वाचा कथा एकाच घरातील दोन विवाहांची!
घरात नवरा ग्रॕज्यूएट व बायको बारावी. दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती चांगली. नवरा चांगल्या कंपनीत नोकरीला त्यामुळे त्याचा पगार चांगला. या नवरा बायकोला झाली दोन मुले. एक मुलगा व एक मुलगी. या सुशिक्षित व चांगल्या आर्थिक स्थितीतील छोट्या कुटुंबात ही दोन मुले लाडात वाढली. दोन्हीही मुले गोरी गोमटी दिसायला सुंदर. थोरला मुलगा डबल ग्रॕज्यूएट झाला व तोही चांगल्या कंपनीत नोकरीला लागून महिना ८०,००० रूपये पगार कमवू लागला. मुलगीही ग्रॕज्यूएट होऊन चांगल्या कंपनीत नोकरीला लागून महिना ३०००० रूपये पगार कमवू लागली.
मुले मोठी झाली. शिकून सवरून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. आता या दोन मुलांच्या आईवडिलांना या दोन्ही मुलांच्या लग्नाची काळजी लागली. मग त्या आईवडिलांनी त्या दोन्ही मुलांच्या लग्नाचे प्रयत्न गावा पासून मुंबई पर्यंत सुरू केले. पण मुलीचे लग्न त्यांच्या नातेवाईकांच्या ओळखीतून अगोदर जमले. तिला अनुरूप चांगल्या ५०००० रूपये पगाराचा ग्रॕज्यूएट नवरा मिळाला. पण मुलगी सहा महिन्यांतच मुलाची आई खोडसाळ आहे म्हणून माहेरी निघून आली. मला नांदायला जायचे नाही म्हणून हट्ट करून बसली व मग दोघांच्या संमतीने तिला कौटुंबिक न्यायालयातून घटस्फोट मिळाला.
बहीण घटस्फोट करून घरी येऊन बसली आणि घरात घटस्फोटित बहीण आहे या कारणावरून तिच्या त्या डबल ग्रॕज्यूएट भावाचे लग्नच जमेना. तो उच्च शिक्षित चांगल्या पगाराचा मुलगा त्याच्या घटस्फोटित बहिणीमुळे बराच काळ म्हणजे ३५ वर्षे उलटून गेली तरी अविवाहित राहिला.
मग आईवडील पुन्हा काळजीत पडले. त्यांना घरातील अन्न गोड लागेना. शेवटी कसाबसा अपत्य नसलेला एक विधुर मुलगा त्यांच्या नातेवाईकांच्याच ओळखीतून त्यांना मिळाला. त्या घटस्फोटित मुलीचे दुसरे लग्न त्या विधुर मुलाशी लावून देण्यात आले. ती मुलगी त्या दुसऱ्या नवऱ्याकडे नांदायला गेली. मग ३५ वर्षाच्या तिच्या अविवाहित भावाला हायसे वाटले. मग त्याचे लग्न पुन्हा नातेवाईक लोकांच्या ओळखीतूनच जमून आले. त्याची पत्नीही ग्रॕज्यूएट व मुंबईत एका कंपनीत अकौंटंट म्हणून महिना ३०००० रू. पगार कमावणारी. पण झाले काय की तिला एकत्र कुटुंबातील तिचे सासू सासरे जड झाले. "मी जर माझ्या आईवडिलांना सोडून तुझ्या बरोबर संसार करायला आले तर तू तुझ्या आईवडिलांना धरून का बसलास? आपण दोघे आपल्या पैशातून स्वतंत्र फ्लॅट घेऊ व तिथे संसार करू. तू अधूनमधून तुझ्या आईवडिलांकडे जात जा व मीही माझ्या माहेरी अधूनमधून जात जाईन" असा हट्ट धरून ती मुलगी बसली. मुलाला हे बिलकुल पटले नाही. "तू तुझ्या आईवडिलांना सोडले म्हणून मी पण माझ्या आईवडिलांना सोडले पाहिजे ही कसली अट"? असे तो मुलगा म्हणाला. झाले ती मुलगी त्याला सोडून तिच्या माहेरी निघून गेली ती पुन्हा परत आलीच नाही. मग त्या दोघांचा कौटुंबिक न्यायालयात संमतीने घटस्फोट झाला.
तिकडे ती घटस्फोटित मुलगी विधुर मुलाबरोबर दुसरा विवाह करून नांदायला गेली होती तिला तिकडे विवाह संबंधातून एक मूल झाले. ते मूल म्हणजे मुलगा. पण तिचे त्या विधुर नवऱ्याबरोबर काय बिनसले माहित नाही. ती तडक त्या बाळाला घेऊन आईवडिलांकडे निघून आली व आता तिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज टाकलाय. आता ही दोन्हीही सुशिक्षित, कमावती मुले त्यांच्या आईवडिलांकडे घटस्फोटित जीवन जगत आहेत. ही सत्यकथा आहे. फक्त नावे गुप्त ठेवली आहेत. वकील म्हणून पूर्वीही अशा केसेस हाताळल्या आहेत. पण असे प्रकार पूर्वी फारच कमी होते. ते हल्ली खूप वाढलेत. हल्ली काही मुले मुली तर बिनधास्त लिव इन रिलेशनशिप मध्ये राहतात. त्यांना विवाह बंधन व कौटुंबिक जबाबदाऱ्या नकोशा झाल्याचे दिसत आहे. विवाह संस्थेचा असा खेळ झालेला बघवत नाही. काय झालेय काय हल्लीच्या पिढीला? पण या बदललेल्या परिस्थितीतही नवीन पिढीतील काही मुले मुली समंजसपणे संसार करताना बघून आनंद वाटतो.
-©ॲड.बी.एस.मोरे, २४.३.२०२४