सूक्ष्मातून सूक्ष्माकडे!
एका सूक्ष्म कणाच्या महास्फोटातून (बिग बँग थिअरी) विश्वाची निर्मिती झाल्यावर विश्व प्रसरण पावत गेले व विश्वाचा पसारा वाढत गेला व तो वाढतच आहे असा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. आकुंचित विश्वाकडून प्रसारित विश्वापर्यंतचा विश्वाचा हा प्रवास अलौकिक आहे. पण प्रसरण पावलेल्या अशा या विश्वाचा उलट प्रवास (रिटर्न जर्नी) सुरू होऊन हे विश्व पुन्हा आकुंचित होत जाऊन त्याच्या मूळ सूक्ष्म कणात जाऊन बसेल का याविषयी निश्चित सांगता येत नाही. परंतु सूक्ष्मातून पुन्हा सूक्ष्माकडे या अगोदर सुलट्या व मग उलट्या प्रवासाचा अनुभव सजीव सृष्टीतील सर्वच सजीवांना घेता येतो व म्हणून तो माणसालाही घेता येतो.
पुरूष बीज व स्त्री बीज यांच्या एका छोट्या संयुक्त थेंबातून मनुष्याचा जन्म होतो. हा जन्म म्हणजे सूक्ष्म कणातून झालेली मानवी जीवन विश्वाची झालेली निर्मिती. हळूहळू बालपण, तरूणपण व प्रौढावस्था ही मानवी जीवनाची चढती कमान म्हणजे मानवी जीवन विश्वाचे चढते प्रसरण. पण त्यानंतर उतार वय सुरू होऊन मानवी जीवन विश्व आकुंचित होत जाते.
मनुष्याची वृद्धावस्था हा सूक्ष्मातून पुन्हा सूक्ष्माकडे नेणाऱ्या उलट्या जीवन प्रवासाचा एक त्रासदायक अनुभव आहे. या अनुभवात शरीर व मेंदूची हालचाल, सक्रियता मंदावते. आयुष्यभर साठवलेल्या ज्ञान व अनुभवाचा साठा वृद्धापकाळात मेंदूला जड होतो. मेंदूची उतरकळा शरीरालाही लागू होते. मेंदू बरोबर शरीरही जड व संथ होत जाते. उतार वयात मेंदू पूर्वीसारखा अनेकविध गोष्टींकडे सहजपणे लक्ष देऊ शकत नाही. अर्थात एकाच वेळी समरसता व एकाग्रता साधणे मेंदूला कठीण होऊन जाते. मग संपूर्ण आयुष्यभर जमवलेल्या अनेक गोष्टी वृद्ध मेंदूला त्रास देत राहतात. त्यातून आवश्यक तेवढ्या निवडक गोष्टीवरच लक्ष देण्याचा वृद्ध मेंदू प्रयत्न करतो. तरीही बऱ्याच वेळा अशा निवडक छोट्या गोष्टी सुद्धा परिपक्व वृद्ध मेंदूला पूर्वीसारख्या झेपत नाहीत.
मनुष्याचे सरासरी वय (आयुष्यमान) साधारण ६५ ते ७० वर्षे असले तरी काही माणसे ८०, ९० व नव्वदीच्या पलिकडेही जगतात. यात निसर्गाचा काहीसा दुजाभाव असला तरी तो चमत्कार नसतो. ते अनुवंशशास्त्र व जैविक विज्ञान आहे. अशाप्रकारे वय लांबणे म्हणजे मनुष्य जीवनाचा सूक्ष्मातून सूक्ष्माकडे जाण्याचा उलट प्रवास थोडासा लांबणे. अशाप्रकारे लांबलेल्या आयुष्यात अशा काही तुरळक माणसांची शारीरिक व मेंदू सक्रियता लांबलेली दिसते. परंतु त्रासदायक उलट प्रवासाच्या विचित्र अनुभवातून सर्वांनाच जावे लागते. तिथे निसर्ग दुजाभाव करीत नाही. प्रसरणातून आकुंचनाकडे उलट चाललेल्या या त्रासदायक प्रवास अनुभवाचा शेवट माणसाच्या मृत्यूने होते. सूक्ष्मातून सुरू झालेला मानवी जीवनाचा प्रवास अशाप्रकारे शेवटी सूक्ष्मातच संपतो. शेवटी काय तर सगळं शून्य!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा