https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

अधीनता!

अधीनता!

अधीनता म्हणजे पराधीनता, बंधन, परावलंबन, ताबेदारी. निसर्गातील विविध पदार्थ, प्राणी, माणसे या सर्व गोष्टी निसर्गाच्या अधीन आहेत. या सर्व गोष्टी निसर्गाच्या अधीन आहेत म्हणजे त्या निसर्गातील चैतन्यमय महाशक्तीच्या अधीन आहेत. या चैतन्यशक्तीला परमेश्वर म्हटले तरी चालेल. 

परमेश्वर ही कोणी महाशक्तीमान व्यक्ती नव्हे तर ती निसर्गातील चैतन्यमय महाशक्ती होय. ती या निसर्गातच आहे, निसर्गाच्या बाहेर नाही. या महाशक्तीनेच निसर्गाचे पदार्थीय रूप धारण केले आहे. याचा अर्थ विश्वात अगोदर शक्ती (एनर्जी) व नंतर पदार्थ (मॕटर). पण तरीही शक्ती व पदार्थ (आध्यात्मिक भाषेत आदिशक्ती व शिव) हे दोघे एकमेकांपासून अलग नाहीत. हे विश्व शक्ती व पदार्थ (एनर्जी व मॕटर), शक्ती व शिव यांनी बनलेले आहे. विश्वाला निसर्ग असे मी म्हणतो.

आदिशक्ती ही शिवापेक्षा श्रेष्ठ होय कारण शिव ही तिची निर्मिती होय. निर्मिती ही निर्माणकर्त्या महाशक्ती पेक्षा मोठी होऊ शकत नाही. परंतु मनुष्य त्याच्या तोकड्या भावनेने व तोकड्या बुद्धीने निसर्गातील चैतन्यमय महाशक्तीला विविध देवरूपांत बसविण्याचा प्रयत्न करतो. परंतु असा प्रयत्न हा व्यर्थ असतो कारण निसर्गातील चैतन्यमय महाशक्ती ही महाशक्तीमानच नव्हे तर अनाकलनीयही आहे. तिला एखाद्या महामानवी व्यक्तिमत्त्वात बसवणे चूक आहे. त्या महाशक्तीला कोणत्याही देवावतारात, देवदूत, देव प्रेषितात किंवा महापुरूषात बसवता येत नाही. पण माणूस स्वतःच्या कल्पनेने तसा बळेच प्रयत्न करतो.

निसर्गातील सर्व पदार्थ, प्राणी व माणसे निसर्गाच्या (निसर्गातील चैतन्यमय महाशक्तीच्या) अधीन आहेत म्हणून माणसाने या अधीन पदार्थ, प्राणी, माणसांच्या अधीन रहावे का? अधीन रहाणे व आहारी जाणे यात फरक आहे. अधीन रहाणे म्हणजे शरणागत, गुलाम राहणे व आहारी जाणे म्हणजे वाहवत जाणे किंवा नदी प्रवाहातील ओंडक्या प्रमाणे प्रवाहाबरोबर वाहत जाणे. या दोन्ही गोष्टी मनुष्याने इतर पदार्थ, प्राणी व माणसांच्या बाबतीत नेटाने टाळल्या पाहिजेत. कारण प्रत्येकाची निसर्गातील महाशक्तीपुढे असलेली अधीनता वेगळी आहे. प्रत्येकाची ताकद (स्ट्रेन्ग्थ) वेगळी, प्रत्येकाचा कमकुवतपणा (विकनेस) वेगळा. त्यामुळे कोणी कोणाच्या किती अधीन रहावे याला ठराविक प्रमाण आहे. एखादी महान व्यक्ती जर आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर तिला आदराने वंदन करणे वेगळे आणि तिच्यापुढे सतत शरणागत, गुलामीच्या भावनेने झुकून राहणे वेगळे. निसर्गातील महाशक्तीपुढे झुकून राहणे वेगळे व एखाद्या शक्तिशाली व्यक्तीपुढे झुकून राहणे वेगळे कारण या जगातील कोणतीही व्यक्ती निसर्गातील चैतन्यमय महाशक्ती एवढी मोठी असू शकत नाही. जगात शेरास सव्वाशेर निर्माण होतोच कारण तशीच रचना या चैतन्य महाशक्तीची आहे. म्हणून माणसाने निसर्गातील महाशक्ती सोडून इतर कोणाच्याही अधीन राहू नये मग कोणी कितीही मोठा असो!

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.४.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा