https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २१ मे, २०१७

*आध्यात्मिक शांती*!

*आध्यात्मिक शांती*!

(१) अबब! प्रचंड आकाराचे केवढे मोठे हे विश्व, त्या विश्वाचा केवढा मोठा हा पसारा आणि विविध ज्ञान शाखांत विखुरलेले त्या विश्वाचे केवढे प्रचंड हे ज्ञान!

(२) एवढया मोठ्या जगाच्या प्रत्येक कानाकोप-यात आपण पोहचू शकत नाही आणि एवढया प्रचंड ज्ञानाचे ओझे आपण उचलू शकत नाही. अगदी तसेच माणसांचे! प्रचंड लोकसंख्येने जगाच्या कानाकोप-यात पसरलेली किती ही असंख्य माणसे! 

(३) या असंख्य माणसांतील आपली माणसे किती? माझ्या दृष्टिकोनातून मनुष्याच्या दैनंदिन जीवनात नेहमीचा संबंध येणारी तीन प्रकारची नाती असंख्य माणसांतून निर्माण होतात. ती म्हणजे नोकरी, औद्योगिक, व्यावसायिक, राजकीय संबंधातून निर्माण होणारी केवळ स्वार्थावर आधारित व्यावहारिक नाती, नंतर भावनेपेक्षा वैचारिक जवळीकेतून निर्माण होणारे मित्रत्वाचे नाते आणि त्यानंतर विवाह संबंधातून निर्माण होणारी पतीपत्नी, आईवडील, मुलेबाळे, भाऊबहिणी इ. अत्यंत जवळची कौटुंबिक नाती व मेहुणामेहुणी, दीरभावजय, नणंदभावजय, काकामावशी, भाचाभाची इ. थोडी लांबची कौटुंबिक नाती. 

(४) परंतू नीट लक्षात घेतले तर, विचाराची सुध्दा स्वार्थापासून सुटका नाही आणि विवाह संबंध हा तर मानवी संभोग वासनेला सामाजिक दृष्ट्या नियंत्रित व संरक्षित करणारा कायदेशीर व्यवहारच असल्याने मित्रत्वाचे नाते काय किंवा कौटुंबिक नाती काय ही नाती केवळ स्वार्थावर आधारित असलेली व्यावहारिक नाती नसली तरी प्रेमभावना व स्वार्थी व्यवहार यांची भेसळ असणारी संमिश्र गुंतागुंतीची नाती आहेत, हे या नात्यांतील प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही.

(५) एवढे मात्र खरे की, तुम्ही अंतर्मुख होऊन थोडा जरी तुमच्या स्वतःचा विचार केला तर तुम्हाला जवळची वाटणारी तुमची ही मित्रमंडळी व तुमची नातेवाईक मंडळी तुमच्यावर स्वार्थीपणाचा शिक्का मारल्याशिवाय राहणार नाहीत. यातून तुमच्यावर खरे प्रेम करणारी तुमची जवळची माणसे किती व कोणती हे तुमचे तुम्हीच शोधा.

(६) एकदा का या भौतिक सत्याचे ज्ञान झाले की, माणसामाणसांतील अहंकार, द्वेष, मत्सर, असूया, राग, लोभ इ. मानवी भावनांमागे दडलेला स्वार्थ तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. अशावेळी गांगरून न जाता, समोर उभे असलेले बलाढ्य विश्व, त्या विश्वाचे स्वतःच्या आवाक्यात न येणारे प्रचंड ज्ञान यालाच महावृक्ष मानून त्या वृक्षाच्या सावलीत छोटे होऊन शांत झोप घ्यायला शिका. एकदा का भौतिक सत्य नीट कळले की, आध्यात्मिक शांतता मिळविणे कठीण जात नाही. *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा