विश्वातील डार्क मॕटर व ईश्वर!
सृष्टीकर्ता (ईश्वर) सृष्टीची नुसती रचना म्हणजे सृष्टीची आकारबद्ध निर्मिती करून गप्प बसला नाही तर निर्माण केलेल्या सृष्टीची नियमबद्ध हालचाल चालू राहण्यासाठी त्याने त्या सृष्टीत कायदेशीर व्यवस्थाही निर्माण केली. लक्षात घ्या की सृष्टी दृश्यमान आहे तशी सृष्टीची व्यवस्थाही दृश्यमान आहे. पण ही व्यवस्था ज्या जोरावर, ज्या प्रभावाखाली चालते तो ईश्वराच्या अधिकाराचा, सत्तेचा, हुकूमाचा प्रभाव मात्र सुप्त आहे, गुप्त आहे, अदृश्य आहे. म्हणजे ईश्वर अदृश्य व त्याचा प्रभावही अदृश्य! पण त्या अदृश्य प्रभावाची अप्रत्यक्षपणे जाणीव होतेय हे मात्र खरे! त्या सुप्त, अदृश्य प्रभावाची जाणीव जर अप्रत्यक्षपणे होतेय तर मग अदृश्य ईश्वराची अप्रत्यक्षपणे जाणीव नास्तिकांना का होत नाही हे कळायला मार्ग नाही. लोकशाहीत आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देऊन त्यांच्या माध्यमातून कायदे बनवतो ते कुठून बनवतो? सृष्टीत असलेल्या मूलभूत व्यवस्थेतूनच ना! कायदे बनवतो म्हणजे काय करतो तर सृष्टीची आहे ती व्यवस्था आम्हाला समजावी म्हणून ती अधिक स्पष्ट करतो, तिला लिखित स्वरूपात समोर ठेवतो. नंतर हे लिखित कायदे आम्हीच निवडलेल्या आमच्या लोकप्रतिनिधी मार्फत राबवतो? पण राबवतो किंवा अंमलात आणतो म्हणजे काय करतो? तर सृष्टीच्या व्यवस्थेत अदृश्य ईश्वराचा जो अप्रत्यक्ष प्रभाव आहे त्या प्रभावाखाली राहून आम्ही सृष्टीची ती व्यवस्था अधिक स्पष्टपणे राबवतो. पण हे सर्व करायला आम्हाला कोण भाग पाडते तर तो अदृश्य ईश्वर व त्याचा सुप्त, गुप्त, अदृश्य प्रभाव! आम्हाला वाटते आम्हीच हे सर्व करतोय. पण आमच्यावर अप्रत्यक्ष प्रभाव टाकून आमच्याकडून करवून घेणारा कोण असतो तर तो अदृश्य ईश्वर व त्याचा तो सुप्त, गुप्त, अदृश्य प्रभाव! म्हणजे ज्या अदृश्य ईश्वराने ही दृश्य सृष्टी रचली तोच ती सृष्टी तिच्या व्यवस्थेसह आम्हाला नकळत अर्थात अप्रत्यक्षपणे चालवत आहे. विश्वातील बऱ्याच गोष्टी विज्ञानापासून दूर व मानवाला अज्ञात आहेत. विश्वातील डार्क मॕटर ही अशीच अज्ञात गोष्ट! म्हणजे अप्रत्यक्ष पुराव्यातून हे डार्क मॕटर या विश्वात असल्याची जाणीव होतेय पण त्याचा प्रत्यक्ष पुराव्याने विज्ञानाला शोधच घेता येत नाही. त्या अदृश्य ईश्वराचे व त्याच्या अदृश्य, सुप्त प्रभावाचे हे असेच आहे अगदी त्या डार्क मॕटर सारखे! आता एकदा का हे कळले की, अदृश्य ईश्वर व त्याचा अदृश्य, सुप्त प्रभाव हा विश्वातील डार्क मॕटर सारखा शोधता न येणारा, अनाकलनीय आहे मग हेही मनात निश्चित केले पाहिजे की तो अनाकलनीय असा ईश्वर व त्याचा अनाकलनीय प्रभाव यांचा शोध घेण्यात व त्यात व्यर्थ चाचपडत बसण्यात अर्थ नाही. त्या अज्ञात, अदृश्य ईश्वराला व त्याच्या सुप्त प्रवाहाला त्याचे काम अप्रत्यक्षपणे करू द्यावे व आपण मात्र सृष्टीचे दृश्य स्वरूप व तिची दृश्य व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत सृष्टीच्या व्यवस्थेची स्वतःच्या बुद्धीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे. असे करताना मनाला ईश्वरी शक्तीचा आधार वाटण्यासाठी अधूनमधून आत्मचिंतन करीत ईश्वराची प्रार्थना करायला मनाची काही हरकत नसावी.
-ॲड.बी.एस.मोरे©९.१०.२०२०