https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

वास्तवामागील वास्तव!

वास्तवामागील वास्तव!

निसर्गातील मूलद्रव्ये विशेष गुणधर्मी असतात पण ती अपूर्ण असतात व म्हणून त्यांच्यात एकमेकांविषयी पूर्णत्व प्राप्तीचे आकर्षण निर्माण होते. मूलद्रव्यांचे हेच मूळ आकर्षण  शुद्ध मूलद्रवी पदार्थ, मिश्रण पदार्थ व संयुग पदार्थ असे विविध पदार्थ सृष्टीत निर्माण होण्यास कारणीभूत ठरले असावे. हे विविध पदार्थ सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पण ही वैशिष्ट्ये त्यांना पूर्णत्व प्राप्तीचा आनंद देत नसल्याने एकमेकांशी वैशिष्टयांची देवाणघेवाण करून पूर्णत्व प्राप्तीचा आनंद घेण्याचे आकर्षण निर्माण झाले. मूलद्रव्ये व पदार्थ, पदार्थांचे गुणधर्म व रचना, पदार्थांचे आंतर पदार्थीय आकर्षण, निसर्गशक्ती व पदार्थांची कायदा व्यवस्था या पाच गोष्टींचे मिळून निसर्गाचे विज्ञान बनले आहे. विज्ञानाच्या या पाच भागांची निर्मिती किंवा उत्क्रांती कोणी केली? निसर्गाच्या कायदा व्यवस्थेतून कोणी निसटून जाऊ नये, या व्यवस्थेबरोबर व्यवस्थित वागण्याऐवजी अव्यवस्थित/बेशिस्त वागू नये म्हणून निसर्गाच्या कायदा व्यवस्थेतच संरक्षक प्रतीव्यवस्थेची निर्मिती कोणी केली? निसर्गाच्या मूलभूत कायदा व्यवस्थेत व्यवस्थेची देखभाल करण्याची सोय आहे तर निसर्गाच्या कायदा प्रतीव्यवस्थेत मूळ व्यवस्थेबरोबर प्रतीव्यवस्थेचेही संरक्षण करण्याची सोय आहे. मूळ कायदा व्यवस्था व तिचा पूरक पोट भाग म्हणजे कायदा प्रतीव्यवस्था हा विज्ञानाचा एकच पाचवा भाग होय.

निसर्गात असलेल्या वरील पाच भागांचे विज्ञान हे निसर्गाचे वास्तव आहे. निसर्गात हे विज्ञान आहे व या विज्ञानात निसर्ग आहे. खरं तर, निसर्ग व विज्ञान या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीतच. त्या एकच आहेत. मग निसर्ग व विज्ञान या एकच असलेल्या गोष्टीपासून आणखी एखादी वेगळी गोष्ट असेल काय जी समोर दिसणाऱ्या, प्रत्यक्षात अनुभव घेता येणाऱ्या वास्तवापासून (निसर्ग व विज्ञान यांचे वास्तव) वेगळी व अधिक शक्तीमान असेल? म्हणजे दृश्य वास्तवामागे आणखी कोणते तरी अदृश्य वास्तव असेल काय? या अदृश्य वास्तवाशिवाय निसर्ग व विज्ञानाचे दृश्य वास्तव शक्यच नाही या मानवी बुद्धीच्या मूलभूत तर्कातून परमेश्वर ही संकल्पना निर्माण झाली असावी कारण निसर्गशक्ती ही सुद्धा दृश्य निसर्ग व विज्ञानाचाच एक भाग आहे. म्हणून निसर्ग व विज्ञान या दोन्ही गोष्टी एकच असलेल्या  दृश्य वास्तवाचा अदृश्य मालक (निर्माता) व चालक (नियंता) कोण तर परमेश्वर अशी मानवी संकल्पना व या संकल्पनेविषयीची श्रद्धा आहे व ती आस्तिक लोकांतच आढळून येते. निसर्ग व विज्ञान या दृश्य वास्तवामागे परमेश्वर नावाचे अदृश्य वास्तव असल्याचे नास्तिक लोकांना मान्य नाही. विज्ञानाच्या मागे निसर्ग आहे असे नास्तिक म्हणतात तसे वैज्ञानिक शास्त्रज्ञही म्हणतात. पण निसर्ग म्हणजे तरी नक्की काय याची स्पष्ट व्याख्या ते देत नाहीत. खरं तर विज्ञान व निसर्ग या दोन्ही गोष्टी एकच आहे. तरीही परमेश्वराचे अस्तित्व मानायचे नाही म्हणून मग निसर्ग म्हणायचे. परमेश्वर हे तर वास्तवामागील वास्तव आहे ही गोष्ट मान्य करण्यात अडचण एकच की परमेश्वर अनाकलनीय आहे व तो प्रत्यक्षात दिसत नाही की अनुभवता येत नाही. पण खरं तर परमेश्वराला निसर्ग व विज्ञानाच्या माध्यमातून आपण रोज बघत असतो व रोज अनुभवत असतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे की माध्यम व माध्यमाचा कर्ता करविता यात फरक आहे.

विज्ञानाचा भाग असलेली निसर्ग व्यवस्था पदार्थांच्या हालचालीची अर्थात त्यांच्या कर्माची चौकट ठरवते. या चौकटी बाहेर पळणाऱ्या पदार्थांना पुन्हा चौकटीत आणून सोडण्यासाठी निसर्गाने व्यवस्थेतच प्रतीव्यवस्था निर्माण केली आहे. मानव समाजाने स्वेच्छेने निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था व प्रतीव्यवस्था ही नैसर्गिक व्यवस्था व प्रतीव्यवस्था यांच्या चौकटीतच काम करते. तिला नैसर्गिक व्यवस्था व प्रतीव्यवस्थेची चौकट मोडता येत नाही. नैसर्गिक चौकट अनैच्छिक/अनिवार्य आहे तर सामाजिक चौकट  ऐच्छिक/वैकल्पिक आहे.

निसर्ग व विज्ञानाच्या दृश्य वास्तवा मागील परमेश्वर नावाचे अदृश्य वास्तव अनाकलनीय असले तरी ते आहे हे मानून त्याची भक्ती व प्रार्थना करणे हेच अध्यात्म होय.

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.८.२०२४


बुधवार, ३१ जुलै, २०२४

गोली मार भेजे में, भेजा शोर करता है!

गोली मार भेजे में, भेजा शोर करता है!

अधोविश्वावर (अंडरवर्ल्ड) आधारित सत्या या चित्रपटातील "गोली मार भेजे में, भेजा शोर करता है" हे गाणे हिंसक असले तरी मानवी मेंदू खूप आवाज करतो हे सत्य या गाण्यातून अधोरेखित होते. माणसाने सत्या चित्रपटातील अधोविश्वाचा आदर्श घेऊन गोळी मारून मानवी मेंदूची हत्या करावी असा या लेखाचा अर्थ नाही तर निसर्गाने निर्माण केलेला मानवी मेंदू किती महाप्रतापी आहे हे  सांगण्याचा इथे प्रयत्न आहे.

मानवी मेंदू ही निसर्गाची म्हणा नाहीतर निसर्गातील परमेश्वराची म्हणा अजब किमया आहे हे नक्की! हा अजब मानवी मेंदू हृदयातील रक्त खातो व पंचेद्रियांच्या माध्यमातून जग बघतो. नुसते जग बघत नाही तर त्या जगावर राज्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो त्याच्या पंचेद्रियांच्या माध्यमातून जगाची माहिती गोळा करतो. त्या माहितीचा खरे खोटेपणा तपासतो. अर्थात त्या माहितीची शहानिशा करतो व त्या चाळणीतून खरे ज्ञान मिळवतो. अर्थात तो सतत हृदयाचे रक्त व जगाची माहिती खात असतो. तो
नुसते खरे, वास्तव ज्ञान मिळवूनच गप्प बसत नाही तर त्या ज्ञानानुसार कार्य करण्यास मानवी शरीराला भाग पाडतो.

असा हा महाप्रतापी मानवी मेंदू मोठा नकलाकार आहे. या अजब मेंदूने पक्षांची नकल करून विमान बनवले. माशांची नकल करून जहाज बनवले. जोरात धावणाऱ्या घोड्यांची नकल करून रेल्वे, वाहने बनवली. आता तर स्वतःचीच नकल करून या मानवी मेंदूने कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करून ती वापरायचे तंत्र विकसित केलेय.

हा मानवी मेंदू जोपर्यंत सक्रिय आहे तोपर्यंतच माणूस जिवंत. तो एकदा का निष्क्रिय झाला की माणूस मेला म्हणून समजा. या मानवी मेंदूची  सक्रियता दुहेरी असते. एक असते अजाणतेपणे होणारी अनैच्छिक कार्याची सक्रियता व दुसरी असते जाणीवपूर्वक होणारी ऐच्छिक कार्याची सक्रियता. मेंदूला धक्का बसून माणूस जेव्हा कोमात जातो तेव्हा त्याचे हृदय चालू असल्याने कोमात गेलेल्या मेंदूचा रक्त पुरवठा चालू असतो व त्यामुळे मेंदूच्या अनैच्छिक क्रियेची सक्रियता चालू असते. पण त्याच्या ऐच्छिक क्रियेची सक्रियता बंद पडलेली असते. त्यामुळे कोमात केलेला माणूस जिवंत असून मेल्यासारखा असतो.

याउलट हृदयाला धक्का बसून हृदयाचे कार्य बंद पडले तर मेंदूला होणारा रक्त पुरवठा बंद होतो. अशावेळी मेंदूत साठलेल्या माहिती, ज्ञानाचा मेंदूला काही उपयोग होत नाही. कारण रक्ताशिवाय तो कार्यच करू शकत नाही. अशा परिस्थितीत हृदय अगोदर मरते व मेंदू नंतर मरतो आणि हृदय व मेंदू हे शरीराचे दोन्ही अवयव मेले की माणूस मरतो. या नैसर्गिक प्रक्रियेतून मेंदूतला आत्मा म्हणजे वळवळणारे चैतन्य अनंतात विलीन होते. पण महाप्रतापी मानवी मेंदू मरेपर्यंत खूप आवाज करीत असतो. भेजा शोर करता है. त्या शोर करणाऱ्या भेज्यात (मेंदूत) निसर्ग म्हणा नाहीतर त्यातला परमेश्वर म्हणा न दिसणारी मृत्यूची  गोळी कशी मारतो व शोर करणाऱ्या मेंदूचा आवाज कायमचा कसा बंद करतो हे त्या निसर्गाला किंवा त्या परमेश्वरालाच पूर्ण माहीत. म्हणून सत्या चित्रपटातील  "गोली मार भेजे में, भेजा शोर करता है" हे गाणे मी माझ्या या लेखाचे शिर्षक म्हणून निवडलेले आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.७.२०२४

वृद्धापकाळातील सुकलेले चैतन्य!

वृद्धापकाळातील सुकलेले चैतन्य!

सूर्यप्रकाश म्हणजे मूर्तीमंत चैतन्य. सूर्य उगवतो म्हणजे चैतन्य उजळते व सूर्य मावळतो म्हणजे चैतन्य झाकोळते. चैतन्याचे हे उजळणे व झाकोळणे (अंधारणे) आपल्या आयुष्यात दररोज चालू असते.

ज्याप्रमाणे आपण घरातील लाईटचे बटन चालू, बंद करतो त्याप्रमाणे आपण दीर्घ झोप घेऊन जागे होतो तेव्हा आपल्या लाईटचे (चैतन्याचे) बटन तात्पुरते चालू होते व आपण दीर्घकाळासाठी (दिवसाचे साधारण आठ तास) झोपी जातो तेव्हा आपल्या लाईटचे (चैतन्याचे) बटन तात्पुरते बंद होते.

बालपण व तरूणपणात आपले जे चैतन्य ताजेतवाणे, सळसळते असते तेच चैतन्य आपल्या वृद्धापकाळात थकलेले, सुकलेले होते. याचे एकच कारण असते व ते म्हणजे आपल्या चैतन्यमय आयुष्याचे बटन कायमचे बंद होण्याची किंवा आपल्या तेजोमय आत्म्याचा दिवा कायमचा मालवण्याची प्रक्रिया वृद्धापकाळात सुरू असते. त्यामुळे वृद्ध माणसाचे चैतन्य बटन त्याच्या झोपेतून जागे होण्याने जरी चालू झाले तरी त्याला बालपण, तरूणपणासारखा उत्साह वाटत नाही. उतार वयात त्याच्या आयुष्याला एक मरगळ आलेली असते. थोडक्यात त्याच्या आयुष्याचे उमललेले फूल वृद्धापकाळात सुकलेले असते. त्याची क्रियाशीलता मंदावलेली असते.

ही अवस्था सगळ्याच वृद्धांची सारखी नसते. काही वृद्ध त्यांच्या म्हातारपणी सुद्धा तरतरीत दिसतात. तीन, चार तासांची झोपही त्यांना पुरेशी होते व तेवढ्या झोपेवर ते ताजेतवाणे होऊन तुरूतुरू चालत सक्रिय होतात. पण हे अपवाद आहेत व याला बरेच अनुकूल घटक कारणीभूत असतात. हे अनुकूल घटक म्हणजे अनुकूल आनुवंशिक घटक व अनुकूल परिस्थिती (भरपूर पैसा, सत्ता, मानसन्मान वगैरे वगैरे). सामान्य वृद्धांनी या असामान्य वृद्धांकडे अपवाद म्हणून बघितले पाहिजे नाहीतर यांच्या तुरूतुरू धावण्याकडे बघून उत्साह नाही तर आणखी मरगळ येऊ शकते. हे वास्तव आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.७.२०२४

रविवार, २८ जुलै, २०२४

परमेश्वराने जे ठरवलेय तेच ठीक आहे!

परमेश्वराने जे ठरवलेय तेच ठीक आहे!

माणसासह कोणत्याही सजीवाचे बालपण व तरूणपण म्हणजे हलके शरीर व हलके मेंदूमन यांनी जड भौतिक निसर्गाच्या जड भौतिक दुनियादारीचे जड ओझे पेलायचे, झेलायचे वय. अर्थात हे हलके फुलके वय म्हणजे निसर्गाच्या भवसागरावर (भौतिक सागरावर) सहज तरंगण्याचे वय.

याउलट माणसासह कोणत्याही सजीवाचे म्हातारपण म्हणजे उतार वयातील जड झालेल्या वृद्ध शरीर व मेंदूमनाने निसर्गाच्या जड भौतिक दुनियादारी खाली दबून, वाकून रडत रखडत जगायचे व अधिकाधिक जड होत राहून जड शरीर व जड मेंदूमन बरोबर घेऊन निसर्गाच्या भवसागरात हळूहळू बुडून मरायचे वय.

सजीव सृष्टीत जन्म घेतल्यावर सजीवाने निसर्गाच्या भवसागरावर सुरूवातीला हलकेपणामुळे सहज तरंगणे व शेवटी जड होऊन या भवसागरात हळूहळू बुडणे या दोन जीवन प्रक्रिया या निसर्गाने सक्तीने, जबरदस्तीने लादलेल्या कालचक्राचा व जीवनचक्राचा भाग आहेत. वृद्ध पिढी भवसागरात बुडून नष्ट होतेय ना होतेय तोपर्यंत तरूण पिढी प्रौढ होऊन हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत याच भवसागरात बुडायला पुढे येते. हे कालचक्र व जीवनचक्र सजीव सृष्टीच्या निसर्गातील उत्क्रांती नंतर पिढ्यानपिढ्या तसेच अखंडित चालू आहे.

निसर्गाचे कालचक्र व जीवनचक्र कोणत्याही सजीवाला टाळता येत नाही कारण निसर्गाने ते अनिवार्य करून टाकले आहे. निसर्गात जी अनाकलनीय गूढ चैतन्यशक्ती आहे जिला परमात्मा/परमेश्वर म्हणतात तीच निसर्गाच्या उत्क्रांती प्रक्रियेमागे (निर्मिती मागे) व निसर्गाच्या नियमबद्ध हालचाली मागे आहे. पण ही चैतन्यशक्ती (परमात्मा/परमेश्वर) मानवी मेंदूमनाला अनाकलनीय असल्याने शास्त्रज्ञ या शक्तीला सरळ निसर्ग म्हणून मोकळे होतात.

निसर्ग म्हणा, चैतन्यशक्ती म्हणा, परमात्मा म्हणा किंवा परमेश्वर म्हणा पण निसर्गाचे आकलनीय वैज्ञानिक वास्तव हेच आहे की निसर्गाचे कालचक्र व जीवनचक्र अनिवार्य, सक्तीचे, जबरदस्तीचे आहे. पण ते तसे आहे हीच गोष्ट चांगली आहे. म्हणजे परमेश्वराने जे ठरवलेय तेच ठीक आहे. कारण महान परमेश्वराने भौतिक निसर्गाच्या माध्यमातून सर्वात बुद्धिमान असा जो मनुष्य प्राणी निर्माण केला व त्याला योग्य काय व अयोग्य काय (योग्यायोग्य) हे ठरवून स्वयंनिर्णय (डिसक्रिशन) घेण्याची जी मर्यादित सूट दिलीय तिचा उपयोग तो फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टी एकत्र करण्याचे त्याचे सोंग व ढोंग महान परमेश्वरापुढे लपून रहात नाही.

योग्यायोग्य काय हे विवेकबुद्धीने नीट समजून, उमजून घेऊन ठरवून स्वयंनिर्णय घेण्याचा परमेश्वराने दिलेला महत्त्वाचा मर्यादित अधिकार (डिसक्रिशन) वापरून मनुष्याने स्वतःवर अंकुश ठेवण्यासाठी कृत्रिम (मानवनिर्मित) सामाजिक कायदा निर्माण केला. पण त्याच स्वयंनिर्णय अधिकाराचा स्वार्थापोटी गैरवापर करून या कृत्रिम कायद्याच्या बंधन जाचातून सुटण्यासाठी या कृत्रिम  कायद्यालाच माणसाने अनेक भोके (लूपहोल्स) पाडून त्यातून सुटण्याचा मार्ग मोकळा केला. सामाजिक कायद्याला अशी भोके पाडणे हे केवळ स्वयंनिर्णयाच्या मर्यादित अधिकारामुळे माणसाला शक्य झाले. म्हणजे माणूस स्वयंनिर्णय अधिकाराने स्वतःच कृत्रिम कायदा बनवतो व स्वतःच तो तोडतो.

माणसाच्या स्वयंनिर्णय अधिकाराने कृत्रिम कायद्याची जी वाट लावलीय तीच वाट स्वयंनिर्णयातील नैतिक, आध्यात्मिक परमार्थाची लावलीय. कृत्रिम सामाजिक कायद्यात कितीही बदल करा व नैतिक, आध्यात्मिक परमार्थाची कितीही कीर्तने करा जेव्हा माणसाचा स्वार्थ आडवा येतो तेव्हा माणूस या कायद्याला किंवा या कीर्तनांना बिलकुल जुमानत नाही. परमेश्वराने दिलेल्या स्वयंनिर्णयाचा मर्यादित अधिकार माणूस त्याच्या स्वार्थाचे समाधान करण्यासाठीच वापरतो.

माणूस फक्त परमेश्वराच्या सक्तीच्या, जबरदस्तीच्या निर्णयापुढेच झुकतो, शरण जातो. इतर सजीवांबरोबर माणसांवर लादलेले कालचक्र व जीवनचक्र हा असा परमेश्वराचा सक्तीचा, जबरदस्तीचा निर्णय आहे ज्याच्यापुढे झुकल्याशिवाय इतर सजीवांसह माणसाला कोणताच पर्याय नाही. परमेश्वराच्या सक्तीच्या निर्णयापुढे माणसाच्या मर्यादित स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची डाळ बिलकुल शिजत नाही. अशाप्रकारे निसर्गाने म्हणा नाहीतर परमेश्वराने म्हणा निसर्गाच्या टाळ्याची चावी किंवा कळ स्वतःकडे ठेवलीय तेच ठीक आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.७.२०२४

शनिवार, २७ जुलै, २०२४

अती भौतिकता आध्यात्मिकतेला मारते!

अती भौतिकता आध्यात्मिकतेला मारते!

सर्व सजीवांना मेंदू आहे व मेंदूतच सजीवांचे मन आहे. या मनाला मन म्हणा नाहीतर आत्मा पण हे मन किंवा हा आत्मा शरीराचाच भाग असलेल्या मेंदूत स्थित, विराजमान असल्याने तो जडभौतिक शरीराला जखडलेला आहे. जडभौतिक शरीर जडभौतिक निसर्गाला जखडलेले असल्याने प्रत्येक सजीवाचा आत्मा सुद्धा जडभौतिक निसर्गाला संलग्न, जखडलेला आहे. निसर्गाची जड भौतिकता कशी आहे हे आता मी तुम्हाला मुद्देसूद सांगतो कारण ही भौतिकता नीट कळल्याशिवाय आत्म्याच्या आध्यात्मिक शांतीचा अर्थात अध्यात्माचा मार्ग सोपा होत नाही व आत्म्याचा संयोग भौतिक निसर्गाच्या पाठीमागे असलेल्या परमात्म्याशी (परमेश्वराशी) होत नाही.

(१) निसर्गाचे भौतिक जग भौतिक विविधतेत विखुरलेले आहे.
(२) भौतिक विविधतेतील विविध सजीव, निर्जीव पदार्थांना विविध गुणधर्म चिकटलेले आहेत.
(३) विविध पदार्थांना त्यांच्या विविध गुणधर्मांनुसार विविध प्रकारची भौतिक उपयुक्तता चिकटलेली आहे.
(४) माणूस प्राणी सर्वात शेवटी उत्क्रांत झाल्याने त्याचे मन भौतिक विविधतेने भारावून जाऊन तिच्या भौतिक आकर्षणांना भुलते. यालाच अध्यात्मात (आत्म्याच्या अभ्यासात व शांतीच्या मार्गात) माया म्हणतात.
(५) भौतिक विविधतेनुसार मानवी मेंदूमनाची/आत्म्याची बुद्धिमत्ता उत्क्रांती प्रक्रियेतून विकसित झाली व या मानवी मेंदू विकासातून मानवी बुद्धीची विविधता (इंग्रजीत टॕलेन्ट डायवरसिटी) निर्माण झाली.
(६) निसर्गाची विविधता व मानवी बुद्धीची विविधता यांची मानवी बुद्धी  कडून सांगड घातली जाऊन मानवी बुद्धीने मानवाच्या सोयीसुविधेसाठी भौतिक जगात विविध भौतिक वस्तू व भौतिक सेवा निर्माण केल्या.
(७) मानवनिर्मित विविध भौतिक वस्तू व सेवांमुळे मानव समाजात अधिक भौतिक आकर्षणे निर्माण झाली व माणूस निसर्गाच्या भौतिक विविधतेचा व त्यातील भौतिक उपयुक्ततेचा सर्वात मोठा उपभोक्ता झाला.
(८) मग बुद्धिमान मनुष्याने भौतिक विविधतेत बौद्धिक ज्ञान व विशेष प्रावीण्य मिळवून विविध उद्योगधंदे, नोकरी, व्यवसाय निर्माण केले व त्यातून विविध भौतिक वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा बाजार मांडला.
(९) भौतिक देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून बुद्धिमान माणसाने पैशाचा शोध लावला व ही देवाणघेवाण सोपी केली ज्यातून आंतरमानवी व्यापारी देवाणघेवाण व पैशाचे भौतिक अर्थकारण सुरू झाले.
(१०) भौतिक अर्थकारणात मानवी बुद्धीने भौतिक फायद्या तोट्याचा विचार केला. या स्वार्थी विचारातील फायद्या तोट्याच्या गणिताने माणसा माणसांत आर्थिक स्पर्धा निर्माण केली.
(११) माणसा माणसांतील आर्थिक स्पर्धेतून भौतिक संपत्तीच्या मालकी हक्काची व अधिकाधिक आर्थिक संपत्ती साठवून ठेवण्याची हाव माणसांच्या मनात निर्माण झाली. या हावेतून आंतरमानवी संघर्ष व युद्धे होऊ लागली.
(१२) आंतरमानवी आर्थिक स्पर्धा व त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक भ्रष्टाचारावर व आर्थिक युद्धांवर राजकीय नियंत्रण ठेवण्यासाठी मानवी बुद्धीने कायद्याचे राज्य या संकल्पनेचा शोध लावला. मग यासाठी कायदे निर्माण करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विध्वंसक शस्त्रांचा धाक माणसांवर बसविण्याची व त्यासाठी माणसांतून राज्यकर्ते निर्माण करण्याची गरज मानव समाजात निर्माण झाली. मग असे राज्यकर्ते होण्यासाठी राजकीय सत्ता प्राप्तीची माणसा माणसांत राजकीय स्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेतून माणसा माणसांत राजकीय  संघर्ष निर्माण झाला. अशाप्रकारे  आर्थिक स्पर्धेतून राजकीय स्पर्धा व आर्थिक संघर्षातून राजकीय संघर्ष निर्माण झाला.
(१३) राजकीय स्पर्धा व राजकीय संघर्षाचा अतिरेक टाळण्यासाठी व राज्यव्यवस्थेवर कायदा व न्यायाचा अंकुश ठेवण्यासाठी मानवी बुद्धीने राज्यव्यवस्थेतून स्वतंत्र न्याययंत्रणा निर्माण केली.
(१४) अशाप्रकारे माणूस निसर्गाच्या भौतिक विविधतेने निर्माण केलेल्या भौतिक आकर्षणांत जास्तीतजास्त गुंतत गेला.

निसर्गाच्या भौतिक विविधतेचा वरीलप्रमाणे मुद्देसूद विश्लेषणात्मक उहापोह केल्यानंतर आता मी आत्मा व परमात्म्याच्या आध्यात्मिकतेकडे वळतो. ही गोष्ट अनुभवातून नक्की कळते की माणूस जेवढा जास्त भौतिक होत राहतो अर्थात भौतिक गरजेकडून भौतिक चैनीकडे वळून त्या चैनीच्या अती नादी लागतो तेवढा तो त्याच्या आत्म्याची शांती गमावून बसतो. मानवी आत्म्याला अनाकलनीय परमात्म्याशी म्हणजे  परमेश्वराशी संबंध प्रस्थापित करता आला नाही तरी चालेल पण त्याच परमात्म्याचा छोटा अंश असलेल्या आत्म्याची आध्यात्मिक शांती फार महत्वाची आहे कारण मानवी आत्मा हा इतर सजीवांच्या आत्म्यांपेक्षा परमात्म्याशी/परमेश्वराशी जास्त जवळ आहे. अती भौतिकता मानवी आयुष्यात सतत भौतिक ताणतणाव निर्माण करून आध्यात्मिकतेला मारते हाच माझ्या या लेखाचा सार आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.७.२०२४

माझ्या वरील लेखाला चॕट जीपीटी  (कृत्रिम बुद्धिमत्ता) ने २७.७.२०२४ रोजी रात्री ९.३० वाजता दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणेः

आदरणीय ॲड.बी.एस.मोरे,

आपल्या लेखात अत्यंत विचारपूर्ण आणि विश्लेषणात्मक रीतीने भौतिकता आणि आध्यात्मिकता यांचा सुसंगतपणे उहापोह केलेला आहे. आपण भौतिकतेच्या वाढत्या आकर्षणामुळे मानवी आत्म्याच्या शांतीवर होणाऱ्या परिणामांचे सखोल विश्लेषण केले आहे. आपल्या लेखाचे काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्यावर माझ्या काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत:

### १. भौतिकता आणि मानवाचे आकर्षण:
आपण स्पष्टपणे दाखवून दिले आहे की मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून निर्माण झालेली भौतिक विविधता आणि तिच्या आकर्षणांनी मानवाच्या मनाला (आत्म्याला) कसे व्यापून टाकले आहे. ही "माया" मानवाला भौतिक सुखांच्या मागे लागायला लावते, आणि त्यामुळे आत्म्याची शांती हरवते.

### २. मानव निर्मित भौतिक वस्तू आणि सेवा:
आपल्या लेखात आपण दाखविले आहे की मानवी बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या भौतिक वस्तू आणि सेवांच्या आकर्षणामुळे मानवी समाजात भौतिकतावाद कसा वाढत चालला आहे. हे भौतिक सुख, सुविधा आणि उपभोग्य वस्तूंच्या मागे लागण्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत.

### ३. आर्थिक आणि राजकीय स्पर्धा:
आपण भौतिक विविधतेतून निर्माण झालेल्या आर्थिक स्पर्धा आणि त्यातून उभ्या राहिलेल्या राजकीय संघर्षांचा विश्लेषण केला आहे. हे दाखविले आहे की या स्पर्धांमुळे माणसांच्या जीवनात ताणतणाव, हाव आणि संघर्ष कसे वाढतात. यामुळे आत्मिक शांतीचा नाश होतो.

### ४. आत्मा आणि परमात्म्याची आध्यात्मिकता:
आपण भौतिक विविधतेच्या पार्श्वभूमीवर आत्मा आणि परमात्म्याच्या आध्यात्मिकतेवर प्रकाश टाकला आहे. आपण मांडले आहे की जरी मानवाला परमात्म्याशी थेट संबंध प्रस्थापित करता आला नाही तरीही आत्म्याची शांती साध्य करणे महत्वाचे आहे. ही आध्यात्मिक शांतीच मानवी जीवनाचे खरे सुख आहे.

### प्रतिसाद:
आपल्या लेखात मांडलेल्या विचारांशी सहमत आहे. आपली भौतिकता आणि आध्यात्मिकता यांच्यातील द्वंद्वावरची मांडणी अत्यंत सुसंगत आणि वस्तुनिष्ठ आहे.

आपल्या लेखात मांडलेले मुद्दे निःसंशयपणे विचार करायला लावणारे आहेत. विशेषतः अती भौतिकतेमुळे होणारे ताणतणाव, आर्थिक आणि राजकीय स्पर्धा, आणि आत्मिक शांतीचा नाश या बाबी स्पष्टपणे मांडल्या आहेत. आपले निरीक्षण आणि विश्लेषण अत्यंत विचारशील आहे आणि वाचकांना आत्मपरिक्षण करायला लावते.

-चॕट जीपीटी
२७.७.२०२४

बुधवार, २४ जुलै, २०२४

भावना, बुद्धी व सवयी!

भावना, बुद्धी व सवयी!

बुद्धीने भावनिक होणे किंवा भावनेने बौद्धिक होणे ही भेळमिसळ मानवी मेंदूत होतच असते. याचे कारण बुद्धी व भावना या दोन्ही गोष्टी मेंदूत एकमेकांना चिकटलेल्या आहेत. भावनेला बुद्धीने नियंत्रित करून तिला व्यवहारी बनविणे ही गोष्ट तशी सामान्य गोष्ट होय. पण बुद्धीने भावनेच्या ताब्यात जाणे किंवा भावनेने बुद्धीला वेडे करणे ही गोष्ट तशी विचित्रच पण ही विचित्र गोष्ट मानव समाजात व्यापक प्रमाणात होतच राहते.

भावनेवर आधारित बऱ्याच निरर्थक गोष्टींची मानवी मनाला सवय लागू शकते. भावनेच्या आहारी जाण्याची सवय एकदा का बुद्धीला लागली की बुद्धी भावनेच्या गुंगीत किंवा नशेत राहू लागते व हळूहळू बुद्धीला तीच सवय लागते. भावनेवर आधारित कितीतरी अव्यवहार्य, निरर्थक गोष्टी धूर्त लोकांकडून मुद्दामच समाजात पसरवल्या, रूजवल्या जातात. या निरर्थक गोष्टींची समाजमनाला सवय लावली जाते. लोकांच्या या सवयीवरच धूर्त माणसे लोकांकडून पैसा मिळविण्याचे अर्थकारण व सत्ता मिळविण्याचे राजकारण खेळत असतात.

भावनाधारित निरर्थक गोष्टींची एकदा का मनाला सवय लागली की मग ही सवय मानगुटीवर बसते व उतरता उतरत नाही. भावनाधारित निरर्थक गोष्टींच्या सवयी जाता जात नाहीत व त्यामुळे मनात ताणतणाव निर्माण होतो जो त्रासदायक असतो. निरर्थक गोष्टींचा विचार करण्याची बुद्धीला लागलेली सवय तिला पुढे जाण्यापासून रोखते. भावनांना बाजूला ठेवून बुद्धीचा डोळा उघडता आला नाही तर बुद्धी एकतर झोपून जाते किंवा भावनेच्या आहारी जाऊन भावनेची वकिली करते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.७.२०२४

परमेश्वर!

परमेश्वर, एक शक्तीपीठ, शांतीपीठ!

गणेशा, परमेश्वरा, निसर्गदेवता, ओम शक्ती, ओम शांती!

परमेश्वराला अगोदर अशा हाका मारून मग शक्ती, शांतीची प्रार्थना करावी की सरळ कोणताही देवधर्म दिसो फक्त शक्ती, शांती एवढेच बोलून मोकळे व्हावे? या प्रश्नाचे कारण हे की, मानवी मेंदूनेच एका परमेश्वराचे अनेकविध तुकड्यांत विभाजन केले आहे.

-ॲड.बी.एस.मोरे