https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

विश्वास पुरावा मागतो, पण श्रद्धा पुरावा मागत नाही!

विश्वास पुरावा मागतो, पण श्रद्धा पुरावा मागत नाही!

निसर्ग म्हणजे पदार्थ विश्वाचा पसारा आणि विज्ञान म्हणजे निसर्गातील विविध पदार्थांच्या विविध गुणधर्मांचे ज्ञान व त्यांच्या गुणधर्मीय हालचाली प्रेरित व नियंत्रित करणाऱ्या विविध कायदेनियमांचे ज्ञान.

निसर्ग व निसर्गाचे विज्ञान मानवी इंद्रियांना दृश्य व मानवी मेंदूला आकलनीय आहे. पण निसर्गाच्या व निसर्ग विज्ञानाच्या मागे असलेली प्रेरणे मागील महाप्रेरणा व शक्ती मागील महाशक्ती मानवी इंद्रियांना अदृश्य आहे व मानवी मेंदूला अनाकलनीय आहे. ती महाशक्ती अदृश्य व अनाकलनीय असल्याने तिच्या विषयी मानवी मनाला नेहमी कुतूहल व जिज्ञासा आहे. पण ती महाशक्ती अदृश्य व अनाकलनीय असल्याने कुतूहल, जिज्ञासेने तिचे कितीही संशोधन केले तरी ती मूर्त, स्पष्ट होत नाही.

मग त्यातून मानव समाजात दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे या महाशक्तीचा पुरावा मिळत नसल्याने ती अस्तित्वातच नाही असे म्हणून मोकळा होणारा नास्तिक समूह व दोन म्हणजे ही महाशक्ती अस्तित्वात आहे यावर श्रद्धा ठेवून तिलाच परमेश्वर मानून तिची भक्ती व प्रार्थना करणारा आस्तिक समूह. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विश्वास पुरावा मागतो पण श्रद्धा पुरावा मागत नाही.

निसर्गातील सुप्त महाशक्ती ही अदृश्य व अनाकलनीय असल्याने तिच्यावर श्रद्धा असली तरी तिची भक्ती व प्रार्थना कशी करावी या प्रश्नाचे उत्तर मानवी मनाला मिळत नाही. म्हणून हे उत्तर देणारे अनेक आध्यात्मिक धर्म जगात निर्माण झालेत. पण हे सर्व धर्म मानवनिर्मित असल्याने त्यांच्यात एकवाक्यता नाही. कारण शेवटी या सर्व धर्मांचा निर्माता कोण तर मानवी मेंदूच ज्याला परमेश्वर नावाची महाशक्ती कायमच अनाकलनीय राहिली आहे. तरीही परमेश्वरावर तर्कभावनिक श्रद्धा असल्याने आस्तिक माणूस परमेश्वर भक्ती व प्रार्थनेची एखादी सोपी व मनाला भावणारी पद्धत एखाद्या धर्मातून उचलतो व तिचे श्रद्धेने पालन करतो.

©ॲड.बी.एस.मोरे, १.५.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा