https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

स्थिर जीवन, शांत जीवन!

आयुष्यात स्थिरस्थावर (सेटल) होणे म्हणजे काय?

आयुष्य स्थिर नाही कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आयुष्य स्थिर नाही म्हणून मनही स्थिर नाही. तरीही माणूस स्थिर आयुष्याची व  स्थिर मनाची अपेक्षा करतो. त्यात त्याची चूक नसली तरी स्थिरता ही खूप कठीण गोष्ट आहे.

अज्ञानामुळे माणूस बौद्धिक दृष्ट्या अपंग होतो. बौद्धिक दृष्ट्या अपंग असलेला माणूस मानसिक दृष्ट्या अस्थिर होतो. म्हणून तो शाळा, काॕलेजातून शिक्षण घेऊन व पुढे  त्या ज्ञानाची अनुभव, सरावातून उजळणी करीत राहून आयुष्यात  शैक्षणिक स्थिरत्व आणण्याचा सतत प्रयत्न करतो. पण जगाचे ज्ञान भांडार एवढे मोठे आहे की मनुष्याने त्याच्या छोट्या आयुष्यात मिळवलेले तुटपुंजे ज्ञान आकाराने प्रचंड मोठ्या असलेल्या ज्ञानसागरात क्षुल्लकच राहते. त्यामुळे माणसाला शैक्षणिक स्थिरत्व आयुष्यभर लाभत नाही.

नुसते शैक्षणिक स्थिरत्व पुरेसे नसते. माणसाला आर्थिक स्थिरत्वही हवे असते. म्हणून माणूस नोकरी, उद्योग धंदा, व्यवसाय यात सातत्यपूर्ण स्थिरत्व मिळविण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याला त्याच्या आयुष्यात आर्थिक स्थिरत्व लाभावे. पण समाजात गरीब व श्रीमंत यातील आर्थिक दरी एवढी मोठी आहे की कितीही उच्च शिक्षण घेतले तरी गरिबांना पिढीजात श्रीमंतांएवढे आर्थिक स्थिरत्व आयुष्यभर लाभत नाही. काही माणसांना तर मरेपर्यंत कष्ट करीत रहावे लागते, मग ते कष्ट शारीरिक असो की बौद्धिक.

शैक्षणिक व आर्थिक स्थिरत्वानंतर माणूस कौटुंबिक स्थिरत्वासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी विवाह करून स्वतःचा जीवनसाथी, मुले यांचे छोटेसे कुटुंब बनवतो. पण काही जणांना हे कौटुंबिक स्थिरत्व लाभत नाही. काहींचे घटस्फोट होतात तर काहींची मुले वाया जातात.

सामान्य माणसाला सर्वसाधारणपणे आयुष्यात शैक्षणिक, आर्थिक व कौटुंबिक स्थिरत्व लाभले की तो खूश, सुखी समाधानी होतो. मोठ्या  भांडवलदार व राजकारणी मंडळींची गोष्टच निराळी. त्यांचे आर्थिक व राजकीय स्थैर्य वेगळे असते कारण त्यांची महत्वाकांक्षाही मोठी असते. पण भरपूर संपत्तीतून व राजकीय सत्तेतून त्यांना खरंच आयुष्यात स्थिरत्व व शांती लाभते का हा संशोधनाचा विषय आहे.

काही माणसे देवाधर्माच्या नादी लागून जीवनात आध्यात्मिक शांती मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यातून खरंच परमेश्वर सापडतो का व आध्यात्मिक शांती लाभते का हाही संशोधनाचा विषय आहे.

घरातील वस्तू जिथल्या तिथे, नीट नेटक्या ठेवण्याचीही सवय काहींना असते. मी माझी कायद्याची व इतर पुस्तके, तसेच मला विशेष वाटलेली वृत्तपत्रांतील कात्रणे घरात ठराविक जागेवर नीट ठेवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचे माझ्या मृत्यूनंतर काय होणार? ती बहुतेक रद्दीत जातील. कारण माझी बौद्धिक आवड व घरातील मंडळीची बौद्धिक आवड एकसारखी नाही. अर्थात माझ्या या संकलनाला स्थिरता नाही. जगाच्या प्रचंड मोठ्या ज्ञानभांडारात माझे हे ज्ञानभांडार फारच किरकोळ आहे.

तात्पर्य काय, तर माणूस त्याच्या आयुष्यात स्थिरस्थावर (सेटल) व्हायला बघतो, पण तो खरंच सेटल होतो का?

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.११.२०२३, कार्तिकी एकादशी, पंढरपूर यात्रा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा