https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २१ मार्च, २०२४

कलियुगाची समाप्ती?

कलियुगाची समाप्ती?

उत्क्रांती काळ म्हणजे संक्रमण काळ. माणूस या संक्रमण काळातून हळूहळू विकसित होत पुढे चालला आहे. विकास म्हणजे नुसता भौतिक विकास नव्हे तर आध्यात्मिक विकासही. माणूस सद्या वैज्ञानिक दृष्ट्या सुशिक्षित झाला आहे पण आध्यात्मिक दृष्ट्या सुसंस्कृत होणे बाकी आहे. दोन्ही दृष्ट्या विकसित युग म्हणजे सतयुग. सतयुग येणे बाकी आहे. सद्या कलियुग चालू आहे. कलियुग म्हणजे कलीने काड्या घालण्याचे, उपद्रव करण्याचे युग. या युगात कलीचा प्रभाव जरी वाढला असला तरी देव निष्प्रभ झालेला नाही. कलीला फटके देत त्याला त्याची जागा दाखवून देण्याचे देवकार्य चालू आहे. या कलीला पूर्णपणे नष्ट करून कलियुगाचा पूर्ण अंत करून सतयुग प्रस्थापित करण्यासाठी देवाचा पूर्णावतार होणे बाकी आहे.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे असे लवकर व्हावे अर्थात सतयुग लवकरात लवकर यावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.३.२०२४

बुधवार, २० मार्च, २०२४

माणसातले देवत्व!

माणसातले देवत्व!

डी.एन.ए. स्वरूपातील आनुवंशिक तत्वच सजीवांचे शरीर घडवतं, धारण करतं. हेच आनुवंशिक तत्व पुढच्या पिढीत संक्रमित होत जातं व सजीवांना पुनर्निर्मित, पुनर्जिवित करून त्यांना पुनर्जन्म देते. हे जरी अनुवंश शास्त्रानुसार (अनुवंशशास्त्र ही वंश सातत्याचा अभ्यास करणारी एक स्वतंत्र विज्ञानशाखा) वैज्ञानिक दृष्ट्या खरे असले तरी शेवटी अनेक माणसांतून फक्त काही माणसेच मानवी जीवनाची उदात्त पातळी गाठून समाजात एक मोठा आदर्श निर्माण करून जातात व त्यातून सामान्य माणसांच्या मनात प्रश्न निर्माण होतोच की असे कोणते आनुवंशिक तत्व बरोबर घेऊन अशी माणसे जन्माला येतात की जे तत्व सूर्यासारखे त्यांच्या आयुष्यभर तळपत राहते व संपूर्ण समाजापुढे एक कायमचा आदर्श घालून जाते?या माणसांकडील विशेष उदात्त गुण व तशीच अलौकिक शक्ती हा दैवी चमत्कार वाटून त्यांच्याविषयी सर्वसामान्य माणसांच्या मनात देवत्वाची आध्यात्मिक भावना निर्माण होणे गैर नाही. एवढेच की देवत्वाच्या या आध्यात्मिक भावनेची कर्मकांडी अंधश्रद्धा होता कामा नये.

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.३.२०२४

हृदयविकार!

हृदयविकार! 

रक्ताच्या धमन्यांत कोलेस्ट्राल मुळे अडथळे (ब्लॉकेजेस) होणे किंवा हृदयाला पंपिंग करणाऱ्या विद्युत प्रवाहात अडथळा (ब्लॉक) निर्माण होणे असे मला माहित असलेले हृदयविकाराचे दोन प्रकार. ब्लॉकेजेस ओपन हार्ट/बाय पास सर्जरीने काढतात तर छातीत बॕटरीवाला पेसमेकर बसवून हृदयाचे बिघडलेले इलेक्ट्रिक सर्किट नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मला दुसऱ्या प्रकारचा हृदयविकार म्हणजे २ एवी ब्लॉक आहे. दोन मोठ्या एम.डी. कार्डिओलॉजिस्ट यांनी मला पेसमेकर बसवावाच लागेल नाहीतर माझे काही खरे नाही अशी भीती घातली. पण के.ई.एम. हॉस्पिटलजवळील रतन सेंट्रल बिल्डिंगमधील, परळ, मुंबईच्या डॉ. सुभाष ढवळे, एम.डी. (होमिओपॕथी) यांनी गेल्या दोन महिन्यापासून नुसत्या होमिओपॕथी औषधांनी माझे दर मिनिटाचे हृदयाचे अनियमित ठोके ४० वरून ६० पर्यंत आणले. ते दर मिनिटाला ७० झाले की मी पुन्हा नॉर्मल होईन. ६७ वयात सर्जरी करून पेसमेकर छातीत बसवणे व त्या बॕटरी यंत्रावर जगणे मला मान्य नसल्याने व नैसर्गिक मृत्यू यावा ही इच्छा असल्याने मी होमिओपॕथीचा पर्याय स्वीकारला. आता प्रश्न राणीच्या बागेतील प्राण्यांचा हृदयविकाराने मृत्यू होण्याचा. तिथल्या पशुवैद्यकांनाच माहित की तिथल्या प्राण्यांना कोणत्या प्रकारचे हृदयविकार होते, आहेत व त्यावर वैद्यक शास्त्रात इलाज काय व ते वापरण्यात त्यांच्याकडून काही निष्काळजीपणा झाला काय? याची चौकशी पशुवैद्यक व फॉरेन्सिक सायन्स मध्ये तज्ज्ञ असलेले मेडिको-लिगल वकील यांची समितीच करू शकेल.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.३.२०२४

कृत्रिमतेचा भस्मासूर!

कृत्रिमतेचा भस्मासूर!

निसर्गाने पृथ्वीवर विविध पदार्थांची जी सृष्टी निर्माण केली ती नैसर्गिक उत्क्रांती पद्धतीने. या निर्मितीचा उद्देश निर्मित पदार्थांचा पदार्थांकडून नैसर्गिक वापर हाच होता. पण याच निसर्गाने पृथ्वीवर माणूस नावाचा सजीव पदार्थ पृथ्वीवर उत्क्रांत केला आणि त्याला अशी काही वासना व बुद्धी दिली की त्याने निसर्गाच्या मूळ नैसर्गिक उद्देशाचीच वाट लावली. त्याच्या तल्लख बुद्धीच्या जोरावर त्याने संपूर्ण सृष्टीची मूळ नैसर्गिकता नष्ट करून तिच्यात कृत्रिमता ठासून भरली.

निसर्गाने पृथ्वीवर विविध पदार्थांची सृष्टी निर्माण केली व तिच्यात आंतर वापराची एक शृंखला तयार केली. या आंतरवापर व्यवहारात निसर्गाने मनुष्याला उच्च स्थानावर आणून बसवले. मानवाची जैविक उत्क्रांतीच सृष्टीच्या पर्यावरणीय पिरॕमिडमध्ये सर्वोच्च स्थानावर झाल्याचे (की केल्याचे?) दिसत आहे. मनुष्याची बुद्धी सुद्धा उत्क्रांतीतून अधिकाधिक  तल्लख होत गेली. या बुद्धीच्या जोरावर मनुष्याने विविध पदार्थांचे गुणधर्म तर शोधलेच पण या विविध पदार्थांमधील आंतरवापरी साखळी सुद्धा शोधून काढली. मग मनुष्याने स्वतःच या सर्व पदार्थांचा स्वतःच्या मर्जीनुसार वापर सुरू केला. हा वापर खरोखरच नैसर्गिक वापर राहिलाय का की मनुष्याकडून त्याचे कृत्रिम वापरात रूपांतर केले गेलेय हा प्रश्न आहे.

पदार्थांच्या नैसर्गिक वापराचे तांत्रिक कृत्रिम वापरात रूपांतर केल्यानंतर मनुष्याने या पदार्थांची त्यांच्या कृत्रिम वापरासह जी आंतरमानवी देवाणघेवाण सुरू केली ती तरी नैसर्गिक राहिलीय का? निसर्गाने माणसासह विविध पदार्थ निर्माण केले पण त्यांची पैशातील किंमत  माणसाने स्वतःच्या सोयीनुसार ठरविली. ही किंमत मानवनिर्मित म्हणजे कृत्रिम आहे. विविध पदार्थ वैशिष्ट्यांना संलग्न विविध मानवी सेवा निर्माण करून माणसाने या सेवांची किंमतही पैशात ठरविली. वस्तू व सेवा कर (गुडस अँड सर्विस टॕक्स म्हणजे जी.एस.टी.) हे या पैशातील किंमतीचे सरकारी पिल्लू. मुळात वस्तू व सेवांची आंतरमानवी आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी निर्माण केला गेलेला पैसा हीच मानवनिर्मित म्हणजे कृत्रिम गोष्ट आहे.

पैसाच काय पण ज्यावर व ज्यासाठी माणसाचे राजकारण चालते ती राजकीय सत्ता ही सुद्धा कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित गोष्ट होय. कृत्रिमतेची ही यादी अपूर्ण आहे. हल्ली हल्लीच कृत्रिम बुद्धिमत्तेचाही मानवाने शोध लावलाय व तिचा वापरही सुरू केलाय. माणसाने सृष्टी मध्ये नैसर्गिकता किती शिल्लक ठेवलीय याचा हिशोब करण्याची वेळ आली आहे.

माणूस नैसर्गिक जीवन जगणेच विसरून गेलाय. त्याला कृत्रिमतेची इतकी सवय लागलीय की तो या कृत्रिमतेतच आयुष्य जगतो व आयुष्य संपवतो. आयुष्यभर तो या कृत्रिमतेचे मार्केटिंग करून तिचीच देवाणघेवाण करीत राहतो. इतकेच काय कृत्रिमतेच्या कृत्रिम भीतीने तो स्वतःचे जीवन त्रस्त, तणावग्रस्त करून टाकतो. कृत्रिमता ही पूरक गोष्ट आहे. ती मूळ नैसर्गिकतेची जागा घेऊ शकत नाही हे माणसाने वेळीच ओळखले पाहिजे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.३.२०२४

सोमवार, १८ मार्च, २०२४

उच्च शिक्षणाला योग्य वेळी योग्य संधी मिळाली नाही तर?

उच्च शिक्षणाला योग्य वेळी योग्य संधी मिळाली नाही तर?

माणूस उच्च ध्येयाने उच्च शिक्षण घेतो. उच्च शिक्षणाची प्रमाणपत्रे लोकांना दाखवित फिरण्यासाठी तो उच्च शिक्षण घेत नाही. पण कठोर बौद्धिक परिश्रमातून मिळविलेल्या उच्च शिक्षणाला योग्य वेळी योग्य संधी म्हणजे उच्च कामाची योग्य संधी जर मिळाली नाही तर उच्च शिक्षित माणसापुढे उच्च ध्येय रहात नाही व उच्च शिक्षण त्याच्या मेंदूवर व्यर्थ भार होऊन बसते. असा उच्च शिक्षित माणूस मग दिशाहीन होऊन छोट्या छोट्या गोष्टींतच त्याचे आयुष्य वाया घालवतो.

निसर्गाचा कारभार किचकट आहे व वाढत चाललेल्या लोकसंख्येने तो अधिकाधिक स्पर्धात्मक व जास्त किचकट झाला आहे. उच्च शिक्षण हे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य देते. उच्च शिक्षण सतत मोठी आव्हाने डोक्यावर घ्यायला आतुर असते. तीच तर उच्च शिक्षणाची कसोटी असते. अशा या उच्च शिक्षणाला मोठी आव्हाने पेलण्याची संधीच दिली नाही तर उच्च शिक्षण उच्च शिक्षित माणसाच्या डोक्यावर मोठा भार होऊन बसते. कशाला घेतले एवढे मोठे उच्च शिक्षण असे उदास विचार अशा उच्च शिक्षित व्यक्तीच्या मनात सारखे घोंघावत राहतात. समाजात जेव्हा अशिक्षित किंवा अर्ध शिक्षित माणसे पैसा व सत्ता यांच्या जोरावर समाजात दिमाखात मिरवतात तेव्हा तर ही उदासिनता जास्त वाढते.

उच्च शिक्षणातून मिळविलेल्या उच्च ज्ञानाला मोठ्या आव्हानांचे मोठे अवकाश (स्पेस) मिळाले नाही तर उच्च शिक्षण भरकटते. ते शिक्षण छोट्या व साध्या गोष्टींतच अडकून, तिथेच घुटमळत बसते. साधे गवत कापायला खुरपे बस्स असते. तिथे तलवार काय कामाची? पण धारधार उच्च शिक्षणाला जर असे साधे गवत कापण्याची वेळ आयुष्यभर आली तर त्या उच्च शिक्षणाची अवस्था काय होत असेल? मोठ्या गोष्टी जर उच्च शिक्षणाला अवास्तव व छोट्या गोष्टी वास्तव झाल्या तर त्या उच्च शिक्षणाला छोट्या गोष्टींवरच सतत लक्ष केंद्रित करणे शक्य होईल काय? त्या उच्च शिक्षणाला अशी परिस्थितीत छोट्या गोष्टीच अतिशय अवघड वाटू लागल्या तर त्यात त्या उच्च शिक्षणाचा काय दोष?

जगावर प्रभुत्व गाजवणाऱ्या मानव समाजाचे संपूर्ण अवकाश (स्पेस) हे खरे तर मूलभूत शिक्षण व त्यापुढील उच्च शिक्षण यांनी व्यापले पाहिजे. पण ते खरे व्यापलेय कोणी? तर दोन शक्तीशाली गटांनी. एक गट आहे श्रीमंत भांडवलदारांचा व दुसरा गट आहे बाहुबळी राजकारण्यांचा. या दोन्ही गटांची भागीदारी आताची नाही. ती कितीतरी काळापासून पिढ्यानपिढ्या चालू आहे. या अतूट भागीदारीत शारीरिक कष्ट करणाऱ्या शेतकरी-कामगारांचा व बौद्धिक कष्ट करणाऱ्या सुशिक्षित व्यवस्थापक-कर्मचाऱ्यांचा वाटा अगदीच नगण्य आहे. खरं तर हे शारीरिक व बौद्धिक कष्टकरी वरील दोन शक्तीशाली गटांचे अर्थात भांडवलदार व राजकारणी यांच्या भागीदारीचे नोकर चाकर, गुलाम राहिले आहेत व रहात आहेत.

मेहनतीने घेतलेल्या उच्च शिक्षणाला त्याचे कर्तुत्व गाजवण्याची संधी कोण देणार? माणसांनी बनवलेला कायदा की हा कायदा राबवणारी माणसे? पण हा कायदा खऱ्या अर्थाने कोण राबवतेय? समाजातील मूठभर भांडवलदार व राजकारणी हे दोन शक्तीशाली गटच ना! आता हे दोन गट कायद्याची अंमलबजावणी कायद्याप्रमाणे करतात की नाही हे पाहण्यासाठी व न्यायाचे हुकूम देण्यासाठी जरी स्वतंत्र न्याययंत्रणा असली तरी तिलाही तिच्या मर्यादा आहेत. न्यायाधीश मंडळी ही सुद्धा माणसेच असतात व न्यायालयात अशिलांच्या न्याय हक्कासाठी कायदेशीर युक्तिवाद करणारी वकील मंडळी ही सुद्धा माणसेच असतात. आणि शेवटी न्यायालयात भांडवलदार व राजकारणी या दोन शक्तीशाली गटांना अशील म्हणून स्वीकारून त्यांची वकिली करणारे मूठभर वकील हे सुद्धा फार मोठे वकील असतात. त्यांच्यापुढे गरीब व अशक्त अशा सर्वसामान्य अशिलांचा व त्यांची हिंमतीने वकिली करणाऱ्या वकिलांचा काय आणि किती निभाव लागणार? तरीही आपण म्हणायचे की कायद्यासमोर सर्व समान आहेत. अशा परिस्थितीत उच्च शिक्षणाला उच्च दर्जाच्या कामाची संधी कशी मिळणार? कारण शेवटी अशी संधी देणारे आहेत कोण? वर उल्लेखित भांडवलदार व राजकारणी हे दोन शक्तीशाली गटच ना? त्यांच्याकडे उच्च शिक्षण असो नसो, ते प्रचंड शक्तीशाली आहेत हे आपल्या मानव समाजाचे कटू वास्तव आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर हे कटू वास्तव कळल्यावर बऱ्याच गोष्टी मनाला पटेनाशा होतात. पण त्या सहन करीत राहण्याशिवाय पर्याय नसतो. पटवून घ्यावे लागते व त्यासाठी मनावर विजय मिळवावा लागतो. मनावर विजय मिळविण्याला पर्याय नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.३.२०२४

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

परिक्रमा!

परिक्रमा!

निसर्गातील विविधतेशी देवधर्माची विविधता कशी संलग्न आहे हा माझा संशोधनाचा विषय. तसा मी कोणी वैज्ञानिक शास्त्रज्ञ किंवा आध्यात्मिक पंडित नाही. मी एक निरीक्षक आहे व निरीक्षणातून माझ्या अल्प बुध्दीला जे काही आकलन होते त्या आकलनाची मी शब्दांत मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी जे काही बोलतो किंवा लिहितो ते परिपूर्ण असूच शकत नाही. त्यात त्रुटी राहणारच. तेंव्हा चुकभूल द्यावी घ्यावी.

माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार निसर्ग विज्ञानाच्या विविधतेचे जसे एक गोल चक्र आहे तसे परमेश्वरी अध्यात्माच्या विविधतेचेही एक गोल चक्र आहे. ही दोन्ही वैज्ञानिक व आध्यात्मिक चक्रे एकमेकांशी संलग्न व एकमेकांत मिसळलेली आहेत. ही दोन्ही चक्रे वेळ आणि काळाच्या घड्याळात (कालचक्रात) गोल फिरत असतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या चक्राला मी वेळचक्र म्हणतो तर तिच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा (परिक्रमा) पूर्ण करण्याच्या चक्राला मी कालचक्र म्हणतो. संपूर्ण विश्वाचे (ब्रम्हांडाचे) कालचक्र खूप मोठे आहे हा माझा निरीक्षणावर आधारित असलेला एक अंदाज.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन्ही चक्रांची परिक्रमा (सर्किट) पूर्ण होणे हे शारीरिक आरोग्यासाठी व मनःशांतीसाठी खूप आवश्यक असते. या परिक्रमेत अडथळा (ब्लॉक) निर्माण होऊ शकतो जसा हृदयाच्या पंपिंगचे सर्किट पूर्ण करणाऱ्या विद्युत प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. हा २ एवी हार्ट ब्लॉक मला सद्या चालू आहे जो माझा हृदयविकार आहे. माझ्या याच हार्ट ब्लॉक मधून मला वैज्ञानिक व आध्यात्मिक चक्रे व त्यांची परिक्रमा कळली असे म्हणायला हरकत नाही. संकटे, आव्हाने यांच्यातूनच अशाप्रकारे सकारात्मक गोष्टी कळतात.

निसर्ग विज्ञानाच्या विविधतेची परिक्रमा करताना कोणत्या तरी एकाच गोष्टीत अडकून पडले की वैज्ञानिक परिक्रमा पूर्ण होत नाही. अगदी तसेच परमेश्वरी अध्यात्माच्या विविधतेची परिक्रमा पूर्ण करताना कोणत्या तरी एकाच देव किंवा देवतेत अडकून पडले की सर्व देव देवतांची परिक्रमा पूर्ण होत नाही. निसर्ग हा वैज्ञानिक विविधतेच्या चक्राचा प्रमुख असतो तसा परमेश्वर हा आध्यात्मिक विविधतेच्या चक्राचा प्रमुख असतो. निसर्ग व परमेश्वर एकमेकांशी संलग्न व एकमेकांत मिसळलेले आहेत तसे विज्ञान व अध्यात्म एकमेकांशी संलग्न व एकमेकांत मिसळलेले आहे. निसर्गाचा (सृष्टीचा) निर्माता व नियंता परमेश्वर असल्याने शेवटी वैज्ञानिक व आध्यात्मिक या दोन्ही चक्रांच्या परिक्रमा त्याच्या भोवतीच पूर्ण होत असतात, फिरत असतात.

कालचक्री घड्याळात फिरणाऱ्या वैज्ञानिक व आध्यात्मिक चक्रांची परिक्रमा (सर्किट) पूर्ण करताना एखाद्या वैज्ञानिक गोष्टीतच किंवा एखाद्या आध्यात्मिक गोष्टीतच जास्त वेळ गूंतून, अडकून राहणे म्हणजे दोन्ही चक्रांची परिक्रमा पूर्ण करण्याच्या मार्गात अडथळा/ब्लॉक निर्माण करणे. असा अडथळा (ब्लॉक) वैज्ञानिक दृष्ट्या आणि/किंवा आध्यात्मिक दृष्ट्या अनैसर्गिक असतो. वैज्ञानिक व आध्यात्मिक परिक्रमेत असा अडथळा (ब्लॉक) निर्माण होऊ नये व झालाच तो लवकर दुरूस्त व्हावा म्हणून सर्व देव देवतांची व परमेश्वराची मनोमन प्रार्थना!

-©ॲड.बी.एस.मोरे, १५.३.२०२४

गुरुवार, १४ मार्च, २०२४

वास्तव!

वास्तव!

अल्पज्ञानी, अल्पबुद्धी, अल्पशक्ती, अल्पजीवी माणूस असल्याने मला जेवढा अनुभव आला, जेवढे ज्ञान मिळाले तेवढेच मर्यादित मी बोलू व लिहू शकतो. माझ्या अल्पज्ञानातून व अल्पबुद्धीतून मला ज्ञात झालेली पृथ्वीवरील जगातील वास्तवे तीन आहेत.

पहिले वास्तव हे की, जगात विविध मानव समुदायांचे विविध धर्म, धम्म आहेत. धर्म हे देव आस्तिक तर धम्म हे देव नास्तिक असा फरक आहे. अनेक देव आस्तिक धर्मांच्या अनेक देवदेवता, अनेक धर्मसमजूती व अनेक धर्मपरंपरा आहेत. बुद्धीला पटो अगर न पटो या सर्व आस्तिक धर्मांचा व नास्तिक धम्मांचा आदर करणे हे अपरिहार्य आहे. त्यांच्यावर टीका, टिप्पणी करणे धोक्याचे आहे कारण लोकांची भावनिक, बौद्धिक पातळी सारखी नसते. याच लोकांत आपल्याला रहायचे आहे हे वास्तव आहे.

दुसरे वास्तव हे की, या जगातील आर्थिक संपत्ती व राजकीय सत्ता ही काही ठराविक भांडवलदार व राजकारणी मंडळींकडे एकवटलेली आहे. सर्वसामान्य माणसांचे एकूण  आर्थिक संपत्तीतील भागभांडवल व एकूण सत्तेतील वाटा नगण्य आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेतही हीच गोष्ट चालू आहे. लोकांचे राज्य ही लोकशाहीची संकल्पना एक मिथ्यक आहे. वास्तव भलतेच आहे. नीट अभ्यास व निरीक्षण केले तर दिसून येईल की सर्वसामान्य माणसे ही पिढ्यानपिढ्या मूठभर भांडवलदार व मूठभर राजकारणी लोकांची गुलाम होऊन किड्या मुंग्यांचे जीवन जगत आहे. शिक्षणाने यात काहीही फरक पडलेला नाही. अशिक्षित व सुशिक्षित अशी दोन्ही सर्वसामान्य माणसे कायम मूठभर भांडवलदार व मूठभर राजकारणी मंडळींची गुलाम आहेत. शिक्षणाने त्यांना गुलामगिरी तून मुक्त केलेले नाही. साम्यवादी देशांतही राजसत्ता काही ठराविक मूठभर राजकीय लोकांच्या हातातच एकवटलेली असते. त्यामुळे तिथेही मूठभरांची हुकूमशाही व सर्वसामान्य  जनतेची गुलामगिरी चालू आहे.

तिसरे वास्तव हे की, जगातील सर्व सजीव, निर्जीव पदार्थ परिवर्तनशील म्हणजे नाशिवंत व तात्पुरत्या काळा पुरते आहेत. त्यांची कोणतीही एक अवस्था कायम नाही. त्यामुळे या पदार्थांचाच सजीव भाग असलेला माणूस सुद्धा नश्वर, नाशिवंत आहे. नैसर्गिक जीवनचक्रात अडकलेले मनुष्य जीवन नाशिवंत असल्याने तात्पुरते आहे. त्यामुळे जीवनातील इच्छा आकांक्षा, राग लोभ, सुख दुःखे या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. तरीही या जगात जन्म घेतल्यावर जीवनाचे भोग हे भोगावेच लागतात व जीवनातील त्रास, यातना या सहन कराव्याच लागतात व शेवटी मृत्यूचा स्वीकार हा करावाच लागतो.

मनुष्य जीवनाची वरील तीन वास्तवे ही सरळस्पष्ट वास्तवे आहेत. त्यांत बदल करणे हे कोणत्याही एका माणसाच्या हातात नसल्याने त्यांचा निमूटपणे स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.३.२०२४