https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २१ मे, २०१७

*गुलाबी जीवनाला काटेरी किनार*!

*गुलाबी जीवनाला काटेरी किनार*!

(१) गुलाबाच्या फुलाचे आकर्षण वाटत असेल आणि त्याचा सहवास हवा असेल तर त्याच्या काट्यांची पीडा सोसण्याची तयारी ठेवावीच लागेल.

(२) जीवनातील सर्वच भौतिक आकर्षणांचे हे असेच आहे. सुख भोगताना त्या सुखाला चिकटलेले दुःख सोसण्याची हिंमत नसेल तर भौतिक सुखाच्या मागे लागू नका. जीवन जगणे हाच एक आनंद आहे आणि तो आनंद भौतिक सुखाचाच एक भाग आहे. तो आनंद, ते सुख सहजासहजी मिळूच शकत नाही. कारण भौतिक सुखाचा मार्ग हाच मुळी भौतिक दुःखातून जातो.

(३) त्यामुळे शासनाने कितीही कायदे केले तरी भ्रष्टाचार, गुंडगिरी यासारख्या पीडादायक गोष्टी समाजात रहाणारच. अशा धोक्यांपासून सावधानता बाळगतानाच प्रसंगी त्यांच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवावीच लागते. काट्यांना किती घाबरणार? अंतर्गत पोलीस व देशाच्या सीमेवर पहारा देणारे सैनिक यांना त्यांच्या मर्यादा आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून राहण्याला नागरिकांच्या मर्यादा आहेत.

(४) माणसातले क्रूर वाघ, सिंह आपल्या आजूबाजूलाच आहेत हे सतत ध्यानात ठेवून स्वतःच शूर वीर बनून जगा. मरण तर असेही येणार आणि तसेही येणारच आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण अटळ आहे. मग मृत्यूला का आणि किती घाबरायचे? तेंव्हा न घाबरता गुलाबाच्या काट्यांना हुशारीने बाजूला करीत, प्रसंगी त्यांना झेलीत जीवनातील गुलाबी सुख भोगायला शिका. *एड.बळीराम मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा