श्री स्वामी समर्थ!
श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांना श्री गुरूदेव दत्ताचा अवतार मानतात. श्री दत्त अवतार हा ब्रम्हा, विष्णू, महेश या तीन प्रमुख देवतांचा त्रिगुणात्मक अवतार. तीन देवतांचे तीन गुण कोणते तर निर्मिती, निर्मित गोष्टींचे पालन पोषण व त्यांचे रक्षण. ब्रम्हाचे कार्य निर्मिती, विष्णूचे कार्य पालन पोषण व महेशाचे कार्य रक्षण आणि ही तिन्ही कार्ये नियमांनी बद्ध आहेत ज्याला आपण विधी लिखित म्हणतो.
वरील तीन गोष्टींत श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द आहेत. श्री या शब्दात बुद्धीदेवता श्री गणेश आहे. अक्कलकोट या शब्दात अक्कल हा शब्द आहे त्याचा अर्थ बुद्धी. कोणत्याही कार्यात सर्वप्रथम बुद्धीचा वापर महत्वाचा. म्हणून प्रथम वंदन असते बुद्धीदेवता श्री गणरायाला. म्हणून आध्यात्मिक प्रार्थनेची सुरूवात श्री गणेशाय नमः अशी करायची. दुसरे वंदन सगळ्या जगाचा स्वामी म्हणजे परमेश्वर, परमात्म्याला. विश्वातील महाशक्ती किंवा विश्वचैतन्य यालाच मी परमेश्वर असे म्हणतो. म्हणून श्री गणेश वंदनेनंतर श्री विश्वचैतन्याय नमः असे म्हणून जगाच्या स्वामीला म्हणजे विश्वचैतन्याला वंदन करायचे आणि मग शेवटी श्री स्वामी समर्थ असे म्हणायचे.
श्री स्वामी समर्थ या तीन शब्दांतील श्री शब्दात गणेश आहे, स्वामी शब्दात जगाचा स्वामी परमेश्वर (महाशक्ती/विश्वचैतन्य) आहे व समर्थ शब्दात सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य बुद्धीदेवता गणेश व जगाचा स्वामी परमेश्वर या दोघांचे आहे. हे सामर्थ्य कर्मयोद्ध्याला कर्मयोग्य फळ देण्याचे सामर्थ्य आहे. चांगल्या कर्माला चांगले फळ पण वाईट कर्माला वाईटच फळ असा त्याचा अर्थ आहे.
म्हणून आपण आपल्या बुद्धीच्या मदतीने व विश्वचैतन्याच्या आधाराने चांगले कार्य करीत असताना त्याचे फळ चांगले मिळावे अशी अपेक्षा करून असे फळ मिळण्यासाठी श्री गणेशा, स्वामी परमेश्वरा तुम्ही तुमचे सामर्थ्य वापरा अशी थोडक्यात प्रार्थना "श्री स्वामी समर्थ" हे तीन शब्द उच्चारून करायची. या तीन शब्दांतील ही अगदी थोडक्यात अशी ईश्वर प्रार्थना आहे. समर्थ म्हटले की पुढे आणखी काही मागायलाच नको कारण योग्य ते कर्मफळ द्यायला श्री स्वामी म्हणजे श्री गणेश व परमेश्वर हे दोघे समर्थ आहेत. पण कर्म जर वाईट असेल तर त्याचे वाईट फळ द्यायलाही श्री स्वामी समर्थ आहेत. वाईट कर्माचे कर्मफळ हे वाईटच मिळणार मग कितीही "श्री स्वामी समर्थ" या तीन शब्दांची प्रार्थना करा. कारण ही सर्व रचना नियमबद्ध म्हणजे विधी लिखित आहे. परंतु चांगले कार्य करताना "श्री स्वामी समर्थ" अशी तीन शब्दांची प्रार्थना केल्याने एक वेगळीच आध्यात्मिक शक्ती मिळते, आत्मबल मिळते.
माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून "श्री स्वामी समर्थ" या तीन शब्दांनी बनलेल्या वाक्याचा आध्यात्मिक अर्थ वरीलप्रमाणे आहे. हाच गहन अर्थ मला श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या प्रतिमेत दिसतो.
श्री स्वामी समर्थ!
-©ॲड.बी.एस.मोरे, १०.४.२०२४ (श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा