https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

नवसंजीवनी!

नवसंजीवनी!

(१) कालचा माझा दिवस माझे डोळे सताड उघडे करणारा, मला नवसंजीवनी देऊन मला मोठे करणारा ठरला. काल २ अॉक्टोबर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे फार मोठे नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे साधे पण महान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महान नेत्यांचा जन्मदिवस! या मंगल दिनी माझ्याही आयुष्यात मंगलमय गोष्ट घडली. मला आलेले नैराश्य दूर झाले, मरगळ झटकली केली, निसर्गातील देवाचा मला सर्वोच्च आदेश मिळाला "उठ, स्वतःला ओळख आणि पुन्हा कामाला लाग, आयुष्याचे नवनिर्माण कर"!

(२) याला पहिले कारण म्हणजे ॲड. विजय चौगुले यांनी माझ्या दोन नैराश्यजनक लेखांवर दिलेल्या त्यांच्या दोन प्रतिक्रिया. या दोन्ही प्रतिक्रियांनी माझे झाकलेले डोळे सताड उघडे झाले व मला नवसंजीवनी मिळाली. त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ती मी ॲडव्होकेटस असोसिएशन अॉफ वेस्टर्न इंडिया या हायकोर्ट वकिलांच्या एका फेसबुक ग्रूपवर लिहिलेल्या एका नैराश्यजनक लेखावर. तिथून त्यांनी मला जागे केले. नंतर "माझ्या ज्ञानाची शोकांतिका" या माझ्या दुसऱ्या नैराश्यजनक पोस्टवर त्यांनी भलीमोठी प्रतिक्रिया दिली आणि मला पूर्ण जागे केले.

(३) कोण आहेत हे ॲड. विजय चौगुले साहेब? माझ्या काही मित्रांना माहीत नसेल कदाचित म्हणून सांगतोय. आज ७० वर्षाचे वय म्हणजे माझ्या पेक्षा ६ वर्षांनी वयाने मोठे असलेले हे चौगुले वकील साहेब म्हणजे वरळी पोदार आयुर्वेदीक हॉस्पिटलच्या पाठीमागील अभ्यास गल्लीत रस्त्यावरच पालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करणारा हा एक होतकरू धडपड्या मुलगा! हाच धडपड्या मुलगा पुढे वकील झाला व आयुष्यात मोठे यश मिळवून आता तो सुखासमाधानाने जगत आहे. मीही पोदारच्या त्याच अभ्यास गल्लीत रस्त्यावर अभ्यास करून वकील झालो.

(४) विजय चौगुले माझ्यापेक्षा ६ वर्षांनी मोठे पण १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात मी जेंव्हा माटुंग्याच्या पोदार वाणिज्य कॉलेज मधून बी.कॉम. चे शिक्षण घेत होतो तेंव्हा याच पोदार अभ्यास गल्लीत मी रस्त्यावर अभ्यास  करीत असताना माझी विजय चौगुले बरोबर  दोस्ती झाली. चौगुले साहेब कधीकधी त्या गल्लीतच रात्री झोपायचे व सकाळी तिथेच उठून कामाला जायचे. नोकरी करून हिंमतीने उच्च शिक्षण घेणारा हा अत्यंत हुशार मुलगा. मी अभ्यास करता करता मध्येच विजय चौगुले यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचो आणि विजय चौगुले त्या वयातही मला धीर देणाऱ्या गोष्टी समजावून सांगायचे.

(५) नंतर विजय चौगुले यांचे पोलीस इन्स्पेक्टर मुलीबरोबर लग्न झाले. त्यांच्या पत्नी डेप्युटी कमिशनर अॉफ पोलीस (डी.सी.पी.) या फार मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा मुलगा, सून, मुलगी हे सर्वच जण आता वकील होऊन ॲड. विजय चौगुले यांच्या चौगुले ॲन्ड असोसिएटस या लॉ फर्ममध्ये एकत्र वकिली करीत आहेत. त्यांची मुंबईत दोन कार्यालये आहेत. हे सर्व कालच त्यांच्या बरोबर झालेल्या फोनवरील चर्चेतून कळले. खरंच फार मोठे यश मिळवले माझ्या या मित्राने! इतकेच नव्हे तर मुंबई काँग्रेसमध्ये एकेकाळी या माझ्या मित्राची खासदार गुरूदास कामत यासारख्या मोठ्या नेत्यांबरोबर उठबस होती, मोठे नाव होते. पण त्या राजकारणाचे जाऊ द्या. त्यांचे वकिलीतले यश हे खूप मोठे यश आहे.

(६) मी जेंव्हा चौगुले साहेबांना त्यांच्या या यशाबद्दल बोललो तेंव्हा त्यांनी मी मिळवलेल्या यशाची आठवण करून दिली. "अरे, माणसा दुसऱ्याच्या यशाकडे बघून तू स्वतःचे यश का अंधारात लपवून ठेवत आहेस, कुठे होतास तू, किती कष्ट उपसलेस तेंव्हा कुठे स्वकष्टाने वकील झालास, स्वकर्तुत्वावर ज्ञानी झालास, किती छान लिहितोस तू, सर्वांकडे ज्ञानाची ही उंची नसते व लेखनाची कला नसते, देवाने तुला कितीतरी भरभरून दिले आहे, तळागाळातून हळूहळू पायऱ्या चढत तू केवढी मोठी उंची गाठली आहेस, अरे स्वतः हिंमतीने मिळवलेले तुझे हे मोठे यश ओळख आणि रूबाबात रहा"! ही चौगुले साहेबांची वाक्ये माझ्या काळजाला भिडली आणि मला नवसंजीवनी मिळाली.

(७) किती काळ लोटला मध्ये! जवळजवळ २५ ते ३० वर्षे झाली. चौगुले साहेब त्यांच्या मार्गावर  व मी माझ्या मार्गावर! मधल्या काळात दोघांची प्रत्यक्ष गाठभेटच नाही आणि मग इतक्या वर्षांनी मी वकिलांच्या ग्रूपवर ती नैराश्यजनक पोस्ट लिहितोय काय, तिथे हे चौगुले साहेब (माझा अभ्यास गल्ली मित्र) अचानक येतात काय, माझ्या यशाची आठवण करून देतात काय व मग आम्ही इतक्या वर्षांनी फेसबुक मित्र होतोय काय हे सगळेच अचंबित करून टाकणारे! माझ्याच यशाचा मी शत्रू का झालो, स्वतःच स्वतःला जिंकण्याचा आनंद हा सर्वात मोठा असतो हे मी का विसरलो? मानवी यशाचे परिमाण काय? पैसा, छे पैसा तर कोणीही मिळवतो, वाटेल ते उलटसुलट धंदे करून! मोठमोठया गँगस्टर्स लोकांकडे का कमी पैसा आहे! यावरून हेच सिद्ध होते की मानवी जीवनात पैसा हे यशाचे परिमाण होऊ शकत नाही. जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे पण पैसा म्हणजे मानवी जीवनाचे सर्वस्व नव्हे! जगण्यासाठी पोटाला अन्न आवश्यक आहे पण  माणूस जगण्यासाठी अन्न खातो की ते अन्न खाण्यासाठी जगतो? पैशाचेही साधारण तसेच आहे. माणसाचे जगणे व जनावरांचे जगणे यात फरक आहे. मानवी जीवनाचा अर्थ मोठा, या जीवनाची ध्येये मोठी, जगणे मोठे! या सर्व गोष्टी शाळा, कॉलेजात शिकूनही हे ज्ञान मी नैराश्येच्या गर्तेत सापडून विसरलो होतो.

(८) मला दुसरी संजीवनी मिळाली एका छोट्या मुलीकडून. मुंबई हायकोर्टात वकिली करणारे माझे तरूण वकील मित्र ॲड. रूपेश मांढरे यांची ही कन्या. नाव वैदेही! काल तिच्या आईने म्हणजे रूपेशच्या पत्नीने (जी माझीही फेसबुक मैत्रीण आहे रूपेश बरोबर) वैदेहीचे वकिलाच्या ड्रेसमधील फोटो व तिचा वकिली युक्तीवादाचा छोटा व्हिडिओ कालची फेसबुक स्टोरी म्हणून टाकला. ते फोटो आणि चिमुकल्या वैदेहीचा तो रूबाबदार वकिली अवतार बघून माझे डोळे सताड उघडले. सोनाराने कान टोचल्यासारखे झाले माझे! रूपेश हा स्वतः तर वकील आहेच. पण तो त्याच्या पत्नीलाही वकील बनवतोय. एलएल. बी. च्या शेवटच्या वर्षाला आहे त्याची पत्नी आणि हे दोघेही त्यांच्या गोड कन्येला लहानपणापासूनच वकिलीचे बाळकडू देत आहेत हे बघून मला खूप बरे वाटले. या तिघांनी मिळून विशेष करून वैदेहीने माझ्यातला वकील पुन्हा जागृत केला.

(९) अरे, मी हे काय करून बसलोय? काय लिहितोय मी हे! नवोदित वकिलांना नवीन उमेद द्यायची सोडून मी स्वतः उगाच निराश होऊन त्यांनाही निराश करतोय! छे, छे! हे फार चुकीचे आहे. वकिली व्यवसाय हा काय साधासुधा व्यवसाय नव्हे! वकील व्हायला फार मोठी तपश्चर्या लागते. राजकारणी असोत नाहीतर सेलिब्रिटी असोत कायद्याच्या कचाट्यात अडकून वकिलाच्या अॉफीसमध्ये आल्यानंतर त्यांची काय भंबेरी उडते, ते किती केविलवाणे होतात, या लफड्यातून वाचवा हो म्हणून वकिलापुढे किती गयावया करतात, हे मी प्रत्यक्षात बघितले आहे. कारण मीही मुंबई हायकोर्टाच्या मोठमोठया वकिलांसोबत बसून तिथे बिनधास्त वकिली केली आहे. गरिबीतून वकील झालो म्हणून काय झाले. स्वकर्तुत्वावर वकिलाचा काळा कोट अंगावर चढवलाय. त्या बार रूममध्ये मी गरीब म्हणून तिथे बसू नको असे म्हणण्याची कोणत्याही मोठ्या वकिलाने हिंमत केली नाही. तशी  हिंमत कोणी करूच शकणार नाही.

(१०) राजकारणात पदांसाठी नेत्यांची हाजी हाजी करायला लावणारा व सेलिब्रिटी आयुष्य  जगण्यासाठी उलटसुलट उड्या मारायला लावणारा हा वकिली व्यवसाय नव्हे! अशा या प्रतिष्ठित वकिली व्यवसायात गेली ३२ वर्षे पाय घट्ट रोवून मी हिंमतीने उभा आहे. हे माझे यश मी विसरतोय हे मला ॲड. रूपेश मांढरे याच्या चिमुकल्या कन्येने (वैदेहीने) प्रात्यक्षिक करून दाखवून समजावून सांगितले.

(११) अरे मोठ्यांनो, तुम्ही काहीही उपद्व्याप करा, कितीही कोलांटउड्या मारा, आम्ही सर्व वकील तुमच्याकडे कायद्याच्या नजरेतून नजर ठेऊन आहोत हे लक्षात ठेवा! सद्या धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना नावाच्या पिल्लावरही आम्हा वकिलांची सक्त कायदेशीर नजर आहे. सर्व डॉक्टर मंडळी व पोलीसही या लढाईत जीव धोक्यात घालून त्यांचे उदात्त कार्य करीत आहेत. पण तरीही कायद्याची नजर ही वेगळी असते. कायदा म्हणजे काय हे त्यासाठी नीट लक्षात घ्यायला हवे. माझ्या मते कायदा म्हणजे निसर्गातील देवाचा सर्वोच्च आदेश! तो आदेश वकिलांना लवकर व छान कळतो हेही माझे वैयक्तिक मत! ते कोणाला पटो अगर न पटो! कोरोनावरील निसर्गाच्या त्या सर्वोच्च आदेशाचे सखोल विचारमंथन वकिलांच्या ज्ञानसागरात सद्या चालू आहे हे ध्यानात ठेवा! सुटेल कसा हा कोरोना कायद्याच्या नजरेतून, कायद्याच्या मगरमिठीतून!

(१२) हो, हे खरे आहे की कायद्याच्या राज्यात हाथसर सारखे बलात्कार सुरू आहेत. खून, बलात्कार करणारी ही नराधम मंडळी म्हणजे मनुष्याचे कातडे अंगावर पांघरून मोकाट सुटलेली हिंस्त्र जनावरेच! या नराधमांना वाटते की अजूनही जंगल राजच सुरू आहे. पण माणूस तो जंगलीपणा सोडून देऊन आता खूप पुढे येऊन पोहोचलाय. या सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात तुमची आता डाळ शिजणार नाही. वैदेही सारख्या क्रांतीकन्या तयार होत आहेत, तयार झाल्या आहेत. नराधमांनो, या सुशिक्षित, सुसंस्कृत मुली व स्त्रिया या क्रांतीकन्या आहेत. त्या तुमची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला जंगलात नेऊन वाघ, सिंहापुढे आता टाकता येईल. पण वाघ, सिंह तुम्हाला पटकन खाऊन टाकतील. तुमचे एनकांऊटर हा त्यातलाच आधुनिक प्रकार! पण अशी झटपट शिक्षा देऊन तुम्ही पटकन मोकळे होणार हे कायद्याला माहित आहे. म्हणून तर तुम्हाला कायद्याच्या जाळ्यात ओढून खूप नाचवायचे व हालहाल करून शेवटी कायद्याची कठोर शिक्षा द्यायची हाच आधुनिक कायद्याच्या राज्याचा न्याय आहे.

(१३) म्हणून तुमचे बारावे नाही तर चांगले तेरावे  घालण्यासाठी हा १३ आकडा माझ्या लेखाच्या शेवटी आलाय. वैदेही ही सर्व क्रांतीकन्यांची प्रतिनिधी आहे. मी तिला आता तिच्या फोटो व वकिली युक्तिवादाच्या व्हिडिओसह वकिलांच्या सर्व ग्रूप्सवर फिरवणार. उठा, मरगळ टाकून द्या असे वैदेही सगळ्या वकिलांना विशेष करून माझ्यासारख्या निराश झालेल्या वकिलांना सांगत फिरणार. वैदेहीवर पोस्ट बनवून तिला फेसबुकवर आणखी प्रसिद्ध करण्याची रितसर परवानगी मी तिच्या आईकडून व्हॉटसअप संवादातून घेतली आहे. विजय चौगुले वकील व कु. वैदेही मांढरे यांच्या वयात केवढे मोठे अंतर पण दोघांनीही माझे कान टोचले, माझे डोळे सताड उघडले व मला काल नवसंजीवनी दिली म्हणून तमाम वकील मंडळींच्या ज्ञान दरबारात माझी ही खास पोस्ट विनम्रपणे सादर करतोय. तिचा स्वीकार होईल अशी आशा बाळगतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा