भौतिकतेच्या आहारी गेलेला माणूस आध्यात्मिक शांती शोधतोय?
विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली असे म्हणतात. तेव्हापासून हे विश्व प्रसरण पावतेय. या प्रसरणाचा एक भाग म्हणजे पृथ्वीवरील निर्जीव व सजीव पदार्थ सृष्टीची उत्क्रांती. बुद्धिमान माणूस हा सृष्टी उत्क्रांतीचा वरचा टप्पा.
बुद्धिमान माणसाची बुद्धी अचानक निर्माण झाली नाही. तीही अनेक आव्हाने, संकटे झेलत उत्क्रांत झाली व अजूनही होत आहे. प्रचंड मोठ्या विश्वाचे अंतराळ विज्ञान व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या सृष्टीचे विज्ञान हे एकसारखे नाही. अंतराळ विश्व व पृथ्वीवरील सृष्टी या दोघांची बेरीज म्हणजे निसर्ग असे ढोबळ मानाने म्हणता येईल.
निसर्ग व निसर्गाचे विज्ञान हे वास्तव आहे कारण ते प्रयोग, अनुभव व पुरावे यातून सिद्ध करता येते व ते सिद्ध झालेय. तसे परमेश्वराचे नाही. परमेश्वर हा मानवी बुद्धीचा तार्किक अंदाज आहे. निसर्ग आहे, निसर्गाचे विज्ञान आहे मग नक्कीच त्याच्या मागे कोणती तरी महान दैवी शक्ती असली पाहिजे व ती महाशक्ती म्हणजे परमेश्वर हा तर्क. हा तर्क पुराव्याने सिद्ध करता येत नाही.
माणूस उत्क्रांत होत होता तेव्हा व आताही वैज्ञानिक व तांत्रिक दृष्ट्या खूप प्रगत झाल्यानंतर सुद्धा मानवी जीवनातील संकटे, आव्हाने, स्पर्धा, अशांती, भीती या गोष्टी चालूच आहेत. त्यामुळे मानवी मन तर्कावर आधारित असलेल्या परमेश्वराचा आधार शोधते.
पण परमेश्वराचा आधार खरंच किती जणांना मिळतो? तो सर्वांना समान मिळतो का? असमान मिळत असेल तर त्याची कारणे कोणती? या अशा तार्किक प्रश्नांतून अनेक कल्पना मानवी मनाने निर्माण केल्या. मुळात परमेश्वर हाच तर्कावर आधारित. मग त्याचा आधार असमान म्हणून पुन्हा अनेक तर्कवितर्क. गतजन्माचे संचित (प्रारब्ध) ही अशीच एक कल्पना. स्वर्ग व नरक या सुद्धा कल्पना आहेत. या सर्व कल्पना असल्याने त्या पुराव्याने सिद्ध करता येणे शक्यच नाही. स्वतः परमेश्वर कोणालाही पुराव्याने सिद्ध करता आला नाही व येणार नाही. फक्त तर्कावर आधारित भावनिक श्रद्धा परमेश्वरावर ठेवायची. पण याच श्रद्धेचे जेव्हा अंधश्रद्धेत रूपांतर होते तेव्हा ते खूप त्रासदायक होते.
पिढ्यानपिढ्या काही अंधश्रद्धा पुढे ढकलल्या गेल्या व मानवी मनात रूतून बसल्या. त्या बाहेर काढून फेकून देण्याची हिंमत करण्यासाठी वास्तव काय व आपण करतोय काय याचा सारासार विचार करता आला पाहिजे. पण कोणाला वेळ आहे असा विचार करायला? एकीकडून डोंगर फोडून इमारती बांधल्या जात आहेत तर दुसरीकडून समुद्राच्या खालून रस्ता (टनेल) काढला जात आहे. यात परमेश्वराला कुठे शोधत बसायचे? तंत्रक्रांती ते अर्थक्रांतीच्या विकास प्रवासाने भयंकर गती धारण केलीय व भयानक स्पर्धा, भयाण अशांतता निर्माण केलीय.
विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक जीवनशैलीने शरीराला थोडा आराम मिळतही असेल पण मनाचे काय? मन प्रचंड अस्थिर, अशांत व भयभीत झालेय त्याचे काय करायचे? मग आध्यात्मिक शांती मिळवायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी मंदिरात जावे तर तिथेही भक्तांची भयाण गर्दी. हे भक्त त्या मंदिरात देवापुढे उभे राहून देवाचे ध्यान कमी व भौतिकतेचाच विचार जास्त करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी कसली आध्यात्मिक शांती मिळणार?
आध्यात्मिक शांती सोडा साधी शांती मिळावी म्हणून शेतात एखाद्या मोठ्या दगडावर जाऊन शांत बसावे तर तिथेही खालून विंचू, साप येतील की काय याची भीती. जंगलात झाडाखाली जाऊन बसावे तर हिंस्त्र प्राणी हल्ला करण्याची भीती. इतकी ही भौतिकता भयानक, भयंकर भितीदायक आहे जिचा निर्माता कोण तर स्वतः परमेश्वर आणि त्याच परमेश्वराकडे संकटमुक्तीची, शांतीची प्रार्थना करायची? पटतात का या गोष्टी बुद्धीला?
विश्व प्रसरण पावतेय आणि भौतिक गोष्टींच्या हव्यासाचे शेपूट वाढतच चाललेय. ते कोणी रोखू शकणार नाही. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ताही मनुष्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोडीला आलीय. या भागीदारीतून भौतिकता हाहाकार माजवणार हे नक्की. भौतिकतेच्या भस्मासूराला परमेश्वर रोखू शकेल काय? तो रोखेल तेव्हा रोखेल पण तोपर्यंत आपणच स्वतःच्या भौतिक वेडाला रोखले पाहिजे. आपण जर स्वतःच आपल्या भौतिक मागण्या कमी केल्या व आजूबाजूला भौतिक विकासाचा जो धिंगाणा चाललाय त्यापासून स्वतःला जास्तीतजास्त अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला तर आध्यात्मिक शांती नाही मिळाली तरी थोडी साधी शांती तरी मनाला जरूर मिळेल.
-©ॲड.बी.एस.मोरे, २८.३.२०२४