https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ७ मे, २०२४

अंथरूण पाहून पाय पसरावेत?

अंथरूण पाहून पाय पसरावेत?

निकोप स्पर्धा म्हणजे काय? आंतर मानवी स्पर्धा निकोप असावी म्हणून आंतरमानवी स्पर्धेचे सामाजिक नियमन करणारा कायदा माणसांनी निर्माण केला. हा स्पर्धा नियमन  सामाजिक कायदा प्रामाणिकपणे पाळून प्रामाणिक स्वकष्टाने यश मिळवणे ही खूप कठीण गोष्ट आहे. प्रामाणिक कष्टाळू माणूस भ्रष्टाचारी माणसाबरोबर काय स्पर्धा करणार? गरीब, अशक्त माणूस श्रीमंत, सशक्त माणसाबरोबर काय स्पर्धा करणार? कसली समानता प्रस्थापित केलीय मानवनिर्मित सामाजिक कायद्याने? सामाजिक कायदा बनवणाराही माणूस, त्याची अंमलबजावणी करणाराही माणूस आणि तो कायदा तोडणाराही माणूस? कसे बरे यश मिळेल या कायद्याला? पण कायदा तर यशस्वी झालाच पाहिजे. मग काय करायचे? यावर उतारा म्हणून मानव कल्याणकारी माणसांनी या कायद्याची एकमेकांना तपासून संतुलन साधणारी व्यवस्था (चेक अँड बॕलन्स सिस्टीम) निर्माण केली. पण सामाजिक कायद्याअंतर्गत काम करणारी ही व्यवस्था एकमेकांवर चेक अँड बॕलन्स नियंत्रण ठेवणारी होण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करणारी व्यवस्था झालीय. त्यातून या व्यवस्थेत सावळा गोंधळ निर्माण होऊन कायद्याची ही व्यवस्था भ्रष्ट झाल्याचे दिसत आहे.

कायद्याच्या या सावळा गोंधळात सर्वसामान्य माणसांचे काही खरे नाही. सर्वसामान्य माणसांनी मोठ्या लोकांच्या मोठ्या स्पर्धेचा खेळ या खेळात भाग न घेता लांबून बघावा अशीच परिस्थिती आहे. फार मोठा गाजावाजा करीत दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकशाहीतील महान राजे, सरदारांच्या निवडणुका हा असाच सत्ता स्पर्धेचा मोठा खेळ आहे ज्याला लोकशाहीचा महोत्सव असे काही लोक संबोधतात. हा खेळ सर्वसामान्य जनतेला लांबून बघावा लागतो. सर्वसामान्य मतदार या नात्याने या स्पर्धेतील त्यातल्या त्यात बऱ्या वाटणाऱ्या काही राजे, सरदारांना मतदान करणे एवढेच या सामान्य लोकांच्या हातात (वोटिंग मशीनचे इच्छा बटन दाबणाऱ्या बोटात) असते. या राजे, सरदारांच्या भाषणांना टाळ्या वाजवा नाहीतर समाज माध्यमावर टीका टिप्पणी करीत बसा या राजे, सरदारांना या सामान्य जणांच्या सामान्य गोष्टींचा तसा काहीच फरक पडत नाही. ही सर्वसामान्य माणसे राजकारणावर बोलून एकतर तोंडाची वाफ वाया घालवतात किंवा राजकारणावर लिहून त्यांचे लिखाण कचरा कुंडीत घालवतात. कारण शेवटी लोकशाही राजकारणातले (हुकूमशाहीचे तर बोलूच नका) सर्व राजे, सरदार हे एकाच माळेचे मणी (सारख्याला वारखे) असतात. या महान राजे, सरदारांच्या मक्तेदारीला सर्वसामान्य माणसे त्यांच्या वास्तव बोलण्याने किंवा लिहिण्याने काही प्रभाव टाकू शकत नाहीत. कारण राजे, सरदार लोकांवर थोडाफार प्रभाव टाकू शकणारी पारंपरिक माध्यमेही या राजे, सरदारांची हुजरेगिरी करण्यात स्वतःला धन्य मानतात. सामान्य जणांना व्यक्त होण्यासाठी समाज माध्यम रूपाने जे एक व्यासपीठ मिळालेय तिथेही राजे, सरदारांची मार्केटिंग टीम घुसून धुमाकूळ घालत आहे. ही समाजमाध्यमी हुजरेगिरीही लोकशाहीतील राजकारण खेळावर बराच प्रभाव पाडत आहे. खरं तर, या समाज माध्यमावर सर्वसामान्य नागरिक कोण व राजे, सरदारांची तळी उचलणारे हुजरे कोण हेच कळेनासे झालेय.

पाच वर्षानंतर येणारी औपचारिक मतदान प्रक्रिया सोडून सर्वसामान्य माणसांचा लोकशाही राजकारणावर कितीसा प्रभाव पडतो हा मोठा संशोधनाचा विषय आहे. या धूर्त राजकारणी लोकांच्या नादी लागून सर्वसामान्य माणसे स्वतःच स्वतःला शिव्या देत आपआपसात उगाच का भांडत बसतात हेच कळत नाही. सामान्य जणांच्या आपआपसातील या भांडणावरच धूर्त राजकारणी मंडळी सत्तेची पोळी भाजून घेतात.

अशा वातावरणात सामान्य जणांच्या ज्ञान, बुद्धीचा आवाका कितीही मोठा असला व इच्छा आकांक्षांची धाव कितीही जोरात असली तरी त्यांनी त्यांच्या शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक (धर्म व जातपात) इत्यादी मर्यादा नीट ओळखून त्या मर्यादांच्या आत राहणे योग्य होय. समाजातील महान राजे, सरदार ही असामान्य माणसे होत. अशा असामान्य माणसांना अपवाद म्हणून स्वीकारले की अपवादाचे अनुकरण करण्याचा मोह होत नाही.  यालाच अंथरूण पाहून पाय पसरणे असे म्हणतात. याला दुसरी म्हणही लागू होते ती म्हणजे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सर्वसामान्य माणसांना सरडा म्हणताना वाईट वाटते. खरं समाजातील महास्वार्थी धूर्त, भ्रष्ट मंडळीच रंग बदलणारे सरडे होत. पण मर्यादेच्या कुंपणासाठी सामान्य जणांसाठी सरड्याची धाव कुंपणा पर्यंत ही म्हण वापरावी लागतेय. पण कुंपणानेच शेत खाल्ले तर बिचाऱ्या सरड्यांनी कुठे जावे?

-©ॲड.बी.एस.मोरे, ७.५.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा