https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

निरागस मुलगी!

निरागस मुलगी!

डिलाईल रोड महाराष्ट्र हायस्कूल मैदानाशेजारील करी रोड स्टेशनकडे जाणारी डिलाईल रोडची फूटपाथ. एक साधारण १६ वर्षे वयाची एक निरागस मुलगी छोट्या टेबलावर  घरगुती भाजी पोळी विकत उभी. बहुतेक इयत्ता दहावीत असावी. "मुली, काय काय आहे तुझ्याकडे", मी. "काका, चवळीची सुकी भाजी, राजमाची पातळ भाजी व चपाती आहे, आज मला यायला थोडा उशीरच झाला", ती मुलगी. "अगं, पण मला मच्छी हवी होती, आता मला त्या शेजारच्या महागड्या हॉटेलात जावे लागेल मच्छी घ्यायला आणि तुझ्याकडे मस्त घरगुती मच्छी स्वस्तात मिळेल म्हणून आलो इथे", मी. "काका, हो ते हॉटेल महाग आहे पण तुम्ही बुधवारी या, इथे स्वस्तात छान मच्छी मिळेल, त्या हॉटेलात १३० रूपयात मिळणारा तळलेला बांगडा त्यापेक्षाही छान घरगुती पद्धतीचा माझ्याकडे ५० रूपयात मिळेल, पण आज शाकाहारी भाजी, चपाती घेऊन जा", ती. "बरं, पण मला ती सुकी चवळीची भाजी नको, पातळ राजमाची भाजी दे, चपात्या घरी बायकोने करून ठेवल्यात, ती भाजी केवढ्याला?", मी. "काका, २० रू.". मी तिच्याकडून फक्त २० रूपयाची राजमाची पातळ भाजी घेतली व निरोप घ्यायला लागलो तेंव्हा ती म्हणाली "काका, बुधवारी या, मच्छी मिळेल". हो म्हणून मी तिचा निरोप घेतला.

आता तुम्ही म्हणाल की, हा अनुभव  तर सगळ्यांनाच येतो मग तो लिहून का सांगितला? सांगितला कारण यात मुद्दा दृष्टिकोनाचा व छोट्या गोष्टींतही मोठा आनंद घेण्याचा आहे. त्या मुलीची निरागसता व प्रामाणिकपणा मला भावला. असे संभाषण करायला मला आवडते. पण त्यासाठी अशा सरळ मनाची, निरागस स्वभावाची, प्रामाणिक माणसे मिळणे दुर्मिळ झालेय. किती श्रीमंत उद्योगपती, व्यापारी व किती पोपटपंची राजकारणी असे सरळ मिळतील? मला संभाषणासाठी ढोंगी, खोटी माणसे आवडत नाहीत तर माझ्या या लेखातील सरळसाध्या मुलीसारखी माणसे संभाषणासाठी आवडतात म्हणून हा अनुभव शेअर केला.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.११.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा