https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २० जून, २०२४

प्रतिकार!

प्रतिकार!

माणूस पूर्णपणे सुसंस्कृत व समंजस व्हायला अजून खूप काळ लागणार आहे. लोकसंख्या वाढीने तर आता जीवघेण्या स्पर्धेतून अहंकार, द्वेष, मत्सर, हिंसक प्रवृत्ती यासारख्या नकारार्थी भावना अनेक पटीने वाढवल्या आहेत. या आव्हानात्मक वातावरणात अहिंसा तत्वाची नुसती जपमाळ ओढत बसण्यात अर्थ नाही कारण अन्यायाविरूद्ध जशास तसा प्रतिकार ही आजच्या काळाची पूर्वीपेक्षाही जास्त गरज आहे व त्यासाठी आपण आपल्या भारतीय संस्कृतीचे पुनर्जागरण व अनुपालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आपल्या लढवय्या महापुरूषांच्या स्मृती जागृत करून अन्यायाविरूद्ध लढण्याची चेतना जागृत केली पाहिजे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.६.२०२४

बुधवार, १९ जून, २०२४

अतिरेकी प्रेम, हिंसा व नेभळट समाज!

अतिरेकी प्रेम, हिंसा व नेभळट समाज!

दिनांक १९.६.२०२४ च्या लोकसत्ता दैनिकातील या दोन बातम्या म्हणजे अतिरेकी प्रेमाची दोन उदाहरणे. एका उदाहरणात एक तरूण त्याला त्याची प्रेयसी साथ देत नाही म्हणून अतिरेकी प्रेमाच्या रागातून वसईत त्या प्रेयसीची दिवसाढवळ्या भर रस्त्यात हत्या करतोय, तर दुसऱ्या उदाहरणात एक पुरूष पत्नीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने पत्नी विरहाच्या नैराश्येतून डोंबिवलीत आत्महत्या करतोय. प्रेम व हिंसा या दोन्ही गोष्टी दोन्ही उदाहरणात आहेत. फरक एवढाच की पहिल्या उदाहरणात अतिरेकी प्रेमातून माणूस दुसऱ्या व्यक्तीची हिंसक हत्या करतोय तर दुसऱ्या उदाहरणात माणूस अतिरेकी प्रेमातून स्वतःच स्वतःची हिंसक आत्महत्या करतोय. मानवी जीवन एवढे का स्वस्त झालेय?

पहिल्या उदाहरणात तर असहाय्य तरूणीची हत्या होत असताना जमाव नुसती बघ्याची भूमिका घेत त्या भयानक घटनेची मोबाईल मधून व्हिडिओग्राफी करताना दिसतोय. खरंच असल्या जमावाला बघून किळस आली. पोलीस सर्व ठिकाणी पोहचू शकत नाहीत. मग अशावेळी लोक एखाद्या असहाय्य व्यक्तीला हिंमत करून वाचवायला का पुढे येत नाहीत? इतकी का नेभळट झालीय जनता? त्या जमावातून एकाने त्या मारेकऱ्याला अडवण्याची हिंमत केली पण त्याला साथ द्यायला त्या जमावातून कोणी पुढे आले नाही. सगळे मोबाईल वरून चित्रफीत काढण्यात दंग होते. या असल्या नेभळट लोकांमुळेच एखादा माणूस अशा प्रसंगात हिंमतीने पुढे येण्यास कचरतो. त्या मारेकऱ्याच्या हातात बंदूक असती तर घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुढे न येणे हे आपण समजू शकतो पण त्या मारेकऱ्याच्या हातात लोखंडी पाना होता. जमावातील काहीजणांनी जरी हिंमत केली असती तरी तो पाना त्याच्याकडून हिसकावून घेऊन त्या मारेकऱ्याला बदड बदड बदडून पोलिसांच्या ताब्यात देता आले असते. पण तशी हिंमत जमावाने केली नाही व त्या तरूणीचा जीव मात्र सर्वांसमोर गेला.

कोणत्या समाजात आम्ही जगत आहोत? आपण निर्मनुष्य ठिकाणी जाण्याचे टाळतो का तर माणसांच्या गर्दीत आपले एखाद्या संकटापासून संरक्षण होईल म्हणून. आता या भ्रमात राहण्यात काही अर्थ नाही. नेभळटांच्या गर्दीत स्वतःला सुरक्षित समजण्याचे काही कारण नाही. समाज माध्यमातून देशप्रेमावर मोठमोठया गप्पा मारणारे लोक अशा प्रसंगात चिडीचूप होतात. शेवटी देशप्रेम म्हणजे तरी काय? आपला देश हे एक कुटुंब आहे हे स्वीकारून या कुटुंबातील कुटुंब सदस्यांचे संरक्षण करणे यालाच तर देशप्रेम म्हणतात ना! कबूल आहे की त्यासाठी पोलीस व लष्कर या दोन कायद्याच्या यंत्रणा आपणच निर्माण केल्या आहेत. सीमेवर देशाचे लष्कर डोळ्यात तेल घालून उभे असते पण देशातंर्गत काय? पोलीस गलोगल्ली तैनात आहेत का? म्हणून तर फौजदारी कायद्यात स्वसंरक्षणाच्या (सेल्फ डिफेन्स) कायद्याची तरतूद आहे ना! पण या तरतूदीचा नेभळट समाजासाठी काही उपयोग नाही. हा समाज सर्व काही पोलिसांवर टाकून मोकळा राहतो.

पत्नी विरहातून पतीने आत्महत्या करणे हे सुद्धा बरोबर नाही असे मला वाटते. आत्महत्या करणाऱ्या पतीचे इतर कुटुंबीय आहेत असे बातमीतून कळते. मग आपल्या मुलाबाळांसाठी का जगू नये व मुले नसतील तर स्वतःसाठी का जगू नये? जीवनसाथी मध्येच अचानक गेल्यावर मागे एकट्याने जगणे हे खूप कठीण असते हे मान्य पण त्यावर आत्महत्या हा उपाय नव्हे.

वरील दोन्ही उदाहरणातून मानवी मन किती रागीट व किती कोमल असू शकते हे कळते. पण अतिरेक हा कधीही वाईटच मग तो सत्ता, संपत्तीचा असो की प्रेमाचा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.६.२०२४

माझे पोदार काॕमर्स काॕलेज!

माझे पोदार काॕमर्स काॕलेज!

हेच ते माझे रमणीरंजन आनंदीलाल पोदार काॕलेज आॕफ काॕमर्स अँड इकाॕनाॕमिक्स (थोडक्यात पोदार काॕमर्स काॕलेज), माटुंगा, मुंबई ज्या काॕलेजात १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात मी काॕमर्स पदवीचे शिक्षण घेतले. या काॕलेजची मजा नंतर ना सिडनॕहम काॕमर्स काॕलेज मधून कंपनी सेक्रेटरी (इंटर) चा पार्ट टाईम अभ्यासक्रम करताना आली ना गव्हर्मेंट लाॕ काॕलेज मधून तीन वर्षाची पदव्युत्तर कायद्याची पदवी (एलएल.बी.) घेताना आली.

पोदार काॕलेजचा माझ्या बॕचचा फक्त एकच अशोक सावंत नावाचा मित्र फेसबुक माध्यमातून सद्या माझ्या संपर्कात आहे. बाकी सगळे विखुरले गेले. काही मित्र परदेशात स्थायिक झाले. त्या काॕलेजची एकही मैत्रीण माझ्या बिलकुल संपर्कात नाही. मी राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) माध्यमातून या काॕलेजच्या समाज कार्यात सक्रिय होतो. पण अभ्यासू, गंभीर विद्यार्थी म्हणूनच काॕलेजमध्ये माझी ओळख होती व कदाचित त्यामुळे माझी काॕलेजच्या मुलींशी मैत्री तशी कमीच होती.

वर्गात अभ्यास वह्यांच्या माध्यमातून एका सुंदर मैत्रिणीशी छान जवळीक निर्माण झाली होती. पण नंतर तिचे व माझे कुठेतरी बिनसले आणि मग ती दूर झाली. वर्ग मैत्रिणीशी ही मैत्री सुरू असताना मी त्यावेळी प्रदर्शित झालेला सचिन पिळगावकर व रंजिता यांचा अखियों के झरोको से हा हिंदी चित्रपट सारखा बघत होतो. असो, ती गोड मैत्री सोडली तर मग काॕलेजच्या इतर कोणत्याही मुलीशी तशी मैत्री झालीच नाही. ती मैत्रीण आता कुठे असेल? असो, पण तिची गोड आठवण मात्र माझ्या जवळ कायम आहे.

माझा हा फोटो आमच्या पोदार काॕमर्स काॕलेजच्या गच्चीवरील टाॕवर खालील आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.६.२०२४

नैसर्गिक न्याय!

नैसर्गिक न्याय!

शब्दांचा फाफटपसारा वाढवत शब्दांतच अडकलेला व न्याय करू की नको या विचारातच अडकलेला कायदा न्याय करूच शकत नाही.  काही आणीबाणीच्या प्रसंगी न्याय त्वरीत (झटपट) मिळणे आवश्यक असते. पण इतर सर्वसाधारण परिस्थितीतही न्याय योग्य वेळेत मिळणे आवश्यक असते. न्याय हा प्रमाणबद्ध म्हणजे जेवढ्यास तेवढा व जशास तसा असावा लागतो व तो विनाविलंब म्हणजे योग्य वेळेत मिळावा लागतो म्हणजे कालबद्ध असावा लागतो. त्वरीत न्याय म्हणजे घाईघाईत दिलेला न्याय नव्हे. न्यायाचा नैसर्गिक कालावधी म्हणजे काय हे कळण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गर्भधारणा झाल्यावर बाळाच्या आईने किती काळ त्या बाळाला पोटात घेऊन रहावे याला नैसर्गिक कालमर्यादा आहे. स्त्रीच्या बाबतीत ती कालमर्यादा साधारण नऊ महिने आहे. हीच कालबद्ध न्यायाची गोष्ट निसर्गातील (निसर्गात मानव समाजही येतो) सर्व प्रकारच्या  न्यायात आहे मग त्याला नैसर्गिक न्याय म्हणा नाहीतर सामाजिक न्याय म्हणा. मानवनिर्मित कोणताही कायदा जो असा प्रमाणबद्ध व कालबद्ध न्याय देऊ शकत नाही तो अनैसर्गिक म्हणजे निसर्ग नियमांच्या विरूद्ध असलेला कायदा होय.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.६.२०२४

मंगळवार, १८ जून, २०२४

उत्क्रांती ही निसर्गाची हुकूमशाही प्रक्रिया!

निसर्गात होणाऱ्या बदलाशी जुळवून घेणाराच निसर्गात टिकून राहतो हा डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताचा सार आहे, याचा अर्थ उत्क्रांती ही दुतर्फी आहे, अगोदर निसर्गाकडून होणारा बदल व नंतर त्याच्याशी जुळवून घेण्याची कृती, पण ही कृती जुळवून घ्या नाहीतर निसर्गातून नष्ट व्हा या हुकूमशाही नियमाने निसर्ग अनिवार्य करतो, याचा अर्थ हाच की उत्क्रांती ही निसर्गाची हुकूमशाही प्रक्रिया आहे! -ॲड.बी.एस.मोरे

जीवघेणी स्पर्धा!

अबब, केवढी ही लोकसंख्या वाढ व केवढी मोठी ही जीवघेणी स्पर्धा!

महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरतीत १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज म्हणजे एका जागेसाठी सरासरी १०१ अर्ज, यातील ठाणे पोलीस दलातील ८०५ जागांसाठी ४६ हजारांहून अधिक अर्ज म्हणजे सरासरी प्रत्येक एका जागेसाठी ५७ अर्ज अशी लोकसत्ता दिनांक १८ जून २०२४ ची बातमी वाचून डोके गरगर फिरले. हे फक्त राज्यातील पोलीस दलातील भरती स्पर्धेचे चित्र. भारतात इतरत्र किती भयंकर परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. आणि काही महान लोक योगासने, मनःशांती प्रयोगांच्या क्लासेसची जाहिरात करीत आहेत. इथे हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळण्याची भ्रांत आणि म्हणे योगासने करा, मनःशांती मिळवा? आजूबाजूला आग लागलेली असताना मनःशांती कशी मिळेल? हल्लीची मुले, मुली याच जीवघेण्या स्पर्धेने निर्माण केलेल्या तणावाखाली जगत आहेत. परीक्षेत थोडे जरी गुण कमी पडले तरी नैराश्येने आत्महत्या करीत आहेत. असली भयानक परिस्थिती आजूबाजूला असताना असल्या संघर्षाला सामोरे जाण्याची गरज नसणारे काहीजण मजा करीत आहेत. खरं तर चैनीचे जीवन जगणाऱ्या लोकांनाच योगासने, मनःशांती वगैरे गोष्टींची गरज आहे. उपाशी राहणाऱ्या, भयानक वास्तव परिस्थितीने निर्माण केलेल्या तणावाखाली जगणाऱ्या लोकांना कसले योगासन आणि कसली मनःशांती? चैनीत जगणाऱ्या काही लोकांनी या गोष्टी खुशाल कराव्यात पण इतरांना या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करू नये.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.६.२०२४

तथ्ये व मिथके यांच्या संगतीत!

तथ्ये व मिथके यांच्या संगतीत जगणारा माणूस!

मानवी मेंदू निसर्गाने असा बनवलाय की तो जन्मापासून मरेपर्यंत विद्यार्थी राहतो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावस्थेत सर्व माणसांची ज्ञान शाळा सर्वसाधारणपणे एकच असते पण त्यानंतर पुढे महाविद्यालयीन व त्यापुढेही उच्च शिक्षणावस्थेत या ज्ञानशाळा निसर्गाच्या विविध ज्ञान शाखांनुसार बदलतात.

उच्च शैक्षणिक ज्ञानशाळांतून प्राप्त केलेल्या विविध ज्ञान शाखांतील विशेष ज्ञानानुसार माणसांच्या कार्यशाळाही विज्ञान संशोधन क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र, कायदा क्षेत्र, व्यवस्थापन क्षेत्र अशा बदलतात. जी माणसे उच्च शिक्षण घेत नाहीत अशा अल्पशिक्षित माणसांना एकतर सगळ्या कार्यशाळांतून कामगार, कारकून म्हणून काम करावे लागते किंवा त्यांच्याकडे नेतृत्व गुण असेल तर त्यांच्यासाठी राजकारणाची कार्यशाळा खुली असते व इतर काही अल्पशिक्षितांना कला, क्रीडा या कार्यशाळा खुल्या असतात. विशेष म्हणजे जवळ उच्च शिक्षण नसले तरीही राजकारण, कला व क्रीडा या कार्यशाळेतील माणसे इतर उच्च शिक्षितांच्या तुलनेत पैसा, रूबाब, मानसन्मान याबाबतीत फार पुढे असतात. अशी विशेष माणसे  सेलिब्रिटी म्हणून चमकत असतात. उद्योगधंदा करून श्रीमंत, अती श्रीमंत होण्यासाठीही तशी उच्च शिक्षणाची फार आवश्यकता नसते. जवळ पिढीजात पैसा, संपत्तीचे भांडवल असले की उद्योग, व्यापार, धंद्यासाठी उत्तमच!

ही माणसे विविध कार्यशाळेतून दोन गोष्टी प्रामुख्याने मिळवत असतात. एक म्हणजे अनुभवी ज्ञानार्जन व जगण्यासाठी अर्थार्जन. राजकारणी मंडळी या दोन गोष्टींसोबत सत्ताही मिळवतात. पण कोणताही माणूस सर्व गोष्टींचे ज्ञान मिळवून सर्व ज्ञान शाखांत पारंगत होऊ शकत नाही. ही मर्यादा निसर्गानेच माणसावर घातली आहे. लोकांची समज व आकलन एकसारखे नसल्याने बहुतेक सर्वच माणसे अर्धवट ज्ञानावस्थेत व अपूर्ण कार्यावस्थेत काही तथ्ये व काही मिथके यांच्या संगतीत जन्मापासून मरेपर्यंत जगत असतात. माणसे येतात व जातात पण त्यांच्या ज्ञानशाळा व कार्यशाळा कायम तशाच अबाधित राहतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.६.२०२४