https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

डॉली!

डॉली!

आशा जेव्हा कोपर रोड, डोंबिवली (प.) येथे चाळीत रहात होती तेव्हा एक छोटे कुत्र्याचे पिल्लू त्यांनी पाळले होते व त्याचे नाव डॉली होते. कुत्र्याचे आयुष्य साधारण १४ वर्षे असते. पण ती डॉली त्या चाळीत तिच्या बालपणीच म्हणजे ३ महिन्याची असतानाच वारली. त्या डॉलीने आशा, वसंतराव, राजू, बंटीला इतका लळा लावला होता की ती मेल्यावर त्यांना खूप दुःख झाले. मला आठवते ती दुःखद बातमी मला सांगताना राजूच्या डोळ्यांत अश्रू होते.

त्या डॉलीची आठवण जाता जाईना म्हणून बंटीने मुंबईत क्राॕफर्ड मार्केट मध्ये जाऊन डॉली सारखेच दुसरे कुत्र्याचे पिल्लू आणले आणि त्याचे नावही डॉलीच ठेवले. ही डॉली मात्र सुरूवातीला कोपर रोड चाळीत व नंतर बदलापूर फ्लॅट मध्ये पूर्ण आयुष्य जगली. आज दिनांक २८ आॕगस्ट, २०२४ रोजी संध्याकाळी ४ वाजता वयोमानानुसार १२ वर्षाच्या वृद्धावस्थेत (कुत्र्याचे १२ वर्षे म्हणजे माणसाचे ८० वर्षे) तिचे बदलापूर येथे निधन झाले.

ही बातमी मला सिद्धीकडून कळली तेव्हा मला खूप वाईट वाटले. मी संध्याकाळी ७ च्या दरम्यान ट्रेनमध्ये असताना आशा, वसंतराव, राजू, बंटी यांना सारखा फोन करत होतो. पण त्यावेळी वसंतराव, राजू, विनय रिक्षाने डॉलीचा मृत देह बदलापूर व वांगणीच्या मध्ये मोकळ्या मैदानात पुरण्याच्या अंत्यकार्यात मग्न होते. राजूने नंतर मला तसे सांगितले व बंटीने तो कामावर होता असे मला सांगितले.

हे सर्व सविस्तर लिहिण्याचे कारण म्हणजे डॉलीने मला लावलेला लळा. मी कधीतरीच आशाच्या घरी जायचो तेव्हा मी दाराची बेल वाजवली व दार उघडले गेले की मला बघताच ती प्रेमाने भुंकून माझ्याकडे यायची व जोपर्यंत मी तिला माझ्या मांडीवर घेऊन डोक्यावरून हात फिरवत नाही, तिचा गळा गोंजारत नाही तोपर्यंत मला सोडतच नव्हती. खरं तर मागे डोंबिवलीला रस्त्यावर रात्री चालत असताना भटक्या कुत्र्यांनी माझ्या पायाचा चावा घेतला होता. त्यामुळे कुत्र्यांविषयी मला राग व भीती होती. पण आशाच्या डॉली पासून मला बिलकुल भीती वाटत नव्हती. याचे कारण ती सुसंस्कृत होती. भटकी कुत्री ही सुसंस्कृत नसतात कारण त्यांना डॉलीसारखे घरचे मायाप्रेम मिळत नाही. या डॉलीला आशा स्वतःच्या मुलाप्रमाणे जपत होती. स्वतःच्या हाताने तिला घास भरवायची तर वसंतराव, राजू, बंटी हे सर्व ती आजारी पडल्यावर दवाखान्यात नेऊन तिचे औषधपाणी करायचे. थोडक्यात काय तर डॉली ही धनवे कुटुंबाची एक कुटुंब सदस्य झाली होती.

अशी ही प्रेमळ डॉली आज गेली. त्यामुळे नक्कीच आज आशाचे घर सुनेसुने झाले असणार. मी कधीतरी आशाच्या घरी जायचो तर डॉलीच्या सहवासातील ते काही क्षणच मला मायाप्रेमाची एक वेगळीच अनुभूती द्यायचे. डॉली गेल्याने ते काही क्षण आठवून मला जर एवढे दुःख होतेय, वाईट वाटतेय तर आशा, वसंतराव, राजू, बंटी व जवळच राहणाऱ्या सुनिता, सिद्धी, विनय यांना किती वाईट वाटत असेल! माया लावली की जनावरही माणसात येते पण काही माणसे मात्र त्यांची माणुसकी सोडून जेव्हा जनावरांपेक्षाही हिंस्त्र वागतात तेव्हा आश्चर्य वाटते.

डॉलीला भावपूर्ण श्रद्धांजली!

-बाळू, २८.८.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा