https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

करा कष्ट आणि व्हा नष्ट!

करा कष्ट आणि व्हा नष्ट!

विश्व ज्यालाच मी निसर्ग म्हणतो हे एक प्रचंड मोठे यंत्र आहे ज्यात ग्रह, तारे, विविध पदार्थ एका चक्रात फिरत असतात. पृथ्वी हा याच विश्व यंत्राचा एक भाग जो चक्राकार स्वतःभोवती फिरतो व सूर्याभोवतीही फिरतो. पृथ्वी नावाच्या या चक्रीय यंत्र भागात पदार्थीय सृष्टीचे आणखी एक चक्र प्रस्थापित झालेय, ज्यात पृथ्वीवरील दिवस रात्रीचे, ऋतूंचे, हवेचे, पाऊस पाण्याचे व निर्जीव पदार्थांच्या हालचालीचे चक्र निर्माण झालेय. याच सृष्टी चक्रात पुन्हा विविध प्रकारच्या सजीवांची विविध जीवनचक्रे निर्माण झालीत ज्यांत माणसांचेही एक जीवनचक्र निर्माण झालेय.

माणसांच्या चक्राकार जीवनचक्रात जन्म व मृत्यूच्या मध्ये जे मानवी जीवन आहे ते जगण्याच्या कष्टाने पुरेपूर भरलेले आहे. जीवनाचे भरण पोषण करण्यासाठी कष्ट आणि वर जीवनाचे संरक्षण करण्यासाठी कष्ट आणि ही दोन्ही कष्टे बौद्धिक कष्ट व शारीरिक कष्ट या दोन प्रकाराची. मानवी जीवनाचे भरणपोषण व संरक्षण करण्यासाठी जी साधने आहेत ती मिळविण्यासाठी कष्ट, त्यांचा नीट सांभाळ व व्यवस्थापन करण्याचे कष्ट. कष्टाच्या ना ना तऱ्हा आणि वर पुन्हा रोजचा व्यायाम, दात स्वच्छ घासणे व अंघोळ करणे वगैरे दैनंदिन कष्टे आहेतच दररोज सोबतीला. ठराविक काळापुरती रोजची झोप हीच काय या कष्टाला थोडीफार विश्रांती. इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे कष्ट खूप जास्त आहेत. अती बुद्धीमान असल्याचा हा असा विचित्र परिणाम. जात्यात भरडल्या सारखा मनुष्य आयुष्यभर कष्टच करीत राहतो आणि शेवटी कष्ट करून करून मरतो. कष्टाने जी काही मिळकत कमावलेली असते ती इथेच सोडून जावी लागते. शेवटी काय "करा कष्ट आणि व्हा नष्ट"!

या कष्टकरी जीवनात माणसाला कुठेतरी सतत वाटत असते की विश्व यंत्राचा कोणीतरी निर्माता असावा जो आपल्याला आपल्या कष्टात मदत करेल, कष्टाचे जाते दळू लागेल वगैरे वगैरे. पण ही कल्पनाच राहून जाते. आपल्या कष्टाचे भरड जाते दळायला तो यंत्रनिर्माता (परमेश्वर) प्रत्यक्षात कधी जवळ येऊन बसतच नाही की कधी कुठे दिसतही नाही. तरीही मानवनिर्मित विविध धर्मांनी या परमेश्वराची विविध प्रार्थनास्थळे जगात निर्माण केली आहेत. तिथे जाऊन खरंच परमेश्वर दिसतो का, आध्यात्मिक शांती देतो का हा प्रश्न विचारला की मग आस्तिक समाज अशा चिकित्सक माणसाला चिडून नास्तिक म्हणून हिणवतो. कोणी आस्तिक बना नाहीतर नास्तिक, पण "करा कष्ट आणि व्हा नष्ट" हे वास्तव मात्र कोणाला टाळता येणार नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.४.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा