https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

(१) मनुष्याला निसर्गाचे विज्ञान कळल्यावरही त्याच्या जीवनाला धर्म आवश्यक आहे का? तर माझे उत्तर हो असेच आहे. विज्ञानाने निर्जीव पदार्थ व मानवेतर प्राणी पूर्ण होतील पण मनुष्य हा धर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
हा विषय माझ्या विचार कक्षेत येण्याचे कारण म्हणजे कालपरवाच महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांच्यात धर्मनिरपेक्षता या भारतीय संविधानातील शब्दावरून रंगलेला पत्रवाद!

(२) देश धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे देशातील नागरिक अधार्मिक असणे असा अर्थ बिलकुल होऊ शकत नाही. तसे असते तर भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा धर्म पाळण्याचे धार्मिक स्वातंत्र्य दिलेच नसते. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हाच की देशाचे सरकार कोणत्याही धर्माचा जाहीर उदोउदो करणार नाही की कोणत्याही धर्माकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघून त्या धर्माच्या लोकांवर अन्याय, अत्याचार करणार नाही. तसेच असे सरकार कोणत्याही धर्मासाठी सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करणार नाही. ज्या त्या धर्माचे अनुयायी त्यांच्या स्वतःच्या  पैशाने त्यांच्या धर्माची स्वतंत्र  प्रार्थनास्थळे निर्माण करून तिथे त्यांची धार्मिक प्रार्थना करू शकतात व सार्वजनिक उपद्रव होणार नाही व देशहिताला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेऊन स्वतःच्या धर्माचा प्रचार व प्रसारही करू शकतात. धर्मनिरपेक्ष शब्दाचा हा अर्थ एवढा सरळस्पष्ट असताना असे वाद व तेही सरकारी पातळीवर का निर्माण होतात हेच कळत नाही.

(३) मला जर कोणी तुम्ही कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे असे मध्येच विचारले तर त्या माणसाचा खूप राग येतो. अरे बाबा, माझ्याकडे माणूस म्हणून बघ ना! माझ्या किंवा तुझ्या जात, धर्माने आपल्या मानवीय संबंधात बाधा यावी असे तुझ्या मनात का यावे? जो धर्म माणूस म्हणून जगायला शिकवत नाही तो धर्म नव्हे व जी जात माणसामाणसांत विद्वेषाची भिंत उभी करते ती जात नव्हे. असा धर्म, अशी जात ही संपूर्ण मानव समाजाची शत्रू असते. मला वृथा धर्माभिमान, वृथा जात अभिमान पसंत नाही. हो, मी जन्माने हिंदू धर्मीय व मराठा जातीय आहे हे मान्य व म्हणून माझ्या मराठी भाषेविषयी जसे मला पटकन प्रेम वाटते तसेच पटकन प्रेम मला माझ्या हिंदू धर्माविषयी व माझ्या मराठा जातीविषयी वाटते. हे असे वाटणे हे नैसर्गिक आहे. तो लहानपणापासून असलेल्या सहवासाचा, संस्काराचा नैसर्गिक परिणाम असतो. पण याचा अर्थ असा नव्हे की मी दुसऱ्याच्या धर्माचा, जातीचा तिरस्कार करावा.

(४) मानवी जीवनाला जातीपातींच्या बंधनातून मुक्त करणे हे फार मोठे आव्हान आहे. ही वर्ण व जात व्यवस्था कशी निर्माण झाली, त्यामागे कोणत्या तरी विशेष वर्गाची विशेष सोय हाच प्रमुख उद्देश होता किंवा आहे का, की या वर्ण व जात व्यवस्थेला नैसर्गिक विज्ञानाचा शास्त्रीय आधार आहे या प्रश्नाचे उत्तर हा मोठा विषय आहे. आजचा माझा विषय हा मानवी जीवन हे धर्माशिवाय अपुरे या मुद्यावर प्रकाश टाकणारा आहे.

(५) धर्मात देव असलाच पाहिजे असे नाही. तसे असते तर बुद्ध हा धर्मच झाला नसता. पण बौद्ध धर्मीय बुद्ध हा धर्म नसून धम्म आहे असे मानतात. म्हणजे जो धर्म देव मानतो त्याला धर्म म्हणायचे व जो धर्म देव मानत नाही त्याला धम्म म्हणायचे. मी मात्र आजच्या माझ्या या विषयासाठी धर्म हाच शब्द प्रमाण मानतोय व त्या अर्थाने बुद्ध धम्मालाही बुद्ध धर्म मानतोय.

(६) आजच्या विषयासाठी मी मानवी मेंदूच्या तीन गोष्टी आधारभूत धरल्या आहेत. एका बाजूला मानवी मनाची (मानवी मेंदूतच मानवी मन असते) आध्यात्मिक किंवा नैतिक भावना व दुसऱ्या बाजूला मानवी मनाची भौतिक वासना आणि दोन्हीच्या बरोबर मध्यभागी मानवी मनाची सारासार बुद्धी! या सारासार बुद्धीलाच सदसद्विवेकबुद्धी किंवा विवेकबुद्धी  म्हणतात. या बुद्धीवर एकीकडून आध्यात्मिक भावनेचा तर दुसरीकडून भौतिक वासनेचा ताण असतो.

(७) हा धर्माचा विषय मला नीट समजण्यासाठी माझ्या बुद्धीने मानवी मनाच्या आध्यात्मिक किंवा नैतिक भावनेला धर्म असे नाव दिले व मानवी मनाच्या भौतिक वासनेला विज्ञान असे नाव दिले. विज्ञानाचा म्हणजे वासनेचा अतिरेक होऊन मध्यवर्ती केंद्रीय बुद्धी जनावरासारखी वासनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून या बुद्धीवर धर्माचा म्हणजे भावनेचा ताण हा हवाच! तसेच धर्माचा म्हणजे भावनेचा अतिरेक होऊन ही बुद्धी वेड्यासारखी भावनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून बुद्धीवर विज्ञानाचा म्हणजे वासनेचा ताण हा हवाच! या दोन्ही ताणांमध्ये संतुलन राखणे ही बुद्धीची कसोटी व मोठी जबाबदारी! या लेखाचा एवढाच सार एवढाच की नुसत्या विज्ञानाने मनुष्य जीवन पूर्ण होऊ शकत नाही. तसे असते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म (धम्म) स्वीकारलाच नसता.

(८) मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे हे माझे माझ्या वरील कारणमीमांसेवर आधारित वैयक्तिक मत आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांच्या मूर्त्या असोत, बुद्ध धर्मातील (धम्मातील) तथागत बुद्धाची मूर्ती असो, ख्रिश्चन धर्मातील येशू ख्रिस्ताची मूर्ती असो, पारसी धर्मातील अग्नी असो की मुस्लिम धर्मातील मक्केतील मशिदेचा फोटो असो, ही सर्व त्या त्या धर्माची प्रतिके आहेत. जसा भारताचा तिरंगा ध्वज हे भारत देशाचे प्रतीक आहे.

(९) ज्याप्रमाणे भारतीय नागरिक तिरंगा ध्वज या भारताच्या प्रतिकात भारतीय संविधानाला बघतात त्याप्रमाणे विविध धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक प्रतिकांत त्यांच्या धर्माचा सार बघतात. कोणत्याही धर्माच्या धार्मिक प्रतिकात तो धर्म एकवटलेला असतो. म्हणून तर या धार्मिक प्रतिकांना फार महत्व असते. हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करणाऱ्या लोकांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की या देवदेवता ही हिंदू धर्माची प्रतिके आहेत. हिंदू धर्माच्या प्रतिकांचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान होय. असा फालतूपणा करण्याची हिंमत कोणीच करू नये.

(१०) कोणीच दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांची किंवा दुसऱ्या धर्माची टिंगलटवाळी करू नये. धर्मनिरपेक्ष या शब्दात इतर धर्मांविषयीचे हे मूलभूत धार्मिक कर्तव्यही समाविष्ट आहे ही गोष्ट सगळ्या धर्माच्या लोकांनी सतत ध्यानात ठेवावी. मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे या वाक्याने हा लेख इथेच संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा