https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ७ एप्रिल, २०२४

मानवजातीस खरा धर्म व जिवंत परमेश्वर कधी सापडलाच नाही!

मानवजातीस खरा धर्म व जिवंत परमेश्वर कधी सापडलाच नाही!

या जगात निसर्ग नियमांपासून कोणीही मुक्त नाही, स्वतंत्र नाही. ज्यांना आपण परमेश्वराचे अवतार मानतो त्यांना सुद्धा निसर्ग विज्ञानाचे चक्र पार करता आले नाही. त्यांनाही नैसर्गिक भोग भोगावेच लागले व त्यांचाही अंत झाला. दैवी चमत्कार करून त्यांना अमर होता आले नाही. कालानुरूप मंदिरे जीर्ण होतात व त्यांचा जीर्णोद्धार करावा लागतो. देव देवतांच्या मूर्त्यांना कालानुरूप तडे जातात व त्यावर रासायनिक लेप लावावा लागतो. अर्थात ज्या देव मूर्त्यांत आपण परमेश्वर बघतो त्या मूर्त्या निसर्ग नियमांच्या अधीन आहेत. परमेश्वर हा जर निसर्गाचा निर्माता असे मानले तर तो कधीही निसर्गाचा गुलाम असता कामा नये. उलट निसर्गच त्या निर्मात्याच्या म्हणजे परमेश्वराच्या तालावर नाचत राहिला पाहिजे. खरंच नाचतो का निसर्ग परमेश्वराच्या तालावर? खरं तर निसर्ग त्याच्या तालावर नाचतो व इतरांना त्याच्या तालावर नाचवतो. निसर्गाच्या या वास्तवाचा प्रत्यक्ष अनुभव घेत असताना त्याच्या आत असलेला म्हणजे निसर्गाधीन असलेला परमेश्वर वेगळा व त्याच्या बाहेर असलेला म्हणजे निसर्गावर बाहेरून हुकूमत गाजवत असलेला परमेश्वर वेगळा, असे दोन वेगळे परमेश्वर आहेत का हे कळायला मार्ग नाही. निसर्गात जगताना परमेश्वर सुद्धा जिवंत जगता आला पाहिजे. तो प्रत्यक्षात जगता आला पाहिजे, कल्पनेत नव्हे. परंतु मानवजातीस खरा धर्म व जिवंत परमेश्वर कधी सापडलाच नाही. परमेश्वराचे मानले गेलेले देवावतार किंवा प्रेषित यांना जिवंत परमेश्वर मानणे चूक की बरोबर हे मानवी बुद्धीने नीट विचार करून ठरवावे. कदाचित परमेश्वर ही कोणी सर्वशक्तिमान व्यक्ती नसून ती सर्वशक्तिमान निसर्ग उर्जा, निसर्ग शक्ती असावी. ही महाशक्ती हाच निसर्गासह मनुष्य जीवनाचा स्त्रोत असावा? समजा असे जर कदाचित असेल तर मग त्या महाशक्तीची आध्यात्मिक ध्यानधारणा करून तिला जिवंत जगता येईल का? खरं तर एवढया मोठ्या शक्तीला स्वतःत सामावून घ्यायला मनुष्य एवढा सामर्थ्यशाली आहे का? आणि त्या अनाकलनीय महाशक्तीची प्रार्थना करून ती खरंच कोणाला पावत असेल का? हे प्रश्न बुद्धी असलेल्या माणसाच्या मनात निर्माण होणार म्हणजे होणार!

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.४.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा