अध्यात्मातले विज्ञान व विज्ञानातले अध्यात्म!
अणू हा पदार्थाचा लहानातला लहान कण पण या अणुकणाला वस्तुमान/ जागा (मास) प्राप्त करून देणारा एक शक्तिशाली कण अणुकणात असतो त्या कणाला देवकण (हिग्ज बोसॉन/गॉड पार्टिकल) म्हणतात असा शोध पीटर हिग्ज या ब्रिटिश शास्त्रज्ञाने लावला. या शोधामुळे महास्फोटानंतर (बिग बँग) विश्वाची निर्मिती कशी झाली या प्रश्नाचा उलगडा झाला.
याचा अर्थ काय तर प्रत्येक अणुत देवकण आहे म्हणजे प्रत्येक पदार्थ, प्राणी, माणूस यात देवकण आहे. कोणताही पदार्थ त्या पदार्थातील अणुकणांचे वस्तुमान (मास) व त्या पदार्थाची उर्जा/शक्ती (एनर्जी) यांनी बनलेला असतो. अणुकणांच्या वस्तुमानात देवकण व त्याला संलग्न उर्जा/शक्ती असे गणित आहे तर मग अणुकणांना वस्तुमान प्राप्त करून देणाऱ्या देवकणांत वस्तुमान संलग्न उर्जेपेक्षा जास्त ताकदवर चुंबकीय उर्जा असणार असा निष्कर्ष निघतो. देवकणाची ही अधिक ताकदवर चुंबकीय उर्जा पदार्थीय वस्तुमानाला संलग्न असलेल्या उर्जेला जवळ घट्ट पकडून धरत असणार.
याचा अर्थ पदार्थाच्या वस्तुमानाला संलग्न असलेल्या उर्जेपेक्षा अधिक ताकदवर उर्जा पदार्थातील अणुतील देवकणात आहे. म्हणून तर पीटर हिग्ज या शास्त्रज्ञाने त्या शक्तिशाली कणाला देवकण असे नाव दिले. पण मला प्रश्न हा पडलाय की या देवकणात एवढी मोठी ताकदवर चुंबकीय उर्जा कुठून येते? ती तर पदार्थीय वस्तुमान संलग्न उर्जेचा भाग नाही आणि तरीही ती वस्तुमान संलग्न उर्जेपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. यापुढे जाऊन आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी असे म्हणेल की शिव व शक्ती यांनी मिळून हे विश्व बनले आहे असे गृहीत धरावे तर मग शिव हा त्याला संलग्न असलेल्या शक्तीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे असे निष्पन्न होते आणि म्हणून तर शिव हा शक्तीला स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे शक्तिशाली गंगा नदीचा प्रवाह शिवशंकराने स्वतःच्या जटांत बंदिस्त/धारण करून मग हळूहळू त्या नदी प्रवाहाला पृथ्वीवर सोडणे. अशी आख्यायिका हिंदू धर्मशास्त्रात आहे. अध्यात्मात डोकावले की जसे विज्ञान दिसते तसे विज्ञानात डोकावल्यावर अध्यात्म दिसते. माझ्या दृष्टिकोनातून परमेश्वराचे अध्यात्म व निसर्गाचे विज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. पुन्हा शेवटी आणखी एक प्रश्न माझ्या मनात येतो तो हा की परमेश्वर कोणाला म्हणायचे? शक्तीपेक्षा अधिक शक्तिशाली असलेल्या शिवाला की शिवाला संलग्न असलेल्या शक्तीला की शिव व शक्ती या दोघांच्या एकत्रित अस्तित्वाला? विश्वातील महाशक्ती म्हणजे विश्वचैतन्य म्हणजे परमेश्वर असे मी मानत होतो. पण आता पदार्थीय वस्तुमान व देवकणी शक्ती असलेला शिव एकीकडे व वस्तुमान नसलेली नुसतीच महाशक्ती (नुसते शुद्ध चैतन्य) दुसरीकडे असे दोन भाग पीटर हिग्ज यांनी लावलेल्या देवकणाच्या शोधामुळे माझ्यासमोर उभे राहतात. या दोन भागांना एकत्र करून त्या एकत्रित गुणरूपात परमेश्वर कसा बघायचा हाही एक आध्यात्मिक व वैज्ञानिक बुद्धीचा मला पडलेला कठीण प्रश्न!
-©ॲड.बी.एस.मोरे, १२.४.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा