https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

मानव समाज हाच मनुष्याचा जवळचा आधार!

मनुष्याला जवळचा आधार मानव समाजाचा, निसर्ग व परमेश्वर हे नंतर!

समाजाची काहीही मदत न घेता किंवा समाजाचा कसलाही आधार न घेता माणूस निसर्गाच्या गाभ्यात म्हणजे निसर्गाच्या विज्ञानात जाऊ शकतो, पण त्याला मर्यादा आहेत. कदाचित निसर्गाच्या गाभ्यात म्हणजे विज्ञानात एकट्यानेच शिरल्यावर माणसाची अवस्था चक्रव्यूहात सापडल्यासारखी होऊ शकते व अशा माणसाला तो चक्रव्यूह भेदून तिथून एकट्यानेच बाहेर पडणे अवघड होऊ शकते.

समाज हे निसर्ग शिकण्याचे, निसर्ग अनुभवण्याचे माणसासाठी एकदम जवळचे माध्यम आहे. निसर्गात परमेश्वर आहे असे मानले तरी तोही निसर्गात कुठे आहे हे कळायलाच मार्ग नाही कारण तो अनाकलनीय आहे. मग त्याच्यापर्यंत वैज्ञानिक व आध्यात्मिक यापैकी कोणत्याही एका मार्गाने किंवा या दोन्ही मार्गांनी पोहोचणे अशक्यच आहे. निसर्ग हा विविध पदार्थीय भागांत व विविध ज्ञान शाखांत विखुरलेला असल्याने तो माणसाला एकदम जवळचा होऊ शकत नाही व परमेश्वर तर निसर्गात कुठे आहे याचा पत्ताच नाही. म्हणून शेवटी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मानव समाज हेच एकदम जवळचे माध्यम आहे व हे जवळचे माध्यम हाच मनुष्याला जगण्यासाठी जवळचा आधार आहे.

निसर्गाचे ज्ञान मिळवायचे तर शाळा व महाविद्यालये या शिक्षण संस्थांचा आधार घ्यावा लागतो. पण शिक्षण संस्थांचा स्त्रोत कोणता तर मानव समाज. या संस्था शेवटी माणसेच चालवतात. म्हणजे शेवटी निसर्गाचे ज्ञान माणसाला माणसांकडूनच घ्यावे लागते. शास्त्रज्ञांनी लावलेले निरनिराळे वैज्ञानिक शोध शाळा, कॉलेजात एकाच ठिकाणी कळतात. माणूस जर शाळा, कॉलेजात गेलाच नाही तर एक एक वैज्ञानिक गोष्ट शिकायला, समजून घ्यायला त्याला किती काळ जाईल? विज्ञानातील बाराखडी शिकण्यातच त्याचे छोटे  आयुष्य कधी संपून जाईल हे त्याला कळणारच नाही.

ही गोष्ट फक्त विज्ञान शिकण्याची आहे. निसर्ग विज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून मनुष्य जीवन  जगण्याची गोष्ट तर आणखी कठीण. ही गोष्ट केवळ आणि केवळ मानव समाजाच्या आधारामुळे शक्य झाली आहे. मग विविध वस्तूंचे उत्पादन करणारे श्रीमंत उद्योगपती असोत की कायदा बनवणारे, राबवणारे धूर्त राजकारणी असोत की न्यायदान करणारे स्वतंत्र न्यायाधीश असोत. परमेश्वराचा अगदी जवळून प्रत्यक्ष आधार मिळणे ही अत्यंत अनिश्चित व दुरापास्त गोष्ट आहे. माणसासाठी प्रत्यक्षात जवळचा आधार हा फक्त आणि फक्त मानव समाजाचा आहे. मग या समाजाला भ्रष्ट समाज म्हणून कितीही नावे ठेवा. आणि मानव समाज तरी शेवटी कशाचा भाग आहे? तो निसर्गाचाच भाग आहे ना! आणि एका तर्कानुसार निसर्गाचा निर्माता कोण आहे तर परमेश्वर आहे. मग भ्रष्ट मानवाला व त्याच्या भ्रष्ट मानव समाजाला भ्रष्ट बनविण्यासाठी कारणीभूत कोणाला धरायचे? फक्त माणसाला व त्याच्या समाजालाच? इथे मुद्दा एवढाच आहे की मानव समाज हा कसाही असला तरी शेवटी तोच मनुष्याचा जवळचा आधार आहे, निसर्ग व परमेश्वर हे नंतर!

खरं तर निसर्गाला व निसर्गातील मानलेल्या परमेश्वराला माणसाने मानव समाजातच बघितले पाहिजे. निसर्ग व त्यातील परमेश्वराला नीट समजून घ्यायचे असेल तर माणसाने माणसाला व मानव समाजाला नीट समजून घेतले पाहिजे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे काही साधु संत म्हणून गेले ते काही उगाच नाही. एकेक माणसाची कलाकुसर बघा, त्याची पाककृती बघा, त्याची औषध निर्मिती बघा आणि अशा कित्येक चांगल्या गोष्टी बघा त्या सर्वात एक नैसर्गिक वैशिष्ट्य दिसेल ज्यात निसर्गाचे आश्चर्य दिसेल, चमत्कार दिसेल व तिथेच परमेश्वर दिसेल. माणूस हा उत्क्रांत झालेला प्राणी असल्याने त्याच्यात जनावरांचे काही वाईट गुण आले आहेत. ते एकदम, अचानक नष्ट होणार नाही. ते वाईट गुण नष्ट होण्याचीही सावकाश, संथ उत्क्रांती प्रक्रिया आहे. तोच संक्रमण काळ सद्या चालू आहे. याच संक्रमण काळाला काही लोक कलियुग असेही म्हणतात. त्याला काहीही म्हणा पण निसर्गाने व त्यातल्या परमेश्वराने माणसाला त्याचा मानव समाज हाच जवळचा आधार दिला आहे ही गोष्ट मान्य करावीच लागेल.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.४.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा