https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
मंगळवार, १८ जून, २०२४
उत्क्रांती ही निसर्गाची हुकूमशाही प्रक्रिया!
जीवघेणी स्पर्धा!
अबब, केवढी ही लोकसंख्या वाढ व केवढी मोठी ही जीवघेणी स्पर्धा!
महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरतीत १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज म्हणजे एका जागेसाठी सरासरी १०१ अर्ज, यातील ठाणे पोलीस दलातील ८०५ जागांसाठी ४६ हजारांहून अधिक अर्ज म्हणजे सरासरी प्रत्येक एका जागेसाठी ५७ अर्ज अशी लोकसत्ता दिनांक १८ जून २०२४ ची बातमी वाचून डोके गरगर फिरले. हे फक्त राज्यातील पोलीस दलातील भरती स्पर्धेचे चित्र. भारतात इतरत्र किती भयंकर परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. आणि काही महान लोक योगासने, मनःशांती प्रयोगांच्या क्लासेसची जाहिरात करीत आहेत. इथे हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळण्याची भ्रांत आणि म्हणे योगासने करा, मनःशांती मिळवा? आजूबाजूला आग लागलेली असताना मनःशांती कशी मिळेल? हल्लीची मुले, मुली याच जीवघेण्या स्पर्धेने निर्माण केलेल्या तणावाखाली जगत आहेत. परीक्षेत थोडे जरी गुण कमी पडले तरी नैराश्येने आत्महत्या करीत आहेत. असली भयानक परिस्थिती आजूबाजूला असताना असल्या संघर्षाला सामोरे जाण्याची गरज नसणारे काहीजण मजा करीत आहेत. खरं तर चैनीचे जीवन जगणाऱ्या लोकांनाच योगासने, मनःशांती वगैरे गोष्टींची गरज आहे. उपाशी राहणाऱ्या, भयानक वास्तव परिस्थितीने निर्माण केलेल्या तणावाखाली जगणाऱ्या लोकांना कसले योगासन आणि कसली मनःशांती? चैनीत जगणाऱ्या काही लोकांनी या गोष्टी खुशाल कराव्यात पण इतरांना या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करू नये.
-©ॲड.बी.एस.मोरे, १९.६.२०२४
तथ्ये व मिथके यांच्या संगतीत!
तथ्ये व मिथके यांच्या संगतीत जगणारा माणूस!
मानवी मेंदू निसर्गाने असा बनवलाय की तो जन्मापासून मरेपर्यंत विद्यार्थी राहतो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावस्थेत सर्व माणसांची ज्ञान शाळा सर्वसाधारणपणे एकच असते पण त्यानंतर पुढे महाविद्यालयीन व त्यापुढेही उच्च शिक्षणावस्थेत या ज्ञानशाळा निसर्गाच्या विविध ज्ञान शाखांनुसार बदलतात.
उच्च शैक्षणिक ज्ञानशाळांतून प्राप्त केलेल्या विविध ज्ञान शाखांतील विशेष ज्ञानानुसार माणसांच्या कार्यशाळाही विज्ञान संशोधन क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र, कायदा क्षेत्र, व्यवस्थापन क्षेत्र अशा बदलतात. जी माणसे उच्च शिक्षण घेत नाहीत अशा अल्पशिक्षित माणसांना एकतर सगळ्या कार्यशाळांतून कामगार, कारकून म्हणून काम करावे लागते किंवा त्यांच्याकडे नेतृत्व गुण असेल तर त्यांच्यासाठी राजकारणाची कार्यशाळा खुली असते व इतर काही अल्पशिक्षितांना कला, क्रीडा या कार्यशाळा खुल्या असतात. विशेष म्हणजे जवळ उच्च शिक्षण नसले तरीही राजकारण, कला व क्रीडा या कार्यशाळेतील माणसे इतर उच्च शिक्षितांच्या तुलनेत पैसा, रूबाब, मानसन्मान याबाबतीत फार पुढे असतात. अशी विशेष माणसे सेलिब्रिटी म्हणून चमकत असतात. उद्योगधंदा करून श्रीमंत, अती श्रीमंत होण्यासाठीही तशी उच्च शिक्षणाची फार आवश्यकता नसते. जवळ पिढीजात पैसा, संपत्तीचे भांडवल असले की उद्योग, व्यापार, धंद्यासाठी उत्तमच!
ही माणसे विविध कार्यशाळेतून दोन गोष्टी प्रामुख्याने मिळवत असतात. एक म्हणजे अनुभवी ज्ञानार्जन व जगण्यासाठी अर्थार्जन. राजकारणी मंडळी या दोन गोष्टींसोबत सत्ताही मिळवतात. पण कोणताही माणूस सर्व गोष्टींचे ज्ञान मिळवून सर्व ज्ञान शाखांत पारंगत होऊ शकत नाही. ही मर्यादा निसर्गानेच माणसावर घातली आहे. लोकांची समज व आकलन एकसारखे नसल्याने बहुतेक सर्वच माणसे अर्धवट ज्ञानावस्थेत व अपूर्ण कार्यावस्थेत काही तथ्ये व काही मिथके यांच्या संगतीत जन्मापासून मरेपर्यंत जगत असतात. माणसे येतात व जातात पण त्यांच्या ज्ञानशाळा व कार्यशाळा कायम तशाच अबाधित राहतात.
-©ॲड.बी.एस.मोरे, १८.६.२०२४
सोमवार, १७ जून, २०२४
माणसांमुळे पृथ्वी बनलीय आगीचा गोळा!
माणसांमुळे पृथ्वी बनलीय आगीचा गोळा!
स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचीच काय पण जगाची लोकसंख्या किती होती, त्याही पूर्वी प्राचीन, अर्वाचीन काळात ती किती होती? आजच्या तुलनेने ती खूपच कमी होती. पण मानवी स्वभाव आज जसा आहे तसाच पूर्वीही स्वार्थी, लोभी, मत्सरी व अहंकारी होता. त्यातून जगण्याची व दुसऱ्यावर सत्ता गाजविण्याची स्पर्धा, ईर्षा व त्यातून भांडणे, युद्धे या गोष्टी तेव्हाही होत्या. विचार करा या सर्व तापदायक गोष्टी लोकसंख्या वाढीने किती प्रमाणात गुणाकाराने वाढल्या असतील व त्यामुळे ही पृथ्वी माणसांच्या इच्छा, आकांक्षा, राग, लोभ, द्वेष, अहंकार इत्यादींच्या स्फोटक वातावरणामुळे किती मोठा आगीचा गोळा झाली असेल?
-©ॲड.बी.एस.मोरे, १८.६.२०२४
रविवार, १६ जून, २०२४
PERSPECTIVES IN RELATION TO GOD AND NATURE CANNOT BE THE SAME!
MY AI CONVERSATION!
निसर्गाचे मेंदूमन हीच निसर्गाची वैज्ञानिक व आध्यात्मिक महाशक्ती?
निसर्गाचे मेंदूमन हीच निसर्गाची वैज्ञानिक व आध्यात्मिक महाशक्ती?
मानवी शरीर अनेक अवयवांनी बनले आहे. या सर्व अवयवांत मेंदू हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रमुख अवयव आहे. या प्रमुख अवयवाला माहिती पुरवणारे डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा हे पाच अवयव मेंदूसाठी ज्ञान गोळा करणारे अवयव असल्याने त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. त्यानंतर हृदय, किडनी यासारखे महत्वाचे अवयव येतात व नंतर इतर अनेक अवयव येतात. या सर्व अवयवांची मिळून शरीर व्यवस्था बनली आहे. शरीराचा मेंदू हा प्रमुख अवयव पाच ज्ञान अवयवांकडून/ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शरीराच्या संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो.
मानवी शरीर अवयवांच्या शरीर व्यवस्थेचा धागा पकडून निसर्ग हे प्रचंड मोठे शरीर आहे असे मानले व ग्रह, तारे, इतर पदार्थ यांना या शरीराचे अवयव मानले तर मग या अवयवांची निसर्ग व्यवस्था समोर येते. आता पुढील महत्वाचा प्रश्न हा की या निसर्ग व्यवस्थेचे नियंत्रण करणारा निसर्गाचा मेंदू हा प्रमुख निसर्ग अवयव कुठे शोधायचा? त्यासाठी निसर्ग शरीराचे डोके व या डोक्याची कवटी शोधावी लागेल. कारण या कवटीतच निसर्गाचा मेंदू असणार.
मानवी शरीराचा मेंदू हा प्रमुख अवयव हा या शरीराचा एक मांसल भाग आहे जो माणसाच्या डोक्याच्या कवटीत असतो. मेंदू नावाच्या या मांसल भागाची पेशी, रासायनिक व विद्युत रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. मेंदू नावाच्या मांसल भागाच्या या गुंतागुंतीच्या रचनेतच मानवी मन असते. हे मेंदूमन म्हणजे सूक्ष्म मानसिक शक्तींचे गुंतागुंतीचे जाळे आहे ज्याची एक विशिष्ट कार्यशैली आहे.
निसर्गाचे डोके, त्या डोक्याची कवटी व त्या कवटीतील निसर्गाचा मेंदू सापडल्याशिवाय त्या निसर्ग मेंदूची रचना, त्या रचनेतील निसर्गाचे मेंदूमन व त्या मेंदूमनाची कार्यशैली कशी कळेल? निसर्गाच्या मेंदूमनाची कार्यशैली दोन प्रकारची आहे का? म्हणजे एक वैज्ञानिक कार्यशैली व दोन आध्यात्मिक कार्यशैली? तसे असेल तर वैज्ञानिक कार्यशैलीच्या भागाचे नामकरण निसर्ग मन व आध्यात्मिक कार्यशैलीच्या भागाचे नामकरण निसर्ग आत्मा (परमात्मा) असे करावे का? मानवी मनाचे सुद्धा दोन भाग आहेत. ते म्हणजे तार्किक मन (लाॕजिकल माईंड) व भावनिक मन (इमोशनल माईंड). तशीच काहीशी विभागणी निसर्ग मनाची असेल का? म्हणजे निसर्ग मनाचा एक भाग हा वैज्ञानिक भाग व निसर्ग मनाचा दुसरा भाग हा आध्यात्मिक भाग? मग माणसांनी एका बाजूने निसर्ग विज्ञानाच्या माध्यमातून निसर्ग मनाच्या वैज्ञानिक भागाचा सराव (प्रॕक्टिस) व दुसऱ्या बाजूने अध्यात्म धर्माच्या माध्यमातून निसर्ग मनाच्या आध्यात्मिक भागाचा सराव (प्रॕक्टिस) करावा का? निसर्गाचे मेंदूमन हीच निसर्गाची वैज्ञानिक व आध्यात्मिक महाशक्ती असे मानावे का?
-©ॲड.बी.एस.मोरे, १६.६.२०२४