https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २६ मे, २०२४

व्यवहारात चुकीला माफी नाही!

व्यवहारात चुकीला माफी नाही!

निसर्ग व्यावहारिक आहे तसा मानव समाजही व्यावहारिक आहे. निसर्ग व समाज व्यवहारांमध्ये नैतिकतेचे व आध्यात्मिकतेचे प्रमाण किती याचा बारीक शोध घेतल्यास ते अत्यल्प असल्याचे दिसून येईल. खरं तर, कायदा आध्यात्मिक किंवा नैतिक नसून व्यावहारिक आहे. नैसर्गिक व्यवहारांचे निसर्ग नियम जसे निसर्गाने घालून दिले आहेत तसे सामाजिक व्यवहारांचे समाज नियम समाजाने घालून दिले आहेत. निसर्ग व समाज नियमांचा एकत्रित संच म्हणजे कायदा. अर्थात कायद्यात निसर्ग कायदा व समाज कायदा अशा दोन्ही कायद्यांचा समावेश होतो.

एखादा माणूस आध्यात्मिक दृष्ट्या कितीही देवश्रद्ध व पापभिरू असेल व नैतिक दृष्ट्या कितीही नीतीमान व निष्पाप असेल पण तो जर निसर्ग व समाज व्यवहाराच्या दृष्टीने मूर्ख असेल तर त्याला निसर्ग व समाज माफ करीत नाही. निसर्ग व्यवहारात निसर्ग कल्याण व निसर्ग सुरक्षितता हे कायद्याचे दोन उद्देश असतात तसे समाज व्यवहारात समाज कल्याण व समाज सुरक्षितता हे कायद्याचे दोन उद्देश असतात. कायद्याच्या या उद्देशांना बाधा आणणारे कोणतेही कृत्य हे बेकायदेशीर असते म्हणजेच ते अव्यावहारिक असते. माणसाच्या आध्यात्मिकतेला व नैतिकतेला जर कायद्यात एवढे महत्व असते तर देवश्रद्ध व नीतीमान माणूस कितीही अव्यावहारिक वागला तरी निसर्ग व समाज दोघांनीही त्याला उदार मनाने माफ केले असते. पण तसे नाही. व्यावहारिक चुकीला कायद्यात माफी नाही अर्थात व्यवहारात चुकीला माफी नाही.

पण व्यवहार शिकवणारा व व्यवहार बंधनात ठेवणारा निसर्ग व समाज कायदा खरंच किती लोकांना आवडतो? मुळात जनावरे असोत की माणसे, त्यांना बंधनात राहणेच आवडत नाही. त्यांना मुक्त जीवन हवे असते. म्हणून तर संधी मिळाली की स्वार्थी माणूस त्याच्या क्षणिक स्वार्थासाठी कायदा तोडायला तयार असतो. सगळ्याच माणसांचा हा सर्वसाधारण कल असतो. पण सर्वसामान्य माणसे याबाबतीत घाबरून मागे राहतात व बेरकी माणसे याबाबतीत पुढे जातात एवढाच काय तो फरक. याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावहारिक चूक करणारा सर्वसामान्य माणूस नेहमी कायद्याच्या कचाट्यात अगदी सहज सापडतो व त्याची लवकर सुटका होत नाही. धनदांडग्या, बेरक्या लोकांचे तसे नसते. तरीही कायदा कोणालाच सोडत नाही. तो कोणी मोडला की मग कोणी कितीही मोठा असो कायदा त्याला त्रास देतोच.

असा हा जबरदस्त व्यावहारिक कायदा स्वैर स्वातंत्र्याचे मुक्त जीवन जगू इच्छिणाऱ्या व बेरक्या लोकांना नकोसा वाटतो. म्हणून तर कंपनी संचालकांना प्राॕडक्शन मॕनेजर, मार्केटिंग मॕनेजर, आर्थिक हिशोब सांभाळणारे चार्टर्ड अकौंटंट ही व्यवस्थापक मंडळी उत्पादक माणसे वाटतात तर कंपनी व इतर कायद्यांचे व्यवस्थापन करणारा कंपनी सेक्रेटरी व कंपनीला कायदेविषयक सल्ला देणारा वकील हे कायदा तज्ज्ञ या भांडवलदार लोकांना कामात उगाच अडथळा आणणारी अनुत्पादक माणसे वाटतात. या भांडवलदार मंडळींचे काय घेऊन बसलात पण सर्वसामान्य माणसे सुद्धा वकिलाला फी देऊन वकिलाच्या माध्यमातून व्यावहारिक करार, दस्तऐवज करण्याचे टाळतात व असले मसुदे संगणकात साठवून बसलेल्या कायद्याचे अर्धवट ज्ञान असलेल्या टपरीवरील एखाद्या टायपिस्ट कडून कायद्याचे करार, दस्तऐवज स्वस्तात करून घेतात आणि मग पुढे ही मंडळी कशात अडकली, फसली की वकिलाकडे रडत येतात. 

लक्षात ठेवा, कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. व्यवहार ज्ञान म्हणजेच कायद्याचे ज्ञान. व्यवहारी बना याचा अर्थ कायदेशीर वागा. तुम्ही कितीही देवधर्म करा, कितीही मोठे समाजकार्य करा, हल्लीच्या समाज माध्यमावर कितीही मित्र संख्या वाढवा व समाज माध्यमावर कितीही समाजप्रबोधक लेखन करा जर तुमच्या मूर्खपणातून तुमच्या कडून एखादी जरी व्यावहारिक चूक झाली तर तुमची वाहवा करणारी मंडळी, मित्र इतकेच काय तुमच्या अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा तुमच्या जवळपासही फिरकणार नाहीत. बाकी अशा प्रसंगात बाहेरचा समाज तर तुमच्या आयुष्याच्या चिंधड्या उडवायला टपूनच बसलेला असतो. कारण व्यवहारात चुकीला माफी नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.५.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा