https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १४ मे, २०२४

परमेश्वर निसर्ग रचनेत व मानवी जीवनात ढवळाढवळ करीत नाही!

परमेश्वर त्याच्या निसर्ग रचनेत व माणसांच्या जीवनात ढवळाढवळ करीत नाही!

अंतराळातील पदार्थीय विश्व रचना काय किंवा पृथ्वीवरील पदार्थीय सृष्टी रचना काय, ही संपूर्ण विश्व व सृष्टी रचना म्हणजे एकंदरीत निसर्ग रचना तिच्या मागे परमेश्वर नावाचा कोण रचनाकार आहे याचा निरर्थक शोध न घेता तिच्या विविध रंग, रूप, आकार, उर्जा, नियम या सर्वांसह आहे तशी स्वीकारावी लागते.

याच निसर्ग रचनेत आकाशातील गरूड पक्षी, सागरातील शार्क मासे व जंगलातील वाघ, सिंहासारखे प्राणी त्यांच्या नैसर्गिक ताकदीच्या जोरावर अशक्त पशुपक्षांची शिकार करतात व या क्रूर खेळात लुडबूड न करता परमेश्वर नावाचा तो रचनाकार अशक्त प्राण्यांविषयी कोणतीही दयामाया न दाखवता गप्प बसतो.

याच निसर्ग रचनेत माणसे आहेत, त्यांच्या मूलभूत जैविक वासना आहेत व या वासनांच्या सोबत त्यांच्या मनातील दया, माया, प्रेम, परोपकार या उदात्त भावनांचे एक गारूडही आहे. पण या गारूडाला डोक्यावर घेऊन किती नाचायचे हे या गारूडासोबत असलेल्या मानवी बुद्धीलाच ठरवावे लागते. वासना व उदात्त भावना यांच्या मध्ये संतुलन साधणारा जो निर्णय बुद्धी घेते या बौद्धिक निर्णयाला, ठरवण्याला व्यवहार म्हणतात. परमेश्वर नावाचा तो रचनाकार माणसांच्या जैविक वासना, उदात्त भावनांचे गारूड व त्यांच्या बौद्धिक व्यवहारामध्ये पडत नाही. माणसांना दिलेल्या बुद्धीवर सर्वकाही सोडून तो गप्प बसतो.

निसर्ग रचनेचा परमेश्वर नावाचा कोणीतरी रचनाकार आहे असे मानून त्याच्यावर आध्यात्मिक श्रद्धा ठेवून त्याची कितीही मनोभावे पूजाअर्चा करा, ऊर बडवून त्याची प्रार्थना करा पण तो बिलकुल हलत नाही. त्याने निर्माण केलेल्या निसर्ग रचनेत व माणसांच्या जीवनात तो ढवळाढवळ करीत नाही. हे वास्तव काहींच्या बुद्धीला कळते पण वळत नाही. 

-©ॲड.बी.एस.मोरे, १५.५.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा