माझी आध्यात्मिकता का, कुठे व कशी?
ओम श्री गणेशाय नमः !
ओम श्री परमेश्वराय नमः !
ओम श्री स्वामी समर्थाय नमः !
ओम शांती !
(१) श्री गणेशाय नमः !
बुद्धीदेवतेचे प्रथम स्मरण, मेंदूचे बौद्धिक इंजिन नीट चालावे म्हणून.
(२) श्री परमेश्वराय नमः !
परमेश्वराचे द्वितीय स्मरण, भौतिक जगातील काही काळच असलेला तात्पुरता प्रवास अडथळे न येता किंवा येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून सुखाचा व्हावा यासाठी मनाला एक भरभक्कम, कणखर आधार लागतो म्हणून. परमेश्वर कोणत्याही शब्दात, दस्तऐवजात, प्रतिमेत, मूर्तीत पूर्णपणे साठवता येत नाही कारण तो अनाकलनीय व प्रवाही आहे. म्हणून मी जगातील कोणत्याही देवधर्मात व कोणत्याही देवदेवतांच्या प्रतिमांत, मूर्तींत एकच परमेश्वर बघतो. तिथे मला एकच परमेश्वर दिसत असल्याने माझे हात तिथे नम्रपणे जोडले जातात. माझ्या दृष्टिकोनातून, आंतरधर्मीय संघर्ष हा मानवनिर्मित संघर्ष आहे, नक्कीच तो परमेश्वर निर्मित संघर्ष नव्हे. म्हणून मी या संघर्षापासून स्वतःला अलिप्त ठेवून संपूर्ण चराचर सृष्टीत सर्वांसाठी एकच असलेला परमेश्वर समोर ठेवून त्याच्यापुढे लीन होतो.
(३) श्री स्वामी समर्थाय नमः !
साधुसंतांचे तृतीय स्मरण, जगात होऊन गेलेल्या सर्व धर्मातील सर्व साधुसंतांचे प्रातिनिधीक प्रतीक व देवत्वाचे प्रत्यक्ष गुणात्मक रूप म्हणून मी श्री स्वामी समर्थांकडे बघतो व त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. त्यांच्या माध्यमातून परमेश्वर जवळ असल्याची अनुभूती मिळते.
(४) ओम शांती !
शेवटी मनःशांतीची प्रार्थना गणेश, परमेश्वर व स्वामी समर्थ या तिघांना एकत्र, कारण म्हातारपणी उतार वयामुळे शरीर झिजलेले, थकलेले असते. ते पूर्वीसारखे भौतिक कार्य करू शकत नाही. शरीराचे जडत्व वाढून शरीराच्या हालचालींची गती संथ झालेली असते.
उतार वयाची हालचाल म्हणजे परतीचा पाऊस. जन्म म्हणजे नव्या नवतीचा पाऊस, जीवन म्हणजे पावसाचे काही काळ स्थिरावणे व मृत्यूपंथाला लागलेला वृद्धापकाळ म्हणजे जिथून आला त्या ठिकाणी पुन्हा माघारी परतणारा परतीचा पाऊस. याच काळात म्हणजे म्हातारपणीच परमेश्वरी अध्यात्माची जास्त गरज असते.
याचे मुख्य शास्त्रीय कारण म्हणजे वृद्धापकाळात आयुष्याच्या परतीचा पाऊस सुरू झालेला असतो आणि तरीही थकलेल्या, झिजलेल्या, जीर्ण झालेल्या शरीरात असलेले मेंदूमन ते वास्तव न स्वीकारता स्वतःला उगाच चिरतरूण समजत असते. त्याला वाटते की वृद्धापकाळातही आपण तरूण शरीरातच आहोत. म्हणून आपण जशा उड्या मारतो तशा उड्या या जीर्ण शरीरानेही मारल्या पाहिजेत. म्हणून ते मेंदूमन हट्टाने थकलेल्या वृद्ध शरीरालाही स्वतःच्या कलाने नाच म्हणते. ज्याप्रमाणे लहान नातवंडे वृद्ध, थकलेल्या आजी आजोबांना बोकांडी बसून त्यांना घोडा करून धाव म्हणतात व त्यांच्या जीर्ण झालेल्या शरीराची चाळण करतात तसेच वृद्ध शरीरात उड्या मारणाऱ्या मेंदूमनाचे असते. काही आजी आजोबांना ही नातवंडी धमाल, मस्ती आवडते तसेच काही म्हाताऱ्यांना आपण अजूनही तरूण आहोत असेच वाटत असते.
मी या अवास्तव गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवतो. माझे मेंदूमनही मला नाच म्हणते, पूर्वीसारखे धाव म्हणते. पण माझे थकलेले शरीर माझ्या मनाला बिलकुल जुमानत नाही. पूर्वी मन शरीरावर राज्य करायचे. आता उतार वयात शरीर मनावर राज्य करीत आहे. ते राज्य स्वीकारण्याशिवाय मला गत्यंतर नाही. पण माझे मन हे वास्तव स्वीकारायला तयार होत नाही. या कटू वास्तवामुळे ते नाराज, हिरमुसले होऊन अशांत होते. अशा या अशांत मनाला शांत करण्यासाठी म्हणजे माझ्या मनःशांतीसाठी मला परमेश्वरी अध्यात्माची गरज भासते. अर्थात उतार वयात अध्यात्म ही माझी चैन नसून गरज आहे. ही गरज मी माझ्या वरील आध्यात्मिक पद्धतीने भागवतो. या लेखातून माझी आध्यात्मिकता का (गरज म्हणून), कुठे (परमेश्वरापाशी) व कशी तर (ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री परमेश्वराय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः,ओम शांती) या पद्धतीने. या अध्यात्म पद्धतीत मी सुरूवात ओम ने करतो कारण ओम मधूनच विश्व निर्माण झाले व ओम मध्येच सारे विश्व सामावलेले आहे व या ओम विश्वाचे मूळ परमेश्वर आहे ही हिंदू धर्मीय संकल्पना, धारणा मी स्वीकारली आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, ३.१.२०२४