https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १६ जून, २०२०

तृप्ती व समाधान

तृप्ती व समाधान यात फरक काय?

(१) मराठी शब्दकोश चाळला तर तृप्ती व समाधान हे समानार्थी शब्द दिसतात. तृप्ती किंवा समाधान म्हणजे मनाची शांती, संतोष हाच समान अर्थ दोन्ही शब्दांचा दिलेला आहे. पण माझ्या मते या दोन शब्दांचा अर्थ वेगळा आहे. माझ्या मते सुरूवातीला असमाधान, मग समाधान (इंग्रजीत कम्फर्ट) व समाधानाच्या पुढे जो चैनीचा (इंग्रजीत लक्झरी) प्रवास सुरू होतो त्या चैनीचा कळस (इंग्रजीत क्लाइमॕक्स) म्हणजे तृप्ती!

(२) तृप्तीच्या मागे धावणारा माणूस हावरट, लोभी (इंग्रजीत ग्रीडि) असतो. लोभी माणूस एखाद्या गोष्टीची तृप्ती करण्यासाठी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करतो. त्या गोष्टीने तो पछाडला, घेरला (इंग्रजीत अॉब्सेशन) जाऊन त्याला त्या गोष्टीचा मंत्रचळ (इंग्रजीत अॉब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसअॉर्डर) लागतो.

(३) पण निसर्ग व्यवस्था अशी आहे की निसर्ग कोणालाच असा तृप्तीचा कळस किंवा बिंदू गाठू देत नाही आणि बळेच गाठला तरी त्या कळसावर जास्त काळ राहू देत नाही. असा कळस गाठणे म्हणजे हिमालयाचे एव्हरेस्ट शिखर गाठण्यासारखे असते. पण एव्हरेस्ट शिखरावर पोहोचलेला गिर्यारोहक त्या उंच शिखरावर किती काळ राहू शकतो? निसर्ग त्याला तिथे जास्त काळ राहूच देणार नाही. कारण निसर्गाची व्यवस्थाच तशी आहे.

(४) तृप्तीचा कळस किंवा सर्वोच्च बिंदू म्हणजे उदासीनतेचा, विरक्तीचा बिंदू! तिथे माणूस हा माणूसच राहत नाही. त्या बिंदूवर तो पूर्णपणे विरघळून जाऊन त्याचे पाणी पाणी (इंग्रजीत सॕच्युरेशन) होते. मग एव्हरेस्ट शिखर जिंकून उपयोग काय? तिथे पुढे काय हा प्रश्न निर्माण होतो कारण तृप्तीच्या त्या कळसावर पुढे काहीच राहत नाही.

(५) माझ्या मते जीवनात तृप्ती पेक्षा समाधान हीच महत्वाची गोष्ट आहे. समाधानाची भावना म्हणजे सुख व शांती या दोन्ही गोष्टींची मध्यम भावना! ही भावनाच जीवनाचा निर्मळ आनंद देते. गडगंज पैसा व संपत्तीच्या मागे लागलेली माणसे कधीच समाधानी राहू शकत नाहीत. कारण त्यांना तृप्तीचे वेड लागलेले असते.

(६) समाधानी माणसाची चाल व तृप्तीच्या मागे लागलेल्या माणसाची चाल नीट बघा. समाधानी माणूस हत्तीच्या पावलांनी डुलत डुलत चालतो तर तृप्तीच्या मागे लागलेला माणूस सारखा कुत्र्यासारखा धावत असतो. जगातील मोठी अर्थसत्ता बळकावून बसलेली मूठभर श्रीमंत माणसे एवढा पैसा, संपत्ती जवळ असूनही आणखी श्रीमंत होण्यासाठी कुत्र्यासारखी धावत असतात. स्वतः तर तशी धावतातच पण गरीब कष्टकरी कामगारांनाही त्यांच्या पाठीमागे धावायला भाग पाडतात. मला या अतीश्रीमंत माणसांची खरंच कीव येते!

(७) अतीश्रीमंत माणसांना अर्थशास्त्राचा "कमी होणारी सीमांत उपयोगिता" हा प्रसिद्ध नैसर्गिक कायदा (इंग्रजीत ज्याला लॉ अॉफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणतात) लागू नसतो काय? तो नक्कीच असतो! पण ही माणसे अनैसर्गिक वागतात व जगात श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी जास्तीत जास्त वाढवून एक अनैसर्गिक पोकळी निर्माण करतात.

(८) देव कधी कोणाला दिसला नाही, दिसणार नाही! आपणच निसर्गातील देवाला समजून घ्यावे लागते. याबाबतीतले कल्पनारंजन ठीक नव्हे. तुम्ही देवळात जाऊन देवाच्या मूर्तीपुढे एकटक किती बघत रहाल? असे सारखे एकटक बघत राहिल्याने तुम्ही आध्यात्मिक तृप्ती गाठू शकाल का? बिलकुल नाही! मग काय करायचे तर देवाचे थोडे ध्यान करायचे व ध्यान धारणेतून तृप्तीच्या नादी न लागता थोडेसे आध्यात्मिक समाधान मिळाले की मग देवाची ध्यान धारणा सोडून द्यायची. नाहीतर देवाचा मंत्रचळ होऊन वेड लागायची पाळी येते. नास्तिक लोक या आध्यात्मिक प्रश्नापासून मुक्त असतात. पण ते इतर गोष्टींत तृप्ती मिळविण्यासाठी धडपडू लागले तर तेही वेडे होऊन जातात.

(९) जीवनात समाधान महत्वाचे, तृप्ती नव्हे! याच समाधानी भावनेने मी जगलो. पोटापुरता पैसा मिळविला व नेटका संसारही केला. आता माझ्या बँकेत शिल्लक नाही म्हणून मी दुःखी नाही कारण मी माझी बौद्धिक शक्ती व माझे ज्ञान भांडवल थोडे जरी इकडेतिकडे वळवले तरी वृध्दावस्थेतही मला कसलेही पेन्शन वगैरे नसताना माझ्या पोटापुरता पैसा मला जरूर मिळणार याची पूर्ण खात्री आहे.

(१०) कोरोनाच्या व रूग्णालयीन खर्चाच्या  भीतीने लोक गांगरून गेले असताना मी मात्र निर्धास्त आहे. आजच बायकोला सांगून टाकलेय की "हे बघ, तुला किंवा मला किंवा दोघांनाही तो कोरोना विषाणू चिकटला तर मुलीला व जावयाला खर्चात टाकायचे नाही, सरळ पालिकेच्या किंवा सरकारी रूग्णालयात जायचे व तिथे त्यांनी अॕडमिट करून घेतले नाही तर तिथेच गेटवर तडफडून मरायचे पण लाखो रूपयांची बिले आकारणाऱ्या खाजगी रूग्णालयात जायचे नाही व कोणाला खर्चात पाडायचे नाही, तू साठीला आलीस व मी साठी पार केलीय म्हणजे आपण भरपूर जगलोय, देवाचे आभार मान व मरतानाही देवाविषयी कृतज्ञता व्यक्त कर"! मी हा असा समाधानी भावनेने जगलोय, जगतोय व त्याच समाधानी भावनेने मरणार! माझे आईवडील हे याच भावनेने जगले व मेले व मीही तसाच जगलो, जगतोय आणि मरणार. बायकोनेही माझे हे असे जगणे स्वीकारले आहे व आत्मसात केले आहे हे विशेष!

(११) माणसाने समाधानी भावनेने जगावे व कायम अतृप्त राहून मरावे अशीच देवाची म्हणा नाहीतर निसर्गाची म्हणा रचना आहे. अतृप्त आत्मा म्हणे भूत होतो. असल्या थोतांडावर मी कधीही विश्वास ठेवला नाही व ठेवणारही नाही. तृप्ती व समाधान यातील फरक शोधता शोधता हा लेख एवढा कसा वाढला हे कळलेच नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.६.२०२०


सोमवार, १५ जून, २०२०

कोणाला हवाय असला पैसा...

कोणाला हवा आहे असला पैसा आणि असली प्रसिद्धी?

केवळ पैसे कमावण्यासाठी म्हणून मी ज्ञानाचा भांडवल म्हणून वापर केला नाही व करणार नाही. किमान गरजा भागविण्याएवढा पैसा मला वकिलीतून मिळतो. माझ्या फक्त १% ज्ञानातून मी पोटापुरते पैसे मिळवून समाधानी राहतो. पैशासाठी बाकीचे ९९% ज्ञान वापरले असते तर गडगंज श्रीमंत झालो असतो. नुसते नशीबच नाही तर पैसे कमावण्याची वृत्तीही असावी लागते माणसात! मी शिकलो, ज्ञान घेतले ते मी माझ्या मानसिक समाधानासाठी. ते समाधान आयुष्यात मी भरपूर मिळविलेय. त्या ज्ञानातील काही भाग माझ्याकडून सहजपणे फुकट वाटला जातो आणि त्यातही मानसिक समाधानाचाच भाग आहे. पैसा, संपत्ती या गोष्टींना मी आयुष्यात नेहमीच दुय्यम स्थान दिले आहे. माझ्या ज्ञानसाधनेचा संबंध माझ्या  अर्थकारणासाठी मी फक्त माझ्या जीवनावश्यक गोष्टींसाठी जोडलाय, चैनीसाठी नव्हे. ही माझी आत्मप्रौढी नव्हे तर सत्य कथन आहे. कारण काहीजण मी पुस्तके काढावीत, यू ट्युब वर व्याख्याने द्यावीत व त्यातून पैसा मिळवावा असे सुचवतात. पण या गोष्टी करण्यात मला बिलकुल रस नाही. कारण गेल्या पाच वर्षात समाजमाध्यमावर लिहिलेल्या विचारांची, लेखांची कमीतकमी १०० पुस्तके तर नक्कीच छापून झाली असती. परंतु एकही माय का लाल पुढे आला नाही की मी पुढाकार घेऊन तुमच्या ज्ञान विचारांचे प्रकाशन करतो म्हणून. नुसते वरवर वाचन करायचे, कधीतरी लाईक करायचे व एखादी प्रतिक्रिया द्यायची. असे दर्दी लोकही बोटावर मोजण्याइतकेच! म्हणून मी एकच फेसबुक खाते कायम ठेवीत नाही. सद्या चालू असलेले माझे हे तिसरे फेसबुक खाते आहे. माझा गुगलवर ब्लॉगही आहे पण तिकडे कोणीही पोहोचत नाही. स्वतंत्र फेसबुक पेजही आहे. पण ब्लॉग, पेजची मार्केटिंग करायला मलाच उलट पैसे मागितले जातात. गंमत ही की मी वकिलीतूनच नीट पैसे कमवत नाही मग या लेखप्रपंचातून असले मार्केटिंगचे धंदे करून काय पैसे कमवणार? आणि कोणाला हवा आहे असला पैसा आणि असली प्रसिद्धी ? मी लहान राहण्यातच माझे स्वर्गसुख आहे.🙏

-ॲड.बी.एस.मोरे©१५.६.२०२०

रविवार, १४ जून, २०२०

वासनांध, भावनांध

वासना ही बलात्कारी, खूनी तर भावना ही आत्मघातकी!

(१) वासनेचा अतिरेक माणसाला जंगली बनवून बलात्कार, खून करायला भाग पाडू शकतो. लैंगिकतेचे शमन करायला नकार दिला म्हणून वासनांध माणसे बलात्कार करून नंतर पुरावा नको म्हणून पिडितेचा खून करण्यास मागेपुढे पहात नाहीत. तर मालमत्तेच्या वादातून भाऊ भावाचा खून करायला धजावतो. मुलीने पळून जाऊन परधर्मातल्या/परजातीतल्या मुलाशी लग्न करून आपली सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळविली याचा राग येऊन एखादा बाप मुलीचा खून करायला मागेपुढे पहात नाही. ही झाली वासनेच्या अतिरेकाची उदाहरणे! वासना म्हणजे फक्त लैंगिक वासना नव्हे. मालमत्तेची हाव, सत्तेची हाव या सुध्दा वासनाच होत. म्हणजे वासनेचा अतिरेक माणसाला बलात्कारी, खूनी बनवू शकतो.

(२) याउलट भावनेचे आहे. माया, प्रेम, करूणा तसेच परोपकार यासारख्या मानवी मनाच्या  भावना चांगल्या आहेत. पण या चांगल्या भावनांचा अतिरेकही वाईट असतो. असा भावनिक अतिरेक किंवा अशी भावना विवशता माणसाला आत्मघातकी बनवते म्हणजे स्वतः स्वतःचीच आत्महत्या करायला भाग पाडते. प्रेमभंग झाला म्हणून भावनाविवश होत माणूस आत्महत्या करतो. आपले विवाहबाह्य संबंध उघडकीस आले आता जोडीदाराला तोंड कसे दाखवू या लज्जेच्या भावनेतून आत्महत्या करण्यास व्यक्ती उद्युक्त होते. कर्जबाजारी झाल्यावर जगाला तोंड कसे दाखवायचे या लज्जेच्या भावनेतून कर्जबाजारी व्यक्ती आत्महत्या करण्यास धजावते. ही सर्व झाली भावनेच्या अतिरेकाची किंवा भावना विवशतेची उदाहरणे! म्हणजे भावनेचा अतिरेक माणसाला आत्मघातकी बनवू शकतो.

(३) वासना व भावना या मानसिक असतात. परंतु वासनेचा संबंध शारीरिक भूकेशी जास्त असतो. भावनेचे तसे नसते. भावना ही मानवी मनाची उच्च पातळी आहे. म्हणून मी वासनेला भौतिक वासना व भावनेला आध्यात्मिक भावना असे संबोधतो. आध्यात्मिक म्हणजे फक्त देवधर्माच्या भावना नव्हेत. तर माया, प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या मानवी मनाच्या चांगल्या भावना यांना सुध्दा मी आध्यात्मिक भावना असे संबोधतो. देवाच्या आध्यात्मिक भावनेचा अतिरेक झाला की मनुष्य देवभोळा होतो व भौतिक व्यवहार करताना व्यावहारिक शहाणपण विसरतो. व्यावहारिक आत्मघातकी पणाचेच हे लक्षण! तसेच माया, प्रेमाच्या भावनेचा अतिरेक झाल्यावर सुद्धा मनुष्य भावनांध होऊन स्वतःच्या मूलभूत स्वार्थावर पाणी सोडतो आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. उदाहरणार्थ, आईवडील मुलांच्या प्रेमापोटी आपली संपत्ती जिवंतपणीच मुलांच्या नावावर करून मोकळे होतात व नंतर त्यांना मुलांपुढेच भीक मागायची वेळ येते. आत्मघातकीपणाचेच हे लक्षण होय!  कारण जिवंत असूनही मेल्याहून मेल्यासारखे जीवन स्वतःहून करून घेण्याचाच हा प्रकार!

(४) काहीवेळा शारीरिक व्याधी खूप भयंकर वेदना देतात. उदाहरणार्थ कर्करोगात माणूस वेदनेने अक्षरशः तडफडतो. असा माणूस अशा शारीरिक वेदना असह्य झाल्याने आत्महत्येचा निर्णय घेतो. तडफदार आय.पी.एस. अधिकारी श्री. हिमांशु रॉय यांनी कर्करोगाच्या वेदना असह्य झाल्याने स्वतःच्याच सर्व्हिस रिव्हाॕल्वर ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना तशी अगदी अलिकडची! शारीरिक वेदनेमुळे स्वतःचा अंत करून घेण्याच्या कायदेशीर हक्काला स्वेच्छामरण हक्क म्हणतात. असे स्वेच्छामरण कायदेशीर करण्यासाठी याचिकांद्वारे सुप्रीम कोर्टापर्यंत प्रयत्न चालू आहेत. असे स्वेच्छामरण व भावनेचा अतिरेक करून केलेली आत्महत्या यात नक्कीच फरक आहे. पण अजूनही कायद्यात दोन्ही गोष्टींना आत्महत्याच म्हणतात.

(५) माझा हा लेख वासना व भावना या दोन गोष्टींचा सखोल विचार करणारा आहे. वासनेचा अतिरेक करून म्हणजे वासनांध होऊन बलात्कार, खून करणे जसे वाईट तसेच भावनेचा अतिरेक करून म्हणजे भावनांध होऊन आत्महत्या करणे वाईट! मानवी बुद्धीचा तो पराभव आहे. वासना व भावना यांच्यावर विवेकी बुद्धीचे सतत नियंत्रण असले पाहिजे. ते नियंत्रण सुटले की माणूस वासनांध होऊन बलात्कारी, खूनी होतो व भावनांध होऊन आत्मघातकी होतो.

ओम् शांती!

-ॲड.बी.एस.मोरे©१५.६.२०२०

विनाशकाले विपरीत बुद्धी!

विनाशकाले विपरीत बुद्धी!

कोलंबसाने भारत शोधता शोधता अमेरिका शोधली व तिथल्या आदिवासींवर गुलामगिरी लादत उद्योग, व्यापाराच्या नावाखाली अमेरिका  घशात घालली. इंग्रजांनी मग जगभर त्यांच्या स्वार्थी वसाहतींचे जाळे पसरवले. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापाराच्या निमित्ताने इंग्रजांनी भारतात शिरकाव केला व हळूहळू भारताला इंग्रजांचे गुलाम केले. १६३० साली जन्मलेल्या शिवरायांनी महाराष्ट्र भूमीवर रयतेचे स्वराज्य निर्माण केले. पण १८१८ साली इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने मराठ्यांचा पराभव करून महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावर प्रचंड मोठी जंगलतोड सुरू केली. याच राक्षसी जंगलतोडीने शिवरायांचे गड किल्ले ओसाड केले. तेंव्हापासून या गड किल्ल्यांचे संवर्धन खितपत पडलेय. म्हणजे १९४७ साली इंग्रज भारत सोडून गेल्यावरही भारतातील लोकशाही सरकारला विशेष करून महाराष्ट्र सरकारला या गड किल्ल्यांचे नीट संवर्धन करता आले नाही. पृथ्वीचा ७०% भाग सागर जलाने व ३०% भाग भूमी व भूजलाने व्यापला आहे. या ३०% भूभागावर मानवी लोकसंख्या प्रचंड प्रमाणात विशेष करून भारत व चीन या पूर्वेकडील देशांत वाढतच गेली. याचे कारण म्हणजे मानवी जन्मदर हा मानवी मृत्यूदरापेक्षा खूप जास्त आहे. जन्म मरणातील ही प्रचंड मोठी तफावत माणसांची लोकसंख्या वाढवत गेली. मग या वाढत्या लोकसंख्येचा जगण्याचा उद्योग प्रचंड प्रमाणात वाढला. या जगण्याच्या उद्योगात माणसांना जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, पदार्थांची मागणी वाढली आणि मग या वाढलेल्या मागणीचे समाधान करण्यासाठी या पदार्थांचा पुरवठा अधिकाधिक कसा वाढेल या प्रश्नाचे उत्तर शोधताना माणसांनी निसर्गाच्या साधन संपत्तीची कत्तल करायला सुरूवात केली. या अनैसर्गिक कत्तलीवरच मानवाच्या तथाकथित विकासाचा डोलारा उभा राहिला आहे. या कत्तलीचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. माणसा सावध हो! निसर्गाची मैत्री पाहिलीस, निसर्गाचे शत्रुत्व पाहू नकोस! विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण सार्थकी लावू नकोस! ओम् शांती!

-ॲड.बी.एस.मोरे©१५.६.२०२०

शनिवार, १३ जून, २०२०

१४ जून राजसाहेबांचा वाढदिवस!

राजसाहेबांचा वाढदिवस आणि माझे मनोगत!

(१) १४ जून हा मा. राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस म्हणजे दरवर्षी येणारा वाढदिवस! आज १४ जून २०२० हा दिवस बरोबर रविवारी आलाय. मी मनात विचार करतोय की कोरोना विषाणूने सद्या जी भीती निर्माण केलीय ती जर नसती तर मनसैनिकांचा केवढा मोठा जनसागर कृष्णकुंज या राजसाहेबांच्या निवासस्थानी धडकला असता. पण राजसाहेबांनी स्वतःच्या सहीचे परिपत्रक काढून मला शुभेच्छा द्यायला आज कोणीही येऊ नये असे सगळ्यांनाच बजावलेय. त्यातूनही न रहावून कोणी तिथे पोहोचलाच तर राजसाहेब त्याची चांगली खरडपट्टी काढल्याशिवाय राहणार नाहीत. मग त्याची दया माया नाही. आदेश म्हणजे आदेश! हा असाच आदेशाचा दरारा मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होता. साहेबांचा आदेश म्हणजे आदेश!

(२) बाळासाहेबानंतर आदेशाचा असा दरारा महाराष्ट्रात कोणाचा असेल तर तो राजसाहेब ठाकरे यांचाच! खरं तर, साहेब म्हणून आता महाराष्ट्रात कोण तर राजसाहेबच! अशा मा. राजसाहेबांची व माझी प्रत्यक्ष भेट डोंबिवली जिमखाना येथे आयोजित केलेल्या वरिष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात आयुष्यात फक्त एकदाच झाली आणि त्या भेटीने एका दिवसात मी चमकलो. त्या मेळाव्यात मी फक्त काही मोजकी वाक्येच राजसाहेबांच्या नजरेला नजर देऊन बोललो. त्यांनी माझे म्हणणे नीट ऐकून घेतले व मला जवळ बोलवून घेतले. इतकेच नव्हे तर त्यांच्या बरोबर मला मनसोक्त फोटो काढू दिले. ती भेट मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. त्या एकाच भेटीने मी एकाच दिवसात प्रसिद्ध झालो आणि मनसैनिकांचा काका झालो. याचे एकच कारण म्हणजे मा. राजसाहेबांचा करिष्मा! राजकारणापासून अलिप्त राहिलेला मी या आगळ्या वेगळ्या भेटीनंतरही राजकारणापासून तसा अलिप्तच राहिलो. पण मनसैनिकांची काका ही हाक मात्र  माझा सतत पाठलाग करीतच राहिली.

(३) हे एक वेगळेच नाते आहे. आता राजकारण जराही नकोच म्हणून मी पूर्वीचे फेसबुक खाते या कोरोना लॉकडाऊनच्या काळात बंद करून टाकले व एक महिना विश्रांती घेऊन नवीन खाते उघडले व त्यावर मी माझा राजकारण संन्यास जाहीर केला. तरीही मनसैनिकांनी काका म्हणून मला शोधून काढलेच व मला सरळ सांगून टाकले की "राजकारण संन्यास हा तुमचा निर्णय आहे, पण तुम्ही आमचे काका आहात याचा राजकारणाशी काही संबंध नाही"! असे प्रेम, असा आदर मला ज्यांच्याकडून मिळतो त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्टस पुन्हा नव्याने स्वीकारण्याशिवाय माझ्यापुढे मग पर्यायच उरला नाही. फार थोड्या मनसैनिक मित्रांना मी जुने फेसबुक अकाऊंट बंद करून आता नवीन उघडलेय हे माहित आहे. त्यामुळे गेल्या महिना भरात नव्याने झालेले मनसैनिक मित्र तसे संख्येने कमी असले तरी पुढील काळात हळूहळू काकाला शोधत ही संख्या आणखी वाढणार हे नक्की! तरीही नव्याने मित्र स्वीकृती झाल्यावर मी प्रत्येक मनसैनिकाला इनबॉक्स मध्ये जाऊन मी राजकारण संन्यास घेतल्याची आठवण करून देतो. पण ते नाराज होत नाहीत कारण त्या सगळ्यांना माहित आहे की काही झाले तरी मी राजसाहेबांचा मोठा चाहता आहे.

(४) एक चाहता म्हणून राजसाहेबांत मी दोन गोष्टी पाहतो. पहिली गोष्ट ही की राजसाहेब म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि दुसरी गोष्ट ही की राजसाहेब हे मा. बाळासाहेब ठाकरे  यांचे प्रतिबिंब! या दोन्हीही गोष्टी ज्या नेत्यात एकवटल्या आहेत तो एकमेव नेता म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे! महाराष्ट्राचा बुलंद आवाज या वाक्यात येतो तो मराठी माणूस आणि मा. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब या वाक्यात  येते ते हिंदुत्व! माझे हे विश्लेषण कोणाला पटेल अगर न पटेल मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. मला या दोन्ही गोष्टी राजसाहेब ठाकरे यांच्यात एकत्र दिसतात हे खरे आहे. उद्या काही लोक राजसाहेबांबद्दल मला जो आदर आहे त्यावरही टीका करतील. पण अशा टीकेला मी महत्त्व देत नाही. राजकारण संन्यास  घेऊनही मी राजसाहेबांचा चाहता व मनसेचा मतदार आहे व राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

(५) एकाच भेटीने एवढा मोठा परिणाम व तोही दीर्घकाळ टिकणारा होऊ शकतो हे राजसाहेब यांच्या उदाहरणाने निदान माझ्या बाबतीत तरी सिद्ध झालेय. मग काही लोक असेही म्हणतील की राजसाहेब ठाकरे यांच्याकडे संमोहन विद्या असावी आणि त्याचाच हा परिणाम असावा. कोण असेही म्हणतील की मी मूर्ख आहे व मला राजकारणच कळत नाही. कोणी माझी राजसाहेबांचा अंधभक्त अशीही संभावना करतील. कोणी काही का म्हणेना, मला काय त्याचे! बोलणारे बोलत राहतील. त्यांच्या नादी लागत बसलो तर माझा अमूल्य वेळ व शक्ती वाया जाईल. आपल्याला राजसाहेबांनी एका दिवसात प्रसिद्ध केले (थोडक्यात चमकवले) म्हणून मी राजसाहेबांविषयी कायम कृतज्ञ राहणार. कारण वकील होऊनही मला कोणी नीट ओळख दिली नव्हती. आता थोडा भाव खातोय ना तो राजसाहेबांच्या करिष्म्याच्या जोरावर! तुम्ही मला ओळख दिली नाही ती मला मा. राजसाहेब ठाकरे यांनी दिली. मग मी तुम्हाला मानणार की राजसाहेब ठाकरे यांना मानणार? हिशोब सरळ आहे! समझनेवालेको काफी इशारा!

(६) राजसाहेबांविषयी वरीलप्रमाणे कृतज्ञता व आदर व्यक्त करून मी आज १४ जून, २०२० रोजी महाराष्ट्राचा बुलंद आवाज व मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब मा. राजसाहेब  ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक मनसे शुभेच्छा देतो व माझे हे मनोगत संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©१४.६.२०२०

ध्यान धारणा

माझी ध्यान धारणा!

ज्या झाडाची मुळे खाली जमिनीत खोलवर रूतून सर्वदूर पसरलेली आहेत, ज्या झाडाच्या फुलाफळांनी बहरलेल्या फांद्या वर आकाशात सर्वदूर पसरलेल्या आहेत अशा डेरेदार निसर्ग झाडाचे ज्ञान मनुष्याचा एवढासा मेंदू घेऊन घेऊन ते किती घेणार? याच झाडाच्या छायेत काहीजण निसर्ग विज्ञानाचे शास्त्रज्ञ होतात तर काहीजण निसर्ग धर्माचे साधू, संत! काहीजण तंत्रज्ञ होतात तर काहीजण वकील! काहीजण उद्योगपती होतात तर काहीजण राजकारणी! कसे वर्णन करावे या निसर्ग झाडाचे आणि कसे शोधावे या निसर्ग झाडाचा मूलाधार असलेल्या  देवाला या झाडातच? वासना व प्रेम या दोन्हीही  गोष्टी याच निसर्ग झाडातून मिळतात. काय हे अलौकिक मिश्रण! वखवखलेल्या भौतिक वासना व निरागस आध्यात्मिक प्रेम या दोन्ही गोष्टींचा संयोग जिथे होतो त्या निसर्ग झाडाचा मूलाधार असलेला देव सुध्दा असाच वासनेने बरबटलेला व प्रेमाने ओथंबलेला असेल का? माझी या देवाविषयीची आस्तिकता फक्त शुध्द आध्यात्मिक होते तेंव्हा देव मला संपूर्णपणे प्रेमळ, दयाळू भासतो. पण याच देवाची निर्मिती असलेल्या निसर्ग झाडात मला जेंव्हा वखवखलेली वासना दिसते तेंव्हा देवाचे मूळ हे शुध्द भावनिक नसून ते वखवखलेल्या वासनेने सुध्दा भरलेले आहे अशी मला जाणीव होते. हीच भौतिक वासना मला या निसर्ग झाडाची फुले, फळे ओढून घ्यायला व त्यांचा उपभोग घ्यायला भाग पाडते. पण तो उपभोग घेताना मी स्वैराचारी होत नाही. कारण भौतिक वासने सोबत आध्यात्मिक प्रेमाचा रस याच निसर्ग झाडातून मला मिळत राहतो. काय हा सुंदर, अलौकिक अनुभव निसर्ग झाडाचा व त्यावर जगणाऱ्या मनुष्य जीवनाचा! पण या निसर्ग झाडाचा मूलाधार असलेला देव हा या झाडात कुठेच सापडत नाही. तो या झाडातच आहे हे मला मानावे लागते व या झाडाच्या माध्यमातून अनुभवावे लागते. या मानलेल्या देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची मला वारंवार इच्छा होते. त्यावेळी निसर्ग झाडाच्या खोडाजवळ मी विसावतो व त्या मानलेल्या देवाचे ध्यान, चिंतन करीत त्या देवाविषयी कृतज्ञ होतो. देवाविषयी अशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निसर्ग झाडाखाली थोडे विसावण्याची माझी सवय हीच माझी ध्यान धारणा! ध्यान धारणा म्हणजे प्रार्थना नव्हे! कारण प्रार्थनेत देवाजवळ काहीतरी मागितले जाते, मग ते भौतिक असो की आध्यात्मिक. ध्यान धारणेत देवाला असे काही मागायचे नसते, तर कृतज्ञ भावनेने देवाचे ध्यान, चिंतन करायचे असते.

-ॲड.बी.एस.मोरे©१३.६.२०२०

फिरता वकील!

मी एक सामान्य, फिरता वकील!

(१) खरं म्हणजे, प्रत्यक्ष वकिलीतच मला माझ्या कायदेशीर कामाची नीट फी घेता आली नाही तर आता मी अॉनलाईन वकिली करून काय फी घेणार? एकतर हे तंत्रज्ञान मला नवीन आहे. प्रत्यक्ष भेटीतून मी क्लायंटशी सल्लामसलत करतो. त्यासाठी कंपनी क्लायंटसनी बोलावले तर त्यांच्या कार्यालयात जातो. कारण माझे स्वतंत्र कार्यालय नाही की कसली आधुनिक यंत्रणा व माझा स्वतंत्र स्टाफ माझ्याकडे नाही! हातगाडीवर सामान घेऊन गल्ली बोळांतून फिरणाऱ्या कष्टकरी कामगाराप्रमाणे मी फिरता वकील आहे. पण वयानुसार आता फिरण्यावरही मर्यादा आल्या आहेत. मला अॉनलाईन वकिली जमत नाही आणि जमवायचीही नाही. फिरती वकिली करून पोटापाण्यापुरते पैसे मिळतात त्यात मी समाधानी आहे.

(२) आता अशा या फाटक्या वकिलाला लोक समाज माध्यमावर मोठमोठे प्रश्न कोणत्या आधारावर करतात हेच कळत नाही. बहुतेक मी कोणीतरी खूप ज्ञानी वकील आहे असा माझ्या काही फेसबुक पोस्टसमुळे काही लोकांचा गैरसमज होत असावा. पण ज्ञानी असणे म्हणजे पॉवरफुल असणे नव्हे हे त्यांना कसे समजावून सांगू?

(३) भारत हा अंदाजे १४० कोटी लोकांचा देश आहे. त्यात धार्मिक, जातीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व इतरही बरीच  विविधता आहे, जी विविधता माणसा माणसांत फरक करते. हा फरक कधीकधी भेदाभेद करीत एकमेकांवर अन्याय करायला धजावतो. एवढया मोठ्या भारत देशात दररोज अनेक अन्यायकारक केसेस होत होतात. देशात दररोज बलात्कार किती होतात हे किती जणांना माहित आहे, सरकारला तरी याची संपूर्ण माहिती आहे का? असूच शकत नाही. कारण लज्जा, भीतीपोटी कित्येक केसेसची नोंदच होत नाही. लोक गप्प बसून अन्याय सहन करतात. मग त्याला भारताचे संविधान किंवा भारतातील कायदे काय करणार? तरीही अमूक अमूक अन्यायकारक गोष्ट झालीच का, तिथे कोण होते, मग असा अन्याय करणाऱ्यांना शिक्षा का झाली नाही असे प्रश्न काही मित्रमंडळी मला समाज माध्यमावर बिनधास्त करतात. जणूकाही मी अशा प्रकरणांवर बारीक लक्ष ठेवून आहे व मला त्यांची संपूर्ण माहिती आहे. असा अंदाज ही मंडळी स्वकयासाने घेतातच कसा? 

(४) मी तर एक सामान्य वकील आहे ज्याचे आकाशात उडण्याचे पंखच परिस्थितीमुळे छाटले गेलेत. अशा वकिलाकडून काही मित्र मंडळी अशा काही प्रकरणांवर उत्तराची अपेक्षा तरी कशी करतात? म्हणूनच असे उलट प्रश्न करणाऱ्या अशा काही लोकांना माझी ही जाहीर नम्र विनंती की, बाबांनो माझ्या फेसबुक पोस्टस या माझ्या स्वानुभवाच्या, माझ्या अल्प ज्ञानाच्या पोस्टस असतात. त्या तुम्ही वाचा. त्यातील काही आवडले तर घ्या. जे आवडणार नाही, जे पटणार नाही ते सोडून द्या. पण तुम्ही कृपया माझ्या ज्ञानाची, माझ्या वकिलीची उलटतपासणी घेऊ नका. कारण मी एक सामान्य, फिरता वकील आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.६.२०२०