प्रदूषण, प्रदूषण आणि प्रदूषण!
पर्यावरण संरक्षण कायद्यात जल, वायू, ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या तरतूदी आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ, हरित न्यायालय यंत्रणा याच कायद्याच्या भाग आहेत. खरं तर वनस्पती व मानवेतर पशुपक्षी निसर्गात प्रदूषण करीतच नाहीत. अतीशहाणा माणूसच त्याच्या नको त्या उद्योगामुळे निसर्गात विविध प्रकारचे प्रदूषण करतो. निसर्गाच्या विविधतेत या मानवनिर्मित विविध प्रदूषणाची भर पडलीय व जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतसे हे मानवनिर्मित प्रदूषण वाढत गेले व ते वाढतच आहे. जंगली प्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण करणे काय, किंवा मानवी निवासस्थानांसाठी व औद्योगिक कारखान्यांसाठी जंगले जाळून, डोंगर फोडून पर्यावरणाचा नाश करणे काय, हे सर्व उद्योग म्हणजे प्रदूषणाचे उद्योग. हे प्रदूषण नको त्या मानवी उद्योगामुळे होत असल्याने त्याचे औद्योगिक प्रदूषण असे नामकरण केले पाहिजे. हे औद्योगिक प्रदूषण जल, वायू, ध्वनी प्रदूषणाच्या पलिकडे गेलेय. रात्रीचा वाढत चाललेला मानवनिर्मित प्रखर प्रकाश हा प्रकाश प्रदूषणाचा नवीन प्रकार. रस्त्यावरील वाहतूक कोंडी काय किंवा दृष्टीस पडणाऱ्या मानवी वर्तनाचे इतर भयंकर प्रकार काय, हे सर्व दृष्टी प्रदूषणाचे प्रकार. मानवी प्रदूषणाचा पुढचा विचित्र प्रकार म्हणजे मानवी विचार प्रदूषण. समाजात धार्मिक, वांशिक, जातीय, भाषिक, प्रांतिक द्वेष पसरवणारे संकुचित मानवी विचार हे तर समाज स्वास्थ्य बिघडवणारे भयंकर विचार प्रदूषण होय. हे सर्व अनैसर्गिक व म्हणूनच बेकायदेशीर होय. उलट्या बुद्धीचा बेअक्कल माणूस स्वतःच्या फालतू, बेकायदेशीर विचार, वर्तनाला रोखण्यासाठी स्वतःच कायद्याची निर्मिती करतो आणि पुन्हा स्वतःच तो कायदा मोडतो आणि वर पुन्हा स्वतःच्या कुशाग्र, तीक्ष्ण बुद्धीचा टेंभा मिरवतो. काय म्हणावे या मानवी मूर्खपणाला?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा