https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
मंगळवार, २ जून, २०२०
हिशोबी कनिष्ठ मध्यमवर्गीय वकील!
रविवार, ३१ मे, २०२०
राजकारणापासून अलिप्त!
मी राजकारणापासून अलिप्त!
माझे वडील मुंबईत गिरणी कामगारांच्या मान्यताप्राप्त युनियनचे म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पुढारी होते. त्यांचे व तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे जवळचे संबंध होते. कामगार चळवळ व राजकारण मी जवळून पाहिलेय. राजकारणात निवडणूक हा पैशाचा खेळ झालाय. उभे रहायचे, पैसे खर्च करायचे आणि पडायचे व पुन्हा निवडून येण्यासाठी आणखी प्रयत्न करायचा यासाठी तुमच्याकडे पैसा पाहिजे व लोकांचे पाठबळही पाहिजे. त्यासाठी ही पैसा लागतो. केवळ तुमचा चांगला स्वभाव व चांगले काम हे राजकारणात तुमचे भांडवल होऊ शकत नाही. आता तर काय माझे वय झालेय ६३ वर्षे आणि दगदग सहन होत नाही. वकिली सुध्दा मर्यादित केली आहे. राजकारणापासून अलिप्त झालोय मी!
-ॲड.बी.एस.मोरे©१.६.२०२०
मनाशी मैत्री
मनाशी मैत्री!
ओम् अशी आध्यात्मिक संज्ञा विश्वाला कोणी दिली? दिलीही असेल कोणीतरी साधु संतांनी! म्हणून तेच सत्य मानायचे काय? शेवटी देव कोणी पाहिलाय? ते सत्य आहे की अशीच कोणाच्या तरी डोक्यातून आलेली संकल्पना आहे? कोणीतरी देव मानतो म्हणून आपणही देव मानायचा का? मानणे व असणे यात फरक नाही का? बरं देवाला मानल्यावर त्याची प्रार्थना अमूक अमूक वेळी व अमूक अमूक पद्धतीनेच केली पाहिजे हे कोणी ठरविले? कोण ओम् सुख शांती परमेश्वरा म्हणेल तर कोण हरी हरी म्हणेल तर कोण आणखी काही! म्हणजे देवाचे अस्तित्व जसे वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करता येत नाही तशी देवाची प्रार्थना कशी करावी यावर धर्माचे एकमत नाही. विविध धर्म विविध पद्धतीने देवाला मानतात व भजतात. असे मानणे व भजने हे वैश्विक सत्य नाही हेच यातून सिद्ध होत नाही का? आपल्या डोक्यात एखादी गोष्ट लहानपणापासून भरवली गेली की मनाला त्या गोष्टीची सवय लागते. नंतर आयुष्यात सत्य काय हे मनाला कळल्यावर सुध्दा मन त्याला न पटणाऱ्या गोष्टी सुध्दा टाकून देऊ शकत नाही. मग त्या न पटणाऱ्या गोष्टी सुध्दा आपल्या मनाला मरेपर्यंत चिकटूनच राहतात. हे फक्त देवाचेच नाही तर कोणत्याही गोष्टीचे असेच आहे. मनाला जेवढा दाबण्याचा प्रयत्न करावा तेवढे ते चेंडूसारखी उसळी घेऊन उलटे वागते. म्हणून मनाशी कठोर वागण्याऐवजी त्याच्याशी गोड मैत्री करण्यातच बुद्धीचा शहाणपणा!
-ॲड.बी.एस.मोरे©१.६.२०२०
वरळी बीडीडी चाळ
गुरुवार, २८ मे, २०२०
ओम् सुख शांती परमेश्वरा!
ओम् सुख शांती परमेश्वरा!
ही प्रार्थना अंतर्मनाच्या अंतःप्रेरणेतून व अंतःस्फूर्तीतून येत असेल तर म्हणायला काहीच हरकत नसावी. पण ही प्रार्थना सारखी सारखी किंवा पुन्हा पुन्हा म्हणण्याचा मंत्रचळ लावून घेऊ नये.
या प्रार्थनेत ओम् म्हणजे प्रचंड मोठे विश्व असा अर्थ असल्याने अशी प्रार्थना संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची अर्थात संपूर्ण विश्वात सुख शांती इच्छिणारी अर्थात तेवढी विशाल असेल तरच तिला अर्थ आहे. कारण फक्त स्वतःच्याच सुख शांतीची इच्छा प्रगट करणारी स्वार्थी प्रार्थना विश्वाच्या सर्वोच्च, स्वयंभू, स्वयंपूर्ण निसर्गशक्ती पर्यंत म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचतच नाही.
हा माझा स्वतःचा वैयक्तिक विचार आहे. त्याला कोणत्याही धार्मिक पांडित्याचा आधार नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी व माझ्याशी निरर्थक वाद टाळावेत ही नम्र विनंती!
-ॲड.बी.एस.मोरे©२९.५.२०२०
मंगळवार, २६ मे, २०२०
निसर्ग माझा गुरू!
निसर्गाला गुरू मानायचे, पण देव मानायचे नाही?
(१) निसर्गाच्या म्हणजे विश्वाच्या निर्मिती मागे देव आहे की नाही, त्या निर्मिती नंतर निसर्गात देवाचे अस्तित्व, वास्तव्य आहे की नाही यावर होत असलेल्या चर्चा बस्स झाल्या व वादही बस्स झाले. काय झाले या चर्चातून, वादातून तर आस्तिक व नास्तिक असे दोन गट तयार झाले. या दोन गटांनी खरं तर बुद्धीचा फालुदा करून टाकलाय. म्हणून मी या वादातच पडत नाही. काही फायदा नाही या वादात पडून. पण मला निसर्गाचे कुतूहल आहे. त्या कुतूहलापोटी मी निसर्गाचे निरीक्षण करतो. त्याचे परीक्षण करण्याएवढा मी मोठा नाही. म्हणून निरीक्षण हाच माझ्या अभ्यासाचा पाया!
(२) या निरीक्षणातून मला कळते की निसर्ग हा स्वयंभू आहे, स्वयंपूर्ण आहे. तो कोणावरही अवलंबून नाही. मग निसर्ग हा जर एवढा मोठा, परिपूर्ण, शक्तीमान आहे तर त्यालाच देव मानले तर काय फरक पडतो? या निसर्गात जन्म घेतल्यावर हा निसर्गच तर आमचा गुरू होतो. तोच तर आम्हाला त्याच्या सान्निध्यात कसे रहायचे हे शिकवितो.
(३) गुरू म्हणून निसर्गाची शिकवण काय तर तुम्हाला मी जगण्यासाठी शारीरिक व बौद्धिक ताकद दिली आहे तिचा हुशारीने वापर करून जगा. तुम्ही माझ्यासारखे स्वयंभू व स्वयंपूर्ण होऊ शकत नसला तरी तुम्हाला माझ्या कडून मिळालेल्या मर्यादित शारीरिक व बौद्धिक शक्तीच्या जोरावर तुम्ही जास्तीतजास्त स्वावलंबी म्हणजे आत्मनिर्भर व्हा. तुम्ही तुमचे स्वत्व जाणा व स्वतःच्या नैसर्गिक अंतःस्फूर्तीने, स्वयंस्फूर्तीने, स्वप्रेरणेने स्वतःचे स्वकर्तुत्व सिद्ध करीत स्वाभिमानी व्हा!
(४) निसर्गाचे निरीक्षण करताना व निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना निसर्गाकडून मला वरील संदेश मिळतो आणि म्हणून निसर्ग हाच माझा सर्वात मोठा गुरू होतो. या महान गुरू पुढे इतर सर्व महान शास्त्रज्ञ, महापुरूष, संत, महात्मे मला लहान वाटतात. याचे कारण म्हणजे या महान लोकांचे महान कर्तुत्व हे त्यांनी निसर्ग गुरूला जवळ केल्यानेच शक्य झाले आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.
(५) आता प्रश्न राहिला की, निसर्गाला गुरू मानायचे पण देव मानायचे नाही, असे का? याचे कारण म्हणजे मानवी मन देव संकल्पने विषयी खूप हळवे आहे. या हळवेपणातूनच देवावर विसंबून राहण्याची मानवी मनाला सवय लागते. आणि हे परावलंबीत्व निसर्गाला मान्य नाही. प्रत्येक सजीवाने स्वावलंबी व्हायलाच पाहिजे हा निसर्गाचा आग्रह असतो. उदा. वयानुसार माणसाची दृष्टी कमी होते. अशावेळी निसर्ग माणसाला काय सांगतो तर "बाबारे, दृष्टी अधू झाली म्हणून माझ्याकडे रडत येऊन मी तूला दिलेल्या बुद्धीचा अपमान करू नकोस, त्याच बुद्धीने डोळ्यांच्या डॉक्टरकडे जा व चष्म्याचा नंबर काढून घेऊन दुकानातून चष्मा विकत घेऊन तो डोळ्यांवर लाव"! हा निसर्ग संदेश माणसाला स्वावलंबनाचे, आत्मनिर्भरतेचे शिक्षण देतो व त्या शिक्षणातून मानवी बुद्धीला शहाणपणा शिकवितो.
(६) क्षणभर अशी कल्पना करा की, निसर्ग जर देव रूपात प्रकट होऊन माणसांपुढे साक्षात उभा राहिला तर काय होईल? माणसाच्या मर्यादित बुद्धीला, इंद्रियांना निसर्गाचे ते महान देव रूप झेपेल काय? माणसेच काय पण निसर्गातील सर्व सजीव सृष्टीच ठप्प होऊन जाईल. याच प्रमुख कारणामुळे निसर्ग कधीही देव रूपात प्रकट होत नाही किंवा प्रकट होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. हे एकदा का मनाला कळले की मग निसर्गाला देव माना नाहीतर मानू नका, काही फरक पडत नाही. पण निसर्गाला गुरू मानून त्याच्याकडून त्याच्या नैसर्गिक सत्याचे अर्थात विज्ञानाचे शिक्षण घेण्यात व त्या वैज्ञानिक शिक्षणातून शहाणपणा शिकण्यात फायदाच आहे हे विसरता कामा नये.
-ॲड.बी.एस.मोरे©२६.५.२०२०
शनिवार, २३ मे, २०२०
आत्मनिर्भर भारत?
आत्मनिर्भर भारत ही घोषणा भावनिक आहे, व्यावहारिक नाही!
एक तरी ॲप आहे का टिकटॉक सारखे भारतात? आणि टिकटॉक वरील लोकांची कला ही किटकिट वाटण्यासारखी गोष्ट आहे का? कला सादर करण्याची मक्तेदारी काय फक्त सेलिब्रिटी लोकांनाच आहे? आणि हे फेसबुक काय किंवा व्हॉटसअप काय ते भारत निर्मित समाज माध्यम आहे काय? ते नसते तर माझ्यासारख्या सर्वसामान्य घरात जन्माला आलेल्या व बडी पोच नसलेल्या लोकांचे लिखाण कोपऱ्यात धूळ खात पडले असते ना! वकील, डॉक्टर मंडळी फेसबुक लाईव्ह होऊन लोकांना कायदेविषयक व वैद्यकीय मार्गदर्शन करू शकतात ते या परदेशी समाज माध्यमांच्या मुळेच ना! टिकटॉक वर सादर होणाऱ्या गरिबांच्या, सर्वसामान्य माणसांच्या कलेचेही तसेच आहे. ट्वीटर वरील राजकारणी, सेलिब्रिटी लोकांची टिवटिव चालते आणि टिकटॉक वरील सर्वसामान्य माणसांच्या कलेची किटकिट वाटते? आत्मनिर्भर भारत व्हायचेय ना, मग चीनच्याच का भारत सोडून इतर सगळ्याच देशांच्या सगळ्याच गोष्टी फेकून दिल्या पाहिजेत ना! १४० कोटी भारतीय जनते पैकी किती भारतीय तयार होतील परदेशी अॕप, परदेशी समाज माध्यमे, परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकायला? जरा ही मोहीम उघडून तरी बघा! स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय ब्रिटिशांबरोबर लढण्यासाठी म्हणून ही स्वदेशी चळवळ ठीक होती, पण आता असे देशप्रेमी करोडोच्या संख्येने पुढे येतील का? आत्मनिर्भर भारत ही घोषणा भावनिक आहे, व्यावहारिक नाही!
-ॲड.बी.एस.मोरे©२३.५.२०२०