https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २९ जून, २०२०

ओम् नमः शिवाय!

ओम् नमः शिवाय!

(१) देशाच्या राज्यघटनेचा आत्मा (मन) त्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत स्पष्ट दिसतो तसा निसर्गाच्या भौतिक, रासायनिक व जैविक रचनेचा आत्मा (मन) त्या रचनेत स्पष्टपणे कुठेच दिसत नाही. निसर्गाचे शरीर दिसते, पण त्याचा आत्मा (मन) दिसत नाही. हीच तर खरी गोची आहे! तसे पाहिले तर मनुष्याला सुध्दा  स्वतःचे शरीर दिसते, पण त्याच्या डोक्याच्या कवटीतील त्याचा मेंदू त्याला कुठे दिसतो? समजा एखाद्या पेशंटच्या जिवंतपणीच त्याच्या कवटीचे अॉपरेशन करताना सर्जनने जर त्या पेशंटचा मेंदू तात्पुरता त्या कवटीबाहेर काढून ठेवला तर त्या मेंदूचे दर्शन त्या सर्जनला होईल, पण पेशंटला होणार नाही.

(२) स्वतःला न दिसणाऱ्या या मानवी मेंदूतच मनुष्याचा आत्मा (मन) असतो. पण मनुष्याला स्वतःचा मेंदूही दिसत नाही व त्यात असलेला स्वतःचा आत्माही (मन) दिसत नाही. तीच गोष्ट  निसर्गाची! आपल्याला निसर्ग दिसतो म्हणजे निसर्गाचे शरीर दिसते पण त्या शरीरातील निसर्गाचा मेंदू दिसत नाही. निसर्गाचा मेंदूच दिसत नाही मग निसर्गाचा आत्मा (मन) कसा दिसणार? माझ्या तर्कानुसार विशाल निसर्गात कुठेतरी निसर्गाचा मेंदू सूक्ष्म स्वरूपात असणार व त्या मेंदूलाच वैज्ञानिक देवांश(गॉड पार्टिकल) म्हणत असणार. वैज्ञानिकांना एकदा का हा देवांश (निसर्गाचा मेंदू) सापडला की मग त्यांना त्यात परमात्मा (निसर्गाचा आत्मा) सापडेल. निसर्गाच्या अशा सूक्ष्म मेंदूला व त्यातील सूक्ष्म आत्म्याला ईश्वर म्हणावे काय? कारण तर्काने तेच निसर्गाचे उगमस्थान धरावे लागेल.

(३) हिंदू धर्मात निर्गुण निराकार परमेश्वराची व या परमेश्वरातून निर्माण झालेल्या ब्रम्हा, विष्णू व महेश या गुणसंपन्न व आकार असलेल्या तीन प्रमुख देवांची संकल्पना आहे. ब्रम्हाकडून निर्मिती, विष्णूकडून निर्मितीचे व्यवस्थापन व महेशाकडून त्या निर्मितीचा लय अशी या तीन देवांची कार्य संकल्पना हिंदू धर्मात आहे. तसेच काहीजण निर्गुण, निराकार परमेश्वराला शिव असे म्हणतात. ईश्वर सत्य है, सत्यही शिव है, शिवही सुंदर है असे एक गीतही सत्यम् शिवम् सुंदरम् या जुन्या हिंदी चित्रपटात आहे. याच शिव संकल्पनेचा संबंध मी तर्काने देवांश (गॉड पार्टिकल) या वैज्ञानिक संकल्पनेशी लावला.

(४) पण या निर्गुण, निराकार शिवाची म्हणजे देवांशाची आराधना, प्रार्थना कशी करायची हा पेच निर्माण झाला. कारण हिंदू धर्मात महेश देवालाच शिवशंकर किंवा महादेव म्हणतात. आता न दिसणाऱ्या निर्गुण, निराकार शिवाची आराधना, प्रार्थना करण्यासाठी मन एकाग्र करायला जावे तर पटकन सगुण व आकार असलेल्या शिवशंकराचीच प्रतिमा (इमेज) समोर येते. हे बहुतेक शिव या नाम साधर्म्यामुळे होत असावे. पण तसे होते हे खरे!

(५) शिवाची आराधना, प्रार्थना करताना "ओम् नमः शिवाय" असे म्हटले जाते. माझ्या मते ओम् म्हणजे शिवाचे अंग किंवा शरीर जे सगुण साकार आहे व त्यालाच निसर्ग, विश्व किंवा सृष्टी म्हणायला हरकत नसावी. आता आपले शरीर व मन हे त्या ओम् म्हणजे निसर्गाचाच भाग आहे. त्या भागाचेच माध्यम घेऊन शिव या निसर्गाच्या देवांशाला आस्तिक म्हणजे कृतज्ञ भावनेने नमः म्हणत नमस्कार करायचा व आध्यात्मिक म्हणजे आत्मिक एकरूपतेच्या
भावनेने शिवाय म्हणत एकरूप (ध्यानस्थ) व्हायचे व अशाप्रकारे शिवाची ध्यानधारणा करायची.

(६) पण प्रश्न असा आहे की शिवाची (मुस्लिम धर्माप्रमाणे अल्लाची किंवा ख्रिश्चन धर्माप्रमाणे गॉडची) आराधना, प्रार्थना केल्याने मनाला एक मोठा मानसिक आधार, मानसिक शांती मिळत असली तरी त्यातून आपल्या शरीराला वेदना देणाऱ्या कोरोनासारख्या विषाणूवर औषध मिळत नाही. म्हणजे मनाची आध्यात्मिक शांती हा शारीरिक व्याधीवर उपाय होऊ शकत नाही. देवावर श्रध्दा असलेल्या धर्माचा उपयोग थोडे नैराश्य दूर करण्यासाठी, मानसिक शांतीसाठी होत असला तरी शारीरिक व्याधीवर मात करण्यासाठी शेवटी निसर्गाच्या (शिवांगाच्या) विज्ञानाचाच आधार घ्यावा लागतो.

(७) पण मग निसर्गाचे म्हणजे शिवांगाचे नियम वैज्ञानिक/नैसर्गिक व प्रत्यक्ष शिवाचे म्हणजे निसर्गाच्या मेंदूचे व त्या मेंदूतील निसर्गाच्या आत्म्याचे नियम धार्मिक/आध्यात्मिक हे कसे? दोन्ही गोष्टी या सारख्याच हव्यात ना! मानसिक शांतीचा संबंध धर्माशी असला तरी शारीरिक आरोग्याचा संबंध विज्ञानाशी असतो ना आणि म्हणून तर कायद्याला विज्ञान व धर्म या दोन्ही  गोष्टींचा एकत्र विचार करावा लागतो.

(८) माझ्या मते, शिव (परमात्मा), अल्ला किंवा गॉड या सर्व संकल्पना निसर्गाच्या मेंदूशी अर्थात देवांश (गॉड पार्टिकल) या वैज्ञानिक संकल्पनेशी जोडायला हव्यात व त्या देवांशाला निसर्गाचे उगमस्थान नाही तर निसर्गाचा राजा समजायला हवे, जसे आपण आपल्या मेंदूला आपल्या शरीराचा राजा म्हणतो.

(९) आपले शरीर व मेंदू यांच्या कार्यप्रणालीत काही फरक आहे का? मग शिव (परमात्मा), अल्ला, गॉड आणि निसर्गाच्या कार्यप्रणालीत कसा फरक असेल? म्हणून आता निसर्ग व देव व तसेच विज्ञान व धर्म यांना एकत्र करण्याची वेळ आली  आहे. निसर्गाचे नियम व देवाचे आदेश या दोन गोष्टी वेगळ्या नसून त्या एकच आहेत. "ओम् नमः शिवाय" या ध्यानधारणेच्या मंत्रात निसर्ग व देव एक होतो म्हणून मी तो मंत्र म्हणतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.६.२०२०


पोलीस आमचे संरक्षक मित्र, पण?

पोलीस आमचे संरक्षक मित्र, पण?

आमच्या घरी पोलीसांची खाणावळ होती. त्यात गिरणी कामगारही होते. त्यामुळे पोलीसांच्या व्यथा व त्रास मला माहित आहे. काही पोलीस तर माझे मित्र आहेत. पण ९९% पोलीस चांगले असले आणि १% पोलीसांनी वाईट वर्तन केले तर अख्खे पोलीस खाते बदनाम होते. या १% लोकांच्या चुका नको का उघड्या पाडायला? वाईट गोष्टी सगळीकडे आहेत. आमच्या वकिली व्यवसायात काय किंवा वैद्यकीय व्यवसायात काय अशा गोष्टी या असतातच व त्यांना चेक करण्यासाठी तर कायदा असतो. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. वाईट ते वाईटच. त्याला वाईट म्हटल्याने चांगले कधी खराब होत नसते. पोलीसांनी माझ्या पोस्टचा गैरसमज करून घेऊ नये. पोलीस व लष्कर हे आमचे संरक्षक आहेत व त्यांना आम्ही नेहमीच आदराने सलाम करतो. जय हिंद!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.६.२०२०

रविवार, २८ जून, २०२०

नवोदित वकील संघटना

फक्त कोर्टात बसून वकिली चालते काय?

(१) माझ्या फेसबुक खात्यावर बरीच वकील मंडळी आहेत. काही ज्येष्ठ वकील आहेत तर काही कनिष्ठ! आजची पोस्ट ज्येष्ठ वकिलांसाठी नाही तर कनिष्ठ वकिलांसाठी आहे. मी १९८८ साली मार्च महिन्यात जेंव्हा वकिली सुरू केली तो काळ व आताचा काळ यात खूप फरक पडला आहे. माझ्या काळात आजच्या सारखी अॉनलाईन वकिली नव्हती. त्यामुळे आजच्या तरूण वकिलांबरोबर मी माझा जुना अनुभव शेअर करावा की नको या विचारात होतो. कारण न्यायदानातही आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वापर सुरू झाल्याने जुने ते आता सोने राहिले नाही. जुनी गोष्ट म्हणजे कालबाह्य झालेली भंगार गोष्ट असा प्रकार झालाय.

(२)  नवोदित वकील माझ्या बाबतीत काय विचार करतील याचा नीट अंदाज न घेता मी हा लेख लिहित आहे. नवोदित वकील म्हणजे वकील किंवा न्यायाधीश घराण्यातून आलेली तरूण वकील मंडळी नव्हेत. त्यांना वकिलीचे बाळकडू घरातूनच मिळालेले असते. माझा रोख आहे तो म्हणजे माझ्यासारख्या गरीब कष्टकरी कुटुंबात जन्म घेऊन मोठ्या मेहनतीने वकील झालेल्या नवोदित वकिलांकडे. अशा गरीब घराण्यातील नवोदित वकिलांची आज परिस्थिती काय आहे याची मला नीट माहिती नाही. ती परिस्थिती बदललेली आहे की ती माझ्या काळासारखीच आजही तशीच आहे हे मला माहित नाही. मी वकील होऊन जवळच्या कोर्टात पहिल्या दिवशी गेलो तेंव्हा वकिलीचा कसलाच प्रत्यक्ष अनुभव नसलेला मी पार भांबावून गेलो होतो. डोक्यात कायद्याचे ज्ञान ताजेतवाने होते. पण मला कोर्टात कोणीही ओळखत नव्हते. बायकोने व मी दोघांनी मिळून खरेदी केलेला नवीन काळा कोट जुन्या बॕगेत घालून मी त्या कोर्टात गेलो व कोर्टाच्या दारातच कायद्याची पुस्तके विकणाऱ्याकडून वकिलाची ती पांढरी गळपट्टी विकत घेतली. मग बार रूमच्या एका कोपऱ्यात एक मोठा आरसा होता त्याच्यासमोर उभा राहून मी ती गळपट्टी कशीबशी गळ्याला बांधली व पांढऱ्या शर्टावर काळा कोट चढवून हळूच एका कोपऱ्यात जाऊन बसलो. माझ्याकडे बघून तिथली वकील मंडळी हा कोणीतरी नवखा वकील दिसतोय याचा अंदाज बांधून माझ्याकडे बघत होती. त्यावेळी मला मराठी चित्रपटातले "कुण्या गावाचं आलं पाखरू" हे गाणं आठवलं आणि मी आणखीनच घाबरून गेलो.

(३) सांगायचे काय की, मी कोर्टात दररोज बाररूममध्ये बसत होतो व न्यायदान कसे चालते हे बघण्यासाठी प्रत्यक्ष कोर्टातही बसत होतो. पण मला कायद्याची कामे मिळत नव्हती व एक पैसाही मिळत नव्हता. दररोज रूबाबात कोर्टात जायचो व हात हलवीत परत यायचो. असे आठ दिवस चालले. मग हळूहळू काही तरूण वकिलांबरोबर बोलून माहिती घ्यायला सुरूवात केली तर कळले की माझ्यासारखे कोर्टात येऊन संध्याकाळी हात हलवीत घरी परत जाणारे बरेच गरीब वकील तिथे आहेत. त्यांना विचारले की, ते दुसरे काही तरूण वकील कसे बिझी दिसतात तर कळले की ती मोठ्यांची पोरं होती. चांगले बस्तान बसलेली सिनियर वकील मंडळी मात्र जाडजूड ब्रिफ्स घेऊन कामात छान बिझी होती.

(४) एके दिवशी हिंमत करून एका सिनियर वकिलाला गाठून विचारले की, "सर मी खूप गरिबीतून वकील झालोय, पण इथे दररोज येऊन मला कसले काम नाही की पैसा नाही, घरी बायको गृहिणी आहे व मुलीला ज्यूनियर के.जी. शाळेत घातलेय, माझे कसे व्हायचे, मी तुमची पुस्तके उचलीन, तुमचे डिक्टेशन घेईन, कोर्टातल्या तारखा घेईन, तुम्ही मला महिन्याचा पगार नाही पण माझ्या कामाचा काही मोबदला पैशात द्याल का"? त्या सिनियर वकिलांना माझी काय दया आली कोण जाणे पण त्यांनी मला दरमहा ५०० रू. मोबदला देऊ केला. तुम्हीच हिशोब करा की १९८८ सालचे ५०० रू. म्हणजे आता २०२० सालचे किती होतील? अशाप्रकारे दरमहा ५०० रूपयावर माझी वकिली सुरू झाली. इतर नवीन वकील मंडळी मात्र त्या दिवसापासून माझ्यावर जळू लागली. हा मागून आला आणि त्या फटकळ सिनियर वकिलाला याने पटवलेच कसे याचे कदाचित त्यांना आश्चर्य वाटले असावे.

(५) आता मी माझ्या वकिलीचा पूर्ण इतिहास इथे सांगत बसत नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की, कोर्ट सुरू होण्यापूर्वी सकाळचे दोन तास त्या सिनियर वकिलांच्या अॉफीसमध्ये काम करायचे, मग कोर्टात जवळजवळ सात तास त्या सिनियरच्या तारखा घेत फिरायचे व मग कोर्ट सुटल्यावर त्या सिनियरच्या अॉफिस मध्ये पुन्हा तीन तास काम करायचे, म्हणजे दररोज बारा तास काम करायचे. शनिवारी तर ते अॉफिस चालू असायचेच पण रविवारी सुध्दा ते सिनियर वकील मला सकाळी तीन तास त्यांच्या अॉफिसात बोलवायचे. एवढी प्रचंड मेहनत करून महिन्याच्या शेवटी ते सिनियर वकील माझ्या हातात ५०० रूपये टेकवायचे. ती तसली कंबरडे मोडणारी मेहनत मी नेटाने तीन महिने केली. त्या तीन महिन्याची कमाई १५०० रूपये. ते सर्व पैसे घरखर्चात संपलेच पण वर बायकोने १००० रूपये कर्ज करून ठेवले. काय करणार होती ती बिच्चारी तेवढ्या तुटपुंज्या उत्पन्नात?

(६) मला कळून चुकले की, ही असली वकिली नक्कीच आपल्याला भिकेला लावेल. मग मात्र  मी ठरवले की नुसते कोर्टात येऊन, सिनियर वकिलाची तळी उचलून काही आपले पोट भरणार नाही व संसारही चालणार नाही. मी बिनधास्त त्या सिनियर वकिलांना रामराम केला व कोर्टाच्या बाहेर जे मोठे जग आहे त्या जगात उडी घेऊन त्या तीन महिन्याच्या माझ्या वकिली प्रॕक्टिसचे सोने केले. निरनिराळ्या सामाजिक संस्था, व्यापारी संघटना यांच्या प्रमुखांची मी धाडस करून प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनाही त्या सिनियर वकिलांना जसे खरे सांगितले तशीच   खरी परिस्थिती सांगितली आणि तिथून सुरू झाली माझी स्वतःची स्वतंत्र वकिली. कोणाचे कसलेही पाठबळ नाही, वकिलीतले मार्गदर्शन नाही, पण तरीही वकील म्हणून मी माझे उत्पन्न थोडे थोडे का असेना पण विविध ठिकाणाहून सुरू केले आणि माझे उत्पन्न दरमहा १५०० रूपये केले आणि तेही कोणत्याही सिनियर वकिलाची हाजी हाजी न करता. मी नुसता कोर्टातच जाऊन बसलो असतो तर मी माझा संसार करीत माझ्या मुलीला एम.बी.ए. पर्यंत शिकवू शकलो असतो का याबद्दल मी साशंक आहे.

(७) मी त्यावेळी लॉयर्स कलेक्टिव्ह कडून प्रेरणा घेऊन ज्यूनियर वकिलांची एक संघटना काढली होती व बार कौन्सिलला पत्र लिहून  प्रत्येक कंपनीत लिगल अॉडिट अनिवार्य करा, मग तिथे ज्यूनियर वकिलांना काम मिळेल वगैरे मागण्या केल्या होत्या. पण बार कौन्सिल कडून मला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. माझे तर आजही असे म्हणणे आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला २४ तास पोलीसांचे स्थानिक  कायदेशीर सल्लागार म्हणून वकिलांची नेमणूक करायला हवी म्हणजे केसला कलमे कोणती लावायची इथून सुरूवात होईल. वकिलांएवढे कायद्याचे सखोल ज्ञान पोलीसांना असू शकत नाही. आय.पी.एस. परीक्षा काय किंवा राज्य पोलीस परीक्षा काय ती म्हणजे एलएल. बी. ची पदवी नव्हे. सरकारी वकील (पी.पी.) कोर्टाचे कामकाज पाहतील व प्रत्येक पोलीस स्टेशनला वेगळे वकील पोलीसांचे दैनंदिन कायदेशीर सल्लागार राहतील. ही सूचना चुकीची कशी यावर आजच्या सक्रिय वकिलांनी मार्गदर्शन करावे.

(८) आणखी एक सूचना मी मागे जाहीरपणे केली होती की, सार्वजनिक रूग्णालये २४ तास चालू असतात, पोलीस स्टेशन्स २४ तास चालू असतात, मग सार्वजनिक न्याय देणारी कोर्टस २४ तास का चालू ठेवीत नाहीत? साठलेल्या केसेसचा भराभर निपटारा होईल, तारीख पे तारीख ही गोष्ट कालबाह्य होईल व सगळ्या वकिलांनाही २४ तास काम मिळेल. पण माझी ही सूचना सरकारच्या पचनी पडेल काय?

(९) आता शेवटचा मुद्दा हा की, सार्वजनिक रूग्णालयातील शिकाऊ डॉक्टर्सना काहीतरी स्टायपेंड मिळतेय की नाही की ते डॉक्टर्स जनतेची फुकट सेवा करतात? मग न्यायदान ही सुध्दा वैद्यकीय सेवेइतकीच उदात्त सेवा आहे हे मान्य करून नवोदित वकिलांना न्यायालयाचे मदतनीस अशी नेमणूक करून त्यांना दरमहा स्टायपेंड देण्यात काय गैर आहे? ही योजना फक्त गरीब कुटुंबातून मोठ्या कष्टाने वकील झालेल्या नवोदित वकिलांसाठीच असावी. आजच्या नवोदित वकील मित्रांनो तुम्ही अॉनलॉईन वकिलीचे मास्टर्स होऊन छान कमाई करीत असाल तर माझ्या या सूचना केराच्या टोपलीत टाका. पण जर तुमची आर्थिक परिस्थिती माझ्या त्याच सुरूवातीच्या काळासारखी आजही असेल तर मग नवोदित वकिलांची स्वतंत्र संघटना निर्माण करून माझ्या या लेखातील सूचनांचा बार कौन्सिल, कायदा मंत्रालय, मुख्यमंत्री व आपले पंतप्रधान या सर्वांकडे नेटाने पाठपुरावा करा. मला त्याकाळी जे जमले नाही ते तुम्ही आता साध्य करून दाखवा.

(१०) पाच वर्षाखालील प्रॕक्टिस असलेल्या नवोदित वकिलांनी राज्य स्तरावरच नव्हे तर देशपातळीवर अशी स्वतंत्र संघटना बांधावी कारण त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांनी तसे करू नये असे जर प्रत्येक कोर्टाच्या बार असोसिएशला वाटत असेल तर सर्व बार असोसिएशनचे राज्य व देश पातळीवर एक फेडरेशन निर्माण व्हावे व या फेडरेशनने नवोदित वकिलांचा प्रश्न हातात घेऊन तो तातडीने सोडवावा. माझा हा लेख जर तुम्हा वकिलांना आवडला असेल तर या लेखाची छायाचित्रे घेऊन किंवा छापील प्रती काढून तुम्ही तुमच्या लेटरहेड वरून त्या प्रती बार कौन्सिल व सरकारकडे पाठवू शकता.

-ॲड.बी.एस.मोरे©२९.६.२०२०

मन मोकळे करा!

मन मोकळे करा!

(१) झाकली मूठ सव्वा लाखाची अशी एक म्हण आहे. पण किती काळ तुम्ही मूठ झाकून ठेवणार? मनाची तगमग सुरू झाली, काही सुचेनासे झाले, परिस्थिती गंभीर झाली की आतल्या आत कुढत बसू नका. बिनधास्त मन मोकळे करा. काही लोक चेष्टा करतील तर करू द्या. तुमची वाईट वेळच तुमचे कोण हे सिद्ध करते. जे लोक तुमचे नसतात तेच तुमची चेष्टा करणार, तुम्हाला खच्ची करण्याचा प्रयत्न करणार. तुमच्या वाईट परिस्थितीत तुमची चेष्टा करणारी अशी वाईट माणसे तांदळातल्या खड्यासारखी बाजूला काढा आणि त्यांना लांब गटारात फेकून द्या. अशा माणसांसाठी तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक गटार तयार ठेवा जिथे अशा माणसांची रवानगी करता येईल. थोडक्यात अशा माणसांना तुमच्या आयुष्यातून कायमचे ब्लॉक करा. पुढे डोक्याला ताप नको. अशा चाळणीतून तुमच्यावर खास प्रेम करणारी माणसे नक्की पुढे येतील जी तुम्हाला आर्थिक नसला तरी मानसिक आधार नक्की देतील.

(२) आता गंमत बघा! माझी बायको, मी माझ्या पैशाने तिच्यासाठी केलेले मंगळसूत्र, कठीण प्रसंगी ते मोडण्यासाठी ती मला सांगते, आम्ही मंगळसूत्र मोडल्यावर कर्ज फिटले या आनंदात राहतोय आणि हे माहित नसलेल्या काही महाभागांना माझ्या बायकोचा कळवळा येतोय. म्हणे मी लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी अशी वैयक्तिक पोस्ट लिहिली. बायकोला हा किस्सा सांगितल्यावर तिने तर डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली की, असेही लोक फेसबुकवर असतात काय आणि ते स्वतःला तुमचे मित्र म्हणवतात. अहो तुम्ही अशा लोकांना ताबडतोब ब्लॉक करून का टाकत नाहीत. कशाला डोक्याला उगाच ताप करून घेता?

(३) आजच एका फेसबुक मित्राचा मला माझ्या व्हॉटसअपवर मेसेज आला. मेसेज काय हे त्या मित्राचे नाव गुप्त ठेऊन सांगतो. "साहेब, खूप बिकट परिस्थिती आलीय, तुमच्याजवळ मन मोकळे केले की बरे वाटते म्हणून सांगतोय. मला काल हे करायचे होते पण करता आले नाही"! कोण आहेत ही माणसे? का वाटतो त्यांना माझा विश्वास! फेसबुकचे जग म्हणे आभासी जग! अरे कोण म्हणते हे आभासी जग? या फेसबुकवर पण जिवंत माणसे आहेत. त्यांनाही मने आहेत. पण खुली होऊ शकत नाहीत. कारण याच फेसबुकवर काही लबाड, ढोंगी मंडळीही आहेत. ही माणसे आभासी जीवन जगत असतात. खोट्या प्रतिष्ठेचे यांना वेड असते. अशा माणसांनी फेसबुकला आभासी जग बनवलेय. मी माझे स्वतःचे सत्य कोणाची पर्वा न करता याच फेसबुकवर उघड केले व आभासी जगाचे रूपांतर सत्य जगात केले. तेंव्हा कुठे मला खरी माणसे याच फेसबुकवर भेटली. याच फेसबुक ने मला मनसे पक्षात बाळूकाका म्हणून ओळख मिळवून दिली. कित्येक मनसैनिक वैयक्तिक पातळीवर माझ्या जवळ आले आणि माझे मित्र  झाले. इतरही लोक माझ्या जवळ आले.

(४) कोणाला जर माझे बिनधास्त मनमोकळे लिखाण आवडत नसेल किंवा पटत नसेल तर त्यांनी मला लगेच ब्लॉक करावे, पण उगाच करायच्या म्हणून काहीतरी कमेंटस करीत बसू नये. त्यांना उत्तर देत बसायचे, वाद वाढवायचा या गोष्टी मला आता ६४ व्या वयात करायच्या नाहीत. मी काय लिहितो, माझी जीवनशैली कशी आहे, माझी विचारधारा काय आहे हे कळायला जास्तीतजास्त माझ्या पाच पोस्टस पुरेशा आहेत. त्याचा एकदा अंदाज आला व त्या गोष्टी पटूच शकत नाही हे एकदा का कळले की मग लांबण लावायची गरजच काय? उगाच वेळ व शक्ती कशाला वाया घालवायची बरे! पटकन मला ब्लॉक करून टाकणे हेच चांगले की नाही. माझे लिखाण ज्यांना आवडते तेच माझ्या बरोबर राहतील ना!

(५) आता एवढे तिखट लिहिण्याचे कारण म्हणजे इथे माणसांचा जीव चाललाय, काही लोक नैराश्येतून आत्महत्या करताहेत आणि मी माझे सत्य लिहून "घाबरू नका, मी लढतोय, तुम्ही पण लढा, आज मंगळसूत्र होते म्हणून मोडले, उद्या नाही म्हणून रडत बसणार नाही, मी वकील आहे वगैरेची बिलकुल पर्वा न करता पोटासाठी याही वयात हातगाडी चालवीन, अंग मेहनतीचे काम करीन पण आत्महत्येचा जराही विचार मनात येऊ देणार नाही, खड्ड्यात गेली ती प्रतिष्ठा, जगणे महत्वाचे" असे सांगून, लिहून आपण सर्वजण एकाच बोटीतून प्रवास करीत आहोत, आपण सर्वच जण समदुःखी आहोत, असा सकारात्मक संदेश देतोय. पण ही गोष्ट समजून न घेता काही महाभाग मी लोकांना माझ्या पोस्टसमधून नकारात्मक संदेश देतोय असे मलाच उलट शिकवत आहेत.

(६) माझे हे असे जाहीरपणे मन मोकळे करणे काही लोकांना आवडत नाही. अशी काही माणसे मलाच सुनावतात की मी माझ्या दुःखाचे जाहीर प्रदर्शन करून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतोय. काय विचित्र बुद्धी आहे यांची! एखाद्या माणसाचे आयुष्य माहित नाही, त्याने आयुष्यात काय खस्ता खाल्ल्यात हे माहित नाही आणि तरीपण त्या माणसाच्या काही पोस्टसवरून त्या पोस्टसचा अर्थ नीट समजून न घेता खुशाल स्वतःचे जजमेंट काढून त्याच्या उभ्या आयुष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचे व त्या माणसाचा पुरता निकाल लावायचा या मानसिकतेला काय म्हणावे? मित्रांनो, मोकळे व्हा म्हणजे वाईट व चांगली माणसे कळतील!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.६.२०२०

शनिवार, २७ जून, २०२०

कोरोनील औषध चाचणी!

रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाची चाचणी करा!

मी वैद्यक शास्त्रातील कोणत्या पॕथीचा समर्थक नाही जसा मी तत्त्वज्ञानातील कोणत्या लॉजीचा समर्थक नाही. कारण कोणतीही पॕथी किंवा लॉजी परिपूर्ण नाही. हे तर जगातील सार्वत्रिक सत्य आहे. मग वैद्यक शास्त्रात ॲलोपॕथीचाच एवढा उदो उदो का? ही ॲलोपॕथी जर एवढी परफेक्ट असती तर तिला कोरोनावर लस शोधून काढायला एवढा वेळ लागलाच नसता. भारतीय वैद्यक शास्त्राचा मूलाधार आयुर्वेद आहे. पण इंग्रज आले आणि त्यांनी नुसत्या आयुर्वेदालाच नाही तर भारतीय संस्कृतीलाच इंग्रजाळून टाकले. या परकीय लोकांनी इथे भारतात ज्या सुखसोयी निर्माण केल्या (ज्याचा काही लोक खूप उदो उदो करतात) त्या त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी निर्माण केल्या. त्यामागे हाच विचार होता की ते जणूकाही भारतात कायम राज्य करणार आहेत. इंग्रज लोकांनी नुसत्या भारतीय साधनसंपत्तीचीच लयलूट केली नाही तर प्राचीन भारतीय शास्त्रांचीही, त्या ज्ञानाचीही लयलूट केली. आयुर्वेदीय ग्रंथ इंग्रजांनी नुसते चाळले नाहीत तर पळवले सुध्दा नसतील का? त्यातील ज्ञान त्यांनी चोरले नसेल का? तेच ज्ञान नव्या स्वरूपात म्हणजे ॲलोपॕथी, होमिओपॕथी मध्ये त्यांनी रूपांतरीत केले नसेल का? इथली बहुसंख्य भारतीय जनता पूर्वीपासून अडाणी ठेवली गेली. भारतातील काही विशिष्ट उच्च वर्गाने खरे ज्ञान तळागाळापर्यंत पोहोचू दिले नाही. तेच काम इंग्रजांनीही इथल्या विशिष्ट वर्गाला हाताशी धरून केले नसेल का? म्हणून तर इंग्रज निघून गेल्यावरही भारतात आयुर्वेदात प्रगती झाली नाही. इंग्रजांनी आयुर्वेदाच्या चिंध्या केल्यावर भारतात शिल्लक राहिलेले आयुर्वेदाचे ज्ञान हे कच्च्या स्वरूपातच राहिले असावे. भारतीयांना इंग्रजाळून टाकल्यावर हेच इंग्रज जे अमेरिकेतही पोहोचले होते त्यांनी ॲलोपॕथीला पुढे आणले. कच्चा माल शुध्द (रिफाईन्ड) करून नवीन स्वरूपात आणला की नुसता चकाकतच नाही तर अधिक गुणकारी होतो. म्हणून रिफाईन्ड ॲलोपॕथी जगाने डोक्यावर घेतली. तिच्यातून ॲलोपॕथीची औषधनिर्मिती करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या निर्माण झाल्या व त्या जगभर सुसाट फोफावल्या. याच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अंतर्गत हितसंबंध जगातील रोगराईच्या निर्मूलनात व त्यातून भरपूर श्रीमंत होण्यात गुंतलेले आहेत. रामदेव बाबांनी कोरोना विषाणूवरील कोरोनील औषध निर्माण करताना वैद्यकीय संशोधन चाचणी प्रक्रियेचे काही तांत्रिक नियम पाळले नसतीलही (नक्की माहित नाही) पण ते जर एवढे ठामपणे या औषधाचा दावा करीत आहेत तर मग आयुर्वेद संशोधन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारा भारत सरकारचा जो आयुष विभाग आहे त्याने रामदेव बाबाचे हे कोरोनील औषध ताब्यात घेऊन स्वतः त्यावर चाचणी का करू नये? ती यशस्वी झाली तर जगात भारताचे केवढे नाव होईल! आणि समजा चाचणी अयशस्वी झाली तर त्याने काय एवढा मोठा फरक पडणार आहे? आपली मागची चांद्रयान मोहीम फसली म्हणून जगाने आपली चेष्टा केली काय? उलट आपल्या प्रयत्नांना त्यांनी दादच दिली ना! मग रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाचे फार तर तसे होईल. पण प्रयत्नच करायचे नाहीत व प्रयत्न करणाऱ्याची चेष्टा करायची ही कोणती मानसिकता? एक फोटो समाजमाध्यमावर फिरतोय त्यात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्पसाहेब हे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना भेटायला येतात तेंव्हा पहिला प्रश्न विचारतात की "कुठे आहेत रामदेव बाबा"? या फोटोतून आपण जगात आपलेच हसे करून घेतोय की नाही? अहो, या कोरोना काळात राजकारण थोडे बाजूला ठेऊन गांभीर्याने वागा ना! रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाची पूर्ण वैद्यकीय चाचणी होऊन त्याचे निष्कर्ष बाहेर आलेच पाहिजेत. आयुर्वेदाला ॲलोपॕथीशी स्पर्धा करण्याची संधी मिळालीच पाहिजे!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.६.२०२०

शुक्रवार, २६ जून, २०२०

२७ जून वाढदिवस!

६४ व्या वयात पदार्पण करताना!

(१) आज २७ जून, २०२० माझा ६३ वा वाढदिवस. म्हणजे मी माझ्या आयुष्याची ६३ वर्षे पूर्ण करून ६४ व्या वर्षात पदार्पण केले. मी जर मोठा साधुसंत वगैरे झालो असतो तर लोकांनी माझा वाढदिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला असता. पण मला आयुष्यात ना साधुगिरी जमली ना गांधीगिरी ना दादागिरी! मी एक तुम्हा सर्वांसारखाच एक सर्वसामान्य माणूस! म्हणून तर मला सरळसाध्या जीवनाचा मस्त, मनमुराद आनंद घेता आला आणि तीच माझी आयुष्याची मजा!

(२) मला वकिलीत जास्त पैसे कमावता आले नाहीत व मग कमी पैशात वृध्दापकाळासाठी बचतही करता आली नाही. जेवढे पैसे कमावले तेवढे संसारात खर्च केले. कधी वाटलेच नव्हते की वृध्दापकाळात कोरोना सारखा बिकट काळ येईल व आपली पुंगी ताईट करील. म्हणून तर मी मेडिक्लेम सुध्दा काढला नाही. माझा एक सरळसाधा हिशोब की, मी किंवा माझी बायको आजारी पडलो तर मग सरळ के.ई.एम. किंवा जे.जे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे आणि सर्वसामान्य माणसांप्रमाणे तिथेच मरायचे. माझे आईवडील पण तिथेच मेलेत. पण माझ्या विवाहित लेकीला माझे हे असले वागणे जराही पसंत नाही. ती सारखी आम्हा नवरा बायकोच्या मागे मेडीक्लेम काढा म्हणून मागे लागलीय. एम.बी.ए. होऊन ती मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक पदावर आहे व त्याच दर्जाच्या मोठ्या कुटुंबात तिचा विवाह झाल्याने माझे हे असले वागणे तिला बिलकुल पसंत नाही. तिने मला आज फोनवरून सरळ सांगून टाकले की आमच्या दोघांचा मेडीक्लेम ती  काढणार म्हणजे काढणारच व त्याचे हप्तेही तीच भरणार. "तुम्ही नेहमी स्वतःचे खरे करीत आलात, आता यापुढे तुम्हाला माझे ऐकावेच लागेल" असे तिने मला फोनवरून बजावले. एकुलती एक मुलगी ती! माझ्या इच्छेप्रमाणे  उच्च शिक्षण घेऊन एम.बी.ए. झाली, करियर मध्ये मोठे यश मिळवले, तसेच छान जोडीदार मिळवला, मग आता तिचे थोडे ऐकलेच पाहिजे म्हणून मी मेडीक्लेमला तयार झालोय. पण मी इकडे काल माझ्या बायकोचे म्हणजे तिच्या आईचे मंगळसूत्र गुपचूप मोडून लॉकडाऊन काळात झालेले बाहेरचे कर्ज फेडलेय हे तिला आईकडून कळले तेंव्हा तिला खूपच वाईट वाटले. "माझे लग्न झाले असले तरी काय झाले, मी तुमचा मुलगाच आहे ना, मग तुम्ही मला पैसे मागायला संकोच का केला, कसला असला स्वाभिमान घेऊन बसलात स्वतःच्या मुलीबरोबर"! असे बरेच काही फोनवरून बोलून तिने आम्हा दोघांनाही निरूत्तर केले. मी जरी बचत करू शकलो नाही तरी मुलीचे हे शब्द म्हणजे मी माझ्या आयुष्यात मिळवलेली खूप मोठी संपत्ती आहे हेच सांगून जातात.

(३) गेल्या ६३ वर्षांच्या काळात माझ्या नुसत्या उच्च शिक्षणानेच नाही तर अनेक प्रकारच्या बऱ्या वाईट अनुभवांनी मला खूप काही शिकवले. नैराश्य आले तरी त्यावर मी माझ्या सकारात्मक विचारांनी मात केली. यात मला माझी बायको, मुलगी, नातेवाईक, काही मोजके मित्र यांनीच नव्हे तर माझ्या काही क्लायंटसनीही खूप मोठी साथ दिली. म्हणून तर बायको गृहिणी, वकिली क्षेत्रात आमचे कोणी आईवडील, बहीण भाऊ नसल्यामुळे या क्षेत्राच्या अंतर्भागाचे ज्ञान शून्य असताना व पिढीजात कौटुंबिक गरिबी असतानाही मी या आव्हानात्मक क्षेत्रात तग धरून राहू शकलो व साधा का असेना पण संसारही करू शकलो.

(४) आयुष्याच्या या अंतिम वळणावर पुन्हा कोरोना महामारीने खूप काही शिकवले. या कोरोना महामारीने जगात सर्वांपुढेच मोठे आव्हान निर्माण केले आहे. मग त्यातून माझी कशी सुटका होणार? मीही त्यात सापडलोय. पण तरीही नैराश्यावर मात करण्यात यशस्वी झालोय. माझे हे तिसरे फेसबुक खाते आहे. पहिल्या दोन खात्यांवर मी दररोज फेसबुक मित्रांचे वाढदिवस बघून त्यांना न चुकता दररोज वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होतो. पण मित्र संख्या वाढत गेली की मग ते दररोज शुभेच्छा देणे जमेनासे झाले. आता या तिसऱ्या फेसबुक खात्यावर मी कोणाचेही वाढदिवस बघत नाही आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत नाही. कधीतरी चुकून होम पेजवर कोणाचा तरी वाढदिवस आहे हे कळले की मग तिथेच कमेंट मध्ये त्याला किंवा तिला शुभेच्छा देऊन मोकळा होतो. लग्नाच्या वाढदिवसांचेही तसेच झालेय. पण माझ्याकडून असे वर्तन घडत असतानाही आज मला फेसबुक मित्रांनी माझ्या खात्यावर व इनबॉक्स मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आणि मला लाजवले. कशा घेऊ मी तुमच्या शुभेच्छा? सद्याचा काळ तर कोरोना विषाणूच्या भीतीचा व कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूचा आहे. म्हणजे वाढदिवस बाजूला ठेवून दररोज आठवणींचा स्मृतिदिन करायचा हा काळ! आपण सर्वच जण सद्या फार बिकट परिस्थितीतून जात आहोत. काही लोकांची आर्थिक परिस्थिती तर खूपच नाजूक झाली आहे. काही घरांत उपासमार चालू आहे. अशा परिस्थितीत तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार करणे मला जड जातेय. तरीही तुम्ही एवढया प्रेमाने मला शुभेच्छा दिल्या आहेत आणि म्हणून तुमचे खूप खूप आभार व मनस्वी धन्यवाद!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.६.२०२०


गुरुवार, २५ जून, २०२०

पुस्तके रद्दीत!

माझ्या पुस्तकांची जागा आता रद्दीत!

विविध विषयांवरील हजारो पुस्तके जमवली, वाचली व शेवटी रद्दीत देऊन टाकली. आता घरात साठलेल्या पुस्तकांची आणखी रद्दी बाहेर काढण्याच्या विचारात आहे. या सर्व पुस्तकांची जागा आता रद्दीतच! एक कोरोना विषाणू जगाला खेळवतोय, नाचवतोय, पण त्याला रोखण्याचा मंत्र किंवा तंत्र जर एकाही पुस्तकात नसेल तर काय करायची ही खंडीभर पुस्तके जवळ ठेवून? मुंबईच्या लोकल्स म्हणे १२ अॉगष्ट पर्यंत बंद ठेवणार! कोणी काढला हा १२ अॉगष्टचा मुहूर्त? मार्च २०२० पासून बंद  ठेवलेल्या लोकल्स आता अॉगष्ट २०२० च्या मुहूर्ताची वाट बघत बसणार. जवळजवळ सहा महिने मुंबईचे व्यवहार ठप्प! सरकारने काय सहा महिने लोकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू फुकट पुरवल्यात? काय नियोजन आहे या लॉकडाऊनचे हे त्या सरकारमध्ये बसून बंदचे आदेशांवर आदेश काढणाऱ्या मंत्र्यांना व अधिकाऱ्यांनाच ठाऊक! सहा महिने नोकरी, धंदा, व्यवसायाशिवाय घरी बसून रहायचे! बापरे, हे काय चाललंय? घरी रहा, कोरोना पासून सुरक्षित रहा आणि उपासमारीने घरातच सुरक्षित मरा, असाच याचा अर्थ होतो ना! सरकारकडे लोकांना जगवण्यासाठी ना अन्न ना लोकांना वाचवण्यासाठी कोरोनाचे औषध, मग कोणत्या आशेने या सरकारकडे बघत रहायचे? मी फक्त महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार विषयीच हे बोलत नाही. जगातील सरकार नावाच्या संपूर्ण व्यवस्थेविषयीच मी हे हतबल मनाने बोलत आहे. कोरोनासारखा एक विषाणू जर जगाला इतका हतबल करू शकतो तर मग मनुष्याच्या इतर प्रगतीला काय अर्थ उरतो? कोरोनाची ही गोष्ट खरोखरच चमत्कारिक आहे! बिहारमध्ये ८० च्या वर लोक वीज पडून मेले अशी बातमी आलीय. मरणाचे संकट जर असे सगळ्या मार्गांनी येत असेल तर मग कोरोनाला घाबरून घरी किती दिवस बसवणार सरकार उपाशी लोकांना? ज्या पुस्तकांवर मी आयुष्यभर जिवापाड प्रेम केले ती सर्व पुस्तके अगदी देवधर्माची पुस्तके सुध्दा आता कोरोना महामारीने रद्दीत जाणार यात बरेच काही आले!

-ॲड.बी.एस.मोरे©२५.६.२०२०