https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
बुधवार, ३ एप्रिल, २०२४
हार्ट ब्लॉक!
मित्रा, तसे काही सिरिएस नाही. फक्त उपयोग होत नसल्याने होमोपॕथी औषधे बंद करून टाकली. तसेही औषधांचे बरेच मेडिकल घोटाळे चालू आहेत दररोज आणि आता डॉक्टरही पूर्वीसारखे राहिले नाहीत. मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणारे झालेत काही तुरळक अपवाद सोडता. निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वराने प्रत्येक माणसाला त्याने नैसर्गिक बुद्धी दिलेली असते. पण तिचा लोक नीट उपयोगच करीत नाहीत. तथाकथित तज्ज्ञ लोक घाबरवून सोडतात. मला तर कार्डिओलॉजिस्टस डॉक्टरांनी पेसमेकर बसवा नाहीतर चक्कर येऊन डोक्यावर पडाल, पायावर पडाल असे सांगितले. मी कसला खमक्या माणूस आहे हे त्यांना माहित नव्हते. पेसमेकर नाही बसवला तर मरणार ना मी, अहो डॉक्टर मी त्याचीच तर आतुरतेने वाट बघतोय. तुम्ही जे काय आता मला सांगितलेय त्याची फी घ्या आणि तुम्हाला सांगतो मेलो तरी पेसमेकर नाही बसवणार. ते होमोपॕथी डॉक्टर स्वतःच काहीतरी द्रवपदार्थ मिक्स करून मला त्यांनी बनवलेली औषधे देत होते. मी त्यांना म्हटले की तुमच्या या औषधांचे घटक मला कळत नाहीत. उगाच होत्याचे नव्हते होऊन जायचे. तेव्हा बाहेरची होमोपॕथी औषधे लिहून द्या. त्यांनी नाही म्हणून सांगितले. मग मीही मला आता तुमची औषधे घ्यायची नाहीत व तुमच्याशी बोलायचेही नाही असे सांगून त्यांना रामराम केला. आता कोणीही मोठा डॉक्टर असो त्याच्या नादी लागायचे नाही असे ठरवलेय. केईएम हॉस्पिटलमच्या दोन गोळ्या एक रक्त पातळ करण्याची व दुसरी कोलेस्ट्राल कंट्रोलची घेत राहणार. खरं या दोन्ही गोळ्यांचा हृदयाचा विद्युत प्रवाह खंडित करणाऱ्या माझ्या हार्ट ब्लॉकवर काही उपयोग नाही. या गोळ्या हृदयात ब्लॉकेजेस होऊ नयेत म्हणून आहेत. ब्लॉक असू दे. त्याला मी माझ्या पद्धतीने सहन करीन. पण आणखी हे ब्लॉकेजेस नकोत म्हणून या एकदम स्वस्तातल्या दोन गोळ्या घेत आहे. मस्त रूबाबात ६७ वर्षाचे आयुष्य जगलोय. आता आणखी कशाला जास्त जगण्याची हौस? जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही हे राजेश खन्नाचे आनंद चित्रपटातील वाक्य माझे एकदम आवडते वाक्य. या व्हॉटसॲप वगैरे समाज माध्यमांचा तसा काही उपयोग नाही. फोनवरून बोलत जाईन तुझ्याशी व जमलेच तर कल्याणला तुझ्या घरी येऊन तुझी भेट घेईन.👍 -बाळू मित्र
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा