https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

सुशिक्षित वर्ग असुरक्षित वर्ग!

मानव समाजात मला आर्थिक शक्ती  एकवटलेले भांडवलदार, राजकीय शक्ती एकवटलेले राजकारणी, दहशतवादी शक्ती एकवटलेले डॉन, कला-क्रीडेत सिद्धी प्राप्त केलेले कलाकार-खेळाडू व धर्म शक्ती एकवटलेले धर्म पंडित हे पाच प्रमुख गट दिसतात, हे पाच गट प्रचंड सामर्थ्यशाली आहेत व म्हणूनच समाजावर ते प्रचंड मोठा प्रभाव टाकून आहेत, समाजातील या पाच महाशक्तींपुढे ज्ञान, विज्ञान लाचार आहे, त्यांचे गुलाम आहे कारण ते एकवटलेले नसून विखुरलेले आहे, बौद्धिक कष्टकरी सुशिक्षित वर्ग हा समाजातील सगळ्यात अल्पसंख्य व असुरक्षित वर्ग होय! -ॲड.बी.एस.मोरे 

रामायण व महाभारत!

रामायण व महाभारत!

हिंदू धर्मात लोकप्रिय असलेले महाभारत हे महाकाव्य महर्षी वेदव्यास यांनी रचले व बुद्धी देवता श्रीगणेश यांनी लिहिले अशी मान्यता आहे. या महाभारतात कौरव पांडवांचे जे महायुद्ध झाले त्या युद्धाच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीता सांगितली. ती संजय यांनी त्या काळात प्रगत असलेल्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाने (दूरदर्शन) ऐकली व ती धृतराष्ट्राला सांगितली. ती धृतराष्ट्र यांनी ऐकली ती त्यांची झाली श्रुती (कानाने श्रवण करणे) व ती त्यांनी स्मरणात ठेवली. मग पुढे त्या श्रुती, स्मृतीच्या माध्यमातून महाभारत कथा व त्यातील गीतेचे तत्वज्ञान पिढ्यानपिढ्या पुढे सरकत गेले. हिंदू धर्मग्रंथांचा आधारच मुळात श्रुती व स्मृती आहे व म्हणून हिंदू ही एक सांस्कृतिक जीवनशैली बनून पुढे चालत आली आहे. मूळ कायद्यावर जसे वकील कारणमीमांसा देत विश्लेषणात्मक ग्रंथ (कमेंटरी) लिहितात तसाच ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला टीकात्मक (म्हणजे विश्लेषणात्मक) हिंदू ग्रंथ आहे. लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ किंवा विनोबा भावे यांचा गिताई हा ग्रंथ हे असेच गीतेवरील विश्लेषणात्मक ग्रंथ आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वर, लो. टिळक, विनोबा भावे यांना गीतेचे भाष्यकार असे म्हणता येईल. पण महाभारत व गीता या दोन्हींचा मूळ दस्तऐवज सापडत नाही. त्यांचे मूळ श्रुती व स्मृती हेच आहे.

हिंदू धर्मात प्रिय असलेले रामायण हे आणखी एक महाकाव्य आहे. या महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकी यांनी केली व ते लिहिलेही त्यांनीच असे मानावे लागेल. कारण लेखक म्हणून श्रीगणेश वाल्मिकी ऋषींच्या मदतीला होते का याचा उल्लेख माझ्या तरी वाचनात आला नाही. रामायण वाल्मिकींनी रचले, लिहिले पण ते श्रीराम सीतेची मुली लव व कुश यांनी जनमानसात सांगून पसरवले. त्यामुळे लव कुश यांनाच रामायणाचे मूळ भाष्यकार म्हणता येईल. पण रामायण महाकाव्याचा मूळ दस्तऐवज सापडत नाही. म्हणजे इथेही श्रुती व स्मृती या गोष्टी आल्या ज्यातून रामायण पिढ्यानपिढ्या पुढे सरकले. पण रामायण या महाकाव्याचे पुढील टीकाकार (विश्लेषणात्मक भाष्य करणारे लेखक) कोण हे सापडत नाही. पण महर्षी वाल्मिकी या मूळ रचनाकाराबरोबर भृगु ऋषी यांनीही रामायणावर टीकात्मक म्हणजे  विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिला असे सहज वाचण्यात आले होते. पण मी भृगु ऋषी लिखित रामायणाचा एक शब्दही वाचलेला नाही.

रामायण अगोदर घडले व त्यानंतर महाभारत घडले असे म्हणतात. दोन्ही महाकाव्यात धनुष्य बाण, गदा, तलवारी ही आयुधे व घोडे, रथ ही वाहने बघायला मिळतात. आता रामायण व महाभारत ही दोन्ही महाकाव्ये हिंदूंचे पवित्र धर्मग्रंथ झाले असून ते हिंदू जीवनशैलीचा भाग झाले आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१.२०२४

गरिबी!

गरीब गरीबच का राहतात?

गरिबांना बचतीचे सल्ले कोणी देऊ नयेत. कसली बचत? त्यांचे सगळे पैसे त्यांच्याकडून खर्च केले जातात हे गरिबांच्या गरिबीचे कारण नाही. त्यापेक्षा फार मोठे कारण आहे ते म्हणजे जगातील मूठभर श्रीमंतांची जगातील बहुतांश संपत्तीवरील मक्तेदारी व तेच समाजातील आर्थिक विषमतेचे प्रमुख कारण आहे. काटकसर कसली करणार गरीब माणूस? कष्टाने मिळविलेल्या थोड्या पैशात त्याचे साधेसुधे जगणे तरी शक्य आहे काय? खरं तर त्याचा कष्टाचा पैसा महिन्याचा खर्च भागवता भागवता संपून जातो. बचत कसली करणार? त्या मूठभर श्रीमंतांची श्रीमंती गरिबांकडे तेव्हाच वळेल जेव्हा गरिबांच्या कष्टाचे आर्थिक मूल्य वाढेल. कोण वाढवणार हे मूल्य, गरीब कष्टकरी, श्रीमंत भांडवलदार की मायबाप सरकार?

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१.२०२४

MY POOR ADVOCACY!

*MY POOR ADVOCACY!*

Oh my God, so much legal fee of Sr. Advocates (lakhs of rupees) just on legal opinion. I give big big legal advices to big big builders and corporates and draft big big documents for said big rich clients but my fee is ONLY Rs.1000 for one hour of my professional engagement by them. If this is degradation of my law knowledge and skill then it is simply because I am visiting lawyer to these clients offices and could not have my independent office and also being fully  dependant on my legal profession for earning livelihood for me and my family and I think this may be the case of every  advocate born in poor families without having born with golden or silver spoon in mouth. Having  poor & uneducated family background of textile mill worker I had to run from one rich corporate client to another as visiting lawyer (degraded name) and being fed up I had to reduce my court practice and reverse my daily time schedule. This resulted in reverse biological clock meaning sleeping from morning to afternoon and working only as part time evening legal consultant to rich clients visiting their offices in Mumbai by long distance local train travel from Dombivli to Mumbai. I do NOT blame rich clients for this. I blame my own failure to overcome this testing situation and big thanks to this wonderful advocacy!

- *Adv.B.S.More,* Mumbai (17.01.2024)

समाजमाध्यमी मैत्री!

समाज माध्यमावरील मित्रांशी असलेली वैचारिक मैत्री ही फक्त हवेतली मैत्री, शेवटी प्रत्यक्ष व्यवहार व मदतीसाठी जवळ कोण आहे याला महत्त्व असते, मुले तिकडे परदेशात व आईवडील इकडे भारतात, त्यांनी दररोज कितीही आॕनलाईन गुजगोष्टी करोत, पण दूर परदेशात स्वतःच्या मुलांवर आलेले संकट दूर करायला भारतातील आईवडील तिकडे प्रत्यक्षात धावून जाऊ शकत नाहीत व भारतात आईवडिलांवर आलेले संकट दूर करायला परदेशातील मुले इकडे प्रत्यक्षात धावून येऊ शकत नाहीत, शेवटी प्रत्यक्षात जवळ काय आहे याला महत्व असते! -ॲड.बी.एस.मोरे

श्रीमंती!

अबब, केवढी ही श्रीमंती!

जगातील मूठभर नव्हे तर फक्त ५ श्रीमंतांनी जगातील बहुसंख्य लोकांना गरीब ठेवलेय. एवढी प्रचंड संपत्ती या ५ जणांकडे एकवटलीच कशी? लोकांच्या मतांवर निवडून येणारी सरकारे काय करीत आहेत? या ५ जणांची श्रीमंती जसजशी पुढे वाढत जाईल तसतशी जगातील गरिबी वाढत जाईल. आपल्या महान परमेश्वराला फक्त हे ५ श्रीमंत लोकच अत्यंत प्रिय झालेले दिसत आहेत. मग आपण काय करायचे? काही नाही आपण ईश्वर नाम सत्य है असे म्हणत आपल्या महान परमेश्वराचा जप करीत बसायचे व हेच आपले प्रारब्ध म्हणून जमेल तेवढे आनंदात जगायचे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.१.२०२४

(संदर्भः आॕक्सफॕम संस्थेचा वार्षिक विषमता अहवाल, बातमी लोकसत्ता दिनांक १६.१.२०२४)

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

नात्यांतील मानसिक संतुलन!

कोणती नाती जास्त जवळची, रक्ताची नाती की लग्नाची नाती?

आधी रक्ताचे नाते की लग्नाचे नाते? कारण पुरूष व स्त्री लग्न करून नवरा व बायको होतात व लैंगिक संबंधातून मुलांना जन्म देतात. अशा मुलांना औरस मुले म्हणतात. लग्न न करता स्त्री पुरूष मुलांना जन्म देतात तेंव्हा त्यांना अनौरस मुले म्हणतात. मुले औरस असोत किंवा अनौरस त्यांचे त्यांच्या आईवडिलांशी नाते असते ते रक्ताचे नाते असते. रक्ताचे नाते म्हणजे जैविक नाते. पती पत्नी यांचे नाते लग्नाचे असते. ते जैविक नाते नसून सामाजिक नाते असते. पण या लग्नाच्या सामाजिक नात्यातही लैंगिक संबंधामुळे पती पत्नीत जैविक संबंध प्रस्थापित होत असतात व त्यामुळे नवरा बायकोचे नाते नैसर्गिक-सामाजिक असे मिश्र नाते असते. पण आईवडील व मुले व त्यांच्या मुलांतील भाऊ, बहीण ही नाती रक्ताची (जैविक) असतात.

मला जवळची, सरळसोपी नाती पटकन कळतात. पण गुंतागुंतीची नाती कळायला थोडा वेळ जातो. वडील, आई, सख्खे भाऊ, सख्ख्या बहिणी, आजोबा (वडिलाचे वडील व आईचे वडील), आजी (वडिलाची आई व आईची आई) ही नाती फार जवळची रक्ताची नाती व म्हणून कळायला सोपी. पण पंजोबा, पंजी, खापर पंजोबा, खापर पंजी ही नाती तशी रक्ताची असली तरी फार लांबची. मी तर आजोबा, आजी (वडिलाकडचे व आईकडचे) यांना बघितले नाही तर पंजोबा, पंजी यांना बघण्याचा प्रश्नच नाही.

जवळच्या रक्ताच्या नात्यांना चिकटलेली लांबच्या रक्ताची नाती असतात ती म्हणजे चुलता (काका किंवा नाना), चुलती (काकी/काकू किंवा नानी), चुलत भाऊ, चुलत बहीण, मावशीचा नवरा (काका), मावशी, मावस भाऊ, मावस बहीण, मावशीतही आईची सख्खी बहीण ही सख्खी मावशी तर आईची मावस बहीण ही मावस मावशी, वडिलांची बहीण म्हणजे आत्या व आत्याच्या मुलाला आतेभाऊ तर आत्याच्या मुलीला आतेबहीण म्हणतात, आईचा भाऊ तो मामा तर मामाच्या मुलाला मामेभाऊ व मामाच्या मुलीला मामेबहीण म्हणतात. पण लांबच्या रक्ताच्या नात्यांतही लग्न हाच दुवा असतो. एकंदरीत नाती रक्ताची व वैवाहिक अशी मिश्र असतात. या मिश्र नात्यांतून निर्माण होणारी इतर नाती म्हणजे जावई, सून, सासू, सासरा, मेहुणा, मेहुणी, नातू, नात वगैरे. या नात्यांना संलग्न अशी इतर बरीच नाती असतात. अशी ही नात्यांची लांबलचक माळ असते. नातीगोती म्हणजे नात्यांची ही अशी लांबलचक माळ.

असे म्हणतात की वडिलाकडील नात्यांपेक्षा मुलांना आईकडील नाती जास्त जवळची वाटतात. माझ्या नात्यांच्या बाबतीत म्हटले माझी जवळच्या रक्ताची नाती पाच व ती म्हणजे माझे आईवडील, माझ्या दोन धाकटया बहिणी व माझा एक धाकटा भाऊ. या पाच जणांत मला धरले तर एकूण कुटुंब सहा जणांचे. माझ्या वडिलांना तीन भाऊ व एक बहीण म्हणजे मला तीन चुलते व एक आत्या. चुलते (काका/नाना) आले म्हणजे चुलत्या (काकी/नानी) आल्याच. मग त्यांची मुले म्हणजे चुलत भाऊ, चुलत बहिणी आल्या. माझ्या आत्याला दोन मुले म्हणजे मला दोन आतेभाऊ व तीन मुली म्हणजे तीन आतेबहिणी. ही सर्व वडिलाकडील नाती. माझ्या आईला एकच सख्खी थोरली बहीण. ती माझी सख्खी मावशी. या सख्ख्या मावशीला एकच एकुलती एक मुलगी (जशी मलाही एकुलती एक मुलगी आहे). सख्ख्या मावशीची ही एकुलती एक मुलगी म्हणजे माझी सख्खी मावस बहीण. माझी सख्खी मावशी व माझी सख्खी मावस बहीण वरळीला आमच्याच घरी रहात असल्याने ती सख्खी मावशी मला माझ्या आईसारखी तर तिची मुलगी म्हणजे माझी सख्खी मावस बहीण मला सख्ख्या बहिणीसारखी. माझ्या सख्ख्या बहिणींच्या पतीशी (सख्ख्या मेहुण्यांशी) जवळीक तशी माझ्या या मावस बहिणीच्या पतीशी (सख्ख्या मावस मेहुण्याशी) सुद्धा जवळीक. माझ्या आईची सोलापूर येथे एक मावस बहीण होती. ती माझी मावस मावशी. त्या मावस मावशीलाही एकच एकुलती एक मुलगी. ती माझी मावस मावस बहीण. मावस मावस बहिणीचे पती म्हणजे माझे मावस मावस मेहुणे. आता हे मावस मावस नाते जरी आईकडील असले तरी ते थोडे लांब पडले. तसे हे नाते रहायलाही लांब म्हणजे पंढरपूरला. त्यामुळे सख्ख्या मावस बहिणीचे नाते व मावस मावस बहिणीचे नाते यात थोडे अंतर पडले. पण तरीही पंढरपूरची माझी मावस मावस बहीण ही खूप प्रेमळ होती. ती पंढरपूरला प्राथमिक शिक्षिका होती. तिचा स्वभाव इतका प्रेमळ होता की मी पंढरपूरला असताना तिच्या घरी सारखा जात असे व मुंबईला आल्यावरही तिचा व माझा सारखा पत्र व्यवहार चालू असे. मावस मावस बहिणीचे नाते सख्ख्या बहिणीच्या नात्यापेक्षाही जवळ झाले होते ते केवळ त्या बहिणीच्या प्रेमळ स्वभावामुळे. आता असे मायाप्रेम जवळच्या नात्यांतही अनुभवायला मिळत नाही याचे वाईट वाटते.

आईकडील नात्यांप्रमाणे माझ्या वडिलाकडील नात्यांशी म्हणजे चुलते, चुलत्या, चुलत भाऊ, चुलत बहिणी, आत्या, आतेभाऊ, आते बहिणी यांच्याशी माझी फार जवळीक का निर्माण झाली नाही याला कारण हेच असावे की ही सर्व नाती वडिलाकडील नाती पडली. पण माझ्या एका धाकटया चुलत्या बरोबर (नाना) व चुलती बरोबर (नानी) मला लहानपणी खूप म्हणजे  खूपच जवळीक निर्माण झाली होती कारण ते दोघेही माझे खूप लाड करीत होते. तसेच माझ्या वडिलाचे पंढरपूरला काका व मावशी होते तेही मी पंढरपूरला असताना माझे खूप लाड करीत होते. त्यांचाही मला लळा लागला होता.

माझ्या बायकोकडील नाती म्हणजे माझ्या लग्नाची नाती. ही नाती म्हणजे माझे सासू, सासरे, मेहुणे, मेहुण्या, त्या मेहुण्यांचे पती म्हणजे माझे साडू, त्यांची मुले. या नात्यांशी सासू, सासरे सोडून माझे एवढे सूर जुळले नाहीत. या सर्वांपैकी माझी एक थोरली मेहुणी व धाकटा मेहुणा यांच्याशी माझी जास्त जवळीक आहे कारण या दोघांशी माझ्या बायकोची जास्त जवळीक आहे व हेच त्यांच्याशी असलेल्या माझ्या जवळीकीचे कारण असावे. बाकी माझ्या लग्नाकडची इतर नाती असून नसून सारखीच. माझ्या मुलीचा विवाह हल्ली म्हणजे तीन वर्षांपूर्वी झाला आहे त्यामुळे माझ्या मुलीमुळे माझ्या जावयाशी माझे नाते मुलासारखे जुळून आले असले तरी मुलीचे सासू, सासरे, मुलीची नणंद यांच्याशी अजून तरी तितकेसे संबंध जुळले नाहीत.

माझ्या वरील नातेसाखळीचा जर अभ्यास केला तर असे दिसून येईल की माझ्या लग्नाच्या नात्यांपेक्षा (बायको, मुलगी व जावई ही अत्यंत जवळची लग्नाची तीन नाती सोडून, त्यात मुलगी रक्ताच्या नात्याची) माझ्या आईवडिलांच्या माध्यमातून तयार झालेल्या रक्ताच्या नात्यांचीच (रक्त जवळचे व लांबचेही) साखळी फार मोठी आहे व तीच मला जास्त जवळची आहे. अर्थात माझ्यापुरती तरी माझ्या लग्नाच्या नात्यांपेक्षा (माझी बायको, मुलगी, जावई ही अत्यंत जवळची लग्नाची तीन नाती सोडून त्यात मुलगी ही रक्ताच्या नात्याची) मला माझ्या रक्ताचीच म्हणजे माझ्या आईवडिलांच्या माध्यमातील नातीच जास्त जवळची आहेत. पण याबाबतीत माझे वडील खरंच ग्रेट होते. त्यांनी रक्ताच्या म्हणजे त्यांच्या आईवडिलांकडील नात्यांना म्हणजे त्यांचे भाऊ, बहीण, काका, मावशा या सर्वांना जवळ केले होते व त्यांच्या लग्नाच्या म्हणजे त्यांच्या बायको कडील नात्यांना म्हणजे माझा चुलत मामा (माझ्या आईला सख्खा भाऊ नव्हता, आई व मावशी या दोन सख्ख्या बहिणी हीच दोन अपत्ये), माझी मावशी, माझी मावस बहीण, तसेच माझी मावस मावशी, माझी मावस मावस बहीण या सर्वांना जवळ केले होते. दोन्हीकडे असे संतुलन साधणे सगळ्यांनाच जमत नाही. मला ते जमले नाही. पण माझ्या वडिलांना ते जमले. तरीही प्रश्न हा आहेच की ज्या नात्यांमुळे आपले मानसिक संतुलन बिघडते अशी नाती जपावी का?

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.१.२०२४