https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

पदार्थ व त्यांची व्यवस्था!

निसर्गातील पदार्थ व त्यांच्या व्यवस्थेचे विज्ञान!

निसर्गाची उत्क्रांती होत असताना त्या उत्क्रांतीतून अगोदर विविध गुणधर्मी पदार्थ निर्माण झाले व नंतर त्यांच्या हालचालीची नैसर्गिक व्यवस्था निर्माण झाली की अगोदर पदार्थांच्या हालचालीची नैसर्गिक व्यवस्था निर्माण झाली व नंतर  विविध गुणधर्मी पदार्थ निर्माण होऊन ते तयार व्यवस्थेत बसवले गेले म्हणजे अगोदर पदार्थ व नंतर व्यवस्था की अगोदर व्यवस्था व नंतर पदार्थ, हे कळायला मार्ग नाही. पण वास्तवात या दोन्ही गोष्टी म्हणजे पदार्थ व व्यवस्था एकत्र आहेत हेच दिसते.

विविध गुणधर्मी असंख्य सजीव व निर्जीव पदार्थ व त्यांच्यामधील नैसर्गिक हालचालीची नैसर्गिक व्यवस्था व तसेच या नैसर्गिक व्यवस्थेच्या अंतर्गत जन्म घेऊन जगणारी, मरणारी व आहे त्या माणसांच्या पुनरूत्पादन क्रियेतून पुन्हा पुन्हा जन्मणारी करोडो माणसे व त्यांच्या सामाजिक हालचालीची सामाजिक व्यवस्था या सर्वांचे ज्ञान म्हणजेच विज्ञान. नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थांच्या नियमांनाच एकत्रितपणे कायदा असे म्हणतात. नैसर्गिक व्यवस्थेचा नैसर्गिक कायदा (नॕचरल लाॕ) असतो व सामाजिक व्यवस्थेचा सामाजिक कायदा (सोशल लाॕ) असतो. या दोन्ही कायद्यांचा तुलनात्मक अभ्यास हा माझा आवडीचा संशोधनाचा विषय आहे.

नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थेच्या अंतर्गत हालचाल करणारी करोडो माणसे पृथ्वीवर जन्माला येतात, जगतात व मरतात. पण त्यापैकी किती लोकांचा आपल्याशी प्रत्यक्ष संबंध येतो? फक्त काही माणसेच आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष संपर्कात  येतात. अशी प्रत्यक्ष संपर्कातील माणसे प्रथमतः कौटुंबिक नाते संबंधातील असतात व नंतर त्यांच्या माध्यमातून जवळ येणारी नातेवाईक मंडळी असतात. अशा जवळच्या नात्यांतील संबंध हे अनौपचारिक व वैयक्तिक स्वरूपाचे असतात ज्यात मायाप्रेम या भावनेचा भाग जास्त व कोरड्या, औपचारिक व्यवहाराचा भाग कमी असतो. त्यानंतर आपला प्रत्यक्ष संबंध येतो तो शैक्षणिक, आर्थिक व राजकीय गरजांतून निर्माण होणाऱ्या औपचारिक, कोरड्या व्यावहारिक संबंधाचा ज्यात गरज सरो व वैद्य मरो, कामापुरता मामा व ताकापुरती आजी अर्थात वापरा आणि फेका असा हिशोब असतो. पण शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा व राजकारण यासारख्या औपचारिक व्यवहार संबंधातूनही वैयक्तिक पातळीवरील जवळचे मैत्रीचे संबंध निर्माण होऊ शकतात. या मर्यादित संबंधाच्या बाहेर संबंध नसलेल्या करोडो अनोळखी लोकांचा प्रचंड मोठा परीघ आपल्या अवतीभोवती असतो व आपण अप्रत्यक्षरीत्या या परिघाचा भाग असतो. जवळच्या प्रत्यक्ष संबंधातील मर्यादित माणसांच्या बाहेर असलेल्या या परिघातील अनोळखी लोकांच्या शैक्षणिक, आर्थिक व राजकीय हालचाली समाज निर्मित वृत्तपत्रे, दूरदर्शन, रेडिओ या पारंपरिक व हल्ली उदयास आलेल्या समाज माध्यमांतून आपल्याला कळत असतात. या परिघातील अनोळखी माणसांच्या हालचालीच्या बातम्या आपल्या वैयक्तिक जीवनावर किती परिणाम करतात हे आपला या बातम्यांना प्रतिसाद किती यावर अवलंबून असते. पण सगळ्याच बातम्या मनाला लावून घ्यायच्या नसतात. करोडो माणसे सामाजिक व्यवस्थेत एकाच लयीत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकतील असे नसते. काही माणसे या व्यवस्थेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. तीच गोष्ट असते नैसर्गिक व्यवस्थेतील लहरीपणाची. तिथेही सगळंच सुरळीत चालेल असे नसते. अधून मधून ऊन, पाऊस, वारा यासारखे निसर्ग घटक नैसर्गिक व्यवस्थेत गोंधळ उडवून देण्याचे काम करीत असतात. विविध नैसर्गिक आपत्ती हा निसर्ग घटकांच्या अशा लहरी गोंधळाचाच भाग. पण शेवटी अधून मधून गोंधळ घालणाऱ्या या निसर्ग व समाज घटकांचा योग्य बंदोबस्त करण्याची ताकद नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थांमध्ये असते. निसर्ग व समाज घटकांना निसर्गाने व समाजाने नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थांच्या दावणीला घट्ट आवळून बांधलेले असते.

पण शेवटी निसर्ग म्हणजे तरी काय? निसर्ग म्हणजे विश्व व विश्व म्हणजे प्रचंड मोठी अंतराळ पोकळी (स्पेस)  व त्या पोकळीतील विविध पदार्थांचा महासंघ. विश्वाचा/निसर्गाचा निर्माता व नियंता कोणीतरी आहे (ज्याला परमेश्वर म्हणतात) हा तर्क आहे तार्किक मानवी बुद्धीचा जो तर्क वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करता आलेला नाही. तो परमेश्वर कोणाला कधी दिसत नाही की कोणाच्या  जवळ येऊन बोलत नाही. त्यामुळे त्याचे अस्तित्व विश्वात/निसर्गात खरंच आहे का हा प्रश्नही चौकस मानवी बुद्धीपुढे निर्माण होतो. पण परमेश्वर असो वा नसो, निसर्ग मात्र त्याच्या पदार्थांसह व पदार्थांच्या व्यवस्थेसह अस्तित्वात आहे हे वास्तव आहे. हे वास्तव नीट तपासून व स्वीकारून वास्तवात असलेल्या नैसर्गिक, सामाजिक व्यवस्थांनुसार जगणे व जगण्याची हालचाल करणे एवढेच माणसाच्या हातात आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.११.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा