वास्तव!
अल्पज्ञानी, अल्पबुद्धी, अल्पशक्ती, अल्पजीवी माणूस असल्याने मला जेवढा अनुभव आला, जेवढे ज्ञान मिळाले तेवढेच मर्यादित मी बोलू व लिहू शकतो. माझ्या अल्पज्ञानातून व अल्पबुद्धीतून मला ज्ञात झालेली पृथ्वीवरील जगातील वास्तवे तीन आहेत.
पहिले वास्तव हे की, जगात विविध मानव समुदायांचे विविध धर्म, धम्म आहेत. धर्म हे देव आस्तिक तर धम्म हे देव नास्तिक असा फरक आहे. अनेक देव आस्तिक धर्मांच्या अनेक देवदेवता, अनेक धर्मसमजूती व अनेक धर्मपरंपरा आहेत. बुद्धीला पटो अगर न पटो या सर्व आस्तिक धर्मांचा व नास्तिक धम्मांचा आदर करणे हे अपरिहार्य आहे. त्यांच्यावर टीका, टिप्पणी करणे धोक्याचे आहे कारण लोकांची भावनिक, बौद्धिक पातळी सारखी नसते. याच लोकांत आपल्याला रहायचे आहे हे वास्तव आहे.
दुसरे वास्तव हे की, या जगातील आर्थिक संपत्ती व राजकीय सत्ता ही काही ठराविक भांडवलदार व राजकारणी मंडळींकडे एकवटलेली आहे. सर्वसामान्य माणसांचे एकूण आर्थिक संपत्तीतील भागभांडवल व एकूण सत्तेतील वाटा नगण्य आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेतही हीच गोष्ट चालू आहे. लोकांचे राज्य ही लोकशाहीची संकल्पना एक मिथ्यक आहे. वास्तव भलतेच आहे. नीट अभ्यास व निरीक्षण केले तर दिसून येईल की सर्वसामान्य माणसे ही पिढ्यानपिढ्या मूठभर भांडवलदार व मूठभर राजकारणी लोकांची गुलाम होऊन किड्या मुंग्यांचे जीवन जगत आहे. शिक्षणाने यात काहीही फरक पडलेला नाही. अशिक्षित व सुशिक्षित अशी दोन्ही सर्वसामान्य माणसे कायम मूठभर भांडवलदार व मूठभर राजकारणी मंडळींची गुलाम आहेत. शिक्षणाने त्यांना गुलामगिरी तून मुक्त केलेले नाही. साम्यवादी देशांतही राजसत्ता काही ठराविक मूठभर राजकीय लोकांच्या हातातच एकवटलेली असते. त्यामुळे तिथेही मूठभरांची हुकूमशाही व सर्वसामान्य जनतेची गुलामगिरी चालू आहे.
तिसरे वास्तव हे की, जगातील सर्व सजीव, निर्जीव पदार्थ परिवर्तनशील म्हणजे नाशिवंत व तात्पुरत्या काळा पुरते आहेत. त्यांची कोणतीही एक अवस्था कायम नाही. त्यामुळे या पदार्थांचाच सजीव भाग असलेला माणूस सुद्धा नश्वर, नाशिवंत आहे. नैसर्गिक जीवनचक्रात अडकलेले मनुष्य जीवन नाशिवंत असल्याने तात्पुरते आहे. त्यामुळे जीवनातील इच्छा आकांक्षा, राग लोभ, सुख दुःखे या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. तरीही या जगात जन्म घेतल्यावर जीवनाचे भोग हे भोगावेच लागतात व जीवनातील त्रास, यातना या सहन कराव्याच लागतात व शेवटी मृत्यूचा स्वीकार हा करावाच लागतो.
मनुष्य जीवनाची वरील तीन वास्तवे ही सरळस्पष्ट वास्तवे आहेत. त्यांत बदल करणे हे कोणत्याही एका माणसाच्या हातात नसल्याने त्यांचा निमूटपणे स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही.
-©ॲड.बी.एस.मोरे, १४.३.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा