https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ५ मे, २०२४

वृद्धापकाळाची आचारसंहिता!

वृद्धापकाळाची आचारसंहिता!

वृद्धापकाळी वयपरत्वे आकसलेल्या शरीराच्या मांसपेशी व नसांमुळे वृद्ध शरीराची हालचाल मंदावलेली, संथ झालेली असते पण त्याचबरोबर मेंदूत साचलेल्या आयुष्यभराच्या आठवणींमुळे, आयुष्यातील अनेक खटाटोपीतून मेंदूत जमा झालेल्या प्रचंड मोठ्या माहिती साठ्यामुळे व विविध माध्यमांतून मेंदूवर सतत आदळणाऱ्या बातम्यांमुळे मेंदूची वैचारिक हालचाल जोरात चालू असते. थोडक्यात थकलेले, संथ झालेले शरीर व धावणारे मन अशी माणसाची वृद्धापकाळी त्रासदायक द्विधा अवस्था असते.

या द्विधा अवस्थेवर मात करणे ही वृद्धापकाळात माणसाची कसोटी असते. बाल्यावस्था व तारूण्यातील माणसाच्या शारीरिक व मानसिक गरजा व वृद्धापकाळातील शारीरिक व मानसिक गरजा यात खूप फरक असतो. आकसलेल्या शरीराला सैल करणारा हलका फुलका शारीरिक व्यायाम व धावणाऱ्या मनाला आवर घालणारा आध्यात्मिक शांतीचा मानसिक व्यायाम या दोन प्रमुख गोष्टी या वृद्धापकाळाच्या दोन प्रमुख गरजा असतात.

जगाच्या भौतिक चक्रात अडकून त्यातच रूतलेल्या व आपण जगात किती मोठे आहोत हे दाखवण्याची हौस बाळगून त्या भौतिक नशेत अडकलेल्या माणसांची कर्णकर्कश ओरड कमीतकमी ऐकणे व या माणसांचा धांगडधिंगी अचकट, विचकट नाच कमीतकमी बघणे या दोन गोष्टी वृद्ध माणसांनी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. भौतिक जगाच्या धिंगाण्या पासून स्वतःच्या शरीर व मनाने पूर्ण अलिप्त ठेवणे शक्य नसले तरी या धिंगाण्यापासून स्वतःला जास्तीतजास्त लांब ठेवणे हीच वृद्धापकाळातील शारीरिक विश्रांती व आध्यात्मिक शांती होय.

थोडक्यात काय तर, आकसलेल्या मांसपेशी, नसा सैल करणारा हलका फुलका शारीरिक व्यायाम व भौतिक जगाच्या दंगामस्तीत, धिंगाण्यात ओरडून नाचण्यासाठी धावणाऱ्या वेड्या मनाला आवर घालून त्याला सूक्ष्म अवस्थेत आणून त्या अवस्थेत स्थिर करणारा आध्यात्मिक शांतीचा मानसिक व्यायाम या दोन गोष्टी हीच वृद्धापकाळाची आचारसंहिता आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.५.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा