https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २८ जून, २०२४

औपचारिक वाढदिवस शुभेच्छा!

औपचारिक वाढदिवस शुभेच्छा मला नकोशा वाटतात!

सर्वसामान्य माणसाचा वाढदिवस साजरा होऊन होऊन तरी कसा साजरा होणार तर घरातील कुटुंब सदस्य आपुलकीने केक आणणार व तो घरातच कापणार व नंतर सर्व मिळून एखाद्या साध्या हॉटेलात जेवायला जाणार. काही मंडळी मात्र  हॉटेल मालकाची आगाऊ परवानगी घेऊन हॉटेलातच केक कापतात व नंतर तिथे जेवतात. केक कापणे ही वाढदिवस साजरा करण्याची इंग्रजी पद्धत. तसे पाहिले तर घरात पुरणपोळी, श्रीखंड किंवा बासुंदी पुरी हे गोड जेवण केले तर ते केक पेक्षा कितीतरी भारी. पण हल्ली बहुतेक सर्वांना तो केकच आवडतो.
खरं तर वाढदिवस साजरा करणे हे सेलिब्रिटी लोकांनाच शोभते. सगळा झगमगाट असतो तिथे. पण म्हणून काय सर्वसामान्यांनी वर्षातून फक्त एकदाच येणारा त्यांचा वाढदिवस साजरा करू नये?

पण माझा मुद्दा दुसराच आहे व तो म्हणजे कुटुंबाबाहेरील लोकांच्या वाढदिवस शुभेच्छांचा. ही शुभेच्छा देणारी मंडळी वर्षभर एकमेकांचे तोंडही बघत नाहीत. पण नेमकी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी पुढे येतात. काही लोकांच्या तर हेही नशिबी नसते म्हणा. सर्वसाधारण अनुभव असा आहे की सदनिकांच्या सोसायटीत राहणारी माणसे वर्षभर समोरून गेली तरी एकमेकांशी कधी आपुलकीने बोलत नाहीत. पण सोसायटीच्या वार्षिक कार्यक्रमात मात्र औपचारिक गप्पागोष्टी करतात व कार्यक्रम संपला की पुन्हा वर्षभर येरे माझ्या मागल्या. सर्वसामान्य माणसाच्या वाढदिवसाचेही तसेच आहे. वर्षभर कधी फोन करून आपुलकीने न बोलणारी माणसे (त्यांना जर वाढदिवसाची तारीख माहित असेल तर) वाढदिवसाला मात्र फोन करून किंवा व्हॉटसॲप संदेशातून औपचारिकपणे शुभेच्छा देतात. अशा औपचारिक वाढदिवस शुभेच्छा मला नकोशा वाटतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.६.२०२४


बुधवार, २६ जून, २०२४

दडपणाखाली जगताना!

दडपणाखाली जगताना!

जन्मापासून मरणापर्यंत माणूस जेवढा दडपणाखाली जगतो तेवढे दडपण घेऊन सृष्टीतील इतर कोणते सजीव जगतात? जंगलात ज्यांच्या डोक्यावर वाघ, सिंहाच्या जीवघेण्या हल्याची टांगती तलवार, भीतीची छाया सतत असते ते दुर्बल प्राणी सुद्धा माणसांनी स्वतःवरच निर्माण केलेल्या कृत्रिम दडपणांची भीती घेऊन जगत नसतात.  

माणसांनी माणसांवर लादलेल्या दडपणांची यादी शांतपणे विचार करून तयार करा. मी यालाच चिंतन व ध्यानधारणा म्हणतो. यात देवाला मध्ये आणायचे नाही. कारण ही ध्यानधारणा वेगळी आहे, हा योग वेगळा आहे. माणूस जन्मला की सुरूवातीची साधारण तीन वर्षे सोडली की बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा व महाविद्यालय (केजी टू पीजी म्हणजे किंडर गार्डन ते पोस्ट ग्रॕज्यूएट) असे शैक्षणिक अभ्यासाचे दडपण सुरू होते. हे दडपण दूर होते ना होते तोपर्यंत उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय करून आर्थिक कमाई करताना स्पर्धेत उतरून संघर्ष करण्याचे दडपण सुरू होते जे मरेपर्यंत चालू रहाते.

हे आर्थिक कमाईचे दडपण सुरू असताना मध्येच कुठून तरी सत्तेचा किडा डोक्यात वळवळू लागतो व त्यानंतर सुरू होते राजकारणाचे व राजकीय स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या राजकीय संघर्षाचे दडपण. ही सर्व दडपणे चालू असताना मध्येच विवाहाची हुरहूर लागते व माणूस लग्न करून मोकळा होतो. मग सुरू होते संसाराची मोठी जबाबदारी व या जबाबदारीतून निर्माण होणारे मुलांच्या शिक्षणाचे, ती बिघडू नयेत म्हणून त्यांना योग्य संस्कार देऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे दडपण, त्यांचे विवाह होऊन ती मुले आर्थिकदृष्ट्या पायावर सक्षमपणे उभी राहण्याचे व विवाह करून त्यांच्या संसारात स्थिर होण्याचे दडपण व इतर बरीच संसाराची दडपणे ज्यांची यादी संपता संपत नाही कारण माणूस आपल्या कुटुंबाविषयी फारच संवेदनशील असतो.

मानवी मनावरील दडपणांची यादी इथेच संपत नाही. भांडवलशाही शोषणाचे दडपण, वेळेचे दडपण, लोक काय म्हणतील याचे दडपण, समाजाने लादलेल्या अनेक धर्मांचे व त्या धर्मांतील आंतरधर्मीय विवाद, धार्मिक युद्धांचे दडपण, सांस्कृतिक रूढी, परंपराचे दडपण, समाजातील वर्णव्यवस्था, जातीपातींचे दडपण, वंशवाद, प्रांतवाद,भाषावाद यांचे दडपण, अंधश्रद्धा फेकून देताना अंधश्रद्ध लोकांच्या रागाचे दडपण, किचकट समाज कायद्याचे दडपण, बाहेर फिरताना खिशातील पैशाचे पाकिट कोणीतरी मारणार नाही ना, आपला मोबाईल फोन कोणीतरी पळवून तर नेणार नाही ना हे दडपण, रस्ता ओलांडताना एखादे वाहन सिग्नल तोडून अंगावरून तर जाणार नाही ना या भीतीचे दडपण, एखाद्या भिकाऱ्याला भीक दिली नाही तर परोपकार, करूणेच्या भावनेतून चुकल्याची भावना मनात निर्माण होते त्या भावनेचे दडपण, अहो इतकेच काय घरातील गॕस, लाईट, पाणी यांच्या बटणांचे दडपण. बटण नीट लागलेय ना, शाॕर्ट सर्किट, गॕस स्फोट होणार नाही ना, पाणी फुकट वाया जाणार नाही ना, ही भीतीयुक्त दडपणे घरातही चालूच असतात. वर पुन्हा नैसर्गिक आपत्ती, आजार यांचे दडपण चालूच असते. परमेश्वराचे ध्यान करून, योगासने करून ही दडपणे बिलकुल दूर होत नाहीत हे वास्तव आहे.

ही दडपणे (मी इथे लिहिलेल्या या कृत्रिम दडपणांची यादी अपूर्ण आहे) कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित आहेत. यात नैसर्गिक दडपणाचा भाग फार थोडा आहे. नीट विचार केला तर कळेल की, ही मानवनिर्मित कृत्रिम दडपणे माणूस सोडून सृष्टीतील इतर कोणत्याही सजीवाला नाहीत. ही कृत्रिम दडपणे झुगारून देऊन खऱ्या स्वातंत्र्याचा व खऱ्या मुक्तीचा आनंद माणसाला त्याच्या आयुष्यात ठरवूनही मिळत नाही कारण ही दडपणे मानवी मनावर मरेपर्यंत चालूच राहतात. या सर्व दडपणांची ओझी आयुष्यभर डोक्यावर घेऊन जगणाऱ्या माणसाच्या सहनशक्तीची कमालच म्हणायची! 

-©ॲड.बी.एस.मौरे, २६.६.२०२४

वि.सू./टीपः

"दडपण, आता विराम आत्महत्येला" या मराठी चित्रपटाची प्रतिमा माझ्या या लेखाला केवळ प्रातिनिधीक चित्र म्हणून लावलेली आहे. हा चित्रपट मी बघितलेला नाही व त्याचा माझ्या या लेखाशी काहीही संबंध नाही. जर या चित्रपटातील सामाजिक संदेश माझ्या लेखातील काही भागाशी जुळत असेल तर तो केवळ एक योगायोग समजावा. दडपण चित्रपट निर्मात्याच्या कलात्मक प्रतिमेवरील स्वामीत्व हक्क (कॉपीराईट) माझ्या प्रातिनिधीक कृतीने बाधित होत नाही. तरी सामाजिक कर्तव्य म्हणून त्या निर्मात्याविषयी सौजन्य व्यक्त करतो.

-ॲड.बी.एस.मोरे, २६.६.२०२४

मंगळवार, २५ जून, २०२४

संथ जीवन योग!

संथ जीवन योग!

महापूरात रौद्र स्वरूप धारण करून जोरात वाहणारी नदी किंवा सुनामी आणणारा रौद्र समुद्र कोणाला आवडेल? हिंस्त्र प्राणी असोत की माणसे सर्वसाधारणपणे सजीव सृष्टी अशांत, रौद्र वातावरण नाकारते व संथ, शांत जीवन स्वीकारते. खरं तर संथ व शांत जीवन हाच सृष्टीतील प्रत्येक जिवाचा मूलभूत नैसर्गिक हक्क आहे. मूलभूत हक्काच्या मोठमोठया गप्पा मारणारा, त्यावर तावातावाने वादविवाद करणारा माणूस मात्र या हक्कावर स्वतःच्या  हव्यासी करणीने गदा आणतोय.

माणसाला निसर्गाने सारासार विचार करण्याची बुद्धी दिलीय ना मग ही बुद्धी गहाण ठेवून माणसाने त्याची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात का वाढवली हा पहिला प्रश्न व मुद्दाही. या वाढलेल्या लोकसंख्येचे वाईट परिणाम म्हणजे जगण्यासाठी प्रचंड प्रमाणात वाढलेली स्पर्धा. मग या स्पर्धेने जीवनात निर्माण केलेली घाईगर्दी. श्वास कोंडून टाकणारी गर्दी व या गर्दीची पळा पळा कोण पुढे पळे तो ही घाई. 

माणसाचे आयुष्य ते केवढे पण त्याने केवढा मोठा पसारा वाढवून ठेवलाय तथाकथित विकासाचा. कसला विकास? मूठभर लोकांच्या चैनीचा विकास व त्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर धावणारी सर्वसामान्य लोकांची गर्दी. याच गर्दीचे मूठभर श्रीमंत भांडवलदार मंडळींकडून शोषण केले जाते व धूर्त राजकारणी मंडळींकडून भूलथापा देऊन गोल फिरवले जाते व गोल फिरवून पुन्हा या गर्दीला तिच्या मूळ स्थितीवर आणून सोडले जाते. सर्वसामान्य माणसाच्या शारीरिक व बौद्धिक कष्टाची किंमत कोण ठरवणार तर हे मूठभर भांडवलदार व त्यांच्याशी खाजगी भागीदारी करणारे धूर्त राजकारणी. मी साम्यवाद किंवा भांडवलवाद या दोन्ही वादांचा पुरस्कर्ता नाही. 

मी संथ जीवन योग या मूलभूत हक्काची पाठराखण करणारा हाडाचा वकील आहे व हा हक्क जो कायदा देऊ शकतो त्या कायद्याचा पुरस्कर्ता आहे. माझी वकिली मी याच मूलभूत हक्कासाठी मर्यादित ठेवली. मला बाहेर ही क्रांती करणे शक्य झाले नाही. पण निदान स्वतःपुरती तरी मी ही क्रांती केली. त्यासाठी मी, पत्नी व मुलगी असे छोटे कुटुंब निर्माण केले व आमच्या कौटुंबिक गरजा मर्यादित केल्या, चैनीचे तर नावच नाही. या मर्यादित जीवन जगण्याला कुटुंब सदस्यांकडून मोलाची साथ लाभली व म्हणून ही वैयक्तिक क्रांती शक्य झाली. हेच मर्यादित जीवन, हेच अध्यात्म व हाच संथ जीवन योग मी आयुष्यभर जगलो व जगत आहे. 

मूठभर भांडवलदार व राजकारणी मंडळींना त्यांच्या चैनबाज संकुचित जीवन विकासासाठी सर्वसामान्य माणसांची धावणारी गर्दी हवी आहे हे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीला कधी कळणार? जीव गुदमरून टाकणारी गर्दी व जोरात धाव धाव धावायला लावणारी जीवघेणी स्पर्धा या भयानक चक्रात सर्वसामान्य माणूस सापडलाय. या माणसाला संथ जीवन योगाची आवश्यकता आहे कारण असे संथ व शांत जीवन हाच त्याचा मूलभूत नैसर्गिक हक्क आहे. हा हक्क डावलणारे कोण हे कळण्यासाठी सामान्य माणसाला थोडे तरी अंतर्मुख व्हावे लागेल. आयुष्यात येऊन गर्दीचा भाग बनून रहायचे व त्या गर्दीबरोबर घाईघाईत धाव धाव धावायचे याला जीवन म्हणत नाहीत. असल्या जीवनावर का शतदा प्रेम करावे? गर्दीचे, घाईचे जीवन म्हणजे अशांत व अस्थिर जीवन. हे असले जीवनच मानसिक आजारांचे मूळ कारण आहे. यातून सामान्य माणूस लवकर बाहेर पडो व त्याला संथ जीवन योगाचा आनंद मिळो व शांती लाभो हीच माझी सदिच्छा! 

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.६.२०२४

सोमवार, २४ जून, २०२४

अन्न, वस्त्र, निवारा!

अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या गरजा की चैनी?

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन प्रमुख गरजा. या गरजांचे अती हुशार माणसाने चैनीत कसे रूपांतर केले ते बघा. पोटासाठी अन्न ही गोष्ट बाजूला पडली व जीभेचे चोचले पुरविणारे प्रक्रिया केलेले अनेक खाद्य पदार्थ निर्माण केले गेले व खा खा खाण्याची चंगळ सुरू झाली. मग आले वस्त्र. खरे तर लाजेपोटी शरीर झाकण्यासाठी माणसाला वस्त्राची गरज भासली. माणसाला काही गोष्टींची लाज वाटते म्हणे. पण आधुनिक माणूस इतका निर्लज्ज झालाय की त्याची लाज कुठे पळून गेलीय हेच कळेनासे झालेय. तर हे लाज झाकण्याचे वस्त्र माणसाने फॕशनचे साधन बनविले. फाटके कपडे घालण्याची फॕशन हल्लीची काही मुले मुली करतात तेव्हा गंमत वाटते. खिशात पैसा खुळखुळणारी मुले, मुली तर नवीन वस्त्र महिनाभर वापरले की लगेच फेकून देतात व दुसरे नवीन घेतात. मग वस्त्र ही माणसाची गरज की चैन? नंतर माणसाची तिसरी गरज कोणती तर निवारा. या गरजेची तर जाम वाट लागलीय. एका बाजूला दाटीवाटीने वसलेल्या गरिबांच्या झोपडपट्ट्या व छोट्या घरांच्या चाळी तर दुसऱ्या बाजूला आलिशान सदनिकांच्या श्रीमंतांच्या गगनचुंबी इमारती हे दृश्य आहे निवारा या गरजेचे. यात झोपडपट्टी व चाळींत निवाऱ्याची गरज दिसते तर उंच इमारतींतील आलिशान सदनिकांत निवाऱ्याची चैन दिसते. आता झोपडपट्टी व चाळी तोडून तिथेही सदनिका युक्त उंच इमारती बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे. गरिबांना सुद्धा थोडी चैन करण्याचा हक्क आहेच की. तीही माणसेच आहेत. पण वाढलेल्या लोकसंख्येच्या  निवाऱ्याची गरज भागविण्यासाठी डोंगर फोडून, झाडीची जंगले तोडून व समुद्र खाडी किनाऱ्यालगतच्या पाणथळींवर भराव टाकून इमारती बांधण्याचा कार्यक्रम चाललाय तो भयंकर आहे. असल्या विकासासाठी पर्यावरणाची वाट लावायची का? पण माणसाला या पर्यावरणाचे काही पडलेले नाही. मस्त खा, प्या व अन्नाची चंगळ करा. चांगले भारी भारी कपडे घाला व वस्त्राची फॕशन करा. आणि उंच उंच इमारतींतील सदनिकांत मजेत रहा व निवाऱ्याची चैन करा. असा हा तीन गरजांचे तीन चैनीत रूपांतर करण्याचा त्रिसूत्री कार्यक्रम चालू आहे. जमीन मालमत्ता विकासाच्या बाबतीत चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) व विकास हस्तांतरण हक्क (TDR) या दोन गोष्टी तर समजण्याच्या पलिकडे गेल्या आहे. शाळा, उद्याने वगैरेचे आरक्षण बदलणे, चटई क्षेत्र निर्देशांक वाढवणे व तसेच विकास हस्तांतरण हक्क या जमिनीवरून त्या जमिनीवर फिरवणे या गोष्टी मालमत्ता विकासाच्या बाबतीत खेळ झाल्या आहेत. आज एक तर उद्या दुसरेच असा विकासाचा कार्यक्रम चालू आहे. खाजगी, सरकारी जमिनी बळकावून, त्या जमिनींवर अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांना संरक्षित करून त्यांना उंच इमारतींत फुकट सदनिका दिल्या जात आहेत ही गोष्ट न्यायालयांनीही सरकारच्या निदर्शनास आणली आहे. आणि दुसरी चीड आणणारी गोष्ट म्हणजे विकासाच्या मार्गात जर झाडे येत असतील तर मग ती झाडे तोडून दुसरीकडे कुठेतरी लावा (लावा या शब्दात वाढवा हा शब्द येत नाही). हा प्रकार तर भयानक फसवणूकीचा प्रकार आहे. एकंदरीत काय तर हा चाललेला विकास हा गरजांचा विकास नसून चैनींचा विकास आहे, पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा भकास विकास आहे. एक दिवस हा भकास विकास माणसांना चांगलाच भारी पडेल यात शंकाच नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.६.२०२४

सृष्टी परिवर्तन चक्र!

सृष्टी परिवर्तन चक्र!

अंतराळ विश्वात निसर्ग किती फुगे फुगवतो, फुगवून ठेवतो व फोडतो या खेळाचा नीट अंदाज पृथ्वीवरून बांधता येत नसला तरी त्याचा पृथ्वीवरील हा खेळ मात्र पृथ्वीवर जगणाऱ्या व मरणाऱ्या सर्व जिवांना प्रत्यक्षात बघायला, अनुभवायला मिळतो. 

निसर्गाने पृथ्वीवर उत्क्रांत केलेली सजीव व निर्जीव पदार्थांची सृष्टी परिवर्तन चक्रात सृष्टीतून पुनर्निर्मित होते, सृष्टीतच काही काळ टिकून राहते व शेवटी सृष्टीतच विसर्जित होते. सृष्टी पुनर्निर्मितीचे, टिकण्याचे व विसर्जनाचे एक परिवर्तन चक्र निसर्गाने पृथ्वीवर निर्माण केले आहे. सृष्टीच्या परिवर्तन चक्रातील पुनर्निर्मितीला, काही काळ अस्तित्व टिकवून धरण्याला व शेवटी सृष्टीतच विसर्जित होण्याला सृष्टीचे चक्राकार परिवर्तन असे म्हणता येईल.

जसा पृथ्वीवरील पाऊस पृथ्वीवरील सागरातूनच निर्माण होतो, काही काळ पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचा वर्षाव करीत राहतो व शेवटी त्या सागरातच चक्राकार विसर्जित होतो तसेच सृष्टीचे परिवर्तन चक्र पृथ्वीवर अनंत काळापासून चालू आहे. पृथ्वी व तिच्या सृष्टीसाठी सूर्य हाच ईश्वर आहे ज्याला सूर्यनारायण म्हणतात. हा सूर्यनारायण पृथ्वीचा ईश्वर आहे, परमेश्वर नव्हे. अंतराळ विश्वातील प्रचंड मोठ्या उर्जा स्त्रोताला संपूर्ण अंतराळ विश्वाचा परमेश्वर असे म्हणता येईल. 

सूर्यनारायण त्याच्या प्रकाशमय व उर्जायुक्त किरणांनी पृथ्वीला व तिच्यावरील सृष्टीला दररोज स्पर्श तर करतोच पण पृथ्वीला तिच्या सृष्टीसह नियंत्रितही करतो. अगदी तसाच अंतराळ विश्वाचा परमेश्वर (विश्व चैतन्य किंवा विश्व उर्जा स्त्रोत) पृथ्वी व तिच्या सूर्यासह सूर्यमालेला व अंतराळ विश्वातील असंख्य ग्रह, ताऱ्यांना स्पर्श करतो व त्यांना नियंत्रित करतो. पण तो परमेश्वर पृथ्वीवरील माणसांच्या दृष्टीस पडत नाही. सूर्यनारायण मात्र लांबून दृष्टीस पडतो. पण तरीही पृथ्वीवरून दृष्टीस पडणाऱ्या सूर्यनारायणाला पृथ्वीवरील कोणाला तरी प्रत्यक्षात भेटता येते का? सूर्यनारायणाला भेटण्याची इच्छा म्हणजे जळून खाक होण्याची इच्छा. सूर्यनारायण त्याच्या उर्जा किरणांच्या माध्यमातून आपल्याला येऊन भेटतोय तेवढेच पुरेसे आहे. आपण त्याला जाऊन भेटण्याची इच्छा बिलकुल नको मग अशा इच्छेला वैज्ञानिक इच्छा म्हणा नाहीतर आध्यात्मिक इच्छा! आपण जर सूर्याला भेटू शकत नाही तर मग अंतराळ विश्वाच्या परमेश्वराला (विश्व उर्जा स्त्रोताला) काय भेटणार?

पृथ्वीवर सतत चालू असलेली सृष्टी चक्रातील परिवर्तन क्रिया ही निसर्गशक्तीची (विश्व चैतन्याची/परमेश्वराची) पृथ्वीवरील वातावरणात सृष्टीचे फुगे फुगवण्याची, त्या फुग्यांचे ते फुगीर अस्तित्व काही काळ टिकविण्याची व शेवटी ते फुगलेले फुगे फोडण्याची चक्राकार परिवर्तन क्रिया होय. पृथ्वीवरील सृष्टीचा फुगा तिच्या परिवर्तन चक्रात पृथ्वीवर फुगतो, पृथ्वीवर त्या फुगीर अवस्थेत काही काळ टिकतो व पृथ्वीवरच फुटतो. सृष्टीचे हे फुगणे, फुगीर अवस्थेत काही काळ टिकून राहणे व शेवटी फुटणे या पृथ्वीवर अनंत काळापासून चालू आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.६.२०२४

रविवार, २३ जून, २०२४

दुनियादारी!

दुनियादारी!

प्रत्येक व्यक्तीचे कुटुंब असतेच. अगदी अविवाहित माणसाचे सुद्धा. एकटा जीव सदाशिव ही गोष्ट चित्रपटात ठीक. वास्तवात कुटुंब ही गोष्ट जवळजवळ अनिवार्य आहे. अविवाहित व्यक्तीलाही जीवनाचा काही काळ तरी जन्म देणाऱ्या आईवडिलांचे कुटुंब लाभतेच. कुटुंब आले की मग कुटुंबाची जबाबदारी आलीच. या कौटुंबिक जबाबदारीचा गाडा हाकण्यासाठी माणसाला कुटुंबाबाहेर दुनियादारी करावी लागते. ही दुनियादारी सहजसोपी नाही. त्यात निसर्गाने व मानव समाजाने निर्माण केलेले अनेक खाचखळगे, अडथळे आहेत. निरनिराळ्या नैसर्गिक आपत्ती, वाढत्या वयानुसार थकणारे शरीर, क्षीण होत जाणारी शक्ती व त्या सोबत येणारे आजार इत्यादी गोष्टी हे निसर्गाने निर्माण केलेले अडथळे होत. तर समाजातील अनेक धर्म, अनेक जातीपाती, वांशिक फरक इ. गोष्टींनी निर्माण केलेली सामाजिक फाटाफूट, काही मूठभर श्रीमंतांनी निसर्गाच्या साधन संपत्तीवर निर्माण केलेली मक्तेदारी, राजकारणातील भ्रष्टाचार व गुंडगिरी, लोकसंख्या वाढीमुळे वाढत चाललेली जीवघेणी आंतरमानवी स्पर्धा इ. गोष्टी हे समाजाने निर्माण केलेले अडथळे होत. या सर्व अडथळ्यांची माहिती करून घेत त्यावर मात कशी करावी याचे ज्ञान घ्यायचे व मग कौशल्याने सर्व अडथळ्यांशी संघर्ष करीत मरेपर्यंत ही दुनियादारी करायची हे तरूण, मध्यम व काही अंशी वृद्ध व्यक्तींवर असलेले दुनियादारीचे ओझे लहानपणी जवळजवळ नसतेच. कारण लहान मुलांच्या डोक्यावर जबाबदार आईवडिलांचे छत्र असते. हे फुलपाखरासारखे स्वच्छंदी बालपण काही निराधार मुलांच्या नशिबी नसते व याला कारण त्यांचे बेजबाबदार किंवा अत्यंत दरिद्री आईबाप असतात. एकंदरीत काय तर दुनियादारी हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.६.२०२४

खेळ मांडला!

खेळ मांडला!

काय म्हणावे निसर्गातील अलौकिक निसर्गशक्तीला किंवा परमेश्वराला?
या महाशक्तीने/परमेश्वराने स्वतःच सृष्टीचा पसारा वाढवला. त्या सृष्टीत स्वतःच प्रश्नांचे डोंगर निर्माण केले आणि मग स्वतःच त्या डोंगरावर उत्तरांचे झरे निर्माण केले व त्या प्रश्न व उत्तरांच्या चक्रात सृष्टीतील सजीव व निर्जीव पदार्थांना कोड्यात घालून सतत खेळवत, झुंझवत ठेवले. या असल्या करणीने त्या निसर्गशक्तीला किंवा परमेश्वराला कोणता आनंद मिळत असेल व यातून त्या शक्तीला किंवा परमेश्वराला काय साध्य करायचे आहे हे त्या महाशक्तीला/परमेश्वरालाच ठाऊक. मानवी मनातील खेळ हा निसर्गशक्तीच्या/परमेश्वराच्या या मोठ्या खेळाचाच भाग. या खेळात किती भाग घ्यायचा व त्यात किती गुंतत जायचे हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न. खरं तर जगातील बऱ्याच मानवनिर्मित गोष्टी हे मानवी मनाचे खेळ आहेत. या निसर्गातील सगळ्याच खेळांचा कर्ता करविता असलेल्या त्या महान निसर्गशक्तीला किंवा परमेश्वराला वंदन!

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.६.२०२४