https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

दया कर, मदत कर!

दया कर, मदत कर?

निसर्ग हा पालनपोषणाचा पाळणा आहे तसा तो खडतर आव्हानांचा डोंगर आहे. हा पाळणा व डोंगर ही निसर्गातील सर्वोच्च शक्तीची अर्थात परमात्म्याची/परमेश्वराची निर्मिती आहे. म्हणून निसर्गालाच परमेश्वर मानणे चुकीचे!

इतर सजीव, निर्जीव पदार्थांप्रमाणे माणसे हीही परमेश्वराची लेकरे आहेत. या लेकरांना त्यांच्या माता पित्यांच्या माध्यमातून परमेश्वर काही काळ चमच्याने दूध भरवून आयते जगवतो. पण नंतर मात्र या लेकरांनी आईवडिलांवर कायम अवलंबून राहणे किंवा आयते खात बसणे हे परमेश्वराला बिलकुल मंजूर नाही.

आईवडिलांचा आयता घास खाऊन मोठ्या झालेल्या लेकरांनी स्वतःच्या ताकदीवर आव्हानांचा डोंगर पार करायला किंवा आकाशात उंच भरारी घ्यायला शिकावे लागते. ही नैसर्गिक ताकद परमेश्वराने प्रत्येक लेकराला दिली आहे. त्यात निसर्ग रचनेप्रमाणे कमीजास्त प्रमाण असू शकते. पण जगण्याची व लढण्याची ताकद परमेश्वराने प्रत्येकाला दिली आहे हे मात्र खरे!

सगळ्याचा आईवडिलांना आपली मुले स्वबळावर आव्हानांंचा डोंगर पार करताना किंवा आकाशात उंच भरारी घेताना आवडतात. त्यांना आपली लेकरे पुन्हा पुन्हा रडत घरी परत आलेली व घरात रडत बसलेली आवडत नाहीत. आदर म्हणून त्यांनी आईवडिलांच्या पाया पडून बाहेर पडणे वेगळे व सारखे सारखे त्यांचे रडगाणे आईवडिलांपुढे गात बसणे वेगळे. परमेश्वर तर नश्वर देहाच्या आईवडिलांचाही अनंत काळचा सर्वोच्च आईबाप. त्याला त्याच्या लेकरांनी सारखे त्याच्यापुढे येऊन "दया कर, मदत कर" अशी प्रार्थना करणे कसे बरे आवडेल? त्याला आदरयुक्त नमस्कार करणे वेगळे व त्याच्यापुढे प्रार्थनेतून रडगाणे गाणे वेगळे!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.११.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा