साचेबंद निसर्ग, रटाळ जीवन!
ग्रह ताऱ्यांच्या पदार्थीय विश्वालाच मी निसर्ग म्हणतो. हा पदार्थीय निसर्ग ठराविक साचेबंद वैज्ञानिक नियमांनी यंत्रवत हालचाल करतो म्हणून मी त्याला साचेबंद यंत्र म्हणतो. या यंत्राच्या हालचालीची यंत्रणा किंवा व्यवस्था हिचा एक ठराविक साचेबंद नमुना (मॉडेल) आहे. या यंत्राच्या व या यंत्रणेच्या साचेबंद पणामुळे (तोच तोच पणा) हे यंत्र रटाळ झाले आहे व त्याची यंत्रणा रटाळवाणी झाली आहे. या साचेबंद नमुन्याच्या यंत्रात व त्याच्या यंत्रणेत आमूलाग्र बदल करता येत नाही. हे यंत्र व त्याचा साचेबंद नमुना जवळजवळ जसा आहे तसाच स्वीकारावा लागतो. बौद्धिक तंत्राने त्यात थोडीफार सुधारणा करता येते एवढेच.
खरं तर, मानवी बुद्धीने या साचेबंद पदार्थ वैज्ञानिक विश्व/निसर्ग यंत्रात कौशल्यपूर्ण बौध्दिक व्यवस्थापन व वापराची जी आधुनिक तांत्रिक व सामाजिक पद्धत किंवा व्यवस्था अंमलात आणली आहे ती सुध्दा तिच्या साचेबंद पणामुळे रटाळ झाली आहे. त्यात नाविन्य उरले नाही. रटाळ निसर्ग यंत्रातून मनुष्याने बाहेर काढलेले हे तांत्रिक-सामाजिक पिल्लू सुद्धा रटाळ झाले आहे. जर निसर्गाची मूलभूत रचनाच (बेसिक स्ट्रक्चर) रटाळ आहे तर त्या रटाळ रचनेतून माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर काढून काढून शेवटी काय बाहेर काढणार तर रटाळ पिल्लूच.
साचेबंद निसर्ग-समाज व्यवस्थेतील यांत्रिक रटाळपणा (तोच तोच पणा) घालविण्यासाठी मनुष्याला जशी हास्यविनोदी करमणूकीची गरज भासते तशीच आध्यात्मिक आधार, शांतीचीही गरज भासते. या गरजेचे कल्पनेतून का असेना पण मानसिक समाधान करून घेण्यासाठी मनुष्य प्राण्याने निसर्ग/विश्व यंत्रात परमेश्वर नावाची कोणती तरी महान शक्ती चालक-मालक म्हणून बसलीय असे तर्काने मानून (परमेश्वर एक तार्किक कल्पना?) त्या तर्काधारित ईश्वर शक्तीला भक्तीभाव, भक्तीरसाने जवळ केले व मानव समाजात एक आध्यात्मिक धर्म संस्कृती निर्माण केली. मानव समाजातील अनेक आस्तिक धर्म हे या आध्यात्मिक धर्म संस्कृतीचेच भाग आहेत.
पण ही आध्यात्मिक धर्मसंस्कृती सुद्धा तिच्या कर्मकांडी साचेबंद पणामुळे रटाळ झाली आहे. कितीही परमेश्वर प्रार्थना करा रटाळ निसर्ग व समाज रचनेत/व्यवस्थेत काही बदल होत नाही की काही फरक पडत नाही हे वास्तव माणसाला शेवटी कळतेच. परंतु इलाज नसल्याने मनुष्य प्राणी हा रटाळपणा कसातरी घालविण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न सतत करीत राहतो. अशा प्रयत्नांची सवय लागली की मनुष्य या सवयीचाच गुलाम होऊन जातो. सवय एक अशी जादू आहे की जी कृत्रिम चैनीला सुद्धा नैसर्गिक गरज बनवते. माणसाने अशा कितीतरी निरर्थक कृत्रिम सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत.
-©ॲड.बी.एस.मोरे, २६.४.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा