https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ३१ मे, २०२४

माणूस निसर्गाच्या जास्त जवळ!

तंत्रज्ञान व सामाजिक कायदा हे निसर्ग विज्ञानाचेच भाग, माणूस निसर्गाच्या जास्त जवळ!

निसर्गाच्या मूलभूत साधनसंपत्तीचा मानवाकडून दोन प्रकारे वापर केला जातो. एक म्हणजे जसा आहे तसा मूळ नैसर्गिक वापर व दोन म्हणजे सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापर. या सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापराला तंत्रज्ञान असे म्हणतात. निसर्गाच्या साधनसंपत्तीचे हे दोन्ही प्रकारचे मानवी वापर हे निसर्ग विज्ञानाचे भाग आहेत. निसर्गाच्या साधनसंपत्तीचा जसा आहे तसा मूळ नैसर्गिक वापर हा निसर्ग विज्ञानाचा भाग आहे हे समजायला जास्त बुद्धी चालवायची गरज नाही. पण या साधनसंपत्तीचा सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापर अर्थात तंत्रज्ञान हा सुद्धा निसर्ग विज्ञानाचाच भाग आहे हे मान्य करावेच लागेल. कारण तो तसा नसता तर निसर्गाने मानवाच्या माध्यमातून तंत्रज्ञान हे अस्तित्वातच येऊ दिले नसते. निसर्ग विज्ञानात निसर्ग पर्यावरणीय शिस्त अंतर्भूत असल्याने ती मूलभूत नैसर्गिक शिस्त तंत्रज्ञानात सुद्धा समाविष्ट आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मालकी हक्काचे व त्या संपत्तीच्या मूळ नैसर्गिक व सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापराचे आंतरमानवी सामाजिक वाटप व देवाणघेवाण सामाजिक शिस्तीने व सामाजिक बंधनाने करण्याची सुधारित मानवी पद्धत किंवा प्रक्रिया म्हणजे सामाजिक कायदा. हा सामाजिक कायदा सुद्धा निसर्ग विज्ञानाचाच भाग आहे. तो जर निसर्ग विज्ञानाचा भाग नसता तर निसर्गाने मानवाच्या माध्यमातून सामाजिक कायद्याची निर्मिती होऊच दिली नसती. निसर्ग विज्ञानात निसर्ग पर्यावरणीय शिस्त अंतर्भूत असल्याने ती मूलभूत नैसर्गिक शिस्त सामाजिक कायद्यात सुद्धा समाविष्ट आहे.

पृथ्वीवर निसर्गाने उत्क्रांत केलेला माणूस ही पृथ्वीवरील निसर्गाच्या पर्यावरणीय साखळीत/उतरंडीत (इकाॕलाॕजिकल पिरॕमिड) सर्वात वरच्या टोकाची निसर्ग निर्मिती होय. या माणसाला निसर्गाने एवढी प्रचंड बुद्धिमत्ता का दिली व मूळ निसर्ग विज्ञानातच त्याच्यासाठी तंत्रज्ञान व सामाजिक कायद्याची सोय करून का दिली हे त्या निसर्गालाच माहित. मात्र यावरून एक तार्किक अनुमान काढता येते की मनुष्य प्राणी हा निसर्गाला सर्वात जास्त प्रिय प्राणी आहे. पण या लाडोबाने निसर्गावरच कुरघोडी केली तर मात्र निसर्ग या लाडोबा माणसाला त्याचा जबरदस्त इंगा दाखविल्याशिवाय राहणार नाही. माणूस निसर्गाच्या जास्त जवळ आहे हे मात्र नक्की!

-©ॲड.बी.एस.मोरे, १.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा