https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
रविवार, २ ऑगस्ट, २०२०
श्री रामकृष्ण हरी!
झोपडपट्टीतला कोरोना!
झोपडपट्टीतला कोरोना!
अहो, कोरोना असा का आटोक्यात येत असतो फक्त स्वयसेवी संस्था व डॉक्टरांच्या प्रयत्नांनी? झोपडपट्टीतील लोकांची मजबूत प्रतिकार शक्ती व न घाबरण्याची वृत्ती हे मुख्य कारण आहे या गरिबांच्या वस्तीत कोरोना आटोक्यात राहण्यासाठी. अशा स्वयंसेवी संस्था व डॉक्टर उच्चभ्रू वस्तीत लावून बघा व मग काय फरक पडतोय का ते बघा. वांद्रे येथील बेहराम पाडा किंवा धारावी झोपडपट्टी बघा. शिरायलाही जागा नाही तिथल्या गल्ली बोळात व एका एका छोट्या घरात १० ते १५ माणसे राहतात तिथे. ही खास भारतीय प्रतिकार शक्ती आहे. जगाच्या तुलनेत भारतात एवढी प्रचंड मोठी लोकसंख्या असूनही इथे कोरोना आटोक्यात आहे याचे मुख्य कारण म्हणजे साजूक तुपातले न खाता चटणी भाकरीवर दाटीवाटीने राहून निर्माण झालेली भारतीय प्रतिकार शक्ती! स्वयंसेवी संस्था व डॉक्टर हे पूरक सेवा देतात. पण मजबूत प्रतिकार शक्तीच नसती तर त्या पूरक सेवेचा किती उपयोग झाला असता याचा नीट विचार करावा लोकांनी!
-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०
शनिवार, १ ऑगस्ट, २०२०
पोस्टमन आॕईल!
शुक्रवार, ३१ जुलै, २०२०
सुसंस्कृतपणा व कायदा!
गुरुवार, ३० जुलै, २०२०
मी लाईक्स साठी लिहित नसतो!
मी लाईक्स साठी लिहित नसतो!
मी लाईक्स साठी वगैरे लिहित नसतो. लेखन ही माझी आवड आहे, छंद आहे. घरात वहीत लिहून स्वतःच त्याकडे बघत बसण्यापेक्षा चारचौघात विचार जाण्यासाठी फेसबुक हे माध्यम छान व व्हॉटसअप पेक्षा मोठे वाटले म्हणून मी फेसबुकवर! पण यात अनेक प्रकारचे वाचक असल्याने गडबड ही होतेच अधूनमधून! पण त्या हनी ट्रॕप घटनेमुळे आता समाजमाध्यमावरच काय तर इतर कोणत्याही अॉनलाईन संभाषणात सावध राहिले पाहिजे हे मात्र नक्की! या घटनेनंतर मी फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारलेली काही खाती तपासली तर अनफ्रेंड करताना गायब झाली. म्हणजे ती फेक होती. वृत्तपत्रात लिखाण छान पण तिथे ओळख हवी, आतल्या गोटात उठबस हवी. पूर्वी मी लिहायचो तिकडे पण संपादक महाशय लिखाणातला मूळ आशयच कट करायचे आणि बऱ्याच वेळा लिखाणाला प्रतिसादच देत नसायचे. म्हणजे आपण ढ व ते हुशार असा काहीसा प्रकार. इथे फेसबुकवर तसे काही नसते. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे व्यक्त होऊ शकता. मी दुसऱ्यांचे लिखाण आवडले तर त्यांच्या नावानेच ज्ञान संवर्धनासाठी पोस्ट करतो. पण ती पोस्ट माझी नाही हे जाहीर करतो. पण ९०% लिखाण हे माझे स्वतःचे मूळ लिखाण असते व म्हणून ते माझ्या नावानेच प्रसिद्ध करतो. ज्ञान, चिंतन व मनन यातून मनात निर्माण होणाऱ्या वैविध्यपूर्ण विचारांमुळे व लिखाणाच्या आवडीमुळे, त्या छंदामुळे व तसेच लोकांबरोबर ज्ञान, विचार शेअर करण्यात मला स्वतःला आनंद मिळतो म्हणून मी इथे फेसबुकवर वाचकांच्या सोबत व्यक्त होत असतो.
-ॲड.बी.एस.मोरे©३१.७.२०२०
बुधवार, २९ जुलै, २०२०
समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?
मंगळवार, २८ जुलै, २०२०
आजपासून सर्व नातेवाईक ब्लॉक!
आजपासून सर्व नातेवाईकांना मी ब्लॉक करीत आहे!
(१) मित्रांनो, आज मी तुम्हाला मनातले सांगत आहे. मी लहानपणापासून न घाबरता मला जे योग्य वाटले त्याप्रमाणेच वागत आलो. खोट्या चेहऱ्यांनी फिरत खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून बसणाऱ्या समाजातील ढोंगी माणसांचा मला पहिल्यापासूनच तिटकारा आहे. गुंड, मवाली लोक स्वतःला साजूक तुपातले म्हणवून घेत नाहीत. आम्ही तसेच आहोत हे ते सांगतात. ते स्वतःचे खरे रूप झाकत नाहीत. त्यामुळे निदान त्यांच्यापासून थोडे सावध तरी राहता येते. पण डबल ढोलकी माणसांचे काय? म्हणून मनात एक आणि ओठात दुसरे असणाऱ्या खोट्या चेहऱ्याच्या ढोंगी माणसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते.
(२) मी जो वकील झालो आहे तो मी माझ्या स्वकष्टाने व स्वतःच्या हिंमतीवर झालो आहे. माझे लहानपणापासून बाहेर काम करून मी माझे शालेय व कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरात दोन वेळेचे जेवण मिळत होते हाच तो काय घरचा पाठिंबा! मला इतर भावंडे होती पण ती दहावी, अकरावी पर्यंत कशीबशी येऊन पोहोचली आणि तिथेच ठप्प झाली. म्हणजे शेवटी शिक्षण हे तुम्हाला तुमच्या कष्टानेच घ्यावे लागते. माझ्या शाळेची, कॉलेजची फी मी स्वतः बाहेर काम करून भरली आहे. माझ्या शालेय जीवनात सुद्धा मी प्रौढ साक्षरता वर्ग घेत होतो व त्यातून दरमहा ५० रूपये मिळायचे त्यातून शाळेची फी भरत होतो. मी वकील होण्याला तर मला घरातूनच विरोध होता. नातेवाईकांचे तर विचारूच नका. याला भिकेचे डोहाळे लागले असे म्हणून जवळच्या लोकांकडूनच माझा अपमान झाला, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण मी डगमगलो नाही. लहानपणापासूनच आत्मनिर्भर झाल्याने घरातील लोकांची वा इतर कोणाचीही पर्वा न करता मी वकील झालो व माझ्या पद्धतीने या आव्हानात्मक व्यवसायात टिकून राहिलो. यात मला ना माझ्या आईवडिलांची मदत झाली ना कोणा नातेवाईकाची. वकिलीत सुध्दा काँग्रेसचे तत्कालीन बडे प्रस्थ बॕ. ए. आर. अंतुले यांच्या विरूद्ध सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल करणे असो किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे असो या सर्व गोष्टी मी एकट्याच्या हिंमतीवर केल्या. यात घरातल्या माणसांचा किंवा इतर कोणत्याही नातेवाईकांचा सहभाग नव्हता की पाठिंबा नव्हता.
(३) पण मी कृतघ्न नाही. लग्न झाल्यावर मला वकिलीत कमी पैसे मिळत असल्याने माझी व माझ्या बायकोची भांडणे व्हायची. माझा हा स्वभाव असा बंडखोर असल्याने त्याचा माझ्या बायकोला खूप त्रास व्हायचा. मग आमची ती भांडणे आमच्या नातेवाईकांपर्यंत जायची. मग मला संसाराच्या दोन गोष्टी सुनवल्या जायच्या. काहीवेळा नातेवाईकांबरोबर उसनवारीही झाली आहे. पण मी कोणाचेही पैसे बुडवले नाहीत. सगळ्यांचे उसने पैसे चुकते केले. पण माझीही एक वकील व धडपड्या, धाडसी माणूस म्हणून माझ्या नातेवाईकांना काही ना काहीतरी मदत झालीच आहे. बाहेरच्या जगाबरोबर ९० टक्के देवाणघेवाण सुरू असताना नातेवाईक मंडळी बरोबर निदान १० टक्के तरी देवाणघेवाण ही होणारच ना!
(४) या पार्श्वभूमीवर २६ व २७ जुलै, २०२० च्या मध्यरात्री मी एका महिला फेसबुक फ्रेंडच्या हनी ट्रॕप मध्ये सापडलो. एकवेळ समाजात माझी बदनामी झाली तरी चालेल पण ही गोष्ट समाज हिताच्या दृष्टिकोनातून उघड करायचीच या हेतूने मी लगेच फेसबुकवर ती पोस्ट टाकली व नंतर स्थानिक पोलीस स्टेशन व सायबर क्राईम सेलला याबाबत ईमेलने अॉनलाईन तक्रारही केली. सामाजिक हितासाठी हे रॕकेट उघड झालेच पाहिजे म्हणून मी जे सत्य घडले ते न घाबरता उघड केले आहे. पण हे सत्य उघड केल्याने माझ्यासारखा माणूस आपला नातेवाईक असल्याची लाज माझ्या कोणत्याही नातेवाईला वाटू नये किंवा त्यांना माझ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून मी आजपासून माझ्या सर्व नातेवाईकांना माझ्या फेसबुक व व्हॉटसअप खात्यांवरून ब्लॉक करीत आहे.
(५) आता माझे एकट्याचे काय व्हायचे ते होऊनच जाऊद्या. नाहीतरी मला आयुष्यात तग धरून राहण्यासाठी बाहेरच्या क्लायंटस व मित्र मंडळींनीच आधार दिला आहे. शेवटी "एकला चलो रे" हेच माझे खडतर जीवन आहे. माझ्या मयताला कोणीही नातेवाईक हजर असण्याची मला बिलकुल गरज नाही. नाहीतरी मेल्यावर आपल्या डेड बॉडीचे काय होते हे मेलेल्या माणसाला कळतच नाही. मग मी नातेवाईक मंडळीनी माझ्या मयताला यावे म्हणून माझ्या बिनधास्त जगण्याला का आवरावे? पण माझ्या या अशा बिनधास्त जगण्याने माझ्या नातेवाईक मंडळींची इज्जत जाऊ नये म्हणून त्यांना मी आजपासून ब्लॉक करीत आहे. पण नातेवाईक ज्या गावात, शहरात, विभागात राहत आहेत तिथले माझे मित्र मात्र बिलकुल ब्लॉक होणार नाहीत याची नातेवाईक मंडळींनी नोंद घ्यावी.
-ॲड.बी.एस.मोरे©२८.७.२०२०