https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ३ मे, २०२४

कायदेशीर आचरणात आध्यात्मिक देवभावना!

कायदेशीर आचरणात आध्यात्मिक देवभावना!

हिंस्त्र प्राण्यांना उदात्त देवत्वाची किंवा उदार माणुसकीची भाषा कळत नाही. त्यांना त्यांच्याच हिंस्त्र भाषेत उत्तर द्यावे लागते. अशा हिंस्त्र वृत्तीचा नाश करण्याची शिकवण फौजदारी कायदा देतो. अशी हिंस्त्र वृत्ती काही माणसांत सुद्धा असते. हिंस्त्र प्राण्यांप्रमाणे अशा काही हिंस्त्र वृत्तीच्या माणसांचाही बंदोबस्त निसर्गात अस्तित्वात असलेल्या या फौजदारी कायद्याने सुज्ञ, सुजाण माणसांना करावा लागतो. निसर्गात जशी गोड फळे निर्माण होतात तशी कडू फळेही निर्माण होतात. ती तशी का निर्माण होतात हे निसर्गाला ठाऊक. पण गोड फळांचा आस्वाद घेण्यासाठी जसा तालबद्ध दिवाणी देवाणघेवाणीचा कायदा निसर्गात अस्तित्वात आहे तसा कडू फळांचा नाश करण्यासाठी विनाशकारी फौजदारी प्रतिकाराचा कायदाही निसर्गात अस्तित्वात आहे. मानवी शरीरात असलेली प्रतिकारशक्ती हा या फौजदारी कायद्याचाच एक भाग आहे. नैसर्गिक न्यायतत्वांनी युक्त असलेले निसर्ग नियम हा विज्ञानाचा प्रमुख भाग (गाभा) आहे. निसर्ग कायद्याच्या या गाभ्यात डोकावले तर त्यात निसर्ग धर्म दिसतो. जर निसर्गाच्या मुळाशी व निसर्गाच्या गाभ्यात परमेश्वर आहे असे मानले तर मानवी मनात निसर्ग धर्माविषयी आध्यात्मिक देवभावना जागृत होते. याच आध्यात्मिक देवभावनेतून मला हिंदू धर्मातील विष्णू व लक्ष्मी दैवते दिवाणी कायद्याची प्रतिके वाटतात तर शंकर व पार्वती दैवते फौजदारी कायद्याची प्रतिके वाटतात. प्रतिके ही प्रतिकात्मक असतात. निसर्गात परमेश्वर आहे असे मानले की ही देवप्रतिके जवळची होतात. पण माझ्या मते या देवप्रतिकांची पूजा अर्चा निसर्ग धर्माच्या नैसर्गिक आचरणातून केली पाहिजे. म्हणजे नैसर्गिक न्यायतत्वांनी युक्त निसर्ग नियमांचे पालन करून म्हणजे निसर्ग कायद्यानुसार वागून केली पाहिजे. असे कायदेशीर आचरण आध्यात्मिक देवभावनेने करण्यात मला काही गैर वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे "हरहर महादेव" गर्जना करीत आध्यात्मिक देवभावनेनेच माणुसकीच्या शत्रूंवर तुटून पडत हा इतिहास विसरता कामा नये.

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.५.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा