https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २७ मे, २०२४

व्यवस्था बदलता येत नाही, तिच्यात काही सुधारणा करता येतात!

व्यवस्था बदलता येत नाही, तिच्यात काही प्रमाणात सुधारणा करता येतात!

निसर्गाची मूळ व्यवस्था कायम तीच आहे व अनंत काळापासून ती आहे तशीच चालू आहे. मानव समाज हा निसर्गाचाच भाग असल्याने समाज व्यवस्था ही सुद्धा निसर्ग व्यवस्थेचा भाग आहे. याच तर्काने मूळ निसर्ग व्यवस्था जर बदलता येत नसेल तर मूळ समाज व्यवस्था कशी बदलता येईल? जर मूळ निसर्ग व समाज व्यवस्था बदलताच येत नसेल तर ती आहे तशी स्वीकारण्याशिवाय पर्याय रहात नाही. हे वास्तव स्वीकारताना मूळ व्यवस्थेतील आभासी बदलाचे जे माकड चाळे, ज्या माकड चेष्टा व ज्या मंत्रचळी कृती काही लोकांनी चालवल्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सुज्ञपणा होय. या माकड चाळ्यांत, माकड चेष्टांत व मंत्रचळी कृतीत सुज्ञ माणसाने प्रत्यक्ष सोडा पण अप्रत्यक्ष सुद्धा भाग घेऊ नये. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत त्यांना कौतुकाचा असो की टीकेचा कोणताच प्रतिसाद देऊ नये.

मूळ निसर्ग व समाज व्यवस्था जरी बदलता येत नसली तरी माणसाने त्याची बुद्धी नीट वापरली तर याच मूळ व्यवस्थेचा माणसाला त्याच्या सोयीनुसार वापर करता येतो किंवा तिचे नीट व्यवस्थापन करता येते. याला व्यवस्थेतील सुधारणा असे म्हणता येईल. या सुधारणा काही प्रमाणातच करता येतात. प्रत्येक माणूस आपआपल्या वैयक्तिक बुद्धी व परिस्थितीनुसार त्याच्या स्वतःच्या सोयीसाठी, फायद्यासाठी अशा मर्यादित सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत असतो. हा प्रयत्न स्वतःपुरता म्हणजे स्वार्थी असतो आणि म्हणून तर एक माणूस दुसऱ्या माणसाला स्वतः विकसित केलेली बौद्धिक तंत्रे, क्लृप्त्या सांगत नाही. यालाच तर धंद्याची गुपिते (बिझिनेस सिक्रेट्स) असे म्हणतात.

स्वतःपुरता स्वार्थ याचा व्यापक अर्थ स्वतःचे कुटुंब, स्वतःचे नातेवाईक, स्वतःचा समाज, स्वतःचे राज्य व स्वतःचे राष्ट्र असा हळूहळू वाढत जातो. माणूस त्याच्या बुद्धीने मूळ निसर्ग व समाज व्यवस्थेत स्वतःच्या सोयीसाठी ज्या तांत्रिक, सामाजिक सुधारणा करतो त्या सुधारणा जर मूळ व्यवस्थेच्या मूलभूत ढाच्याला, रचनेला घातक असतील तर अशा सुधारणा सामाजिक कायद्याने रोखल्या पाहिजेत नाहीतर विनाश अटळ आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.५.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा