https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

विज्ञान, धर्म व धम्म!

विज्ञान, धर्म व धम्म!

विज्ञान म्हणजे निसर्गाचे वास्तव. या वास्तवात श्रद्धाळू मानवाने परमेश्वर हेही वास्तव आहे असे मानले तेंव्हा ईश्वर धर्म निर्माण झाला. पण जगात अनेक देवधर्म आहेत. खरं तर हे धर्म म्हणजे परमेश्वर या गृहीतकाभोवती आपआपल्या देव कल्पनांप्रमाणे फिरणारे व देवधार्मिक कर्मकांडात एकवाक्यता नसणारे अनेक संप्रदाय होत. अशा धर्मात बुद्धीचा भाग कमी व भावनेचा (श्रद्धेचा) भाग जास्त असतो. परमेश्वराशिवाय निसर्ग/ विश्व शक्यच नाही हा मूलभूत तर्क (जो वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता आला नाही) हाच काय तो ईश्वर धर्मातील बुद्धीचा अल्प भाग.

याउलट धम्मात बुद्धी व भावना यांच्यात संतुलन साधलेले असते. धम्म म्हणजे केवळ गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्म नव्हे. कारण त्या धम्मात नास्तिकता आहे. माझ्या मते धम्म म्हणजे संपूर्ण निसर्ग व मानव समाज यांचे कल्याण साधणारा जगव्यापी असा सार्वजनिक कायदा. हा सार्वजनिक कायदा लोकांवर नास्तिकता लादत नाही. निसर्गात अलौकिक सर्वोच्च शक्ती असलेला परमात्मा आहे असे मानायला धम्म किंवा कायदा जशी मुभा देतो तशी मुभा तो नास्तिक व्हायलाही देतो.

पण परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे अर्थात आस्तिक असणे म्हणजे जगातील धर्म संप्रदायांनी घोषित केलेल्या प्रेषित, देवावतार यांनाच मानणे व त्यांच्याविषयी धर्मांनी सांगितलेल्या धार्मिक कर्मकांडी पद्धती अवलंबणे असे नव्हे. ईश्वर श्रद्धा असलेला आस्तिक माणूस त्याच्या वैयक्तिक पातळीवर स्वतःचा वैयक्तिक ईश्वर धर्म निर्माण करून त्याला सोयीस्कर असलेल्या पद्धतीने ईश्वर प्रार्थना करू शकतो. स्वतःपुरत्या मर्यादित असलेल्या या वैयक्तिक ईश्वर धर्माचा म्हणजे वैयक्तिक पातळीवरील ईश्वर प्रार्थना पद्धतीचा सार्वजनिक गाजावाजा करण्याची काही गरज नसते.

माझ्या माहितीप्रमाणे गौतम बुद्ध हे नास्तिक असल्याने त्यांच्या बुद्ध धम्माला ईश्वर धर्म मान्य असणे हे शक्य नाही. माझ्या धम्म संकल्पनेत मात्र ईश्वर धर्म येऊ शकतो. धम्म व धर्म यांच्या संयुक्त मिश्रणाचा माझा हा स्वतंत्र विचार प्रचलित धम्म व रूढ धर्म संकल्पनांमध्ये बसेलच असे नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.११.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा