https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

माझ्या वंशाची पणती!

माझी वंशाची पणती!

मला मुलगी हेच प्रथम अपत्य असल्याने मुलगा का नाही म्हणून दुसऱ्या अपत्याचा आग्रह इतर अनेक जणांनी केला. इतकेच काय माझी आई मला म्हणायची की "अरे बाळू, वंशाला एक तरी दिवा असावा"! तेंव्हा माझे तिला एकच उत्तर असायचे की "माझी ही एकच वंशाची पणती असणार पण ती साऱ्या घराबाराला उजळून काढणार"! पुरूषप्रधान संस्कृतीच्या अशा शब्दांपासूनच माझ्या मुलीवर अप्रत्यक्षपणे नकारात्मक प्रवाहांचा (इंग्रजीत निगेटिव्ह वायब्रेशन्सचा) भडिमार सुरू झाला. क्षुल्लक कारणांवरून व काही गैरसमजांतून आम्हा पती पत्नीत वाद, भांडणे होत होती. त्या नकारात्मक वातावरणाचा माझ्या मुलीवर वाईट परिणाम होत होता. पण तरीही जिद्दीने अभ्यास करून तिच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने एम.बी.ए. चा फुल टाईम कोर्स एका नामांकित व्यवस्थापन संस्थेतून डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण करून स्वकर्तुत्वावर आज ती एका फार मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत सिनियर मार्केटिंग मॕनेजर पदावर आहे याचा मला खूप अभिमान आहे. हे सर्व यश मिळवत असताना ती स्वतःसाठी योग्य तो जोडीदार शोधत होती. बाप म्हणून मी मात्र मुलीच्या काळजीने लग्नासाठी तिच्या मागे लागून तिच्यावर रागाने ओरडत होतो. परंतु तरीही तिने मला कधीही उलट उत्तर दिले नाही. तिने आयुष्यात एवढे मोठे यश कमी वयातच प्राप्त केल्यावर शेवटी एका विवाह मंडळाच्या माध्यमातून तिला योग्य असलेला जोडीदार निवडून विवाह केला. माझा जावई एम.बी.ए. (लंडन) असून एका आंतरराष्ट्रीय कंपनीत डायरेक्टर आहे व शिवाय स्वतःच्या फॕक्टरीचा मालक आहे. इतकेच नव्हे तर माझी मुलगी मला पापा व जावई मला डॕडी म्हणून नुसते फोनच करीत नाहीत तर माझ्या डोंबिवलीच्या फ्लॅटवर दोघेही येतात व आम्हा पतीपत्नीलाही त्यांच्या अंधेरीच्या फ्लॅटवर घेऊन जातात. माझी मुलगी तर मला सारखी म्हणते की "पापा, आता नका कुठे कामासाठी जाऊ, घरी आराम करा, दोघे पर्यटन करा, मी तुम्हाला पैसे देईन, मी तुम्हाला सांभाळेन"! हे तिचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. पण तरीही मला मनात वाईट वाटतेच की, मी माझ्या सोन्यासारख्या मुलीला हवे तसे अनुकूल वातावरण दिले नाही. मी तुम्हाला आता तिच्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो. ती लहान असताना एकदा तिने एका कार्यक्रमात कठीण प्रश्नांची उत्तरे देऊन एक नंबरचे बक्षीस म्हणून टी शर्ट मिळवला तर मी तो तिच्या हातातून काढून घेऊन दुसऱ्या एका मुलास दिला कारण काय तर तो तिकडे हिरमुसला होऊन बसला होता म्हणून. माझी मुलगी मला नंतर म्हणाली की "पापा, प्रश्नांची उत्तरे मी दिली होती ना, मग मी मिळवलेल्या त्या बक्षीसावर हक्क माझा होता की त्या मुलाचा"? तो प्रसंग आठवला की माझ्या डोळ्यात अजूनही अश्रू येतात. नशीब काय असे हिसकावून थोडेच मिळते? नशीब हे स्वकर्तुत्वाने मिळवावे लागते. आजच्या काळात सुद्धा पुरूषप्रधान संस्कृतीचा पगडा मनावर असलेले लोक मुलगा नसेल तर संसारात अर्थ नाही असे जेंव्हा म्हणतात तेंव्हा मला त्यांची कीव येते. एकुलत्या एक मुलीलाच मी माझा मुलगा समजलो व माझी हीच एकुलती एक मुलगी एक दिवस माझे नाव मोठे करणार व माझ्या म्हातारपणीचा आधार होणार हे मी पाहिलेले स्वप्न माझ्या या एकुलत्या एक मुलीने पूर्ण केले आहे. एवढे मोठे सुख व समाधान मला निसर्गाने म्हणा की मनाला जाणीव करून देणाऱ्या निसर्गातील अलौकिक शक्तीने म्हणा  दिले त्या शक्तीचे मी कितीही आभार मानले तरी कमीच आहेत!

-बाळूमामा, २७.१२.२०२१

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

नाती!

बोला की बाळूमामा!

काही नाती जन्माने चिकटली, काही लग्नाने बनली, काही अशीच योगायोगाने जमली, काही जुळली, काही परिस्थिती, प्रसंगाने डळमळीत होऊन तुटली. हवामान बदलते तशी माणसे बदलतात व मग नातीही बदलतात.

व्यावहारिक नाती ही व्यवहारापुरती मर्यादित राहतात. व्यवहार संपला की नाते संपले. जर व्यवहार दीर्घकाळ टिकले तर व्यावहारिक नाती सुद्धा दीर्घकाळ टिकतात. व्यवहार नाही पण भावनिक जवळीक आहे अशी नाती भावनिक आधारावर टिकतात. भावनिक जवळीकेला वैचारिक जवळीकेची जोड मिळाली म्हणजे विचार जुळले की नाती अधिक घट्ट होतात.

व्यवहार कशाला म्हणतात तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींच्या देवाणघेवाणीला व्यवहार म्हणतात. व्यवहारात स्वार्थ असतो. स्वार्थाचे समाधान दोन्ही बाजूने झाले पाहिजे. पण स्वार्थाला महास्वार्थ चिकटला की मग तो व्यवहार राहत नाही. मीच एकटा सगळं खाईन तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल असा विचार जेंव्हा बुद्धी करते तेंव्हा ती महास्वार्थी झालेली असते. 

नाती जर नुसती व्यावहारिक असतील तर ती व्यवहारापुरती कोरडी असतात. अशा नात्यात भावनेचा ओलावा नसतो. बुद्धीची खरी कसोटी तेंव्हाच लागते जेंव्हा नात्यात भावनाही असते व स्वार्थी व्यवहारही असतो. पण काही नाती ही भावनिक जवळीक व वैचारिक सुसंवादावर आधारित असतात. अशा नात्यांत स्वार्थ नसतो व स्वार्थ नसल्याने व्यवहारही नसतो.

माझीही अशी काही भावनिक नाती आहेत की जिथे व्यवहार नसल्याने व विचार सरळस्पष्ट असल्याने वाद निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. भामाताई ही तर माझी मावस मावस बहीण होती. पण तिच्याबरोबरचे माझे नाते हे मनमोकळे होते. कारण त्या नात्यात फक्त भावनिक जवळीक होती. व्यवहार बिलकुल नव्हता. हल्लीच ती बहीण हे जग सोडून गेली. त्यामुळे ते निर्मळ माया प्रेमाचे भावनिक नाते नैसर्गिक रीत्या संपले. पण तिचा मुलगा शिवा हा तिच्या स्वभावासारखाच आहे व त्यामुळे त्याच्याशी बोलताना भामाताईचा तो फिल येतो. परवा त्याला असाच फोन केला तर तिकडून त्याचा नेहमीचाच गोड आवाज आला "बोला की बाळूमामा"! आवाजात तोच गोडवा व तीच निर्मळ भावना जी भामाताईत होती. कसले व्यावहारिक देणे नाही की घेणे नाही. नुसती भावनिक जवळीक. अशी नाती दुर्मिळ असतात. 

-बाळू, २५.१२.२०२१

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

राम कृष्ण हरी!

देव प्रार्थना!

आपल्या जवळच्या माणसांशी जशी आपली नाळ जुळते तशी आपल्या जवळच्या धार्मिक  संस्कृतीशी व आपल्या जवळच्या देवदेवतांशी आपली नाळ जुळते. म्हणून आपल्या धर्मातील लोकांमध्ये विवाह केल्यास जवळच्या संस्कृती साधर्म्यामुळे संसारात अडचणी कमी होतात. बाकी हल्ली सुशिक्षित, अती सुशिक्षित लोक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करताना दिसून येतात. शिक्षण, विचार त्यांना संसारात एकत्र ठेवत असतील तर तेही योग्यच म्हणावे लागेल.

पण जवळीक ही महत्वाची. आपण हिंदू धर्मीय लोक मंदिरांसमोरून जातो तेंव्हा आपले हात आपोआप जोडले जातात. पण आपण जर इतर धर्माच्या प्रार्थनास्थळांपुढून गेलो तर तसे होत नाही याचे कारण म्हणजे आपल्या धर्माशी व देवदेवतांशी लहानपणापासून जोडली गेलेली आपली नाळ. अशी जवळीक आपल्या कुळ देवतेशी व आपल्या ग्रामदेवतेशी असते. विशेष बाब ही की माझे वडील करमाळा तालुक्यात असलेल्या साडे गावचे व माझी आई माढा तालुक्यात असलेल्या ढवळस गावची. दोन्ही गावे सोलापूर जिल्ह्यातीलच. साडेगावचे ग्राम दैवत कोणते तर कोडलिंग (खरं तर कोटलिंग म्हणजे महादेव/शंकर) व ढवळसची ग्रामदेवता कोणती तर अंबाबाई ( म्हणजे शंकर पत्नी पार्वती). म्हणजे काय तर वडिलांचे ग्रामदैवत शंकर व आईची ग्रामदेवता पार्वती. या दोन्ही गोष्टी कशा जुळून आल्या बघा काका-आईच्या विवाहाने! मी ढवळस गावाला मावशी बरोबर (माझ्या आईची सख्खी बहीण ) जाऊन उंच टेकडीवर असलेल्या अंबाबाईचे एकदा दर्शन घेतलेय. पण मी अजूनही वडिलांच्या साडे गावातील कोडलिंगाचे दर्शन घेतलेले नाही. ही गोष्ट ग्रामदैवतांची. पण माझे कुळदैवत कोणते हे ६५ वय झाले तरी अजूनही मला माहित नाही हे विशेष! याचे कारण काय तर माझे वडील (काका) हेच मुळात तेवढे आध्यात्मिक नव्हते. त्यांनी कधीही घरात ग्रामदैवत, कुळदैवत यांचा आग्रह धरला नाही की साडे गावाला आम्हाला घेऊन गेले नाहीत. माझी आई मात्र घरातील देव्हाऱ्यात पितळेचे देव ठेवून तिला जमेल तशी पूजा करायची. पण ती निरक्षर असल्याने तिला त्या देव्हाऱ्यातील ग्रामदैवत कोण व कुळदैवत कोण हे आम्हाला सांगता येत नसे. त्यामुळे माझ्या मनावर आईच्या देवधर्मापेक्षा काकांच्या बिनधास्त राहण्याचाच जास्त पगडा पडला. या इथे जवळीक या शब्दाला अर्थ आहे. आपल्या मनावर पगडा ज्याच्याशी आपली जवळीक निर्माण होते त्याचाच पडतो.

गजू व बळी, तुम्हाला आठवत असेल की तुमची आई  ही परडी भरायची. तुमच्या आईची ती परडी मी लहानपणी बारकाईने न्याहाळत बसायचो. पण मला ते नीट कळत नसायचे. ती परडी अंबाबाई देवीची असते बहुतेक, नक्की माहित नाही व ठामपणे सांगताही येणार नाही. कारण परडीशी जवळीक निर्माण झाली नाही व त्यामुळे तिचा पगडा माझ्या मनावर पडला नाही. 

पुण्याच्या भाऊजीबरोबर मी दोन, तीन वेळा सोनारीला गेलोय. तिथली गाव जत्रा पाहिलीय व सोनारीचे ग्रामदैवत भैरवनाथ (शंकराचा अवतार) याचेही दर्शन घेतलेय. मागे बहिणीच्या  कुटुंबाबरोबर कोल्हापूरच्या जोतीबाला जाऊन (तोही शंकराचाच अवतार) त्याचेही दर्शन घेतलेय. मात्र अजून जेजुरीच्या खंडोबाचे (तोही शंकराचाच अवतार) दर्शन घेतलेले नाही.

हिंदू धर्मात शिव पंथी व वैष्णव पंथी असे दोन पंथ आहेत. शिवपंथीयांची जवळीक शंकराशी जास्त तर वैष्णवपंथीयांची जवळीक विष्णूशी जास्त. वर उल्लेखित भैरवनाथ, जोतिबा व खंडोबा हे शंकराचे अवतार आहेत तर राम, कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. पंढरपूरचा पांडुरंग (विठ्ठल) हा कृष्णच म्हणजे विष्णूचा अवतार. मोहोळची ताई व दादा हे पंढरपूरकरच व त्यामुळे त्यांच्या घरात विठ्ठलाचे (पांडुरंगाचे) जास्त संस्कार. त्यामुळे त्यांचा मुलगा नेहमी "राम कृष्ण हरी" असे म्हणून देव प्रार्थना करतो. राम काय किंवा कृष्ण काय दोघेही विष्णूचेच अवतार. मग आपल्या नातेवाईकांत भाऊजी  भैरवनाथी म्हणजे शिवपंथी व ताईचा मुलगा पांडुरंगी म्हणजे वैष्णवपंथी झाले काय?

माझी दोन बहिणी व माझी भावजय यांच्या घरी श्री स्वामी समर्थांचे मोठे फोटो मला पहायला मिळतात. श्री स्वामी समर्थांशी त्यांची ही जी जवळीक निर्माण झालीय ती बहुतेक एखाद्या अनुभूतीमुळे झाली असावी. माझा मुंबईत एका श्री स्वामी समर्थ मठाशी योगायोगाने संबंध आला. पण मी त्यांचे आध्यात्मिक कार्यक्रम अटेंड करीत नाही. कारण एकंदरीतच सगळ्या देवाधर्माविषयीचा माझा दृष्टिकोन हा वैज्ञानिक आहे. पण मी सगळ्या देवांना नमस्कार करतो. कारण विश्वात, निसर्गात कोणती तरी अद्भुत, अनाकलनीय शक्ती आहे व ती शक्ती म्हणजेच परमेश्वर, परमात्मा असे मी मानतो. तो एकच आहे. फक्त त्याचे अवतार (इतर धर्मात देवाच्या अवतारांना देवदूत म्हणतात) निरनिराळे आहेत असे मी मानतो. त्यामुळे श्री भैरवनाथ काय, श्री स्वामी समर्थ काय किंवा राम कृष्ण हरी काय या सगळ्याच देव प्रार्थना एकाच परमेश्वराला, परमात्म्याला जाऊन मिळतात असे मी मानतो.

माझे बालपण पंढरपूरला श्रीविठ्ठल मंदिराच्या सान्निध्यात गेले असल्याने त्या देवाशी थोडीशी जास्तच जवळीक निर्माण झाली आहे व म्हणून "राम कृष्ण हरी" असे म्हणून या लेखाचा शेवट करतो.

राम कृष्ण हरी!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.१२.२०२१

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

वृद्धत्व विकास!

उतार वयातील कमकुवतपणा व विकास!

लहानपणातली व तारूण्यातील उत्साह, ताकद व चपळता उतार वयात कमी झालेली असते. अर्थशास्त्रात उतरत्या सीमांत उपयोगितेचा एक नियम आहे (इंग्रजीत लॉ अॉफ डिमिनिशिंग मार्जिनल युटीलिटी). त्याप्रमाणे मानवी शरीर व मनाची निसर्गाला असलेली उपयुक्तता वाढत्या वयानुसार कमी कमी होत गेल्याने तो निसर्ग मानवी शरीर व मनाला (शरीरातच मन असते, मनात शरीर नव्हे) भंगारात काढण्याची तयारी करीत असावा व त्यामुळेच उतार वयात मानवी शरीर व मन कमकुवत होत जात असावे. या उतार प्रक्रियेला मानवी शरीर व मनाचा घसारा (इंग्रजीत डिप्रिशियशन) असेही अर्थहिशोबी भाषेत म्हणता येईल. म्हातारपणीच्या या उतार प्रक्रियेला उतरत्या सीमांत क्षमतेचा नियम (इंग्रजीत लॉ अॉफ डिमिनिशिंग ॲबिलिटी) असेही म्हणता येईल. त्यामुळे होते काय की शरीरावरची घाण साफ करण्यासाठी लागणारी टूथब्रश, दाढीचे ब्लेड, मिशीचे केस कापण्याची कात्री यासारखी शस्त्रे हाताबोटांत नीट धरता  येत नाहीत. हातपाय कंप पावतात, थरथरतात. याचे कारण म्हणजे शरीराचे अवयव कमकुवत झालेले असतात. मेंदू (ज्यात मन असते) हाही शरीराचा अवयव (शरीराचा राजा का असेना) असल्याने तोही मेंदूपेशींसह कमकुवत झालेला असतो. त्यामुळे मन कमकुवत होऊन मनाचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. सगळ्याच सजीवांच्या शरीर व मनात होणारे हे परिवर्तन नैसर्गिक व अनिवार्य असते. त्यामुळे हा बदल स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसते. या नैसर्गिक परिवर्तनाशी सुसंगत वर्तन कसे करता येईल हे पहावे व तसे तंत्र विकसित करावे. यालाही आपण विकासाचा भाग म्हणूया व वृध्दावस्थेत तो भाग शिकूया!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१२.२०२१

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

नवसंजीवनी!

नवसंजीवनी!

(१) कालचा माझा दिवस माझे डोळे सताड उघडे करणारा, मला नवसंजीवनी देऊन मला मोठे करणारा ठरला. काल २ अॉक्टोबर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे फार मोठे नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे साधे पण महान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महान नेत्यांचा जन्मदिवस! या मंगल दिनी माझ्याही आयुष्यात मंगलमय गोष्ट घडली. मला आलेले नैराश्य दूर झाले, मरगळ झटकली केली, निसर्गातील देवाचा मला सर्वोच्च आदेश मिळाला "उठ, स्वतःला ओळख आणि पुन्हा कामाला लाग, आयुष्याचे नवनिर्माण कर"!

(२) याला पहिले कारण म्हणजे ॲड. विजय चौगुले यांनी माझ्या दोन नैराश्यजनक लेखांवर दिलेल्या त्यांच्या दोन प्रतिक्रिया. या दोन्ही प्रतिक्रियांनी माझे झाकलेले डोळे सताड उघडे झाले व मला नवसंजीवनी मिळाली. त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ती मी ॲडव्होकेटस असोसिएशन अॉफ वेस्टर्न इंडिया या हायकोर्ट वकिलांच्या एका फेसबुक ग्रूपवर लिहिलेल्या एका नैराश्यजनक लेखावर. तिथून त्यांनी मला जागे केले. नंतर "माझ्या ज्ञानाची शोकांतिका" या माझ्या दुसऱ्या नैराश्यजनक पोस्टवर त्यांनी भलीमोठी प्रतिक्रिया दिली आणि मला पूर्ण जागे केले.

(३) कोण आहेत हे ॲड. विजय चौगुले साहेब? माझ्या काही मित्रांना माहीत नसेल कदाचित म्हणून सांगतोय. आज ७० वर्षाचे वय म्हणजे माझ्या पेक्षा ६ वर्षांनी वयाने मोठे असलेले हे चौगुले वकील साहेब म्हणजे वरळी पोदार आयुर्वेदीक हॉस्पिटलच्या पाठीमागील अभ्यास गल्लीत रस्त्यावरच पालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करणारा हा एक होतकरू धडपड्या मुलगा! हाच धडपड्या मुलगा पुढे वकील झाला व आयुष्यात मोठे यश मिळवून आता तो सुखासमाधानाने जगत आहे. मीही पोदारच्या त्याच अभ्यास गल्लीत रस्त्यावर अभ्यास करून वकील झालो.

(४) विजय चौगुले माझ्यापेक्षा ६ वर्षांनी मोठे पण १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात मी जेंव्हा माटुंग्याच्या पोदार वाणिज्य कॉलेज मधून बी.कॉम. चे शिक्षण घेत होतो तेंव्हा याच पोदार अभ्यास गल्लीत मी रस्त्यावर अभ्यास  करीत असताना माझी विजय चौगुले बरोबर  दोस्ती झाली. चौगुले साहेब कधीकधी त्या गल्लीतच रात्री झोपायचे व सकाळी तिथेच उठून कामाला जायचे. नोकरी करून हिंमतीने उच्च शिक्षण घेणारा हा अत्यंत हुशार मुलगा. मी अभ्यास करता करता मध्येच विजय चौगुले यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचो आणि विजय चौगुले त्या वयातही मला धीर देणाऱ्या गोष्टी समजावून सांगायचे.

(५) नंतर विजय चौगुले यांचे पोलीस इन्स्पेक्टर मुलीबरोबर लग्न झाले. त्यांच्या पत्नी डेप्युटी कमिशनर अॉफ पोलीस (डी.सी.पी.) या फार मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा मुलगा, सून, मुलगी हे सर्वच जण आता वकील होऊन ॲड. विजय चौगुले यांच्या चौगुले ॲन्ड असोसिएटस या लॉ फर्ममध्ये एकत्र वकिली करीत आहेत. त्यांची मुंबईत दोन कार्यालये आहेत. हे सर्व कालच त्यांच्या बरोबर झालेल्या फोनवरील चर्चेतून कळले. खरंच फार मोठे यश मिळवले माझ्या या मित्राने! इतकेच नव्हे तर मुंबई काँग्रेसमध्ये एकेकाळी या माझ्या मित्राची खासदार गुरूदास कामत यासारख्या मोठ्या नेत्यांबरोबर उठबस होती, मोठे नाव होते. पण त्या राजकारणाचे जाऊ द्या. त्यांचे वकिलीतले यश हे खूप मोठे यश आहे.

(६) मी जेंव्हा चौगुले साहेबांना त्यांच्या या यशाबद्दल बोललो तेंव्हा त्यांनी मी मिळवलेल्या यशाची आठवण करून दिली. "अरे, माणसा दुसऱ्याच्या यशाकडे बघून तू स्वतःचे यश का अंधारात लपवून ठेवत आहेस, कुठे होतास तू, किती कष्ट उपसलेस तेंव्हा कुठे स्वकष्टाने वकील झालास, स्वकर्तुत्वावर ज्ञानी झालास, किती छान लिहितोस तू, सर्वांकडे ज्ञानाची ही उंची नसते व लेखनाची कला नसते, देवाने तुला कितीतरी भरभरून दिले आहे, तळागाळातून हळूहळू पायऱ्या चढत तू केवढी मोठी उंची गाठली आहेस, अरे स्वतः हिंमतीने मिळवलेले तुझे हे मोठे यश ओळख आणि रूबाबात रहा"! ही चौगुले साहेबांची वाक्ये माझ्या काळजाला भिडली आणि मला नवसंजीवनी मिळाली.

(७) किती काळ लोटला मध्ये! जवळजवळ २५ ते ३० वर्षे झाली. चौगुले साहेब त्यांच्या मार्गावर  व मी माझ्या मार्गावर! मधल्या काळात दोघांची प्रत्यक्ष गाठभेटच नाही आणि मग इतक्या वर्षांनी मी वकिलांच्या ग्रूपवर ती नैराश्यजनक पोस्ट लिहितोय काय, तिथे हे चौगुले साहेब (माझा अभ्यास गल्ली मित्र) अचानक येतात काय, माझ्या यशाची आठवण करून देतात काय व मग आम्ही इतक्या वर्षांनी फेसबुक मित्र होतोय काय हे सगळेच अचंबित करून टाकणारे! माझ्याच यशाचा मी शत्रू का झालो, स्वतःच स्वतःला जिंकण्याचा आनंद हा सर्वात मोठा असतो हे मी का विसरलो? मानवी यशाचे परिमाण काय? पैसा, छे पैसा तर कोणीही मिळवतो, वाटेल ते उलटसुलट धंदे करून! मोठमोठया गँगस्टर्स लोकांकडे का कमी पैसा आहे! यावरून हेच सिद्ध होते की मानवी जीवनात पैसा हे यशाचे परिमाण होऊ शकत नाही. जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे पण पैसा म्हणजे मानवी जीवनाचे सर्वस्व नव्हे! जगण्यासाठी पोटाला अन्न आवश्यक आहे पण  माणूस जगण्यासाठी अन्न खातो की ते अन्न खाण्यासाठी जगतो? पैशाचेही साधारण तसेच आहे. माणसाचे जगणे व जनावरांचे जगणे यात फरक आहे. मानवी जीवनाचा अर्थ मोठा, या जीवनाची ध्येये मोठी, जगणे मोठे! या सर्व गोष्टी शाळा, कॉलेजात शिकूनही हे ज्ञान मी नैराश्येच्या गर्तेत सापडून विसरलो होतो.

(८) मला दुसरी संजीवनी मिळाली एका छोट्या मुलीकडून. मुंबई हायकोर्टात वकिली करणारे माझे तरूण वकील मित्र ॲड. रूपेश मांढरे यांची ही कन्या. नाव वैदेही! काल तिच्या आईने म्हणजे रूपेशच्या पत्नीने (जी माझीही फेसबुक मैत्रीण आहे रूपेश बरोबर) वैदेहीचे वकिलाच्या ड्रेसमधील फोटो व तिचा वकिली युक्तीवादाचा छोटा व्हिडिओ कालची फेसबुक स्टोरी म्हणून टाकला. ते फोटो आणि चिमुकल्या वैदेहीचा तो रूबाबदार वकिली अवतार बघून माझे डोळे सताड उघडले. सोनाराने कान टोचल्यासारखे झाले माझे! रूपेश हा स्वतः तर वकील आहेच. पण तो त्याच्या पत्नीलाही वकील बनवतोय. एलएल. बी. च्या शेवटच्या वर्षाला आहे त्याची पत्नी आणि हे दोघेही त्यांच्या गोड कन्येला लहानपणापासूनच वकिलीचे बाळकडू देत आहेत हे बघून मला खूप बरे वाटले. या तिघांनी मिळून विशेष करून वैदेहीने माझ्यातला वकील पुन्हा जागृत केला.

(९) अरे, मी हे काय करून बसलोय? काय लिहितोय मी हे! नवोदित वकिलांना नवीन उमेद द्यायची सोडून मी स्वतः उगाच निराश होऊन त्यांनाही निराश करतोय! छे, छे! हे फार चुकीचे आहे. वकिली व्यवसाय हा काय साधासुधा व्यवसाय नव्हे! वकील व्हायला फार मोठी तपश्चर्या लागते. राजकारणी असोत नाहीतर सेलिब्रिटी असोत कायद्याच्या कचाट्यात अडकून वकिलाच्या अॉफीसमध्ये आल्यानंतर त्यांची काय भंबेरी उडते, ते किती केविलवाणे होतात, या लफड्यातून वाचवा हो म्हणून वकिलापुढे किती गयावया करतात, हे मी प्रत्यक्षात बघितले आहे. कारण मीही मुंबई हायकोर्टाच्या मोठमोठया वकिलांसोबत बसून तिथे बिनधास्त वकिली केली आहे. गरिबीतून वकील झालो म्हणून काय झाले. स्वकर्तुत्वावर वकिलाचा काळा कोट अंगावर चढवलाय. त्या बार रूममध्ये मी गरीब म्हणून तिथे बसू नको असे म्हणण्याची कोणत्याही मोठ्या वकिलाने हिंमत केली नाही. तशी  हिंमत कोणी करूच शकणार नाही.

(१०) राजकारणात पदांसाठी नेत्यांची हाजी हाजी करायला लावणारा व सेलिब्रिटी आयुष्य  जगण्यासाठी उलटसुलट उड्या मारायला लावणारा हा वकिली व्यवसाय नव्हे! अशा या प्रतिष्ठित वकिली व्यवसायात गेली ३२ वर्षे पाय घट्ट रोवून मी हिंमतीने उभा आहे. हे माझे यश मी विसरतोय हे मला ॲड. रूपेश मांढरे याच्या चिमुकल्या कन्येने (वैदेहीने) प्रात्यक्षिक करून दाखवून समजावून सांगितले.

(११) अरे मोठ्यांनो, तुम्ही काहीही उपद्व्याप करा, कितीही कोलांटउड्या मारा, आम्ही सर्व वकील तुमच्याकडे कायद्याच्या नजरेतून नजर ठेऊन आहोत हे लक्षात ठेवा! सद्या धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना नावाच्या पिल्लावरही आम्हा वकिलांची सक्त कायदेशीर नजर आहे. सर्व डॉक्टर मंडळी व पोलीसही या लढाईत जीव धोक्यात घालून त्यांचे उदात्त कार्य करीत आहेत. पण तरीही कायद्याची नजर ही वेगळी असते. कायदा म्हणजे काय हे त्यासाठी नीट लक्षात घ्यायला हवे. माझ्या मते कायदा म्हणजे निसर्गातील देवाचा सर्वोच्च आदेश! तो आदेश वकिलांना लवकर व छान कळतो हेही माझे वैयक्तिक मत! ते कोणाला पटो अगर न पटो! कोरोनावरील निसर्गाच्या त्या सर्वोच्च आदेशाचे सखोल विचारमंथन वकिलांच्या ज्ञानसागरात सद्या चालू आहे हे ध्यानात ठेवा! सुटेल कसा हा कोरोना कायद्याच्या नजरेतून, कायद्याच्या मगरमिठीतून!

(१२) हो, हे खरे आहे की कायद्याच्या राज्यात हाथसर सारखे बलात्कार सुरू आहेत. खून, बलात्कार करणारी ही नराधम मंडळी म्हणजे मनुष्याचे कातडे अंगावर पांघरून मोकाट सुटलेली हिंस्त्र जनावरेच! या नराधमांना वाटते की अजूनही जंगल राजच सुरू आहे. पण माणूस तो जंगलीपणा सोडून देऊन आता खूप पुढे येऊन पोहोचलाय. या सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात तुमची आता डाळ शिजणार नाही. वैदेही सारख्या क्रांतीकन्या तयार होत आहेत, तयार झाल्या आहेत. नराधमांनो, या सुशिक्षित, सुसंस्कृत मुली व स्त्रिया या क्रांतीकन्या आहेत. त्या तुमची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला जंगलात नेऊन वाघ, सिंहापुढे आता टाकता येईल. पण वाघ, सिंह तुम्हाला पटकन खाऊन टाकतील. तुमचे एनकांऊटर हा त्यातलाच आधुनिक प्रकार! पण अशी झटपट शिक्षा देऊन तुम्ही पटकन मोकळे होणार हे कायद्याला माहित आहे. म्हणून तर तुम्हाला कायद्याच्या जाळ्यात ओढून खूप नाचवायचे व हालहाल करून शेवटी कायद्याची कठोर शिक्षा द्यायची हाच आधुनिक कायद्याच्या राज्याचा न्याय आहे.

(१३) म्हणून तुमचे बारावे नाही तर चांगले तेरावे  घालण्यासाठी हा १३ आकडा माझ्या लेखाच्या शेवटी आलाय. वैदेही ही सर्व क्रांतीकन्यांची प्रतिनिधी आहे. मी तिला आता तिच्या फोटो व वकिली युक्तिवादाच्या व्हिडिओसह वकिलांच्या सर्व ग्रूप्सवर फिरवणार. उठा, मरगळ टाकून द्या असे वैदेही सगळ्या वकिलांना विशेष करून माझ्यासारख्या निराश झालेल्या वकिलांना सांगत फिरणार. वैदेहीवर पोस्ट बनवून तिला फेसबुकवर आणखी प्रसिद्ध करण्याची रितसर परवानगी मी तिच्या आईकडून व्हॉटसअप संवादातून घेतली आहे. विजय चौगुले वकील व कु. वैदेही मांढरे यांच्या वयात केवढे मोठे अंतर पण दोघांनीही माझे कान टोचले, माझे डोळे सताड उघडले व मला काल नवसंजीवनी दिली म्हणून तमाम वकील मंडळींच्या ज्ञान दरबारात माझी ही खास पोस्ट विनम्रपणे सादर करतोय. तिचा स्वीकार होईल अशी आशा बाळगतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३.१०.२०२०

सोपान मोरे, माझा डॕशिंग बाप!

सोपान मोरे या डॕशिंग बापाचा मुलगा आहेस तू!

शिक्षण सातवी, बलभीम नागटिळक या मामाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील  साडे खेडेगावातून मुंबईत आणलेला मुलगा, मग व्हिक्टोरिया मिलमध्ये बदली कामगार म्हणून नोकरी, चौकस बुद्धीमत्ता, वृत्तपत्रीय वाचनातून परिसर अभ्यास, स्वतःच विकसित केलेली वक्तृत्व कला, मग राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून गिरणी कामगार पुढारी म्हणून नाव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सारख्या काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर जवळून उठबस आणि या सर्व गोष्टी कोणाच्याही पाठबळाशिवाय फक्त आणि फक्त स्वतःच्या हिंमतीवर, कर्तुत्वावर मिळवून एक आदरयुक्त दरारा निर्माण केलेला डॕशिंग माणूस म्हणजे माझा बाप सोपान मारूती मोरे! त्याच्या तालमीत तयार झालेला गडी आहेस रे तू. या माझ्या बापाने कोणाची पर्वा केली नाही. जे स्वतःला पटले तेच करीत पुढे गेला. ज्यांना हे जमले नाही ते मागे राहिले, माझ्या बापाला वचकून राहिले. बाहेरच्या माणसांना ओळखून त्यांच्याशी सुरक्षित अंतर ठेऊन थोडे लांबच राहिलेल्या माझ्या बापाने नातेवाईकांना सुद्धा हातभर लांब ठेवले व एकटा स्वतःच्या रूबाबात राहून स्वतःचा आब राखून जगला माझा बाप! मग भले त्याला नातेवाईक काहीही म्हणोत. कारण कामगार पुढारी म्हणून मिळविलेले स्थान हे बापाने स्वकर्तुत्वावर मिळविले होते. कोणा नेत्यांची हाजी हाजी केली नाही की कोणा नातेवाईकाचे पाठबळ मिळाले नाही म्हणून चिडचिड केली नाही, मग का करावी कोणाची पर्वा! संसार केला आणि जमेल तेवढे माझ्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, पण घरात कोणाचेच अतिरेकी लाड केले नाहीत. माझी आई (चंद्रभागा सोपान मोरे) ही ढवळस गावची पूर्ण अशिक्षित, अंगठे बहाद्दर स्त्री असल्याने माझ्या बापाला कामगारांचे पुढारीपण करताना बायकोकडून जो काही थोडाफार मानसिक आधार लागतो तो पण मिळाला नाही. पण ती बिच्चारी घरात तिच्या थोरल्या बहिणी बरोबर खाणावळ घालून संसारात कष्ट उपसत होती. माझ्या बापाला कौटुंबिक जिव्हाळा होता पण त्यात अतिरेकी भावनाप्रधानता नव्हती. स्वतःच्या कुटुंबाविषयी माझ्या बापाचे हे कडक धोरण, मग दुसऱ्या  नातेवाईकांचे तर विचारूच नका. माझ्या डॕशिंग बापाच्या ओळखी मोठ्या, मग त्या ओळखीचा फायदा करून घेण्यासाठी गुळाला मुंगळे जसे चिकटतात तसे हळूच चिकटलेले काही मुंगळे त्यांचा फायदा झाला की माझ्या बापाला टाटा करून गेले व विसरले. गरज सरो आणि वैद्य मरो, दुसरे काय! माझ्या बापाच्या याच खंबीला पावलावर पाऊल टाकून मी जगत आलोय. बापाचे क्षेत्र राजकीय तर कायद्याच्या उच्च शिक्षणामुळे माझे क्षेत्र वकिली! पण दोन्हीही क्षेत्रे ही सामाजिकच! माझ्या बापासारखाच माझा स्वभाव! मग कोणाची बॉसिंग मी काय सहन करून घेणार! डझनभर नोकऱ्या मी मिळविल्या पण बॉस लोकांची दादागिरी सहन झाली नाही की त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून देऊन त्यांना रामराम करीत सोडल्या.  घरात कोणीही वकील, न्यायाधीश नसताना किंवा इतर कोणत्याही मित्राचा, नातेवाईकांचा पाठिंबा नसताना हिंमतीने वकिलीत पडलो. बायको गावची बारावी शिकलेली मुलगी व गृहिणी. त्यात मुलगी झालेली. बायकोच्या नातेवाईकांनीही माझ्या या भलत्या धाडसामुळे (काहींनी याला खाता पंढरी अशी नावे ठेवली) मला त्यांच्यापासून हातभर लांब ठेवले. या  वकिलीत सगळीकडून प्रतिकूल परिस्थिती, सगळा अंधार! त्यातून हळूहळू शिकत गेलो व गेली ३२ वर्षे वकिलीत पाय घट्ट रोवून उभा आहे. खडतर परिश्रम घेतले पण अशिलांकडून फी कशी वसूल करायची याची अक्कल नाही. मग या कोर्टातून त्या कोर्टात वणवण व सतत पैशाची चणचण! पण तरीही कसाबसा संसार केला. एकुलत्या एक मुलीला एम.बी.ए. चे उच्च शिक्षण देण्यासाठी जमेल तेवढे आर्थिक पाठबळ व प्रोत्साहन दिले. तिनेही स्वकर्तुत्वावर ते उच्च शिक्षण घेऊन मग मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक पदाची नोकरी मिळवली. सांगायचे तात्पर्य काय, तर माझा फक्त सातवी शिकलेला डॕशिंग बाप, हिंमत करून वकील झालेला मी स्वतः व एम.बी.ए. चे शिक्षण घेऊन व्यवस्थापक झालेली माझी मुलगी ही प्रगतीची चढती कमान आहे. हे यश कोणतेही माध्यम छापून आणणार नाही कारण तिथे माझी जरा सुद्धा पोहोच नाही. पण गरजच काय मोठ्या माध्यमात जायची. समाज माध्यम आहे ना माझ्या जवळ माझे हे सत्य सांगण्यासाठी! अरे रूबाबात जग रे, भरपूर यश मिळवलेस तू आयुष्यात!

(माझ्या हयात नसलेल्या डॕशिंग बापाचा व माझ्या हयात नसलेल्या अशिक्षित पण अत्यंत प्रेमळ असलेल्या आईचा फोटो समोर ठेऊन स्वतःच स्वतःशी केलेले हे स्वगत आहे. माझ्या बापाला वडील म्हणण्याऐवजी मी या लेखात बाप म्हटलेय कारण तो बाप माणूस होता. एका फोटोत माझा बाप राष्ट्रीय नेते श्री. पी.ए. संगमा यांच्याबरोबर खळखळून हसताना जेंव्हा मी बघतो तेंव्हा उतार वयातही (६४) मला शक्ती मिळते).

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीसूर्याने पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अतिमागास, मागास जाती समाज जीवनात आजही अंधारच असता. धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

(१) एखाद्या व्यक्तीवर योगायोगाने अन्याय होणे व त्यामुळे त्याने दैव, नशीब, प्रारब्ध यासारख्या कल्पना कवटाळून बसणे व एखाद्या समाजावर एकाच पिढीत नव्हे तर पिढ्यानपिढ्या अन्याय होत गेल्याने त्या समाजाचा देवावरील व दैव, प्रारब्ध वगैरे कल्पनांवरील विश्वास उडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

(२) मी हिंदू धर्मात व मराठा जातीत जन्मलो म्हणून मी शैक्षणिक, आर्थिक, राजकीय या तिन्ही मूलभूत गोष्टींच्या बाबतीत त्या धर्मामुळे किंवा त्या जातीमुळे सोन्याचा किंवा चांदीचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आलो असे नव्हते. सातवी पर्यंत शिकलेले वडील गिरणी कामगार, आई शालेय शिक्षणाने पूर्ण अशिक्षित व घरी चार मुले असल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची अशा हलाखीच्या परिस्थितीत हिंदू धर्मीय मराठा हा शिक्का माझ्या मदतीला धावून आला नाही.

(३) अशा हलाखीच्या परिस्थितीत खाजगी कंपन्यांत नोकऱ्या करीत खुल्या वर्गात शिक्षण घेत वकील होणे ही साधी गोष्ट नव्हती. ज्यांनी ज्ञान, पैसा व सत्ता या तिन्ही क्षेत्रातील जागा अडवून ठेवल्या होत्या त्यांनी मी हिंदू-मराठा म्हणून माझे कुठेही आदराने स्वागत केले नाही. स्वतःच हिंमत करून कष्ट घेत व अपमान सहन करीत वकील झालो व स्वतःला थोडेफार का असेना पण ज्ञान व पैसा या दोन गोष्टींत कनिष्ठ श्रेणीतून मध्यम श्रेणीत घेऊन आलो. माझ्या या खडतर प्रवासात मी हिंदू-मराठा आहे म्हणून मला कसलीही मदत झाली नाही. म्हणजे मी जो वकील झालो तो हिंदू धर्मामुळे किंवा मराठा जातीमुळे नाही तर माझ्या मेहनती मुळे झालो हे सत्य आहे.

(४) मग मी असा विचार करतोय की मराठा जातीत जन्मून जरा मला शैक्षणिक व आर्थिक बाबतीत काहीच फायदा झाला नाही तर मग या जातीला उच्च जात समजायची कशी? ही सुद्धा  मागासवर्गीय जातच झाली. भले ती अनुसूचीत जाती जमाती सारखी अतिमागास जात नसेल. पण ती मध्यम मागास जात तर निश्चितच आहे. केवळ या जातीतली बोटावर मोजता येतील एवढीच मंडळी गर्भश्रीमंत व सत्ताधारी आहेत म्हणून संपूर्ण मराठा समाज हा उच्च जातीचा पुढारलेला समाज असे समजणे चुकीचे आहे. माझे एकट्याचेच उदाहरण नाही तर हलाखीत खिचपत पडलेली माझ्यासारखी लाखो करोडो कुटुंबे मराठा समाजात आहेत हे सत्य आहे.

(५) खरे खोटे मला माहित नाही, पण महान क्रांतिकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी म्हणे मराठा समाजालाही आरक्षण घ्या असे सांगितले होते. मग मराठा समाजाने ते आरक्षण का घेतले नाही की त्यावेळी मराठा समाजाच्या मूठभर श्रीमंत व सत्ताधारी नेत्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी मराठा समाजाला त्यापासून वंचित ठेवले हे कळायला मार्ग नाही. जे झाले ते झाले पण आज सकल मराठा समाज जागृत झाला आहे. तो उच्च जातीचा खोटा शिक्का मराठा समाजाला नको आहे. सत्य परिस्थिती स्वीकारून मराठा समाजाला मागास जातीचा समाज म्हणून मान्यता मिळणे व त्या आधारे आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.

(६) अशा परिस्थितीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत) मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिलाय ही गोष्ट मनाला खूप भावली. मी आज विचार करतोय की, अज्ञान, गरिबी, अस्पृश्यतेच्या दलदलीत (दलित हा शब्द याच दलदलीवरून निर्माण झाला असावा बहुतेक) पिढ्यानपिढ्या पिचत ठेवलेल्या अतिमागास जातींतील लोकांना मोठ्या हिंमतीने अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याने या पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अशा अतिमागास व काही इतर मागास जातीत जन्मलेल्या लोकांची स्थिती आजही त्यावेळी होती तशीच अंधारमय राहिली असती.

(७) मी ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो, करोडो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याचा विचार करतो तेंव्हा त्यांचा तो निर्णय किती तर्कशुद्ध होता हे मनाला पटते. पिढ्यानपिढ्या दलदलीत खिचपत ठेवलेल्या  एवढया मोठ्या अतिमागास समाजाला उचलून वर काढायला जेंव्हा कोणताच देव पुढे येत नाही तेंव्हा त्या देवावर विश्वास का ठेवावा व जो धर्म एखाद्या समाजाला अस्पृश्य लेखतोय त्या धर्मात तरी का रहावे? डॉ. आंबेडकर यांचे हे क्रांतिकारक विचार म्हणूनच मला पटतात. मला जर कोणी अस्पृश्य म्हणून लेखले असते तर मीही हेच केले असते. मी हिंदू धर्मात राहूनही बौद्ध धर्माचे बौद्धिक विचार स्वीकारू शकतो व मराठा समाजाचा असूनही अतिमागास समाज बांधवांचा मित्र होऊ शकतो. हा माझा व्यापक दृष्टिकोन मला माझ्या शिक्षणाने दिलाय! १४ अॉक्टोबर, १९५६ या क्रांतिकारी दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या निमित्त आज १४ अॉक्टोबर या दिनी सर्वांना धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०


मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

(१) मनुष्याला निसर्गाचे विज्ञान कळल्यावरही त्याच्या जीवनाला धर्म आवश्यक आहे का? तर माझे उत्तर हो असेच आहे. विज्ञानाने निर्जीव पदार्थ व मानवेतर प्राणी पूर्ण होतील पण मनुष्य हा धर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
हा विषय माझ्या विचार कक्षेत येण्याचे कारण म्हणजे कालपरवाच महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांच्यात धर्मनिरपेक्षता या भारतीय संविधानातील शब्दावरून रंगलेला पत्रवाद!

(२) देश धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे देशातील नागरिक अधार्मिक असणे असा अर्थ बिलकुल होऊ शकत नाही. तसे असते तर भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा धर्म पाळण्याचे धार्मिक स्वातंत्र्य दिलेच नसते. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हाच की देशाचे सरकार कोणत्याही धर्माचा जाहीर उदोउदो करणार नाही की कोणत्याही धर्माकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघून त्या धर्माच्या लोकांवर अन्याय, अत्याचार करणार नाही. तसेच असे सरकार कोणत्याही धर्मासाठी सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करणार नाही. ज्या त्या धर्माचे अनुयायी त्यांच्या स्वतःच्या  पैशाने त्यांच्या धर्माची स्वतंत्र  प्रार्थनास्थळे निर्माण करून तिथे त्यांची धार्मिक प्रार्थना करू शकतात व सार्वजनिक उपद्रव होणार नाही व देशहिताला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेऊन स्वतःच्या धर्माचा प्रचार व प्रसारही करू शकतात. धर्मनिरपेक्ष शब्दाचा हा अर्थ एवढा सरळस्पष्ट असताना असे वाद व तेही सरकारी पातळीवर का निर्माण होतात हेच कळत नाही.

(३) मला जर कोणी तुम्ही कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे असे मध्येच विचारले तर त्या माणसाचा खूप राग येतो. अरे बाबा, माझ्याकडे माणूस म्हणून बघ ना! माझ्या किंवा तुझ्या जात, धर्माने आपल्या मानवीय संबंधात बाधा यावी असे तुझ्या मनात का यावे? जो धर्म माणूस म्हणून जगायला शिकवत नाही तो धर्म नव्हे व जी जात माणसामाणसांत विद्वेषाची भिंत उभी करते ती जात नव्हे. असा धर्म, अशी जात ही संपूर्ण मानव समाजाची शत्रू असते. मला वृथा धर्माभिमान, वृथा जात अभिमान पसंत नाही. हो, मी जन्माने हिंदू धर्मीय व मराठा जातीय आहे हे मान्य व म्हणून माझ्या मराठी भाषेविषयी जसे मला पटकन प्रेम वाटते तसेच पटकन प्रेम मला माझ्या हिंदू धर्माविषयी व माझ्या मराठा जातीविषयी वाटते. हे असे वाटणे हे नैसर्गिक आहे. तो लहानपणापासून असलेल्या सहवासाचा, संस्काराचा नैसर्गिक परिणाम असतो. पण याचा अर्थ असा नव्हे की मी दुसऱ्याच्या धर्माचा, जातीचा तिरस्कार करावा.

(४) मानवी जीवनाला जातीपातींच्या बंधनातून मुक्त करणे हे फार मोठे आव्हान आहे. ही वर्ण व जात व्यवस्था कशी निर्माण झाली, त्यामागे कोणत्या तरी विशेष वर्गाची विशेष सोय हाच प्रमुख उद्देश होता किंवा आहे का, की या वर्ण व जात व्यवस्थेला नैसर्गिक विज्ञानाचा शास्त्रीय आधार आहे या प्रश्नाचे उत्तर हा मोठा विषय आहे. आजचा माझा विषय हा मानवी जीवन हे धर्माशिवाय अपुरे या मुद्यावर प्रकाश टाकणारा आहे.

(५) धर्मात देव असलाच पाहिजे असे नाही. तसे असते तर बुद्ध हा धर्मच झाला नसता. पण बौद्ध धर्मीय बुद्ध हा धर्म नसून धम्म आहे असे मानतात. म्हणजे जो धर्म देव मानतो त्याला धर्म म्हणायचे व जो धर्म देव मानत नाही त्याला धम्म म्हणायचे. मी मात्र आजच्या माझ्या या विषयासाठी धर्म हाच शब्द प्रमाण मानतोय व त्या अर्थाने बुद्ध धम्मालाही बुद्ध धर्म मानतोय.

(६) आजच्या विषयासाठी मी मानवी मेंदूच्या तीन गोष्टी आधारभूत धरल्या आहेत. एका बाजूला मानवी मनाची (मानवी मेंदूतच मानवी मन असते) आध्यात्मिक किंवा नैतिक भावना व दुसऱ्या बाजूला मानवी मनाची भौतिक वासना आणि दोन्हीच्या बरोबर मध्यभागी मानवी मनाची सारासार बुद्धी! या सारासार बुद्धीलाच सदसद्विवेकबुद्धी किंवा विवेकबुद्धी  म्हणतात. या बुद्धीवर एकीकडून आध्यात्मिक भावनेचा तर दुसरीकडून भौतिक वासनेचा ताण असतो.

(७) हा धर्माचा विषय मला नीट समजण्यासाठी माझ्या बुद्धीने मानवी मनाच्या आध्यात्मिक किंवा नैतिक भावनेला धर्म असे नाव दिले व मानवी मनाच्या भौतिक वासनेला विज्ञान असे नाव दिले. विज्ञानाचा म्हणजे वासनेचा अतिरेक होऊन मध्यवर्ती केंद्रीय बुद्धी जनावरासारखी वासनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून या बुद्धीवर धर्माचा म्हणजे भावनेचा ताण हा हवाच! तसेच धर्माचा म्हणजे भावनेचा अतिरेक होऊन ही बुद्धी वेड्यासारखी भावनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून बुद्धीवर विज्ञानाचा म्हणजे वासनेचा ताण हा हवाच! या दोन्ही ताणांमध्ये संतुलन राखणे ही बुद्धीची कसोटी व मोठी जबाबदारी! या लेखाचा एवढाच सार एवढाच की नुसत्या विज्ञानाने मनुष्य जीवन पूर्ण होऊ शकत नाही. तसे असते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म (धम्म) स्वीकारलाच नसता.

(८) मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे हे माझे माझ्या वरील कारणमीमांसेवर आधारित वैयक्तिक मत आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांच्या मूर्त्या असोत, बुद्ध धर्मातील (धम्मातील) तथागत बुद्धाची मूर्ती असो, ख्रिश्चन धर्मातील येशू ख्रिस्ताची मूर्ती असो, पारसी धर्मातील अग्नी असो की मुस्लिम धर्मातील मक्केतील मशिदेचा फोटो असो, ही सर्व त्या त्या धर्माची प्रतिके आहेत. जसा भारताचा तिरंगा ध्वज हे भारत देशाचे प्रतीक आहे.

(९) ज्याप्रमाणे भारतीय नागरिक तिरंगा ध्वज या भारताच्या प्रतिकात भारतीय संविधानाला बघतात त्याप्रमाणे विविध धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक प्रतिकांत त्यांच्या धर्माचा सार बघतात. कोणत्याही धर्माच्या धार्मिक प्रतिकात तो धर्म एकवटलेला असतो. म्हणून तर या धार्मिक प्रतिकांना फार महत्व असते. हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करणाऱ्या लोकांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की या देवदेवता ही हिंदू धर्माची प्रतिके आहेत. हिंदू धर्माच्या प्रतिकांचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान होय. असा फालतूपणा करण्याची हिंमत कोणीच करू नये.

(१०) कोणीच दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांची किंवा दुसऱ्या धर्माची टिंगलटवाळी करू नये. धर्मनिरपेक्ष या शब्दात इतर धर्मांविषयीचे हे मूलभूत धार्मिक कर्तव्यही समाविष्ट आहे ही गोष्ट सगळ्या धर्माच्या लोकांनी सतत ध्यानात ठेवावी. मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे या वाक्याने हा लेख इथेच संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.१०.२०२०

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

विज्ञान व धर्म!

मानवी शरीर एक विज्ञान तर धर्म मानवी आत्मा!

निसर्गाचे विज्ञान काय आहे तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र. जीवशास्त्राचा मुख्य भाग आहे जैविक वासना. या तिन्ही शास्त्रांच्या वापरात भावनेला थारा नाही. तिथे लागते ती फक्त बुद्धी! म्हणजे विज्ञानात फक्त बुद्धीला महत्व आहे. या बुद्धीला तांत्रिक बुद्धी असे म्हणता येईल.

पण माणूस हा असा एकमेव प्राणी निसर्गातून निर्माण झाला आहे की तो फक्त विज्ञानावर जगू शकत नाही. त्याला निसर्गाच्या विज्ञानासोबत देवाचा धर्म लागतो. देवाचा धर्म काय आहे तर तो मानवी भावना व मानवी बुद्धी यांचे मिश्रण आहे. धार्मिक बुद्धी ही भावनिक बुद्धी असते जी तांत्रिक बुद्धीला आध्यात्मिक वळण देते. उदाहरणार्थ, स्त्री पुरूषातील लैंगिक वासनेचे समाधान करण्यासाठी तांत्रिक बुद्धी जेंव्हा पुढे सरसावते तेंव्हा धार्मिक बुद्धी तांत्रिक बुद्धीला स्वैराचार, बलात्कार करण्यापासून रोखते. ही गोष्ट मनुष्याला योग्य नाही असे बजावून त्यास प्रतिबंध करते.

मानवाने निसर्ग विज्ञानात सुशिक्षित होऊन विज्ञान व तंत्रज्ञानात भरपूर प्रगती केली आहे. पण त्याचबरोबर मानवाने देव धर्मात सुसंस्कृत होऊन धर्म व कायद्यातही खूप प्रगती केली आहे. धर्म हाच कायद्याचा मुख्य आधार आहे जो विज्ञानाला आध्यात्मिक वळण देतो. खरं तर धर्म हाच मनुष्याला जनावरांपासून वेगळा करतो. जे लोक निसर्गातील देवाचे अस्तित्व मान्य करीत नाहीत (नास्तिक लोक) त्यांनाही धर्माचा आधार घ्यावाच लागतो ज्याला ते मानव धर्म असे नाव देतात.

मनुष्याला भावना नसत्या व जनावरांप्रमाणे नुसत्या वासनाच असत्या तर जगात कोणताही धर्म व कायदा दिसला नसता. सगळी माणसे फक्त निसर्गाचे मूलभूत विज्ञान व त्यासंबंधीची तांत्रिक बुद्धी यावरच जनावरांचे जंगली जीवन जगली असती. ते जंगली जीवन नको असेल अर्थात मानव समाजात बळी तो कानपिळी या जंगली वैज्ञानिक नियमानुसार खून,बलात्कार, अत्याचार, दहशतवाद, भ्रष्टाचार यांचे थैमान नको असेल तर मानवाला विज्ञान व तंत्रज्ञानावर धर्म व कायद्याचे वर्चस्व अर्थात तांत्रिक बुद्धीवर धार्मिक बुद्धीचा कठोर वचक निर्माण करता आला पाहिजे व तोही कायमचा! कारण मानवी शरीर व मन निसर्ग विज्ञानाचा भाग असले तरी धर्म हा मानवी आत्मा आहे! थोडक्यात मानवी शरीर एक विज्ञान तर धर्म मानवी आत्मा!

-ॲड.बी.एस.मोरे©५.१२.२०२१

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

कट्टरता अनैसर्गिक!

सामायिक साखळीत कट्टरतेला थारा नाही!

निसर्गातील विविधता मानव समाजात आलीय. निसर्गातील विविधतेत असलेले विशेष ज्ञान मिळवून त्या ज्ञानात प्रावीण्य मिळवून माणसे त्या त्या विषयातील तज्ज्ञ (स्पेशालिस्ट) होतात. या तज्ज्ञ मंडळीमुळे मानव समाजात विविधता निर्माण होते.

समाजात विविध प्रांत, समूह, भाषा, धर्म, जात, संस्कृतीची विविधता व तिची विशेषतः निर्माण झाली आहे. विशिष्ट प्रांत, समूह, भाषा, धर्म, जात, संस्कृतीशी विशेष भावनिक जवळीक निर्माण झाली की त्यातून जी विशेष जाणीव निर्माण होते तिला अस्मिता म्हणतात. अस्मिता माणसाला त्या अस्मितेशी चिकटून रहायला व तिच्याशी काटेकोर रहायला शिकवते. त्यातून मानव समाजात तुकड्या तुकड्यांची कट्टरता निर्माण होते. ही कट्टरता अस्मितेचा अभिमान नाही तर गर्व करायला शिकवते. ही गर्वाची भावना अस्मितेचा अहंकार फुलवते जो समाज एकतेसाठी घातक असतो.

निसर्गात विविधता व विशेषतः असली तरी त्या विशेषतेची कट्टरता आहे का हा अभ्यासाचा विषय आहे. निसर्ग हा सर्वसमावेशक आहे. तो कोणत्याही विशेष पदार्थाला व त्याच्या विशेष गुणधर्माला कट्टर होऊ देत नाही. या नैसर्गिक सत्यावर आधारित "शेरास सव्वाशेर" ही म्हण  निर्माण झाली आहे. निसर्गाने विविधतेला एकत्र ठेवण्यासाठी समरसतेची एक साखळी निर्माण केली आहे. विविधता म्हणजे असमानता. पण या असमानतेतच सामायिक साखळी निर्माण करून निसर्गाने अटीशर्तीची समता (समानता) निर्माण केली आहे. कायद्यापुढे सर्व समान याचा अर्थ निसर्गापुढे सर्व समान. सामायिक  साखळीत निसर्ग कोणाचीही कट्टरता चालू देत नाही.

विविधतेची अर्थात विशेषतेची एकजूट करणे म्हणजे विशेषीकरणाचे (स्पेशलायझेशनचे) सामान्यीकरण (जनरलायझेशन) करणे. निसर्ग तेच करतोय व मानव समाजालाही तेच करावे लागतेय. सामान्यीकरणात विशेषतेला भाव असला तरी तिच्या कट्टरतेला थारा नसतो. तिथे शेरास सव्वाशेर ही व्यावहारिक म्हण प्रत्यक्षात कार्यरत असते. म्हणून तर कोणत्याही विशेष गोष्टीला अतिशय महत्व देणे किंवा तिच्याबद्दल एकदम काटेकोर (कट्टर) राहणे चूक!

एखादा मनुष्य एखाद्या विशिष्ट विषयात विशेष प्रावीण्य मिळवून त्या विषयात जरी तज्ज्ञ होऊ शकला तरी तो विविधतेने युक्त असलेल्या सर्व विषयात तज्ज्ञ होऊ शकत नाही. त्या अर्थाने मानव समाजातील सर्व व्यक्ती ज्ञान व कौशल्य यांच्या बाबतीत मरेपर्यंत सर्वसामान्य राहतात व सामान्य होऊन सामायिक साखळीला जोडल्या जातात. नैसर्गिकरीत्या सामायिक साखळीला असे जोडले गेल्यानंतर सर्व विषयातच नव्हे तर विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विषयाशी सुद्धा काटेकोर (कट्टर) राहण्याचा अट्टाहास करणे हे चुकीचे आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©३.१२.२०२१

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

सुखाने संसार करा!

सुखाने संसार करा, घटस्फोट टाळा!

मानवी लैंगिकता व पुनरूत्पादन या नैसर्गिक क्रिया. या क्रियेवर सामाजिक शिस्तीचे बंधन घालण्याच्या उद्देशाने निर्माण झाली ती विवाह संस्था. या विवाह संस्थेतील कौटुंबिक व्यवहार नियंत्रित करणारा कायदा तो विवाह कायदा. विवाह कायदा हा नागरी (सिव्हिल) कायदा होय. मानवी लैंगिकतेच्या अतिरेकावर कठोर बंधन घालणारे फौजदारी कायदे सुद्धा मानव समाजाने निर्माण केले आहेत. उदा. बलात्कार प्रतिबंधक कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) कायदा, मानवी तस्करी (जबरदस्तीने वेश्या व्यवसाय) कायदा इ.

विवाह बंधनात राहून संसार करणे हा जसा एक निर्मळ आनंद आहे तसे ते एक आव्हानही आहे कारण या बंधनात हक्क व कर्तव्ये यांच्यात समतोल साधण्याची कसरत नवरा व बायको दोघांनाही करावी लागते. ही कसरत ज्यांना नकोशी वाटते किंवा नीट जमत नाही ते विवाह बंधन तोडण्याच्या दिशेनेच विचार करून शेवटी घटस्फोटाचा निर्णय घेतात.

एक वकील म्हणून घटस्फोट टाळण्याकडे मी नेहमीच प्रयत्नशील असतो. कारण घटस्फोट ही अत्यंत गंभीर परिस्थितीत निर्णय घेण्याची गोष्ट आहे. उदाहरणार्थ, नवरा बायको पैकी कोणी मनोरूग्ण असणे, पुरूषाची नपुंसकता, नवरा बायको पैकी कोणी व्यभिचारी असणे, सासर कडून हुंड्यासाठी होणार छळ, स्त्रीला चूल व मूल या कामापुरतीच समजून पुरूष प्रधान सासरकडून स्त्रीला मिळणारी कनिष्ठ  वागणूक इत्यादी. माझा मुख्य मुद्दा किरकोळ कारणांवरून नवरा बायकोत होणाऱ्या भांडणा पुरता मर्यादित आहे. मुलगी लग्न होऊन सासरी जाणे, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा असे तिला तिच्या आईवडिलांनी म्हणणे, तसेच लग्न झाल्यावर मुलीने माहेरचे नाव सोडून देऊन नवऱ्याचे नाव व आडनाव लावणे ही पारंपरिक पद्धत आपल्याकडे अजून सुरूच आहे व ती बहुसंख्येने स्वीकारली गेली आहे.

प्रश्न हा आहे की मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेंव्हा ती आपल्या आईवडिलांना सोडून तर जात असतेच पण मोठ्या विश्वासाने आपले जीवन नवऱ्याला समर्पित करताना एकदम नवख्या घरात प्रवेश करीत असते. त्यामुळे तिला सुरूवातीला असुरक्षित वाटणे हे अगदी साहजिक आहे. त्यात जर सासरची मंडळी तिला स्वतःच्या मुलीसारखी वागणूक न देता परक्यासारखी वागणूक देऊ लागली तर संसार तणावपूर्ण होतो. अशावेळी नवऱ्या मुलाने स्वतःचे आईवडील, भाऊ, बहिणी व आपली बायको यांच्यात संतुलन साधायचे काम केले पाहिजे. ही गोष्ट खूप अवघड असते. खूप मोठे एकत्र कुटुंब असेल तर तिच्या आईवडिलांना सोडून संसार करायला आलेली मुलगी एकटी पडते. अशावेळी जर घाबरून तिने तिच्या आईवडिलांना फोन केले तर तिच्यावर संशय न घेता तिची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कोणतेही आईवडील आपल्या मुलीचा संसार मोडावा असा प्रयत्न करणार नाहीत. तेंव्हा मुलीच्या संसारात मुलीची आई लुडबूड करून तिच्या संसारात आग लावते असा सर्वसाधारण  आरोप करणे चुकीचे आहे. मुलीच्या आईकडे बोट दाखवताना मुलाची आई अगदी गरीब गाय असते असा निष्कर्ष कोणी काढू नये. टाळी एका हाताने वाजत नसते. अशाही केसेस मी पाहिल्या आहेत की मुलगा जर एकुलता एक असेल तर अशा मुलाच्या आईला आपली सून आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करते की काय अशी भीती वाटल्याने अशी सासू सुनेला जाच करीत राहते. अशावेळी आईलाही सोडता येत नाही व बायकोला घेऊन वेगळेही राहता येत नाही अशी मुलाची पंचाईत होऊन जाते. याला अवघड जागेचे दुखणे म्हणतात. काही वेळा नवरा बायकोच्या किरकोळ भांडणात मुलाचे आईवडील, नातेवाईक नाक खुपसतात तसे मुलीचे आईवडील, नातेवाईकही नाक खुपसतात. नवरा बायकोच्या भांडणात असे इतरांनी नाक खुपसल्याने प्रश्न अवघड होऊन बसतात. टाळी एका हाताने वाजत नाही हे खरे आहे. कोणीही फक्त मुलीच्या आईवडिलांना किंवा फक्त मुलाच्या आईवडिलांना दोष देऊन मोकळे होऊ नये. पण शेवटी मुलगी ही तिच्या आईवडिलांना सोडून सासरच्या घरी संसार करायला आलेली असते. त्यामुळे सुरूवातीला तरी तिची बाजू कमकुवत असते हे विसरता कामा नये.

मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी अशी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ एवढाच की लग्न करताना मुलाने व मुलीने नीट विचार करून लग्न करावे. एकदा लग्न केले की मग हे लग्न कायम टिकलेच पाहिजे हाच तो विचार असावा म्हणजे लग्नापूर्वी शिक्षण, आर्थिक पाया, दोन्ही कडील कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी गोष्टींचा नीट अभ्यास, विचार करूनच लग्न करावे. दोघे नवरा बायको जर समविचारी, एकमेकांवर प्रेम करून एकमेकांना समजून घेणारे असतील तर त्यांच्या संसाराला कोणाचीच दृष्ट लागू शकत नाही मग ते मुलाचे आईवडील असोत, मुलीचे आईवडील असोत की आणखी कोणी!

माझ्या वकिलीत वैवाहिक केसेस मध्ये मी जास्तीतजास्त संसार जोडण्याचेच प्रयत्न केले आहेत. मी नेहमी दोन्हीकडची माणसे एकत्र बोलावून दोन्ही बाजू ऐकून घेऊन दोन्ही बाजूंना त्यांचे प्रश्न काय आहेत व त्यावर कायदा काय म्हणतो हे नीट समजावून सांगतो व मग समेट घडवून आणतो. ज्यांचे संसार मी जुळवले ती मंडळी अजूनही माझे नाव काढतात. एका केसमध्ये तर नवरा उद्योजक व बायको वकील होती. मी नवऱ्याचे वकीलपत्र स्वीकारले होते. तरी मी एका हॉटेलात नवरा व बायको दोघांना चहा प्यायला या, मला दोघांचे म्हणणे एकत्र ऐकायचे आहे असे सांगितले. तेंव्हा दोघांनी माझे म्हणणे ऐकले. त्या एकाच बैठकीत मी दोघांनाही त्यांच्या चुका समजावून सांगितल्या व आयुष्य खूप छोटे आहे, मस्त मजेत एकत्र संसार करा हे समजावून सांगितले. दोघांनाही ते मनापासून पटले. मग त्यांची घटस्फोटाची केस तडजोडीने मागे घेत असल्याचा अर्ज कोर्टात देऊन कोर्टाच्या सही शिक्क्यानिशी दोघांत समेट घडवून आणला. आज ते दोघेही नवरा बायको आनंदात संसार करीत आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा इंजिनियर झाला आहे व दोघेही नवरा बायको मला अधूनमधून फोन करून सांगतात की "सर, आमच्या मुलाचे लग्न जेंव्हा कधी ठरेल तेंव्हा आमच्या मुलाला व सुनेला आशीर्वाद द्यायला तुम्हाला लग्न कुठेही असले तरी यावेच लागेल"! वकिलीतला हा आनंद मला जीवनाचे खूप मोठे समाधान देतो.

माझे पती व पत्नी दोघांनाही एवढेच सांगणे की विवाह, संसार, मुलांचे संगोपन हा अनुभव खरं तर स्वर्गसुख आहे. तुम्ही शेवटपर्यंत एकमेकांचे आधार आहात. संसारातील किरकोळ भांडणे स्वतःच मिटवा. तुमच्या संसारात कोणालाही नाक खुपसू देऊ नका मग ते तुमचे आईवडील का असेनात! सुखाने संसार करा, घटस्फोट टाळा!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.११.२०२१

किती चांगले होते ते दिवस?

किती चांगले होते ते दिवस!

किती चांगले होते ते जंगली दिवस आम्हा वाघ, सिंहाचे! हवा मोकळी, स्वच्छ पाणी मुबलक आणि खायला काय तर हरणे, ससे, रानडुकरे यांची निसर्गाकडून भरपूर पैदास! भूक लागली की थोडे धावायचे आणि अगदी सहज शिकार करायची, मिटक्या मारीत मांस खायचे, वरून पाणी प्यायचे, जोडीदार मिळविण्यासाठी थोडी मारामारी करायची आणि मस्त ताणून द्यायची.

पण हा माणूस नावाचा प्राणी कुठून पैदा झाला माहित नाही आणि याने आमची वाट लावली. हा अतिशय बुद्धीमान आणि धूर्त, बेरका प्राणी. या प्राण्याने काय केले तर स्वतःची लोकसंख्या वाढवत आमची जंगले बळकावली, डोंगरे फोडली, मुक्तपणे वाहणाऱ्या नद्या अडवून त्यावर धरणे बांधली आणि आम्हा सगळ्यांच्या बोकांडी हा माणूस बसला. आम्ही जंगलाचे राजे, पण या माणसांनी आमचे काय केले तर आम्हाला सर्कस मध्ये खेळ खेळायला भाग पाडले. सर्कस मधल्या त्या रिंग मास्तरची हिंमत केवढी मोठी! आम्हाला चाबकाचे फटके मारायचा. काहींनी तर आम्हाला माणसांची करमणूक करणाऱ्या चित्रपटात वापरून घेतले. हाथी मेरे साथी हा राजेश खन्नाचा हिंदी चित्रपट बघा म्हणजे कळेल आमचा वापर. पण शेवटी काही दयावान माणसांना आमची दया आली. त्यातून पुढे मग तो सर्कस प्रकार बंद झाला. पण या दयेचा परिणाम तसा तात्पुरता होता. काही अतिशहाण्या माणसांनी मग आमची वाघ व सिंह अशा दोन जातीत विभागणी करून आमच्यापैकी वाघांना ताडोबा जंगलात बंदिस्त केले तर आमच्यापैकी सिंहाना गिर जंगलात बंदिस्त केले. अशाप्रकारे या धूर्त माणसांनी आम्हा वाघ, सिंहाची जातीपातीत विभागणी करून आम्हाला जंगल आरक्षणात बंदिस्त केले.

ती कुत्री या महाधूर्त, बेरक्या माणसांत कशी माणसाळली हे कळत नाही. माणसे खरवस खात असताना शेपूट हलवत एखादा तरी खरवसचा तुकडा फेकावा म्हणून माणसांपुढे लाळघोटेपणा करीत उभी असतात. आम्हाला हे कधीच जमणार नाही कारण जंगले संपली तरी आम्ही जंगलचे राजे आहोत. पण आता नावालाच राजे राहिलो आहोत. आमची राज्ये खालसा करून या धूर्त माणसांनी आमच्या ऊरावर आता सिमेंटची जंगले बांधली आहेत व त्यातील काडेपेट्यांसारख्या घरात ही माणसे स्वतःसाठी शांती शोधत देवाचे अध्यात्म करीत बसलीत. आमचे नैसर्गिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन कसली मिळणार यांना शांती! खरंच किती चांगले होते ते दिवस!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.११.२०२१

दोन वर्ग!

सर्वसामान्य माणूस कोणाला म्हणायचे?

ज्ञान, संपत्तीचे प्रतिनिधित्व करणारा पैसा व शस्त्रबळाचा धाक दाखवणारी सत्ता ही मानवी जगात मानाने जगण्याची तीन प्रमुख साधने आहेत. या साधनांची मालकी कोणाकडे हा मूलभूत प्रश्न आहे. सुशिक्षित, ज्ञानी माणसे ज्ञान साधनाची मालक असतात, अतिश्रीमंत भांडवलदार मंडळी ही संपत्ती आणि/किंवा पैसा साधनाची मालक असतात व प्रभावशाली राजकारणी मंडळी ही शस्त्र आणि/किंवा सत्ता साधनाची मालक असतात.

पण बारकाईने बघितले तर सुशिक्षित, ज्ञानी माणसे ही ज्ञान साधनाची फक्त नावाला मालक असतात कारण त्यांचे ज्ञान भांडवलदार व राजकारणी यांच्या अर्थात अनुक्रमे पैसा व सत्ता यांच्या दावणीला बांधलेले असते. अर्थात इतर शारीरिक श्रमिक मंडळीप्रमाणे ही बौद्धिक श्रमिक मंडळीही भांडवलदार व राजकारणी यांची गुलाम असतात. म्हणजे समाजात ज्ञान, संपत्ती (पैसा), सत्ता (शस्त्र ) या तीन साधनांचे मालक दोनच, एक श्रीमंत भांडवलदार व दोन प्रभावशाली राजकारणी! हे दोन मालक हेच खरे असामान्य लोक, बाकीचे सर्व (सुशिक्षित, ज्ञानी धरून) सर्वसामान्य लोक! अर्थात मानव समाजात दोनच वर्ग व ते म्हणजे साधन मालक अर्थात शोषक वर्ग व मालकांचा गुलाम श्रमिक अर्थात शोषित वर्ग! शोषक वर्ग हा असामान्य वर्ग तर शोषित वर्ग हा सर्वसामान्य वर्ग!

वाईट याचेच वाटते की शोषित वर्ग हा बहुजन समाज वर्ग पण त्यांच्यात पुन्हा जाती पातीचे वर्ग (उच्च जातवर्ग व मागास जातवर्ग) असे वर्ग पाडले जाऊन या बहुजन समाजाचे मालक वर्गाकडून आणखी शोषण होण्यासाठी मदतच होते. जातीपाती नसत्या तर बहुजन शोषित वर्ग एक होऊन साधनांची मालकी स्वतःकडे दाबून ठेवणाऱ्या मूठभर शोषक वर्गाशी बौद्धिक व शारीरिक श्रम भांडवलाच्या जोरावर प्रभावी संघर्षकर्ता झाला असता व त्या संघर्षातून साधनांची मालकी काही प्रमाणात का असेना पण स्वतःकडे खेचून घेऊ शकला असता.

पण बहुजन समाजातच जातीपातीवरून संघर्ष होतोय आणि मूठभर मालक (शोषक) वर्ग आणखी पॉवरफुल होतोय. कधी संपणार हे दुष्टचक्र? आज क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे. त्यांना विनम्र अभिवादन करून हा लेख संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.११.२०२१

सर्वसामान्य माणूस!

सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचे फायदे!

१. सर्वसामान्य माणसांकडे पैसा खूप कमी असल्याने जास्तीच्या पैशाचे काय करायचे याची त्यांना चिंता नसते.

२. सर्वसामान्य माणसांकडे पैसा खूप कमी असल्याने आपोआप त्यांच्या चैनीला चाप बसून त्यांच्या गरजा कमी होतात.

३. असामान्य माणसांना जास्त लोक ओळखत असतात त्यामुळे त्यांच्या हालचालीवर लोकांचे जास्त लक्ष असते. पण सर्वसामान्य माणसांना कोणी विचारत नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावर वडापाव खाता येतो व टपरीवर चहा पिता येतो.

४. सर्वसामान्य माणसांकडे पैसा खूप कमी असल्याने त्यांना गँगस्टर्स कडून खंडणीची धमकी येण्याची भीती नसते. तसेच इनकम टॕक्स, ईडीच्या धाडीची भीती नसते. त्यामुळे त्यांना शांत झोप लागते.

५. सर्वसामान्य माणसे वस्तू खरेदी करताना न लाजता किंमतीची घासाघीस करू शकतात.

६. असामान्य माणसांना आयुष्याचे जोडीदारही असामान्य लागतात. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली तर एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला भारी पडू शकतो. सर्वसामान्य नवरा बायकोचे तसे नसते. त्यांच्यात भांडणे झाली तरी दोघेही कमकुवत असल्याने एकमेकांना नीट समजून घेऊन दोघेही तडजोड करून सामोपचाराने संसार करतात.

७. कुठे परगावी फिरायला गेले तर असामान्य माणसे भारी लॉजमध्ये जातात. सर्वसामान्य माणसे मात्र साधे लॉज शोधतात पण त्यातला आनंद लय भारी असतो.

८. सर्वसामान्यांना त्यांच्या मुलांना भारी शाळांत घालता येत नाही कारण त्यांच्याकडे मोठी फी देण्यासाठी पैसा नसतो. पण त्यांची मुले हुशार असतात. ती ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या शाळांत शिकूनही श्रीमंत मुलांना शिक्षणात भारी पडतात.

९. असामान्य माणसे आजारी पडली की भारी डॉक्टर्स, भारी रूग्णालये गाठतात. सर्वसामान्य माणसांना गल्लीतला साधा डॉक्टर पुरेसा होतो. जास्त आजारी पडल्यावर सरकारी रूग्णालये सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी जवळजवळ फुकट तत्पर असतात. शेवटी काय मरण जवळ आल्यावर असामान्य माणसे पंचतारांकित रूग्णालयात तळमळत मरतात व सर्वसामान्य माणसे सरकारी रूग्णालयात तळमळत मरतात. शेवटी वेदना, तळमळ दोन्ही रूग्णालयात असते. मग फरक काय पडतो, इथे मेले काय आणि तिथे मेले काय?

सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचे आणखी तसे खूप फायदे आहेत. असामान्य माणसांना त्यांच्या असामान्यत्वाची टिमकी वाजवत जगू द्या. त्यांना जास्त भाव देऊ नका. सर्वसामान्य जगण्यातला मुक्त आनंद घ्या.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.११.२०२१

हनी ट्रॕप व हॕकर्स!

हॕकर्स व हनी ट्रॕपवाल्यांनी फेसबुकवर हा काय खेळ चालवलाय?

फेसबुक हॕकर्स व हनी ट्रॕपवाले हल्ली मोकाट सुटलेले दिसतात. गेल्या आठवड्यात मलाही माझ्या फेसबुक मेसेंजर इनबॉक्स मध्ये माझ्या एका फेसबुक मित्राने एक लिंक पाठवली व मला इशारा केला (केला इशारा जाता जाता) की ती लिंक उघडू नये. कारण त्याच लिंकने त्याचे फेसबुक खाते हॕक झाले आहे. पण मला जाम चरबी. मी ती लिंक उघडली जेणेकरून माझे फेसबुक खाते हॕक होईल व इकडेतिकडे फिरत राहील. काय माहित कदाचित माझे ते खाते फिरतही असेल. बोंबलत फिरू द्या त्याला मला काही फरक पडत नाही. कारण एकदा असेच एका बदमाश टोळीने माझ्या फेसबुक इनबॉक्स मध्ये मध्यरात्री घुसून मला मधाचे बोट दाखवून हनी ट्रॕप केले होते. मग मी त्या टोळीलाच त्याचवेळी ट्रॕप करून ठाणे सायबर पोलिसांना पहाटे तक्रार केली. आता पुन्हा हा नवीन हॕक लिंकचा प्रकार. या लोकांना काय कामधंदा नाही काय? कशाला उगाच त्रास देतात माझ्यासारख्या सरळमार्गी माणसाला? मी त्यांचे काय वाकडे केले आहे? आता त्या फेसबुक मित्राला तरी मला तसली लिंक पाठवायची काय गरज होती? त्याचे खाते हॕक झाले म्हणून माझेही खाते हॕक व्हावे अशी त्याची इच्छा होती काय? अरे बाबा, तुझे हॕक झालेले ते खाते माझ्या फेसबुक मित्र यादीत ठेऊन काय करू? इतर मित्रांना पण तो हॕक वायरस चिकटायचा व करोना विषाणू प्रमाणे  त्रास द्यायचा. थांब आता मी तुलाच ब्लॉक करतो असे इनबॉक्स मध्ये लिहून मी जाता जाता इशारा करणाऱ्या त्या मित्रालाच ब्लॉक करून टाकले व त्या हॕक झालेल्या खात्याचा संबंध तोडून टाकला. थोडक्यात काडीमोडच घेतला मी. एकतर रोज नवीन नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाने माझे डोके फिरायची वेळ आलीय म्हातार वयात आणि आता या वयात असल्या भलत्याच तांत्रिक भानगडी ऊरावर घेऊन कोण बसतोय. माझ्याकडे आता वकिलीची जास्त कामे नाहीत हे तरीषअनोळखी लोकांना कसे काय कळते बुवा? अधूनमधून सारखे माझ्या फोनवर लघुसंदेश येत असतात की घरी बसून दररोज १००० रूपये कमवा म्हणून. मी काय या लोकांना कामाची किंवा पैशाची भीक मागत फिरतोय काय? मग वैतागून मी तो तसला एस.एम.एस. फोनमध्ये दिसला रे दिसला की लगेच डिलिट करून टाकतो. कुठून हे असले अॉनलाईन तंत्रज्ञान आलेय काय माहित? पूर्वी किती मस्त होते. सगळं हाताने लिहायचे. साधे पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र लिहिण्यात किती मजा होती. चोरी लगेच पकडली जायची. मी एकदा असेच हस्तलिखित प्रेमपत्र कॉलेजमध्ये एका मुलीच्या वहीत कोंबले होते. पण माझ्या हस्ताक्षरावरून माझी ती चोरी पकडली गेली होती. मग त्या मुलीने नंतर माझ्याशी बोलणेच सोडले होते. हल्ली काय कोणीपण उठतो आणि दुसऱ्याचे इलेक्ट्रॉनिक लिखाण चोरतो व स्वतःच्या नावाने खपवतो. कसला कॉपीराईट कायदा आणि कसले काय? या डिजिटल किंवा अॉनलाईन तंत्रज्ञानाने माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाची मात्र अधूनमधून बोबडी वळत असते हे मात्र खरे!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.११.२०२१

https://www.tv9marathi.com/crime/cyber-crime/marathi-actress-shubhangi-gokhale-facebook-account-hacked-appeals-friends-to-not-click-on-suspicious-links-in-messenger-586075.html

चौकट!

चौकट!

चौकटीबाहेर जाऊन जीवन जगण्याचा किंवा प्रवाहाविरूद्ध पोहण्याचा प्रयास हा शेवटी महागात पडतो. याचा अर्थ असा नव्हे की माणसाने प्रवाहपतित होऊन जीवन जगावे. तसे असते तर मनुष्य जनावरांच्या पातळीवर जंगली जीवनच जगत राहिला असता.

पण तरीही आयुष्याला चौकट हवी. बेभान, मुक्त जीवन म्हणजे कटी पतंग जीवन. म्हणून मी पुरूष मुक्ती व स्त्री मुक्ती या दोन्ही विचारांना अतिरेकी विचार समजतो. याचे कारण म्हणजे निसर्गाची चौकटच अशी आहे की स्त्री व पुरूष दोघेही एकमेकांसाठी बनले आहेत. त्यांचे एक होणे, एकत्र राहणे, एकमेकांसाठी जगणे हेच तर स्त्री शक्ती व पुरूष शक्ती यांच्या निर्मितीच्या मागील निसर्गाच्या अनाकलनीय मुळाचे अर्थात परमेश्वराचे मूळ उद्दिष्ट आहे. स्त्री मुक्ती काय किंवा पुरूष मुक्ती काय हे अतिरेकी विचार या मूळ उद्दिष्टाला, पायाला छेद देणारे घातक विचार आहेत.

मानवी जीवनाला दोन चौकटी आहेत. एक चौकट ही निसर्गाची मूळ वैज्ञानिक चौकट व दुसरी चौकट ही समाजाची पूरक सामाजिक चौकट! या दोन्ही चौकटींची मिळून कायदेशीर चौकट तयार होते. मनाचे काल्पनिक बुडबुडे व निसर्गाचे वास्तव सत्य यात फरक आहे. 

निसर्गाच्या वैज्ञानिक चौकटीत राहून माणसांनी माणसांसाठी तयार केलेली सामाजिक चौकट म्हणजे सामाजिक कायद्यांची (नीतीनियमांची) चौकट ही बुद्धीच्या जोरावर समाजमनाने तयार केलेली विशेष चौकट होय. जंगली जनावरे निसर्गाच्या मूळ चौकटीतच जीवन जगणे पसंत करतात कारण त्यांना उच्च श्रेणीची कुशाग्र मानवी बुद्धी नसते. त्यामुळे बळी तो कानपिळी या निसर्गाच्या मूळ जंगली नियमापलिकडे ती विचार करू शकत नाही. निसर्गातील मूळ शक्तीला म्हणजे अनाकलनीय परमेश्वरालाच या जंगली नियमाचा उबग आल्याने त्याने उच्च बुद्धीचा मनुष्य प्राणी निर्माण केला असावा.

पण सगळी माणसे सारख्या बुद्धीमत्तेची का दिसत नाहीत? सगळी माणसे समान बौध्दिक पातळीवर असती तर त्यांच्यात खरी समानता निर्माण झाली असती. पण मानवी समतेचे तत्व सामाजिक कायद्यात समाविष्ट केले असले तरी प्रत्यक्षात ते दिसत नाही याचे कारण म्हणजे माणसांमधली असमान बौध्दिक पातळी.

आता मी सांगत असलेल्या वरील दोन चौकटी किती जणांना नीट समजल्या आहेत? मुळात या दोन चौकटी अस्तित्वात आहेत का इथूनच वादाला सुरूवात होईल. देव अस्तित्वात आहे की नाही अर्थात ती कल्पना आहे की वास्तव आहे या वादाप्रमाणेच या दोन चौकटी वास्तवात आहेत की त्या केवळ कल्पना आहेत इथून या आंतरमानवी वादाला सुरूवात होईल. याचे मूळ कारण म्हणजे या दोन चौकटी समजून घेण्याची निरीक्षणशक्ती व आकलनक्षमता अर्थात बुद्धी  सगळ्या माणसांना सारखी असत नाही. म्हणून तर समाजात खालच्या पातळीवरील कनिष्ठ न्यायालयांपासून वरच्या पातळीवरील उच्च व सर्वोच्च न्यायालयांपर्यंत खालून ते वर अशा चढत्या क्रमाने वेगवेगळी न्यायालये आहेत.

या लेखाचा सार एवढाच आहे की वरील दोन चौकटीत राहून बंदिस्त जीवन जगताना मानवी मनाची घालमेल, कुतरओढ झाली तरी या दोन चौकटीत राहून जीवन जगणे मनुष्याच्या हिताचे आहे. निसर्गाची मूळ वैज्ञानिक चौकट व मानव समाजाची पूरक सामाजिक चौकट या चौकटी पलिकडे निसर्गातील देवाचा कोणता धर्म नाही की कोणते अध्यात्म नाही. जे काही आहे ते या दोन चौकटीतच आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२९.११.२०२१

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

अतिविचार, अतिशहाणपणा!

निसर्गाची विविधता माणसाला अतिविचारातून अतिशहाणपणा करण्यास उद्युक्त करते?

माणूस विकास करतो म्हणजे काय करतो तर निसर्गाच्या मोहाला बळी पडतो व त्या मोहाने अतिविचार करून अतिशहाणपणा करतो. हा अतिशहाणपणा म्हणजे मानवी विकास. मानव समाजाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर हा खरं तर अतिविचारी माणसाच्या अतिशहाणपणाचा विकासदर असतो. निसर्गाची विविधता व त्यात भरीस भर म्हणजे माणसाची चौकस बुद्धी हा या विकासदराचा मुख्य आधार आहे.

साधे पाण्यात पोहण्याचे उदाहरण घ्या. नदीच्या किनारी बसून पाण्यात मासे कसे पोहतात हे बघता बघता माणसाच्या डोक्यात आपण असे पोहू शकतो का असा विचार आला. मग त्या माशांचे निरीक्षण, पाण्याच्या खोलीचा अंदाज व पाण्याच्या गुणधर्माचे परीक्षण या गोष्टी आल्या व त्यातून मनुष्य पाण्यात पोहायला शिकला. या ज्ञानातून पुढे माणसाने पाण्यातून प्रवास करणारी मोठमोठी जहाजे बनविली. त्यानंतर मामसाने आकाशात उडणाऱ्या पक्षांचे निरीक्षण व हवेच्या गुणधर्माचे परीक्षण करून हवेत प्रवास करणारी विमाने बनविली. वाघ, सिंह, हरणे, घोडे यांच्या पळण्याच्या वेगाचे व पेट्रोल, डिझेल, वीज यांच्या शक्तीचा अभ्यास करून व पुढे चाकाचा शोध लावून मोटारी, रेल्वे निर्माण केल्या. ही सर्व तांत्रिक प्रगती करण्यास दोनच गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्या दोन गोष्टी म्हणजे निसर्गाच्या विविधतेचे मानवी मनाला भुरळ पाडणारे विज्ञान व मनुष्याची चौकस बुद्धी!

मानवी चौकस बुद्धीने मिळविलेले निसर्गाच्या विविधतेच्या विज्ञानाचे विविध प्रकारचे ज्ञान हे मानवाचे महत्वाचे नैसर्गिक साधन आहे. हे नैसर्गिक साधन व पैसा हे या ज्ञानातूनच निर्माण झालेले मानवनिर्मित कृत्रिम साधन या दोन साधनांच्या जोरावर आधुनिक मनुष्य तांत्रिक व सामाजिक जीवन जगत आहे. सत्ता हे या दोन साधनांतून मनुष्यानेच निर्माण केलेले तिसरे कृत्रिम साधन. अर्थात आधुनिक मनुष्य ज्ञान, पैसा व सत्ता या तीन साधनांच्या जोरावर उच्च विकसित जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे व त्याचा विकासदर वाढविण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीत आहे.

वरील तीन साधनांची (ज्ञान, पैसा, सत्ता) आंतर मानवी देवाणघेवाण करण्यासाठी आंतरमानवी संवाद महत्वाचा होता म्हणून मनुष्याने भाषा हे संवादाचे माध्यम निर्माण केले. पण पैशाला भौतिक (मटेरियल) देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून कायम ठेवले. भाषा व पैसा ही माध्यमे आहेत तशी साधनेही आहेत. पण भाषेकडे साधनाऐवजी माध्यम म्हणूनच जास्त बघितले जाते.

आंतरमानवी भाषा संवाद असो की ज्ञान, पैसा व सत्ता या साधनांची आंतरमानवी भौतिक देवाणघेवाण असो (ज्यात मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तू व सेवांची भौतिक  देवाणघेवाण येते) यांचा मूलभूत पाया (उद्देश) मानवी स्वार्थ हाच आहे. या स्वार्थाचे हळूहळू पुढे तीन वर्ग निर्माण झाले. पहिला वर्ग माया, प्रेमाचा, दुसरा वर्ग माणुसकीचा व तिसरा वर्ग निव्वळ स्वार्थाचा.

पहिला वर्गात आपले कुटुंब येते. आईवडील, पती पत्नी व स्वतःची मुले (लग्नानंतर भाऊ बहिणी वेगळ्या होतात) या स्वतःच्या कुटुंब सदस्यांत स्वार्थाला माया, प्रेमाचा ओलावा  चिकटलेला असल्याने भाषा संवाद व भौतिक देवाणघेवाणीत स्वार्थाचा थोडा त्याग करून कौटुंबिक नातेसंबंधाचा निर्मळ आनंद घेण्याचा प्रयत्न केला जातो. हातचे राखून संवाद व देवाणघेवाण हा प्रकार कौटुंबिक नाते संबंधात नसतो. या संबंधात सामाजिक कायद्याच्या दंडकाची तशी गरजच नसते. सर्व व्यवहार सुरळीत, सहज नैसर्गिकरीत्या पार पडतात.

दुसऱ्या वर्गात जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार व एकंदरीत मानव समाज येतो. इथे थोडे हातचे राखून संवाद व देवाणघेवाणीचा आंतरमानवी व्यवहार केला जातो. पण या संबंधात स्वार्थाला माणुसकीचा ओलावा चिकटलेला असल्याने योग्य मोबदल्याचा योग्य व्यवहार (इंग्रजीत फेयर बिझिनेस) हा प्रकार असतो. या योग्य व्यवहाराचे (फेयर बिझिनेसचे) कायदेशीर नियमन करण्यासाठी सुधारक मानव समाजाने दिवाणी कायदा (सिव्हिल लॉ) निर्माण केला आहे.

तिसरा वर्ग मात्र निव्वळ स्वार्थाचा! या वर्गात माया, प्रेम किंवा माणुसकीला बिलकुल थारा नसतो. कसेही करून दुसऱ्याकडून ओरबडून घ्यायचे ही नीच प्रवृत्ती इथे असते. या वर्गातील लोक भ्रष्टाचार व त्याही पुढे जाऊन अत्याचार करायला मागेपुढे पहात नाहीत. या वर्गातील लोकांना कायदेशीर सरळ करण्यासाठीच तर सुधारक मानव समाजाने फौजदारी कायदा (क्रिमिनल लॉ) निर्माण केला आहे.

वरील विवेचनावरून लक्षात येईल की मानवी जीवन किती आव्हानात्मक आहे ते! पण काय करणार, नशिबाचा किंवा योगायोगाचा भाग आहे या जगात मनुष्य म्हणून जन्माला येणे हे. माणसाला माणूस म्हणून जन्म घेताना माहित असते का की आपल्या वाट्याला निसर्ग व मानव समाजाने एवढी मोठी प्रचंड विविधता व त्यातील प्रचंड मोठी आव्हाने वाढून ठेवलीत म्हणून!

-ॲड.बी.एस.मोरे©१.१२.२०२१

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

आध्यात्मिक नव्हे तर वास्तविक!

आता आध्यात्मिक नाही तर वास्तविक!

देवा असशील जर तू कुठे तर प्रेम दे, शक्ती दे! कारण तूच जर प्रेमहीन, शक्तीहीन झालास तर  तुझा आम्हाला उपयोगच काय? हे जग जर तूच बनविले असेल तर ते उपयुक्ततेचे जग आहे हे काय तुला सांगायला हवे? आम्हाला नको इथे कोणाची पोकळ शाब्दिक शाबासकी! देवाचे आध्यात्मिक जग ही एक कवी कल्पना आहे हे आम्हांस कळून चुकलेय. तुझे हे जग भौतिक आहे व त्यामुळे या जगात आम्ही जर निसर्ग व समाज उपयुक्त काही नैसर्गिक कर्म केले तर त्याचे फळ आम्हाला भौतिक मोबदल्यात नको का मिळायला? पैशाने भौतिक गोष्टी विकत घेता येतात तर मग आमच्या उपयुक्त भौतिक कर्माचा मोबदला आम्हाला पैशात मिळायला नको का? किती लबाड माणसे तू या जगात निर्माण केली आहेस? हातचे राखून वरवरचे सांगत स्वतःच्या भौतिक स्वार्थाचे समाधान किती लबाडीने करतात ही माणसे! इतकेच नव्हे लबाडीच्याही पुढे जाऊन दुष्ट, हिंस्त्र होत काही माणसे स्वतःच्या भौतिक स्वार्थाचे नीच समाधान जबरदस्तीने करताना दुसऱ्यावर खूप अत्याचार, बलात्कारही करतात. आणि हे सर्व तुझ्यासमोर घडत असताना तू मात्र मख्खपणे बघत राहतोस. कसा विश्वास ठेवावा आम्ही तुझ्यावर? म्हणून तू एक थोतांड आहेस ज्या थोतांडावर तुझ्या भौतिक जगातील लबाड माणसे अज्ञानी व सरळमार्गी माणसांची घोर फसवणूक करीत आहेत असे आम्हाला वाटले तर त्यात आमचे काय चुकले? त्यामुळे आता यापुढे आध्यात्मिक नाही तर वास्तविक रहायचे निदान मी तरी ठरवलेय! सांभाळून घे रे बाबा!

-ॲड.बी.एस.मोरे©३०.११.२०२१

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

WHEN NATURAL BECOMES DIVINE!

WHEN NATURAL BECOMES DIVINE AND SCIENTIFIC BECOMES SPIRITUAL!

Nature and God are same in the sense that God is supreme power in and behind Nature. The supreme power called God is not hidden. It is seen within Nature. This way the Nature is truth and this truth is God meaning Nature is God. 

What is natural within Nature can be made divine by touching natural with word God. When you say Oh God while in your natural action your natural action becomes divine action.

Why should we touch natural with word God? This is because word God means supreme power in and behind Nature. The word God adds super strength to your natural act. The unnatural action is act against Nature means against God and it cannot become divine by touching it with word God. Such touch will not add super strength to such unnatural action. The unnatural action thus can never become divine action.

The natural within Nature is truly scientific and scientific becomes spiritual once it is touched by word God. The spiritual means from the inner spirit of God.

-Adv.B.S.More©20.11.2021

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

जन्म, जीवन, मृत्यू!

जन्म, जीवन, मृत्यू!

दुनिया व दुनियादारीची किंचितही जाणीव नसल्याने आईच्या गर्भात नऊ महिने बिनधास्त राहणारे मनुष्य बाळ व जन्मानंतर मृत्यूपर्यंत वाढत जाऊन याच बाळाचे होणारे मनुष्य रूपी झाड यात खूप फरक आहे. आईच्या गर्भात त्रास नसला तरी जन्म व मृत्यू यांच्यामध्ये असलेल्या जीवनात खूप त्रास आहे. जन्मताना बाळाला होणारा किंचित त्रास व शेवटी मरताना मनुष्य रूपी झाडाला होणारा त्रास यात फरक आहेच. पिकलं पान सहज गळून पडते तसे मनुष्याच्या वृद्धावस्थेतल्या मृत्यूचे आहे काय?

-ॲड.बी.एस.मोरे©३०.१०.२०२१

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

अट्टाहासी मेंदूमन व मनःशांती!

अट्टाहासी मेंदूमन व मनःशांती!

विश्व किंवा निसर्ग हे एक प्रचंड मोठे झाड आहे ज्याच्या फांद्या अनेकविध व फळेही अनेकविध पण या झाडाची मुळे किंवा मूळच माहित नाही. असेच फोफावत गेलेले, वाढलेले हे झाड. या झाडाच्या मुळाला आम्ही देव म्हणतो. हा देव या विश्वाचा किंवा निसर्गाचा निर्माता व आधार आहे अशी जगातील सर्व आस्तिकांची धारणा! सगळ्या विश्वाचा किंवा निसर्गाचा एकच देव किंवा परमेश्वर ही झाली एकेश्वरी कल्पना! पण झाडाला जशी अनेक मुळे असतात तशा हिंदू धर्मात विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या अनेक देवदेवता आहेत. पण तरीही या सर्व देवदेवता एकाच परमेश्वराच्या किंवा परमात्म्याच्या शाखा आहेत असेही हिंदू धर्म मानतो.

एक गोष्ट मात्र खरी की विश्व किंवा निसर्गरूपी झाडाला जी अनेकविध फळे लागतात त्यांची चव ही झाडाच्या मुळांप्रमाणे घेता येत नाही तर त्या फळांच्या चवीप्रमाणेच घेता येते. म्हणजे विश्व किंवा निसर्गाच्या मुळाशी देव आहे असे मानले तरी विश्वाचा किंवा निसर्गाचा अनुभव हा देवाप्रमाणे नाही तर विश्व किंवा निसर्गाप्रमाणेच घ्यावा लागतो. मग देवाचा धर्म व निसर्गाचे विज्ञान यांची सांगड कशी घालायची? इथेच तर मानवी मनाचा खरा गोंधळ उडतो. हा गोंधळ का उडतो कारण माणसाने न दिसणाऱ्या व न अनुभवता येणाऱ्या देवाचा धर्म बनवला व तो निसर्गाच्या विज्ञानात घुसवला.

माणसाच्या कवटीत जो मेंदू आहे तो कवटीतून बाहेर काढला की मानवी शरीराचा एक मांसल अवयव म्हणून दृश्य होतो. पण या दृश्य मेंदूत असलेले मेंदूमन मात्र अदृश्य असते आणि हीच तर खरी निसर्गरूपी झाडाची किमया आहे. हे मेंदूमन निसर्गातील अनेकविध फांद्या स्वतःच्या ताब्यात ठेवून त्यावरील अनेकविध फळांची मालकी स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करते व मग त्या फांद्यांनी व फळांनी मेंदूमनाच्या मर्जी किंवा इच्छेनुसारच वागले पाहिजे असा निरर्थक  अट्टाहास करते.

वास्तविक विश्व किंवा निसर्ग रूपी झाडाच्या अनेकविध फांद्या व अनेकविध फळे निसर्ग नियमांप्रमाणे (जे नियम विज्ञानाचा मुख्य भाग आहेत) वागतात. निसर्गाचा हा सर्व लवाजमा मेंदूमनाच्या ताब्यात राहणे शक्यच नाही. अहो, मेंदूला चिकटलेल्या शरीराचे अवयव तरी या मेंदूमनाच्या ताब्यात राहतात का? प्रत्येक अवयवाचा नमुना वेगळा व कार्यपद्धती वेगळी. या सर्व इंद्रिये, अवयवांचा राजा बनून त्यांच्यावर नियंत्रण ठेवतानाच मेंदूमनाची खूप त्रेधातिरपीट उडते. मग निसर्गाच्या अनेकविध फांद्या व फळांचे अनेकविध भाग असलेल्या वस्तू व माणसांवर नियंत्रण ठेवण्याची मेंदूमनाची काय पात्रता! ही विश्वमाया आहे. मेंदूमनाला हे कळते पण वळत नाही. एवढे कळूनही मेंदूमन विश्व/निसर्ग नियंत्रणाचा अट्टाहास करतेच व त्या नादात स्वतःची शांती हरवून बसते. मग देवाची ध्यानधारणा, प्रार्थना यातून आभासी शांती मिळविण्याचा प्रयत्न करते. खरं तर, आपल्याच इच्छेप्रमाणे जगाने वागले पाहिजे हा अट्टाहास सोडला की मनाला आपोआप शांती मिळते. त्यासाठी देवाच्या ध्यानधारणेची किंवा प्रार्थनेची बिलकुल गरज नसते. आपले शरीरच धड आपल्या ताब्यात नाही मग आपल्या घरातील माणसांनी म्हणजे आपला जीवनसाथी (पती/पत्नी), मुलेबाळे यांनी आपल्या ताब्यात रहावे, आपल्या मर्जी, इच्छेनुसार वागावे हा मेंदूमनाचा अट्टाहास किती वाईट बरे.

मेंदूमनाचा त्यापुढील मूर्ख अट्टाहास म्हणजे आपल्या नातेवाईकांनी, आपल्या मित्रांनी आणि इतकेच काय समाजातील अनोळखी माणसांनी सुद्धा आपल्या इच्छेप्रमाणे वागावे. शक्य आहे का हे? वागू द्या या अनेकविध फांद्या व फळांना त्यांच्या विशिष्ट गुणधर्म व आवडीनिवडी प्रमाणे व निसर्ग नियमांप्रमाणे! सोडून द्या हो तुमच्या मेंदूमनाचा निरर्थक अट्टाहास की त्यांनी तुमच्या ताब्यात राहून तुमच्या मर्जी, इच्छेप्रमाणे वागावे. तुमच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला येणाऱ्या वस्तू व माणसांकडून जास्त अपेक्षा करायच्या नाहीत. त्यांच्या व तुमच्या संबंधातील मर्यादित शेअर ओळखा. व्यावहारिक काय किंवा माया, प्रेमाचा काय, देवाणघेवाणीचा तेवढाच शेअर घ्या व द्या व मग पुढच्या सर्व अपेक्षा सोडून द्या. असे केले तरच तुमच्या मेंदूमनाला मनःशांती मिळेल.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.१०.२०२१

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

DO NOT OVERREACH WITH NATURE!

DO NOT OVERTHINK, OVERACT, OVERREACH WITH NATURE!

When everything is normal naturally why are you making it abnormal artificially? Let things happen in their natural course. Let love come naturally as you cannot grab love forcefully. Let your man oriental i.e. artificial things remain only natural supplement to original natural & not unnatural intermeddling or intrusion with original natural by destructive over thinking, over action & over reaching with Nature! Please do not overthink, overact, overreach with Nature!

-Adv.B.S.More©24.10.2021

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

महाभारत व कायदा!

श्रीकृष्णाच्या साक्षीने महाभारत घडले की श्रीकृष्णानेच ते घडविले?

महाभारताचे युद्ध व त्या युद्धात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता यांचा अभ्यास कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. या युद्धाचा श्रीकृष्ण हा साक्षीदार झाला. त्याच्या साक्षीनेच हे युद्ध लढले गेले. पण या युद्धात श्रीकृष्णाने प्रत्यक्ष भाग घेतला नाही. त्याने त्याचे सैन्य दुर्योधनाच्या बाजूने उभे राहण्याची परवानगी दिली व स्वतः मात्र अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. नुसता सारथी झाला नाही तर सारथ्य करताना पांडवांच्या बाजूने युद्ध जिंकले जावे या उद्देशाने अर्जुनाला गीतेद्वारे युद्धनीतीचे मार्गदर्शन करीत राहीला.

प्रश्न हा आहे की श्रीकृष्ण हा जर श्रीविष्णूचा अवतार म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वर होता तर तो हे युद्ध रोखू शकत नव्हता काय? पण त्याने हे युद्ध होऊ दिले. अधर्मी दुर्योधनाची निर्मिती कोणाची तर श्रीकृष्णाचीच म्हणजे देवाचीच व त्याच्या विरूद्ध धर्माचे युद्ध लढण्यासाठी उभ्या केलेल्या अर्जुनाची निर्मिती सुद्धा कोणाची तर श्रीकृष्णाचीच म्हणजे देवाचीच आणि हे युद्ध रोखता येत असताना सुद्धा ते न रोखता या युद्धाचा फक्त साक्षीदार होणारा कोण तर तोही श्रीकृष्णच म्हणजे देवच! म्हणजे सर्व करून नामानिराळा राहणारा कोण तर देवच! स्वतःच सगळं करायचे पण त्यातून निर्माण होणाऱ्या दुष्परिणामाचा भागीदार मात्र व्हायचे नाही हा देवाच्या कोणत्या धर्माचा प्रकार आहे? खरंच डोके गरगरायला लागते महाभारताचा असा विचार केला तर!

महाभारताचा हा विचार कायद्याला लावला की मग असेच डोके गरगरायला लागते. अर्थकारण सरळ कायद्याप्रमाणे चालले पाहिजे ना! पण नाही त्यात कोणीतरी वाकडी वाट करणार व आर्थिक गैरव्यवहारातून काळी माया जमवून मजा करणार. दुधात मिठाचा खडा टाकून दूध नासवण्यासारखाच हा प्रकार. मग नासलेल्या दुधाला पुन्हा पूर्वीसारखे चांगले दूध करण्याचा खुळा प्रयत्न करीत रहायचे आणि तसे नाही जमले तर मग त्या नासलेल्या दुधाचे पनीर बनवून खायचे. कोणीतरी दुधात मिठाचा खडा टाकतोय हे सरळ समोर दिसतेय पण मुळातच त्याला रोखायचे नाही पण मिठाचा खडा पडून दूध नासले की मग धावाधाव करायची यालाच कायद्याचे राजकारण म्हणतात काय?

करोनाचेच बघा ना! हा करोना निर्माण करणारा देवच व त्याचा प्रतिबंध करणारी लस निर्माण करणाराही देवच! करोना विरूद्ध प्रतिबंधक लस या युद्धात देव प्रत्यक्षात भाग घेत नाही पण या युद्धाचा साक्षीदार मात्र होतो आणि तेही करोना प्रतिबंधक लसीचे सारथ्य करून! काय किमया म्हणायची या देवाची! याच देवावरील श्रध्देने आम्ही "देवाशपथ किंवा ईश्वरसाक्ष खरे बोलेन, खोटे बोलणार नाही" असे म्हणतो ना! आहे की नाही कमाल देवाची व त्याच्या धर्माची म्हणजेच कायद्याची! म्हणून माझा सरळसाधा प्रश्न हाच की, श्रीकृष्णाच्या साक्षीने महाभारत घडले की श्रीकृष्णानेच ते घडविले?

-ॲड.बी.एस.मोरे©६.१०.२०२१

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

मनसे पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास व भविष्यकाळ!

https://linkmarathi.com/महाराष्ट्र-नवनिर्माण-सेन/
लेखकः ॲड.बी.एस.मोरे, २४.९.२०२१

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास आणि भविष्यातील झंझावात!

(१) वयाची पासष्टी गाठली असताना मी जेंव्हा मागील काही राजकीय घडामोडी अभ्यासतो तेंव्हा मला त्या पार्श्वभूमीवर मा. राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हाच पक्ष महाराष्ट्रात नवनिर्माणाची क्रांती करेल असे वाटते. ते तसे का वाटते त्याबद्दलचा माझा हा लेख!

(२) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या नावात मधोमध असलेला नवनिर्माण हा शब्द विशेष भावतो. मनुष्याला निसर्गाने नवनिर्माणाची एक विशेष प्रेरणा व बुद्धी दिली आहे. त्यामुळे तो निसर्गाची मूळ रचना व मूळ व्यवस्था (विज्ञान) यात नैसर्गिक प्रेरणेने सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत असतो. मग या सुधारणेचा विषय कोणताही असो. तंत्रज्ञान, कला, क्रीडा, कायदा व त्याचबरोबर देव व धर्म असे अनेक विषय आहेत जे मनुष्याने केलेल्या नवनिर्माणाचा भाग आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून नवनिर्माणच केले. त्या स्वराज्य स्थापनेनंतर बऱ्याच घडामोडी मराठी भूमीत झाल्या.

(३) या ऐतिहासिक कालखंडात अलिकडच्या काळात घडलेले एक नवनिर्माण ठळकपणे माझ्या दृष्टीस पडते ते म्हणजे मनसे पक्षाची स्थापना! मध्यभागी असलेले शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे आणि दोन्ही बाजूला शिवसेनेचे दोन वारसदार उध्दवजी ठाकरे व राजसाहेब ठाकरे! पण सख्खे नाते वजनाला भारी पडले व दुसऱ्या वारसदाराला बाजूला व्हावे लागले आणि मग जन्म झाला दुसऱ्या वारसदाराच्या म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या सेनेचा जिचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जी दुसरी सेना दिनांक ९ मार्च २००६ रोजी जन्माला आली. आज उध्दवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय काँग्रेस या दोन पक्षांबरोबर आघाडी करून महाराष्ट्रात सत्तेवर आहे तर मा. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) तिच्या स्थापनेनंतर १५ वर्षे होऊनही सत्तेबाहेर आहे. अजूनही या पक्षाचा खडतर प्रवास, खडतर परीक्षा सुरूच आहे. यशापयशाची पर्वा न करता राजसाहेब ठाकरे यांच्या कणखर, खंबीर नेतृत्वाखाली या पक्षाचा प्रवास सत्तेच्या दिशेने जोमाने सुरू आहे.

(४) राजकारणापासून स्वतःला सतत अलिप्त ठेवणारा मी या मनसे पक्षाकडे कसा आकर्षित झालो हा इतिहासही रोमांचकारक आहे. मनसे संताप मोर्चाचा एक क्षण ज्याने मला मनसेकडे आकर्षित केले व त्या पक्षाला मनापासून घट्ट चिकटून ठेवले. प्रभादेवी-परळ रेल्वे पूलावर मागे २३ माणसे मेली आणि सरकारला जाब विचारण्यासाठी चर्चगेट स्टेशनवर राजसाहेबांनी एक प्रचंड मोठा मनसे संताप मोर्चा काढला. त्यावेळी केलेल्या भाषणात मा. राज ठाकरे काय म्हणाले हे लोक विसरले. त्या संताप मोर्चाने इतिहास घडवला. सरकार सरळ झाले आणि तिथे मजबूत रूंद पूल बांधला गेला. इतकेच नव्हे तर प्रभादेवी-परळ स्थानकांवरील गर्दीला आवर घालण्यासाठी परळ स्टेशन पासून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुरू झाल्या. हे लोक विसरले.

(५) त्या काळात मी मा. राजसाहेब ठाकरे यांची डोंबिवली जिमखान्यात वरिष्ठ नागरिक सभेत भेट घेतली व त्यांना एक निवेदन दिले. त्यावेळी धाडसाने दोन शब्द बोलून त्यांचे लक्ष वेधले तेंव्हा त्यांनी मला जवळ बोलवून घेतले व मला त्यांच्यासोबत मनसोक्त फोटो काढू दिले. ज्या राजसाहेबांचे शिवाजी पार्क मैदानावरील मनसे पक्ष स्थापनेनंतरचे पहिले भाषण मी मैदानात बसून ऐकले त्या राजसाहेबांनी मला जवळ बोलवून घेतले हा माझ्या आयुष्यातील दुर्मिळ क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.

(६) मनसेचा झेंडा पक्ष स्थापनेच्या वेळी व नंतर पुढे काही काळ  एक रंगी नव्हे तर चार रंगाचा म्हणजे निळा, पांढरा, भगवा व हिरवा असा चौरंगी होता. त्या पूर्वीच्या झेंड्याखाली अनेक जाती धर्माच्या सर्व मराठी माणसांना मराठी माणूस म्हणून एकत्र आणण्याचा राजसाहेबांनी प्रयत्न केला. पण जात इतकी घट्ट चिकटलीय लोकांच्या मनाला की ती त्यांच्या मनातून जाता जात नाही. तरीही मनसेच्या पूर्वीच्या झेंड्यात मध्यभागी भगवा रंगच मोठ्या आकाराचा होता हे महत्त्वाचे! त्या भगव्याने इतर रंगांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. पण जातीपातीला घट्ट चिकटून बसलेल्या लोकांनी आपआपले रंग उधळत मराठी माणूस या शब्दाला सोडले पण त्यांची जात सोडली नाही. म्हणून तर मनसेने पुढे हिंदुत्वाचा भगवा झेंडा शिवमुद्रेसह घेतला. भरकटलेल्या लोकांप्रमाणे मा. राजसाहेबांच्या अनेक भूमिका नसतात तर त्यांनी घेतलेल्या  भूमिका ठाम असतात. दुर्दैव हे की त्या भूमिका  लोकांना कळत नाहीत. पण कळतील हे नक्की आणि मग मात्र महाराष्ट्रात नवनिर्माणाला कोणी अडवू शकणार नाही.

(७) माझ्या मनावर मा. राजसाहेब ठाकरे या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप पडली याला बहुधा माझा स्वभाव कारणीभूत असावा. मला खरंच रोखठोक डॕशिंग नेते आवडतात. मग लोहस्त्री श्रीमती इंदिरा गांधी असोत की शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे असोत. हे दोन्हीही महान नेते आज हयात नाहीत. मग मी आता  कोणाला फॉलो करायचे हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला तेंव्हा या नेत्यांच्या डॕशिंगपणाशी साम्य असलेला व सद्या हयात असलेला एकच नेता मला जवळचा वाटला व तो नेता म्हणजे मनसे प्रमुख मा. राजसाहेब ठाकरे! मार्गात अनेक संकटे आली, सुरूवातीचे यश सोडले तर बरेच पराभव वाट्याला आले, ते पराभव पचवताना अनेकांच्या उलटसुलट टीकेला, आरोपांना सामोरे जावे लागले. पण या सर्वांना आडवे करून हा नेता ध्येयाच्या दिशेने ठामपणे उभा राहून आपला कणखर बाणा दाखवतो हेच तर माझ्यासाठी मोठे आश्चर्य आहे. मी तर खूप छोटा माणूस आहे. पण मी कुठेतरी स्वतःलाच  राजसाहेबांत बघत असतो. म्हणून तर मी या नेत्याचा मनस्वी चाहता आहे. पण ही तर माझी वैयक्तिक बाब झाली. पण खरं तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब म्हणून मला हाच नेता समोर दिसतो हे प्रमुख कारण आहे.

(८).मराठी माणूस हा हा मनसेचा मूलभूत मुद्दा व मराठी संस्कृती आणि हिंदुत्व (हिंदू संस्कृती) एकमेकांशी निगडीत असल्याने हिंदुत्वाचा मुद्दा मनसेला जवळ! मराठीच्या मुद्यावर आक्रमक होऊन मागे मनसेने त्या अॕमेझॉन कंपनीला झुकवलेच! मराठी माणूस मराठी भाषेसाठीच काय पण मराठी समाजाच्या हितासाठी असा आक्रमक झाल्याशिवाय मराठी माणसाचे काही खरे नाही हे मला मनसे पटले आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मनसेचे महाराष्ट्र सैनिक असे आक्रमक होऊन लढतानाचे हे चित्र म्हणजे मी शाळा कॉलेजात शिक्षण घेत असतानाच्या त्या काळातील बाळासाहेबांच्या शिवसेनेत सक्रिय असलेल्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांचे चित्र! काळ बदलला आणि आता बाळासाहेबांच्या जागी  राजसाहेब आले व जुन्या शिवसैनिकांच्या जागी मनसेचे महाराष्ट्र सैनिक आले.

(९) महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाला फार मोठी अवकळा आली आहे. हा विभाग म्हणे करोना संकटात सापडालाय. तशी बातमीच दिनांक २६ अॉक्टोबर, २०२० च्या लोकसत्तेत छापून आलीय. या विभागाकडे महाराष्ट्रातील ३७५ वारसावास्तूंच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी आहे. त्यात शिवरायांचे गड, किल्ले सुद्धा आले. पण दुर्दैवाने हा विभाग अनुत्पादित म्हणून सरकारकडून दुर्लक्षित आहे. आर्थिक पाठबळ व कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ पुरवले नाही तर हा विभाग कसला महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणार? खरं तर महाराष्ट्रातील हे गड, किल्लेच शिवरायांची स्मारके म्हणून जगापुढे आणायला हवीत. पण त्यासाठी या पुरातत्व विभागाला आर्थिक पाठबळ व कर्मचाऱ्यांचे मोठे मनुष्यबळ पुरवून चांगलेच कामाला लावले पाहिजे. माझ्या मनात येते की आज मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हातात जर पूर्ण सत्ता असती तर हा पुरातत्व विभाग असा कोपऱ्यात पडला असता का? शिवरायांच्या गड, किल्यांचे संवर्धन मागे राहिले असते का? महाराष्ट्राच्या इतिहासाचा वारसाच जपला नाही तर त्याचे नवनिर्माण काय होणार? इथे राजसाहेबच पूर्ण सत्तेवर पाहिजेत!

(१०) हिंदुत्वाचा अर्थ व्यापक आहे. हिंदू धर्मीय पूजा पद्धती किंवा कर्मकांडाशी हिंदुत्वाला जोडून त्या व्यापक अर्थाला संकुचित करू नका, असे मागे दसरा मेळाव्यात भाषण करताना सरसंघचालक श्री. मोहन भागवत म्हणाले. आणि हे खरेही आहे. सृष्टी विविधतेत समरसता व याच समरसतेतून एकता, तसेच वसुधैव कुटुंबकम् या हिंदुत्वाच्या संकल्पना व्यापक व वैज्ञानिक आहे. याच पार्श्वभूमीवर  मनसेच्या नवनिर्माण शब्दाचा अर्थ संकुचित नसून फार व्यापक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मागे रविवार दिनांक २५.१०.२०२० च्या लोकसत्ता लोकरंग मध्ये महाराष्ट्रातील प्रबोधनः एक दृष्टिक्षेप हा डॉ. सदानंद मोरे यांचा प्रदीर्घ लेख मी वाचला होता. या लेखात युरोपमधील प्राचीन ग्रीक परंपरेचा पुनर्जन्म अरबांच्या माध्यमातून कसा झाला म्हणजे मुळात ग्रीक भाषेतल्या पण युरोपसाठी विस्मृतीत गेलेल्या ज्ञानभांडाराचा अरबांनी कसा परिचय करून घेतला पण अरबांना इस्लामची धार्मिक चौकट ओलांडता न आल्याने दमछाक होऊन त्यांची प्रगती कशी कुंठित झाली व मग युरोपियन विद्वानांनी त्याच ग्रीक ज्ञानभांडारातील ग्राह्यांश ग्रहण करून ते जुनेच ज्ञान पुनर्ज्ञात करून घेत वैज्ञानिक प्रगती कशी साध्य केली अर्थात युरोपियन लोकांनी ग्रीक वारशाचे पुनरूज्जीवन कसे केले या इतिहासाचे या लेखामुळे दर्शन झाले. ही प्रगती युरोपियन लोकांनी जुन्याच ग्रीक ज्ञानाच्या केलेल्या पुनर्निर्माणामुळे शक्य झाली. या पुनर्निर्माणासाठी त्यांनी स्वतःच्या धार्मिक चौकटीशी संघर्ष केला व ती चौकट ओलांडली. त्या काळात इंग्रजांनी इतर युरोपियन लोकांशी संघर्ष करून त्यांनाही हरवले व मग ते जगाचे राज्यकर्ते झाले. यातून हाच अर्थ घ्यायचा की तुम्हाला जर जुन्याचे सोने करायचे असेल तर तुम्हाला जुनी चौकट ओलांडावी लागेल म्हणजे तुम्हाला त्या जुन्या चौकटीचे पुनर्निर्माण अर्थात नवनिर्माण करावे लागेल. मला मा. राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षातील नवर्निर्माण या शब्दात खूप सखोल अर्थ आहे याची जाणीव झालेली आहे. हा अर्थ फक्त मराठी भाषेपुरताच संकुचित करून चालणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास खूप महान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या इतिहासाचा तळपता सूर्य! पण स्वातंत्र्योत्तर काळात या महान इतिहासाचे कालानुरूप नवर्निर्माण झालेय का? हा प्रश्न फक्त शिवरायांच्या गड, किल्ल्यांच्या रक्षण, संवर्धनाचाच नाही तर त्या महान इतिहासाचे नवर्निर्माण करण्याचा आहे. हे महान कार्य करण्यासाठी तेवढाच चौफेर व सखोल अभ्यास आवश्यक आहे. तो अभ्यास मला राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांत दिसतो. हिंदुत्व व नवनिर्माण या शब्दांचा व्यापक अर्थ लक्षात घेतल्याशिवाय राजसाहेबांचे व त्यांच्या मनसे पक्षाचे राजकारण लक्षात येणार नाही.

(११) मला राजकारणात करियर करायचे नाही. मला ना पैशाची हाव ना सत्ता गाजवायची हौस!पण तरीही एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी या मनसे पक्षात आहे ते फक्त मा. राजसाहेब ठाकरे या एकाच व्यक्तीमत्वासाठी! माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले हे व्यक्तीमत्व! बोलण्याची तीच शैली आणि वागण्यातला तोच रूबाब! खरं तर राजसाहेब कुठे आणि मी कुठे पण का जाणो पण मला हे व्यक्तीमत्व भावते. बापरे, पक्ष स्थापन केल्यापासून सुरूवातीचे काही काळापुरतेचे यश सोडले तर नंतर किती पडझड झाली या पक्षात! किती आले आणि किती गेले, पण हा नेता जराही डगमगला नाही, नाउमेद झाला नाही. कणखर, खंबीर नेता! या नेत्याची दिशा निश्चित, विचार पक्के व ठाम मग काहीही होवो! म्हणून तर मला हे व्यक्तीमत्व आवडते. शेवटी हे राजकारण आहे. इथे अनेक प्रयोग करावे लागतात. आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा त्या त्या परिस्थितीनुसार तह केले पण वेळ आली की नंतर हे तह मोडूनही काढले. शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनीही अगोदर मराठी माणूस हा प्रमुख मुद्दा घेऊन नंतर राष्ट्रीय पातळीवर शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा मराठीच्या मुद्याला जोडला. राजसाहेबांनीही तेच केले मग त्यांच्यावर टीका कशासाठी? मा. बाळासाहेबांनी स्वतःचा बाणा जपत भाजपशी युती केली. राजकारणात असे प्रयोग होतच असतात. इतर पक्षांनी असे प्रयोग केले तर चालतात मग राजसाहेबांनी असे प्रयोग करूच नयेत काय? शेवटी यशापयश हे तसे अनेक घटकांवर अवलंबून असते. मला राजसाहेबांचे "यशाला अनेक बाप असतात तर पराभवाला अनेक सल्लागार" हे वाक्य नेहमी मनापासून आवडते. करारीपणा, ठामपणा, अपयशाने जराही खचून न जाणे, प्रयत्नात सातत्य ठेवणे, कोणाची साथ मिळो अगर न मिळो दांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे जाणे, धैर्य, धाडस हे राजसाहेबांचे गुण मला फार आवडतात. त्यांच्या याच गुणांमुळे जर मी त्यांचा चाहता आहे तर मग साहजिकच त्यांच्या मनसे पक्षाचा मी महाराष्ट्र सैनिक असणार हे ओघाओघाने आलेच.

(१२) दिनांक १४ जून हा मा. राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस! या दिवशी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर प्रेम व विश्वास असणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा जनसागर लोटतो. राजसाहेबांत मी दोन गोष्टी पाहतो. एक म्हणजे राजसाहेब हेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत आणि दोन म्हणजे राजसाहेब हे मा. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब आहेत! या दोन्हीही गोष्टी ज्या नेत्यात एकवटल्या आहेत तो एकमेव नेता म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे! महाराष्ट्राचा बुलंद आवाज या वाक्यात येतो तो मराठी माणूस आणि मा. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब या वाक्यात येते ते हिंदुत्व! माझे हे विश्लेषण कोणाला पटेल अगर न पटेल मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. मला या दोन्ही गोष्टी राजसाहेब ठाकरे यांच्यात एकत्र दिसतात हे खरे आहे. दूरदृष्टी असणारा अत्यंत  अभ्यासू व तितकाच धाडसी, चाणाक्ष नेता म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे!

(१३) मनसे म्हणजे सत्तेची हाव नव्हे, मनसे म्हणजे तात्पुरती सोय नव्हे! इथे नाराजीला वाव नसे, इथे स्वार्थाला भाव नसे! मनसे ही एक अखंड चालणारी चळवळ आहे. मनसे ही सत्तेसाठी लाचार होणारी वळवळ नव्हे. मनसे म्हणजे मनापासून, हृदयातून! राजसाहेबांवर असे हृदयातून प्रेम करणारे महाराष्ट्र सैनिक मनसेत आहेत म्हणून मनसे स्थापनेपासून गेल्या १५ वर्षांत अनेक संकटे येऊनही मनसे ठामपणे उभी आहे. मनसे पक्ष हा सत्तेसाठी हपापलेला म्हणजे सत्ता पिपासू राजकीय पक्ष नसून ती सतत चालणारी एक चळवळ आहे. तो एक धगधगता प्रवास आहे. म्हणून मी म्हणतो की, मनसे क्रांती बाकी आहे. मनसे ही क्रांतीची ज्वाळा आहे. तो कायम धगधगता अंगार आहे. तिची धग मी अनुभवत आहे. संपूर्ण क्रांतीच्या दिशेने प्रवास करताना ती धग कायम राहिलीच पाहिजे!

(१४) फक्त मराठी भाषा व फक्त मराठी माणूस या विषयावर राजकारण करणे आता कठीण आहे महाराष्ट्रात! मा. बाळासाहेबांच्या वेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आता मराठी माणूस भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस, वंचित आघाडी अशा विविध पक्षात विभागला गेलाय. देशपातळीवर नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाने भाजपला नवा सूर गवसलाय. मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेंव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी मराठी माणूस चिडलेला होता. त्या वेदनेला बाळासाहेबांनी मोठे केले. शिवाय शिवसेनेच्या स्थापनेला व प्रगतीला त्यावेळचा सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष म्हणजे इंदिरा काँग्रेस चा छुपा पाठिंबा होता. कारण काँग्रेसला कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन वर्चस्व मुंबईतून मोडून काढायचे होते. आज मा. राजसाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा मुद्दा त्यांच्या मनसे पक्षाच्या माध्यमातून उचलून धरला असला तरी त्यांना मराठीच्या मुद्याला हिंदुत्वाचा मुद्दा जोडावा लागला कारण शेवटी  राजकारणात अस्तित्व टिकवणे व पुढे नेणे ही महत्त्वाची गोष्ट असते. चाणाक्ष राजसाहेबांनी ही गोष्ट वेळीच ओळखली हे महत्त्वाचे आहे.

(१५) मा. राजसाहेबांनी पुढील ग्रामपंचायत व नगरपालिका, महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टिकोनातून राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. त्या दौऱ्यात त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना दिलेली रोखठोक व स्पष्ट उत्तरे त्यांचा प्रचंड मोठा आत्मविश्वास, कणखर बाणा दाखवतात. या नेत्याच्या नेतृत्वाखालील मनसे पक्षाचे भवितव्य उज्वल आहे. हा नेता मनसे पक्षाच्या माध्यमातून नवनिर्माणाची क्रांती महाराष्ट्रात करणार हे नक्की!

-ॲड.बी.एस.मोरे©२४.९.२०२१