https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

वर्चस्वाचा उन्मादी गर्व व कायदा!

वर्चस्वाचा उन्मादी गर्व व कायदा!

आधुनिक व सुसंस्कृत मानवी जीवनशैलीचा विकास माणसांच्या रानटी, जंगली जीवनशैलीतून व वर्चस्वाच्या टोळी युद्धांतून झाला असल्याने आधुनिक काळातही माणसाची वर्चस्व वृत्ती जाता जात नाही. दुसऱ्यावर वर्चस्व गाजवत गर्वाने जगण्याची ही मानवी वृत्ती ही मूळ पशू वृत्ती होय. जंगलात बळी तो कानपिळी या नियमाने वाघ, सिंह हे बलवान प्राणी इतर अशक्त प्राण्यांना आपल्या कह्यात ठेवून त्यांचे शोषण करून गर्वाने राजेशाही जीवन जगण्यासाठी वर्चस्वाच्या लढाया लढतात. त्यांचीच पद्धत अवलंबून मानव समाजात टोळी युद्धे हा जंगली प्रकार अंमलात आला. राजेशाहीत बलवान राजे अशक्त राजांना बळी तो कानपिळी या नियमाने युद्धात हरवून हरलेल्या राजांना व त्यांच्या प्रजेला मांडलिक बनवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करीत असत. त्या मांडलिकत्वाच्या म्हणजे झुकून राहण्याच्या व खंडणी देण्याच्या मोबदल्यात मांडलिक राजांना व त्यांच्या राज्यातील प्रजेला शांततामय जीवन जगण्याची हमी युद्धात जिंकणारे राजे देत असत. काळ बदलला. राजेशाही जाऊन लोकशाही आली पण लोकशाहीतही लोकांतून निवडून येणाऱ्या लोक प्रतिनिधींना राज्य कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी लोकांना त्यांच्या उत्पन्नातून काही भाग लोकशाही सरकारला कररूपाने द्यावा लागतो. हा कर म्हणजे आधुनिक खंडणीच होय. दुसऱ्यावर वर्चस्व गाजवताना गर्व होण्याची पशू वृत्ती लोकशाही राजकारणात लोकप्रतिनिधींमध्येही अधूनमधून उफाळून येत असते. आणि लोकशाही सरकार तरी पूर्ण आधुनिक व सुसंस्कृत आहे का? उत्तर नाही असेच आहे. कारण तसे असते तर समाजात दहशत निर्माण करून समांतर अर्थव्यवस्था चालवत खंडणी वसूल करणारे अंडरवर्ल्डचे गँगस्टर्स अस्तित्वात राहिलेच नसते. मानव समाजातील धार्मिक उन्माद व जातीपातीमधून माणसाची वर्चस्व वृत्ती दिसून येते जी मूळ पशू वृत्ती आहे. कितीही देवधर्म, आध्यात्मिक देवभक्ती करा कोणत्याही धर्माला व कोणत्याही देवाला माणसाच्या या पशू वृत्तीचा संपूर्ण नायनाट करता आलेला नाही. त्यासाठी माणसांना विचार करून पुन्हा त्याच बळी तो कानपिळी या जंगली नियमाचा आधार घेत आधुनिक कायदा व शासन व्यवस्था निर्माण करावी लागली. इथे परमेश्वर व देवधर्म  उपयोगाला आले नाहीत व येत नाहीत. निरनिराळे खेळ जसे की क्रिकेट, कुस्ती, बुद्धीबळ यातून माणसाने त्याची वर्चस्व वृत्ती जिवंत ठेवण्याचाच प्रयत्न चालू ठेवला आहे. या खेळांत जिंकणारे खेळाडू हरणाऱ्या खेळांडूवर वर्चस्व सिद्ध करतात व मग खेळ जिंकण्याचा आनंदोत्सव साजरा करतात. या आनंदाच्या सोहळ्यात म्हणजे खेळ जिंकण्याच्या सोहळ्यात सामान्य माणसेही टाळ्या वाजवून, फटाके वाजवून नाचतात. हा नाच असतो दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याचा, दुसऱ्याला जिंकण्याचा व त्यातून निर्माण होणाऱ्या गर्वाचा. वर्चस्वाचा हा उन्मादी गर्व दैनंदिन जीवनात म्हणजे आंतर मानवी शैक्षणिक, आर्थिक व राजकीय व्यवहारांतही दिसून येतो. म्हणून तर संत तुकाराम म्हणतात "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग"! या वर्चस्व उन्मादी गर्विष्ठ वृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी शासन व्यवस्थेअंतर्गत येणारी प्रशासन, पोलीस व लष्कर यंत्रणा कायद्याच्या माध्यमातून मार्शलचे काम करते तर न्याययंत्रणा अंपायरचे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.११.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा