https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

कोरोना काळजी घ्या!

वकील व क्लायंटच्या मैत्रीपूर्ण नात्याला कोरोनाने लावलाय घोर!

माझ्या ८२ वर्षाच्या एका जवळच्या क्लायंटला आठ दिवसांपासून कोरोना झालाय. तो क्लायंट घरातच होम क्वारंटाईन आहे. घरातील इतर लोक निगेटिव्ह आहेत. मुंबई महानगरपालिका व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते कोरोना नसलेले नातेवाईक त्या कोरोनाबाधित क्लायंटची नीट काळजी घेत आहेत. पण काल तो घरातच तोल जाऊन पडला. त्याला आता नीट उठबस करता येत नाही. फ्लॅट मोठा असल्याने त्या क्लायंटची घरातच वेगळी सोय करता आली. पण आता पडल्यामुळे त्याला स्वतःला नीट जेवता येत नाही. त्याला कोरोना असल्याने नातेवाईक त्याच्या सोबत राहून त्याला अंघोळ घालणे, जेवण खाऊ घालणे या गोष्टी करू शकत नाहीत. त्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे व म्हणून तो सारखा माझ्याशी फोनवर बोलत असतो. त्याच्या काळजीने माझी झोप व जेवण उडालेय. वकील व क्लायंटचे नाते हे असेही मैत्रीपूर्ण असते. पण कोरोनाने या मैत्रीलाच घोर लावलाय. कोरोना संकट हे सत्य आहे. मित्रांनो व मैत्रिणींनो काळजी घ्या!

-ॲड.बी.एस.मोरे©३.८.२०२०


श्री रामकृष्ण हरी!

देवाचे अवतार जगण्याची संस्कृती निर्माण करतात!

(१) निसर्ग ही काय स्वतंत्र, स्वयंभू व सार्वभौम अस्तित्व असलेली एखादी वस्तू (एन्टिटि) आहे काय? निसर्ग म्हणजे काय तर अथांग पसरलेले विश्व, सृष्टी! या विश्वाचा धनी कोण? नास्तिक म्हणतील धनी कोणच नाही. पण एक आस्तिक म्हणून मी म्हणेल की निसर्गाला धनी आहे व तो देव आहे आणि हा देव याच निसर्गात आहे. पण तो अदृश्य आहे. त्याचे अस्तित्व माझ्या तर्काला पटते व त्याची जाणीव माझ्या मेंदूला होते. 

(२) हिंदू धर्म संस्कृतीत ब्रम्हा, विष्णू व महेश असे तीन प्रमुख देव त्यांच्या विशिष्ट कार्यानुसार मानले गेले आहेत. खरं तर ही एकाच देवाची तीन रूपे जशी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ ही एकाच राज्य संस्थेची तीन रूपे! पण निसर्गाचे निर्मिती कार्य ब्रम्हदेवाने पूर्ण केल्यावर त्याचे कार्य संपले व दोनच कार्ये शिल्लक राहिली आणि ती म्हणजे निसर्गाचे भरण, पोषण, संगोपन हे आर्थिक कार्य व याच निसर्गातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या गोष्टींचा नाश करून निसर्गाचे संरक्षण हे दुसरे समांतर राजकीय कार्य! 

(३) माझ्या मते, निसर्ग निर्मिती नंतर देवाची श्री  विष्णू व श्री शंकर ही दोनच रूपे पुढे निसर्गात कार्यरत झाली. फायद्याच्या आमिषाने आर्थिक व्यवहार प्रोत्साहित करणारा देव म्हणजे विष्णू व शिक्षेच्या भीतीने राजकीय व्यवहार नियंत्रित करणारा देव म्हणजे महेश हीच ती दोन देव रूपे! म्हणून तर हिंदू संस्कृतीत ब्रम्हदेवाची मंदिरे दिसत नाहीत. पण सगळीकडे विष्णू नारायणाची व शिव शंकराची मंदिरे दिसतात. आता हिंदू धर्म संस्कृतीत प्रथम पूजली जाणारी श्री गणेश देवता ही बुद्धी देवता आहे जी विष्णू व महेश या देवतांना बौद्धिक मार्गदर्शन करते असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात गणेश हे त्या एकमेव देवाचेच श्री शंकराच्या माध्यमातून निर्माण झालेले एक रूप आहे जे रूप एक बौध्दिक मार्गदर्शक म्हणून ब्रम्हदेवाच्या जागी स्थित झालेय आणि म्हणूनच श्री गणेशाची मंदिरेही सगळीकडे दिसतात.

(४) निसर्गाचा धनी हा एकच देव आहे आणि तो जसा अदृश्य आहे तसे गणेश, विष्णू व महेश हे तीन देवही अदृश्य आहेत. या अदृश्य देवांचा निसर्गाच्या व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग असणे आवश्यक म्हणून या देवांनी प्रत्यक्ष स्वरूपात अवतार घेणे हे आलेच. पण हिंदू धर्म संस्कृतीत गणेशाचे अवतार दिसत नाहीत. श्री गणेशाला त्याच्या मूळ रूपातच पूजले जाते. श्री शंकराचे खंडोबा, ज्योतिबा सारखे काही अवतार आहेत. त्या शंकर किंवा शिव अवताराची मंदिरेही आहेत. पण शंकराला जास्तीत जास्त त्याच्या लिंगाच्या/पिंडीच्या रूपातच पूजले जाते. मानव रूपात अवतार घेऊन धर्म संस्कृती निर्माण करणारा एकच प्रमुख देव आहे  व तो म्हणजे विष्णू नारायण! याच देवाचे दोन प्रमुख मानव अवतार आहेत आणि ते म्हणजे श्रीराम व श्रीकृष्ण! रामायणातून श्रीरामाचे आयुष्य पहायला मिळते व मनुष्य जीवनाचे उच्च नैतिक तत्वज्ञान कळते तर महाभारतातून श्रीकृष्णाचे आयुष्य पहायला मिळते व गीतेच्या संदेशातून जशास तसे हे व्यावहारिक तत्वज्ञान कळते.

(५) श्री विष्णू नारायणाने श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या मानव अवतारांतून जगाला जगायची संस्कृती दिली. खोल विचार केला तर रामायण व महाभारतातून कळणारी हिंदू धर्म संस्कृती जी सर्व वेद, उपनिषदांचे सार आहे, ही नुसती भारतीय संस्कृती न राहता जागतिक संस्कृती व्हायला हवी. सद्याच्या आधुनिक काळातील दिवाणी व फौजदारी हे दोन प्रमुख व्यावहारिक कायदे जर अभ्यासायचे असतील तर रामायण व महाभारत वाचा. त्यात तुम्हाला या दोन्ही कायद्यांचे प्रत्यक्ष दर्शन होईल. हे दोन कायदे आपणास व्यावहारिक जीवन कसे जगायचे याविषयी नीट मार्गदर्शन करतात व त्यातून जगण्याची संस्कृती निर्माण करतात. श्रीराम व श्रीकृष्ण या विष्णू देवाच्या दोन प्रमुख मानव अवतारांनी अनुक्रमे रामायण व महाभारतातून जगण्याची संस्कृती घालून दिलीय असे माझे वैयक्तिक मत आहे.

श्री गणेशाय नमःII श्री नारायणाय नमःII
श्री शंकराय नमःII ओम् शांतीII

श्री रामकृष्ण हरीII

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

टीपः

हिंदू धर्मशास्त्र व पुराण कथा विस्ताराने लिहीत बसलो तर एक मोठे पुस्तक होईल. मी एका छोट्या लेखात हिंदू धर्म संस्कृतीचा सार लिहिलाय. गणेश पुराण, विष्णू पुराण, शिव पुराण किती पुराणे आहेत हिंदू धर्मात? मी अगोदर तीन मुख्य देव घेतले. मग निर्मिती संपल्यावर ब्रम्हदेवाच्या  ठिकाणी गणेशाला आणून बसवले.  केदारनाथ व त्रंबकेश्वर हे अवतार नव्हेत तर ज्योतिर्लिंगे आहेत ही चूक दुरूस्त करतो व खंडोबा बरोबर ज्योतिबा ही अवतार म्हणून लिहितो. पण खंडोबा, ज्योतिबा भारतात किती राज्यात माहित आहेत? म्हणून सर्व देशाला माहित असलेले राम व कृष्ण  या विष्णूच्या दोनच प्रमुख अवतारावर भर दिला आहे. शंकराला लिंग/पिंड स्वरूपी व गणपतीला त्याच्या मूळ रूपातच पूजणे सर्वमान्य आहे. माझे लिखाण हे माझे ओरिजनल स्वतःच्या विचारातून असते व म्हणून प्रत्येक ठिकाणी हे माझे वैयक्तिक मत असे लिहितो. मी रामायण व महाभारतात आधुनिक कायदा पाहतो हे किती लोकांच्या डोक्यात शिरेल? पण मला ती बुद्धी दिलीय. ती तशीच प्रत्येकाला असेल असे नाही. कारण सगळ्यांचे ज्ञान व बुद्धी सारखी नसते.

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

झोपडपट्टीतला कोरोना!

झोपडपट्टीतला कोरोना!

अहो, कोरोना असा का आटोक्यात येत असतो फक्त स्वयसेवी संस्था व डॉक्टरांच्या प्रयत्नांनी? झोपडपट्टीतील लोकांची मजबूत प्रतिकार शक्ती व न घाबरण्याची वृत्ती हे मुख्य कारण आहे या गरिबांच्या वस्तीत कोरोना आटोक्यात राहण्यासाठी. अशा स्वयंसेवी संस्था व डॉक्टर उच्चभ्रू वस्तीत लावून बघा व मग काय फरक पडतोय का ते बघा. वांद्रे येथील बेहराम पाडा किंवा धारावी झोपडपट्टी बघा. शिरायलाही जागा नाही तिथल्या गल्ली बोळात व एका एका छोट्या घरात १० ते १५ माणसे राहतात तिथे. ही खास भारतीय प्रतिकार शक्ती आहे. जगाच्या तुलनेत भारतात एवढी प्रचंड मोठी लोकसंख्या असूनही इथे कोरोना आटोक्यात आहे याचे मुख्य कारण म्हणजे साजूक तुपातले न खाता चटणी भाकरीवर दाटीवाटीने राहून निर्माण झालेली भारतीय प्रतिकार शक्ती! स्वयंसेवी संस्था व डॉक्टर हे पूरक सेवा देतात. पण मजबूत प्रतिकार शक्तीच नसती तर त्या पूरक सेवेचा किती उपयोग झाला असता याचा नीट विचार करावा लोकांनी!

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

पोस्टमन आॕईल!

पोस्टमन रिफाईन्ड ग्राऊन्डनट अॉईल!

१९७८ साली बी.कॉम. झाल्यावर मी सहा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी बऱ्याच कंपन्यांत अकौंटस क्लार्क म्हणून नोकऱ्या केल्या. त्या मध्ये दोन टाकी, पायधुनी, मुंबई-४०० ००८ येथील मुस्लिम बहुल विभागात त्या काळात प्रसिद्ध असलेली अहमद मिल्स ही अहमद उमरभॉय यांची एक कंपनी होती. त्या कंपनीचे पोस्टमन ब्रँड हे डबल फिल्टर गोडेतेल त्यावेळी खूप प्रसिद्ध होते. इतर गोडेतेलापेक्षा ते महाग असल्याने ती श्रीमंतांची खरेदी होती. तसेच खोबरेल तेल, साबण हीही त्या कंपनीची अन्य उत्पादने होती. स्टाफ बहुतेक मुस्लिम होता. त्यामुळे माझे सी.ए. बॉसही मुस्लिम होते. मी अकौंटस क्लार्क म्हणून तिथे कामाला होतो. मराठी माणूस असूनही त्यांनी कधी दुजाभाव केला नाही. माझ्या चोख कामावर खूश होऊन त्यांनी मला कामाच्या वेळेत थोडी सवलत दिली व इतरांपेक्षा मला चांगली पगारवाढही दिली. ती देताना "स्पेशल ट्रिटमेंट फॉर स्पेशल पर्सन" हे शब्द त्यांनी उच्चारले व ते शब्द माझ्या पुढील आयुष्यात आत्मविश्वास वाढविण्यासाठी मला खूप उपयोगी ठरले. 

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

सुसंस्कृतपणा व कायदा!

सुसंस्कृतपणा व कायदा!

(१) भौतिक वासनेच्या खालच्या पातळीवरून आध्यात्मिक भावनेच्या वरच्या पातळीवर उंचावताना मानवी मनाची ना खाली ना वर अशी अवस्था होते. मनाच्या अशा गोंधळलेल्या, संभ्रमित अवस्थेत मध्यवर्ती भूमिका घेऊन विवेक बिंदू निश्चित करताना मानवी बुद्धीची ओढाताण होते या बौद्धिक कसरतीचा अनुभव अनेक माणसे वेळोवेळी घेत असतात. 

(२) भौतिक वासनेचा पूर्णपणे त्याग करून आध्यात्मिक भावनेच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचणे म्हणजे साधुसंत होणे. असे साधुत्व मिळविणे म्हणजे सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होणे होय. भौतिक वासनांविषयी जेंव्हा माणसाच्या मनात विरक्ती निर्माण होते तेंव्हाच माणूस सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होण्याचा निर्णय घेतो. असे संन्यासी होणे हे नैसर्गिक आहे का या मुद्यावर वाद निर्माण होऊ शकतो. पण भौतिक वासनांबद्दल विरक्ती निर्माण होऊन येणारे साधुत्व व भौतिक वासना आणि आध्यात्मिक भावना यांच्यात संतुलन साधत निर्माण होणारा मनाचा सुसंस्कृतपणा यात खूप फरक आहे. प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उच्च मानवी भावना आध्यात्मिक भावना होत असे माझे वैयक्तिक मत आहे.

(३) भौतिक वासना व आध्यात्मिक भावना या दोन्हीही गोष्टी जर मानवासाठी नैसर्गिक आहेत तर मग दोन्हीही नैसर्गिक गोष्टींना एकत्रित ठेऊन त्यांचा नीट म्हणजे संतुलित सांभाळ करणे ही मानवी कृतीही नैसर्गिकच झाली. मग याचा अर्थ एवढाच निघतो की सुसंस्कृत वर्तन हेच मानवासाठी नैसर्गिक वर्तन आहे. तरीही शेवटी भौतिक वासनेचा पूर्ण त्याग करून फक्त आध्यात्मिक भावनेला चिकटून राहात संन्यासी होणे हे नैसर्गिकदृष्ट्या कितपत योग्य आहे हा वादाचा मुद्दा राहतोच. 

(४) विवाहबद्ध होऊन वासना व भावना यात संतुलन साधत प्रजोत्पादन करणे व सांसारिक जबाबदाऱ्याही पार पाडणे याला मानवी मनाचा सुसंस्कृतपणा म्हणता येईल. पण काही विशेष वैयक्तिक कारणामुळे काहीजण विवाहच करीत नाहीत किंवा विवाह करूनही नंतर घटस्फोटाने एकटे राहण्याचा निर्णय घेतात. हा काही अंशी संन्यासी होण्याचाच प्रकार झाला असे माझे वैयक्तिक मत आहे. हे मत एकटे राहणाऱ्या लोकांना कदाचित आवडणारही नाही. कारण मानवी मनाची माणुसकी काय किंवा मानवी मनाचा सुसंस्कृतपणा काय हे ठरवताना मानवी बुद्धीचा कस लागतो. वेगवेगळ्या माणसांची बुद्धी याबाबतीत वेगवेगळी चालते आणि मग त्यातून खूप वादविवाद होतात. 

(५) अशा वादविवादातून समाजात गोंधळ, अराजक निर्माण होऊ नये म्हणून समाजाच्या सामूहिक बुद्धीने ठरवलेला सुसंस्कृतपणा हा समाजाचा कायदा झाला व तो कायदा हाच मनुष्यासाठीचा नैसर्गिक कायदा म्हणून मान्य करण्यात आला. मानवी सुसंस्कृतपणा निश्चित करणाऱ्या अशा कायद्याला समाजमान्यता मिळविण्याची प्रक्रिया हीच लोकप्रतिनिधींकडून कायदे मंडळात कायदा बनविण्याची प्रक्रिया होय. 

(६) या कायद्याचे दोन भाग पाडण्यात आले. पहिला भाग म्हणजे समाजाच्या विवेकबुद्धीने निश्चित केलेले मनुष्याचे सुसंस्कृत वर्तन जे वासना व भावना यांच्यात सुवर्णमध्य साधते. कायद्याच्या या पहिल्या भागाला दिवाणी कायदा म्हणतात. दुसरा भाग म्हणजे मानवी सुसंस्कृतपणाची मध्यवर्ती पातळी सोडून वासनेच्या खालच्या पातळीवर उतरणाऱ्या मानवी मनाला रोखणारा फौजदारी कायदा. हा फौजदारी कायदा मानवी मनाला असंस्कृत बनू देत नाही (भ्रष्टाचार करणे हे असंस्कृतपणाचे लक्षण होय) व असंस्कृतपणाहूनही खालची पातळी म्हणजे जंगली पातळी गाठू देत नाही (अत्याचार, खून, बलात्कार, दरोडा यासारख्या हिंसक गोष्टी करणारे वर्तन हे जंगलीपणाचे लक्षण होय). संन्यासी होण्यास मात्र कोणताच कायदा अडवू शकत नाही. कारण संन्यासी माणूस समाजालाच काय तर निसर्गालाही कोणताही त्रास देत नसतो. थोडक्यात काय तर सामाजिक कायदा हा मानवी सुसंस्कृतपणा निश्चित करतो!

-ॲड.बी.एस.मोरे©१.८.२०२०

गुरुवार, ३० जुलै, २०२०

मी लाईक्स साठी लिहित नसतो!

मी लाईक्स साठी लिहित नसतो!

मी लाईक्स साठी वगैरे लिहित नसतो. लेखन ही माझी आवड आहे, छंद आहे. घरात वहीत लिहून स्वतःच त्याकडे बघत बसण्यापेक्षा चारचौघात विचार जाण्यासाठी फेसबुक हे माध्यम छान व व्हॉटसअप पेक्षा मोठे वाटले म्हणून मी फेसबुकवर! पण यात अनेक प्रकारचे वाचक असल्याने गडबड ही होतेच अधूनमधून! पण त्या हनी ट्रॕप घटनेमुळे आता समाजमाध्यमावरच काय तर इतर कोणत्याही अॉनलाईन संभाषणात सावध राहिले पाहिजे हे मात्र नक्की! या घटनेनंतर मी फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारलेली काही खाती तपासली तर अनफ्रेंड करताना गायब झाली. म्हणजे ती फेक होती. वृत्तपत्रात लिखाण छान पण तिथे ओळख हवी, आतल्या गोटात उठबस हवी. पूर्वी मी लिहायचो तिकडे पण संपादक महाशय लिखाणातला मूळ आशयच कट करायचे आणि बऱ्याच वेळा लिखाणाला प्रतिसादच देत नसायचे. म्हणजे आपण ढ व ते हुशार असा काहीसा प्रकार. इथे फेसबुकवर तसे काही नसते. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे व्यक्त होऊ शकता. मी दुसऱ्यांचे लिखाण आवडले तर त्यांच्या नावानेच ज्ञान संवर्धनासाठी पोस्ट करतो. पण ती पोस्ट माझी नाही हे जाहीर करतो. पण ९०% लिखाण हे माझे स्वतःचे मूळ लिखाण असते व म्हणून ते माझ्या नावानेच प्रसिद्ध करतो. ज्ञान, चिंतन व मनन यातून मनात निर्माण होणाऱ्या वैविध्यपूर्ण विचारांमुळे व लिखाणाच्या आवडीमुळे, त्या छंदामुळे व तसेच लोकांबरोबर ज्ञान, विचार शेअर करण्यात मला स्वतःला आनंद मिळतो म्हणून मी इथे फेसबुकवर वाचकांच्या सोबत व्यक्त होत असतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३१.७.२०२०

बुधवार, २९ जुलै, २०२०

समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?

समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?

मी माझे खरे अनुभव समाज माध्यमावर शेअर करतो ते माझे दुःख हलके करण्यासाठी मुळीच नाही. माझे वय ६४ आहे. आता कसले आले आहे दुःख हलके करणे? खूप गोष्टी पचवल्यात या आयुष्याने! पूर्वी कुठे होती समाजमाध्यमे वैयक्तिक दुःख हलके करायला? तेंव्हा स्वतःचे दुःख हलके करणे हा माझ्या सत्य लिखाणाचा हेतूच नाही. माझे अनुभव हे आत्मचरित्र म्हणून मी समाज माध्यमावर माझ्या पोस्टसमधून खुले करतो जेणे करून इतर समदुःखी लोकांना हलके वाटेल हे जाणून की कोणीतरी आहे तिथे जे आपलेच दुःख भोगतोय आणि दुसरा हेतू हा की इतर लोक माझ्या अनुभवातून अगोदरच सावध होतील. या गोष्टी लोकांपासून लपवून वर जायचे का? छे, ही तर स्वतःचीच शुद्ध फसवणूक झाली! अशा खोट्या चेहऱ्याने जगून काय उपयोग? लोक माझ्यासारखे जर मोकळे झाले असते तर जगातील बऱ्याच आत्महत्या थांबल्या असत्या. पण लोक खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून बसतात, उगाच लाजतात, घाबरतात व खोटे जीवन जगतच मरतात. मला असे जगणे आवडत नाही म्हणून मी हा असा आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.७.२०२०