https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
शनिवार, ४ जुलै, २०२०
पक्षपातीपणा!
वकील हा सरकार मधील महत्वाचा दुवा!
शुक्रवार, ३ जुलै, २०२०
कुछ तो लोग कहेंगे!
कुछ तो लोग कहेंगे!
(१) मी कोणतीही एक विचारधारा घेऊन जगत नाही. जगातील सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असताना माझ्या बुद्धीला जे कळते, जे पटते ते मी माझ्या बुद्धीनुसार बोलत व लिहित असतो. त्यात दररोज सुधारणा होत असते. त्यामुळे कालची मांडणी आज बदलते व उद्याही बदलू शकते. पण सत्य हे सत्यच असते. त्याची फक्त मांडणी बदलत असते. ज्ञानाची प्रगल्भता व अनुभवाची परिपक्वता यानुसार मांडणीतला हा फरक होत असतो.
(२) मला प्राथमिक शाळेपासून लिखाणाची सवय आहे. कित्येक गोष्टी मी लहानपणापासून लिहून ठेवल्या. पण जसजसे ज्ञान प्रगल्भ होत गेले व अनुभव परिपक्व होत गेला तसतशा त्या लिहून ठेवलेल्या गोष्टी हवेत दूर उडून गेल्या. माझ्या जुन्या डायऱ्या आता या जगात कुठे आहेत हे त्या डायऱ्यांनाच ठाऊक! मी तरी त्या किती सांभाळणार! लहानपणीच काय पण पुढे तरूणपणीही एवढ्याशा छोट्या घरात राहणारा मी माझ्याच लिखाणाचा ढीग कुठे कुठे म्हणून साठवून ठेवणार! लग्न झाल्यावर अनेक घरे बदलली व मग टेम्पोतून घरसामान हलवताना कितीतरी जुन्या डायऱ्या, वह्या गहाळ झाल्या. वकिली सुरू केल्यावर मात्र मोठ्या वह्या घेऊन त्यात लिखाण करू लागलो. त्यातल्या काही हस्तलिखित वह्या आज एका कपाटात आहेत. पण त्यातली पाने आज चाळताना माझ्या लिखाणात कितीतरी बदल झालाय हे मलाच जाणवते.
(३) पाच वर्षापूर्वी मला दर्शना नावाच्या एका लेडी लिगल असिस्टंटने फेसबुकवर लिहा सर असे सुचवले. मग तिनेच माझे फेसबुक खाते उघडून दिले. तोपर्यंत मला समाजमाध्यम वगैरे गोष्टी माहित नव्हत्या. तेंव्हापासून मी फेसबुक वर लिहितोय. पेनाने हस्तलिखिते लिहूनही खूप कंटाळा आला होता. मोबाईलमध्ये कलर नोट हे ॲप डाऊनलोड केले व मग त्या नोट पॕडवर बोटाने लिहायला शिकलो. तिथे लेख लिहून झाला की मग तो बोटानेच सिलेक्ट करून कॉपी करायचा व फेसबुकवर पेस्ट करायचा. अशाप्रकारे माझे फेसबुक लिखाण सुरू झाले.जवळजवळ १००० लेख लिहिले व अनेक विचार वाक्ये लिहिली.
(४) पण फेसबुक मित्र झालेल्या काही पोरकट, टवाळखोर लोकांनी माझ्या लिखाणाची चेष्टा केली व त्यामुळे वैतागून जाऊन मी माझी पूर्वीची दोन फेसबुक खाती बंद केली. पण माझ्या त्या कृतीमुळे माझे लिखाण सिरियसली वाचणाऱ्या माझ्या बऱ्याच चांगल्या फेसबुक मित्रांवर अन्यायही झाला. काहींनी मला तसे स्पष्टपणे बोलूनही दाखवले व त्यांची नाराजी व्यक्त केली. तेंव्हा मग मी लॉकडाऊनच्या काळातच दोन महिन्यापूर्वी हे तिसरे फेसबुक खाते उघडले आहे. आता हे तिसरे खाते कसेही करून टिकवावे असे ठरवले असताना पुन्हा त्याच जुन्या वाईट अनुभवाची पुनरावृत्ती होऊ लागली. म्हणून मग काल त्यावर एक लेख लिहून मी माझे हे तिसरे खाते सार्वजनिक वरून खाजगी केले व त्यावर सरळ एक टॕग लाईन लिहून टाकली. "माझे फेसबुक खाते सुज्ञ लोकांसाठी आहे, टवाळखोरांना इथे प्रवेश नाही" हीच ती टॕगलाईन!
(५) आता मला असे का वागावे लागले याबद्दल माझ्या आयुष्यातील फक्त तीनच उदाहरणे इथे नमूद करतो. पहिले उदाहरण मला स्वतःला आलेल्या फेसबुकवरील अनुभवाचे. मी काही लिहिले की एकजण माझ्या पोस्टसवर सारख्या विचित्र कमेंटस करायचा. मला उलटसुलट प्रश्न विचारायचा. मी त्याच्या प्रत्येक कमेंटवर त्याला स्पष्टीकरण द्यायचो व अधूनमधून झापायचो. त्यावर त्याच्याकडे उत्तर नसायचे. मग त्याने खोडसाळपणे माझ्या फेसबुक इनबॉक्स मध्ये घाणेरडे व्हिडिओ, अश्लिल चित्रे पाठवायला सुरूवात केली. मी त्याला झापला व हे प्रकार बंद कर असे खडसावले. पण त्याने त्याचा तो खोडसाळपणा चालूच ठेवला. मग मात्र मला त्याला ब्लॉक करावेच लागले. या मूर्खांना हे कळत कसे नाही की मला जर या ६४ वयात असे व्हिडिओज, अशी चित्रे पहायची असतील तर त्या गुगलवर खजिना पडलाय ना अशा गोष्टींचा! पण ही नीच वृत्तीची माणसे! यांना एखादी व्यक्ती काही चांगली गोष्ट करतेय हे बघवत नाही.
(६) आता दुसरे उदाहरण माझ्या बायकोला आलेल्या अनुभवाचे. गणपती, दसरा, दिवाळी अशा सणांना माझी बायको आमच्या दारात सुंदर रांगोळी काढायची. अजूनही काढते. आम्ही जेंव्हा बैठ्या चाळीत रहायचो तेंव्हा माझ्या बायकोने रांगोळी काढून घराचा दरवाजा लावून घेतला व नंतर काही तासांनी दरवाजा उघडून बघितला तर ती रांगोळी कोणीतरी मुद्दामहून पायाने पुसलेली असायची व त्यावर खोडसाळपणे दगडेही टाकलेली असायची. पण हे असे कोण व का करतेय हेच आम्हाला कळत नसायचे.
(७) आता तिसरे उदाहरण माझ्या वडिलांचे. माझे वडील राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे डॕशिंग पुढारी होते. त्यांचे वक्तृत्व खूप छान होते. ते ज्या मिलमध्ये नोकरी करायचे तिथे त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. पण त्यांच्या काही विरोधकांना ही गोष्ट बघवत नसायची. मग असे काही नीच वृत्तीचे लोक त्या मिलच्या संडासात माझ्या वडिलांच्या चारित्र्यावर खोटे आरोप करीत खडूने घाणेरड्या कमेंटस लिहायचे व अश्लिल चित्रेही काढायचे. मग ती बातमी संपूर्ण मिलमध्ये पसरायची. माझ्या वडिलांचे अनुयायी त्यावर चवताळून जायचे व वडिलांना म्हणायचे तुम्ही फक्त सांगा मग बघा आम्ही त्या लोकांना कसे फोडून काढतो ते! त्यावेळचे ते खळ्ळ खट्याकच होते! पण माझे वडील त्या लोकांना शांत करीत सांगायचे की, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा मग फक्त एक काम करा. त्या हलकट लोकांनी त्या ज्या काही घाणेरड्या कमेंटस लिहिल्या आहेत, अश्लिल चित्रे काढली आहेत ती साबणाने, पाण्याने पुसून टाका. हे ऐकून माझ्या वडिलांचे अनुयायी तसेच करायचे.
(८) आजचा जमाना हा डिजिटल जमाना आहे. पण अॉनलाईन व्यवहार सुरू झाल्याने लोकांची नीच वृत्ती बदलली का? माझ्या वडिलांचे यश न बघवून त्यांना बदनाम करणारी अश्लिल चित्रे मिलच्या संडासात काढणारी ती माणसे काय व आजच्या काळात मला फेसबुक इनबॉक्स मध्ये अश्लिल व्हिडिओ, अश्लिल चित्रे पाठवणारी ती व्यक्ती काय, काही फरक आहे का या हलकट, नीच वृत्तीत? फक्त माध्यम बदलले, पण वृत्ती तीच राहिली.
(९) काही लोकांच्या अशा नीच वृत्तीवर, त्यांच्या ढोंगी स्वभावावर मी माझ्या कडक लिखाणातून जेंव्हा हल्ला चढवतो तेंव्हा माझेच काही चांगले मित्र मला अमर प्रेम या गाजलेल्या जुन्या हिंदी चित्रपटातील त्या फेमस गाण्याची आठवण करून देतात. आनंद बक्षी यांनी लिहिलेले, आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले, किशोर कुमार यांनी त्यांच्या सुंदर आवाजात गायलेले व राजेश खन्ना या सुपर स्टारने त्या चित्रपटात शर्मिला टागोर या नायिकेला पेश केलेले ते गाणे काय म्हणते तर "कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातों में, कहीं बीत न जाए रैना"! अरे कसे सोडणार या नीच लोकांना? आज कुछ तो लोग कहेंगे और कल कुछ तो लोग करेंगे भी! हे कुछ जे असते ना ते खूप टोचणारे असते. गुलाबाचे फूल सुंदर, सुगंधी असते म्हणून त्याच्या सोबत असणारे काटे कोण अंगाला टोचून घेते काय? ते काटे बाजूला काढून फेकूनच देतात ना. अगदी तसेच फालतू कमेंटस करणाऱ्या टवाळखोरांना मी माझ्या फ्रेंड लिस्ट मधून खड्यासारखे बाजूला काढून त्यांना ब्लॉक करणार व माझे लिखाण त्यातला अर्थ नीट समजून घेऊन जे वाचतात त्यांना मी गुलाबाप्रमाणे माझ्याजवळ ठेवणार. हाच त्या "कुछ तो लोग कहेंगे" या गाण्याचा मी माझ्या स्वतःसाठी काढलेला अर्थ!
-ॲड.बी.एस.मोरे©४.७.२०२०
माझी वैज्ञानिक आस्तिकता!
गुरुवार, २ जुलै, २०२०
आजपासून फेसबुक खाते खाजगी!
आजपासून माझे खाते पुन्हा खाजगी!
फेसबुकवरील एका हितचिंतकाने मला सावध केले होते की माझे फेसबुक खाते खाजगी आहे ते तसेच राहूद्या, ते सार्वजनिक करू नका, नाहीतर पुन्हा पूर्वीच्या जुन्या खात्यांप्रमाणेच उपद्रव होईल. पण मी त्यांचे ऐकले नाही व पुन्हा समाजवीर होण्याचा मोह होऊन मी माझे हे तिसरे खाते सुध्दा सार्वजनिक केले. त्याचा उपद्रव शेवटी सुरू झालाच. मी नुसते खाते सार्वजनिकच नाही केले तर पुन्हा योग्य ती चाळणी न करता कोणाच्याही फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारत गेलो. मित्रसंख्या वाढवून घेणे हा दुसरा मोह त्याला कारणीभूत ठरला. त्याचा भयंकर दुष्परिणाम आज मला दिसून आला. मी आज कोरोना नियंत्रण करण्यासाठी जाहीर झालेली संचारबंदी व जमावबंदी यांच्यातील फरक सांगणारा एक छोटा कायदेशीर लेख फेसबुकवर लिहिला व आता संचारबंदी जाहीर झाल्याने लोकांनी कोरोनाबरोबर पोलीस कारवाईचीही काळजी घ्यावी असे त्या लेखात लिहिले. तर एका मराठी मित्रानेच फिदीफिदी हसण्याचे चिन्ह माझ्या त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून टाकले व "तुम्हाला हे पसंत नसेल तर १४४ कलमाविरूध्द कोर्टात जा" असे मलाच उलट सुनावले. त्या व्यक्तीला मी ताबडतोब अनफ्रेंड व ब्लॉक करून टाकले आहे. माझ्या समाजमाध्यमावरील लिखाणाला आता काही अर्थच उरला नाही. माझ्या सखोल अभ्यासपूर्ण लिखाणाचे गांभीर्य नसलेली काही तथाकथित फेसबुक मित्र मंडळी जर माझीच चेष्टा मस्करी करायला धजावत असतील तर मग मी माझ्या या सामाजिक लिखाणाचा अट्टाहास पुन्हा पुन्हा का करावा? मला तर वरवर गुळमुळीत लिहिणे जमत नाही. मी माझ्या खास भाषा शैलीत सत्य लिहिण्याचा प्रयत्न करावा व पुन्हा माझेच हसू करून घ्यावे, हे सर्व कशासाठी? हे काही लोक गंभीर विषयावर हसूच कसे शकतात? यांना माझ्या कायद्याच्या ज्ञानाची गंमत वाटते काय? बरं, माझ्या ज्ञानाची ज्या कोणाला गंमत वाटत असेल त्यांनी मला ताबडतोब अनफ्रेंड करावे असे अगोदरच्या फेसबुक पोस्टने मी जाहीर करून टाकले आहे. एखाद्याच्या पोस्टसवर पोकळ कमेंटस व कुचेष्टापूर्ण हास्यचिन्हे टाकण्यासाठीच गंमत म्हणून फ्रेंड रिक्वेस्टस पाठविणाऱ्या लोकांना त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना मी कसे ओळखणार? काय निकष लावावेत मी अनोळखी माणसांच्या फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना? सद्या मी दोनच निकष लावलेत आणि ते म्हणजे वकील व मराठी माणूस यांना प्राधान्य! पण माझ्या आजच्या गंभीर पोस्टवर फिदीफिदी हास्यचिन्ह टाकून वरील विचित्र कमेंट करणारी व्यक्ती ही सुध्दा मराठीच होती ना! माझ्या या नवीन खात्यावर नव्याने मित्र झालेल्या लोकांच्या असल्या चित्रविचित्र प्रतिक्रियांची वाट बघत बसू का म्हणजे अशी कुचेष्टेची प्रतिक्रिया आली रे आली की मग लगेच अशा व्यक्तीला अनफ्रेंड व ब्लॉक करता येईल. यासाठी समाजमाध्यमावर अभ्यासपूर्ण लिखाण करायचे का? आता माझे हे तिसरे खाते पण अशा काही लोकांमुळे बंद करायची वेळ आली तर मात्र खूप कठीण झालेय असले फुकटचे समाजकार्य असेच म्हणावे लागेल. असो, पुढे या समाजमाध्यमाचा वापर कसा करायचा, माझे हे फेसबुक खाते इतर बहुसंख्य लोकांप्रमाणे फक्त आणि फक्त करमणूक व विरंगुळा (हवा पाण्याच्या गप्पा मारणारा टाईमपास) यासाठीच ठेवायचे का याचा मी जरूर गांभीर्याने विचार करीन. तूर्तास तरी हे खाते सार्वजनिक वरून खाजगी करून टाकत आहे म्हणजे माझ्या पोस्टस कोणाला कुठेही शेअर करता येणार नाहीत. या निर्णयाने माझ्या काही चांगल्या मित्रांवर अन्याय होईल, पण त्याला माझा नाईलाज आहे. माझ्या ज्या हितचिंतक मित्राने फेसबुक खाते सार्वजनिक करू नका असा मैत्रीपूर्ण सल्ला दिला त्या हितचिंतक मित्राचे खूप खूप आभार व मनस्वी धन्यवाद!
-ॲड.बी.एस.मोरे©३.७.२०२०
टीपः ६४ वर्षाच्या वकिलाला कायदा शिकवताय तुम्ही? ग्रेट! रामराम! ( माझ्या पोस्टवर विचित्र कमेंट करणाऱ्या त्या व्यक्तीला मी ब्लॉक करून माझ्या पोस्टवर तिने केलेल्या कमेंटसमधील त्या व्यक्तीचे नावही मी डिलीट करून टाकले आहे. मला उगाच पुढील वाद नकोत. पण तरीही त्या व्यक्तीच्या काही कमेंटस तिच्या नावासह डिलीट झाल्या नाहीत. बहुतेक तिला ब्लॉक केल्याने तसे होत असावे). -ॲड.बी.एस.मोरे©३.७.२०२०
बुधवार, १ जुलै, २०२०
फक्त माणूस म्हणूनच!
तुम्ही कोणत्याही लिंग, वय, प्रांत, भाषा, शिक्षण, धर्म, जात, वर्ण, वर्ग, विचारधारा किंवा पक्षाचे असाल, पण फक्त माणूस म्हणूनच तुम्ही माझे मित्र आहात! -ॲड.बी.एस.मोरे©२.७.२०२०
Be you belong to any gender, age, place, language, education, religion, caste, race, class, ideology or party, but you are my friends only as human being! -Adv.B.S.More©2.7.2020
मंगळवार, ३० जून, २०२०
२०२० सालाची उदास आषाढी एकादशी!
आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा!
मी पंढरपूरकर असल्याने पंढरपूरच्या अनेक वाऱ्या लहानपणापासून बघत आलो आहे. कार्तिकी एकादशीची वारी तर मोठी आहेच पण सर्वात मोठी वारी म्हणजे आषाढी एकादशीची वारी. लाखो वारकऱ्यांच्या भेटीने सजणारी ही सर्वात मोठी पंढरपूर यात्रा! पण आज १ जुलै २०२० रोजी आषाढी एकादशी असूनही सारे पंढरपूर ओस पडलेय, चंद्रभागा नदीचा परिसर ओसाड झालाय आणि महाराष्ट्र मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणारी विठ्ठलाची महापूजा मास्क लावून होतेय, हे दृश्य आयुष्यात पहिल्यांदाच बघायला मिळतेय आणि या सर्वाला कारण काय तर कोरोनाचे महाभूत! कोरोनाचे महाभूत देवाला भारी पडतेय यावर विश्वासच बसत नाही. अशी उदास आषाढी एकादशी कधी बघायला मिळेल असे चुकूनही वाटले नव्हते. यालाही देवाची लीला म्हणूया व कोरोना लस लवकर बाजारात आणून कोरोनाचे महाभूत पळवून लाव अशी विठ्ठलाकडे प्रार्थना करूया! हरी विठ्ठल! हरी पांडुरंग!
-ॲड.बी.एस.मोरे©१.७.२०२०