https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ४ जून, २०२४

आपलं माणूस!

आपलं माणूस!

गाव, तालुका, जिल्हा, शहर, राज्य, देश व जग आणि त्यातल्या जत्रा, रेल्वे स्थानके, बस स्थानके, बागा, सुंदर पर्यटन स्थळे, देवदेवतांची तीर्थस्थळे, प्रार्थनास्थळे या सर्व ठिकाणी असते ती लोकांची गर्दी आणि गर्दी. आपण या गर्दीचा फक्त एक छोटासा भाग आहोत की आपले काही स्वतंत्र अस्तित्व आहे, या गर्दीत आपल्यावर जीव ओवाळून टाकणारे आपलं माणूस किंवा आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी आपली माणसे कोण ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला अर्थ आहे याचा नीट शोध घ्या. या आपल्या माणसांशिवाय या गर्दीत तुम्ही असला काय, नसला काय या गर्दीला काही फरक पडत नाही. या गर्दीतल्या स्वतःचा व आपल्या माणसांचा शोध घ्या. स्वतःसाठी व आपल्या माणसांसाठी आपल्याला जगायचंय हे कायम ध्यानात ठेवा. बाकी सगळं खोटं आहे. या गर्दीतून तुम्ही तुमचे अस्तित्व संपवून बसला किंवा तुमच्यावर अतोनात मायाप्रेम करणारं तुमचं जिव्हाळ्याचे माणूस हे जग सोडून कायमचे निघून गेलं तर जीवनात नुसते एकटेच गर्दीचा भाग बनून जगण्यात अर्थ रहात नाही. म्हणून स्वतःला व स्वतःच्या माणसांना जपा!

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.६.२०२४

सोमवार, ३ जून, २०२४

मर्यादेच्या नैतिक अध्यात्मात स्वर्ग दडलाय!

मर्यादेच्या नैतिक अध्यात्मात स्वर्ग दडलाय!

माझ्या आतापर्यंतच्या अभ्यास व निरीक्षणानुसार लैंगिक वासना, आर्थिक संपत्ती व राजकीय सत्ता ही मानवी स्वार्थाला अतिरेकी बनवून त्या स्वार्थाला अगदी खालच्या नीच पातळीवर घेऊन जाणारी तीन प्रमुख स्वार्थकारणे होत व अहंकार, क्रोध व हिंसा ही या तीन कारणांच्या अतिरेकाची तीन प्रमुख लक्षणे होत.

माझ्या मते, लैंगिक वासना, आर्थिक संपत्ती व राजकीय सत्ता या तीन स्वार्थकारणांना स्वयंस्फूर्तीने मर्यादेत ठेवण्याचा मानवी मनाचा उदात्त ध्यास व प्रयत्न हेच मर्यादेचे नैतिक अध्यात्म होय. मर्यादेचे हे नैतिक अध्यात्म यशस्वी करणे महाकठीण काम आहे व हे काम सर्व माणसांना शक्य होत नाही.

सर्वसाधारण माणूस लैंगिक वासना, आर्थिक संपत्ती व राजकीय सत्ता या तीन प्रमुख स्वार्थकारणांच्या आहारी जाऊन अहंकार, क्रोध व हिंसा या तीन लक्षणांचा शिकार बनतो. तो तसा बनताना स्वतःबरोबर इतरांना उपद्रव करतो. म्हणून मग या तीन लक्षणांना शिक्षेची भीती दाखवून धाकात ठेवणारा धाक बंधन कायदा मानव समाजाला आवश्यक वाटतो. अर्थात मर्यादेचे नैतिक अध्यात्म व्यापक प्रमाणावर समाजात यशस्वी झाले असते तर समाजाला धाक बंधन कायद्याची गरजच भासली नसती.

मर्यादेचे नैतिक अध्यात्म समाजात जेवढे व्यापक प्रमाणावर यशस्वी होत जाईल तेवढ्या प्रमाणात मानव समाजात मायाप्रेम, करूणा, औदार्य या तीन प्रमुख उदात्त भावना फुलत जातील व त्यातून मानव समाज जगण्यासाठी एक स्वर्ग होईल. याचा अर्थ हाच की मर्यादेच्या नैतिक अध्यात्मात स्वर्ग दडलाय.

-©ॲड.बी.एस.मोरे, ४.६.२०२४

मान्सून पाऊस हा निसर्गाचा चमत्कार!

मान्सून पाऊस हा निसर्गाचा चमत्कार!

मान्सून वाऱ्यांचा पाऊस म्हणजे मान्सून पाऊस. हा पाऊस दोन प्रकारचा असतो. एक उन्हाळी मान्सून पाऊस किंवा आगमनाचा पाऊस आणि दोन हिवाळी मान्सून पाऊस किंवा परतीचा पाऊस. उन्हाळ्यात एकीकडे भारत देश व  आसपासच्या प्रदेशातील जमीन खूप तापल्याने त्या जमिनीवरील हवा विरळ होऊन तिथे हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार होतो व दुसरीकडे भारताच्या दक्षिणेकडील हिंदी महासागरातील खारे पाणी तापून त्याची वाफ तयार होते व ती वरवर जाऊन हिंदी महासागरावरील बाष्प युक्त मान्सून वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरावरील हवेच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उन्हाने तापलेल्या भारत व आसपासच्या प्रदेशावरील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे म्हणजे उत्तरेकडे वाहू लागतात. 

हे बाष्पयुक्त मान्सून वारे खालून वर  दक्षिणेकडून (हिंदी महासागराकडून) उत्तरेकडे (भारताकडे) वाहताना त्या वाऱ्यांच्या दोन शाखा तयार होता. एक शाखा असते पश्चिमेकडील अरबी समुद्रातून भारत भूमीवर  घुसण्याची तर दुसरी शाखा असते पूर्वेकडील बंगालच्या उपसागरातून भारत भूमीवर घुसण्याची. या दोन्ही शाखांतून भारत भूमीवर तसेच आसपासच्या प्रदेशावर वाहणारे बाष्पयुक्त वारे आकाशात वर जाऊन थंड होतात व पाण्याचे ढग बनून खाली भारत भूमीसह आसपासच्या प्रदेशावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पाऊस पाडतात व या भारत व आसपासच्या प्रदेशावर हे चार महिने पावसाळा ऋतू निर्माण करतात. 

या चार महिन्यांत दक्षिण-पश्चिम (साऊथ-वेस्ट) दिशेकडून उत्तर-पूर्व (नाॕर्थ-इस्ट) दिशेकडे वाहणाऱ्या नेऋत्य मान्सून पावसामुळे भारत व त्याच्या आसपासची जमीन थंड होते व तिथे हवेच्या जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. तर तिकडे दक्षिणेकडील हिंदी महासागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार होतो. वारे नेहमी हवेच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात व त्यामुळे सप्टेंबर महिन्यानंतर सुरू होणाऱ्या हिवाळ्यात उत्तरेकडील बाष्पयुक्त मान्सून वारे दक्षिणेकडे म्हणजे भारत भूमीकडून हिंदी महासागराकडे उलटे वाहू लागतात व तसे परत जाताना पुन्हा भारत व त्याच्या आसपासच्या प्रदेशावर परतीचा पाऊस पाडतात ज्याला हिवाळी मान्सून पाऊस म्हणतात जो पाऊस भारतात दिवाळी सणातही पडतो. पण हिवाळी किंवा परतीच्या मान्सून पावसाचा जोर हा उन्हाळी (आगमनाच्या) मान्सून पावसापेक्षा खूप कमी असतो. मान्सून पाऊस हा निसर्गाचा चमत्कार आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, विज्ञान अभ्यासक, ३.६.२०२४

शुक्रवार, ३१ मे, २०२४

माणूस निसर्गाच्या जास्त जवळ!

तंत्रज्ञान व सामाजिक कायदा हे निसर्ग विज्ञानाचेच भाग, माणूस निसर्गाच्या जास्त जवळ!

निसर्गाच्या मूलभूत साधनसंपत्तीचा मानवाकडून दोन प्रकारे वापर केला जातो. एक म्हणजे जसा आहे तसा मूळ नैसर्गिक वापर व दोन म्हणजे सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापर. या सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापराला तंत्रज्ञान असे म्हणतात. निसर्गाच्या साधनसंपत्तीचे हे दोन्ही प्रकारचे मानवी वापर हे निसर्ग विज्ञानाचे भाग आहेत. निसर्गाच्या साधनसंपत्तीचा जसा आहे तसा मूळ नैसर्गिक वापर हा निसर्ग विज्ञानाचा भाग आहे हे समजायला जास्त बुद्धी चालवायची गरज नाही. पण या साधनसंपत्तीचा सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापर अर्थात तंत्रज्ञान हा सुद्धा निसर्ग विज्ञानाचाच भाग आहे हे मान्य करावेच लागेल. कारण तो तसा नसता तर निसर्गाने मानवाच्या माध्यमातून तंत्रज्ञान हे अस्तित्वातच येऊ दिले नसते. निसर्ग विज्ञानात निसर्ग पर्यावरणीय शिस्त अंतर्भूत असल्याने ती मूलभूत नैसर्गिक शिस्त तंत्रज्ञानात सुद्धा समाविष्ट आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मालकी हक्काचे व त्या संपत्तीच्या मूळ नैसर्गिक व सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापराचे आंतरमानवी सामाजिक वाटप व देवाणघेवाण सामाजिक शिस्तीने व सामाजिक बंधनाने करण्याची सुधारित मानवी पद्धत किंवा प्रक्रिया म्हणजे सामाजिक कायदा. हा सामाजिक कायदा सुद्धा निसर्ग विज्ञानाचाच भाग आहे. तो जर निसर्ग विज्ञानाचा भाग नसता तर निसर्गाने मानवाच्या माध्यमातून सामाजिक कायद्याची निर्मिती होऊच दिली नसती. निसर्ग विज्ञानात निसर्ग पर्यावरणीय शिस्त अंतर्भूत असल्याने ती मूलभूत नैसर्गिक शिस्त सामाजिक कायद्यात सुद्धा समाविष्ट आहे.

पृथ्वीवर निसर्गाने उत्क्रांत केलेला माणूस ही पृथ्वीवरील निसर्गाच्या पर्यावरणीय साखळीत/उतरंडीत (इकाॕलाॕजिकल पिरॕमिड) सर्वात वरच्या टोकाची निसर्ग निर्मिती होय. या माणसाला निसर्गाने एवढी प्रचंड बुद्धिमत्ता का दिली व मूळ निसर्ग विज्ञानातच त्याच्यासाठी तंत्रज्ञान व सामाजिक कायद्याची सोय करून का दिली हे त्या निसर्गालाच माहित. मात्र यावरून एक तार्किक अनुमान काढता येते की मनुष्य प्राणी हा निसर्गाला सर्वात जास्त प्रिय प्राणी आहे. पण या लाडोबाने निसर्गावरच कुरघोडी केली तर मात्र निसर्ग या लाडोबा माणसाला त्याचा जबरदस्त इंगा दाखविल्याशिवाय राहणार नाही. माणूस निसर्गाच्या जास्त जवळ आहे हे मात्र नक्की!

-©ॲड.बी.एस.मोरे, १.६.२०२४

निसर्ग हे परमेश्वराचे घर!

निसर्ग हे परमेश्वराचे घर!

निसर्ग हे परमेश्वराचे प्रचंड मोठे घर आहे. हे घर कधीही नष्ट होत नाही कारण परमेश्वर कधी नष्ट होत नाही. अर्थात निसर्ग कायम आहे व त्यात असलेला परमेश्वरही कायम आहे. फक्त निसर्ग घरातील सामान कायम त्याच स्वरूपात रहात नाही. विविध प्रकारच्या त्या घर सामानाचे स्वरूप परिवर्तन क्रियेतून सतत बदलत राहते. आपण सर्व माणसे सुद्धा या परिवर्तनशील सामानाचाच एक भाग आहोत. त्यामुळे आपणही सतत बदलत आहोत. कारण परिवर्तन हा परमेश्वरी निसर्ग घराचा नियम आहे. त्यामुळे आपण आपले सामान जोर लावून कायम नीटनेटके ठेवण्याचा व ते तसे नीट राहिलेय का हे परत परत रोखून बघण्याचा मंत्रचळी अट्टाहास सोडायला हवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, ३१.५.२०२४

गुरुवार, ३० मे, २०२४

माता!

व्यभिचारी विवाहबाह्य लैंगिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला कचरा कुंडीत फेकून देणाऱ्या माता बघायला मिळतात व अविवाहितेच्या लैंगिक छळातून जन्माला आलेल्या बाळाला आईचे प्रेम देण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या माताही बघायला मिळतात. मनुष्याच्या  मानसिकतेचा, स्वभावाचा थांगपत्ता लागणे कठीण आहे. -ॲड.बी.एस.मोरे (संदर्भः लोकसत्ता बातमी, दि. ३०.५.२०२४)

न्यायाचे प्रतीक!

आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेले न्यायाचे प्रतीक असलेले रोमन न्यायदेवीचे चित्र बदलून सिंहाचा चेहरा असलेले भारतीय न्यायदेवदेचे चित्र भारतीय न्यायसंस्थेने स्वीकारण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत ते महाराष्ट्रातून बार कौन्सिल आॕफ महाराष्ट्र अँड गोवा च्या माध्यमातून हे विशेष. आम्ही तर रोमन न्यायदेवीचे चित्र बघतच वकिली केली. आता भारतातील नवोदित वकील भारतीय न्यायदेवतेचे हे नवीन प्रतीक बघत वकिली करतील असे दिसतेय. -ॲड.बी.एस.मोरे (संदर्भः लोकसत्ता बातमी, दि.३०.५.२०२४)