मेंदू एक विषय अनेक!
निसर्गाने सृष्टीच्या उत्क्रांती प्रक्रियेत माणसाला पर्यावरण साखळीत उच्च स्थानावर आणून ठेवले आहे. त्यातून परिस्थिती अशी निर्माण झाली की माणसाचा मेंदू एक पण त्याच्यापुढे वाढून ठेवलेले पर्यावरणीय विषय अनेक. या अनेकविध विषयांना नीट हाताळता यावे म्हणून निसर्गाने मानवी मेंदू इतर प्राण्यांपेक्षा जास्त विकसित केला. एकीकडून निसर्गाने पर्यावरणाचा विकास केला तर दुसरीकडून मानवी मेंदूचा.
पण हा विकसित मेंदू निसर्गानेच निर्माण केलेल्या अनेक विषयांना झेलण्यासाठी खरंच समर्थ आहे का? निसर्गाचा एकेक विषयच एवढा मोठा व किचकट की त्यात जेवढे खोल जावे तेवढा त्यात मेंदू अधिकाधिक गुंतत व रूतत जातो. एकच विषय संपता संपत नाही. मग आयुष्याच्या मर्यादित काळात व दिवसाच्या मर्यादित वेळेत मानवी मेंदू दुसऱ्या विषयांकडे लक्ष कसे व किती देणार?
माणसाच्या दैनंदिन क्रिया कितीतरी असतात. एका विषयाला जास्त महत्व द्यावे तर इतर विषय रडत, वाट बघत बसतात. बाबा, विषय संपव व दुसऱ्या विषयाकडे वळ असे मेंदूनेच मेंदूला बजावले तरी घाईघाईने एखादा विषय संपवून टाकून दुसऱ्या विषयाकडे वळावे असे मेंदूला वाटत नाही. काम, काळ व वेग यांचे व्यवस्थापन करताना कामांचा प्राधान्य क्रम ठरवावा असे सांगितले जाते. पण काहीवेळा सगळ्याच गोष्टींना पूर्ण करण्याची गरज असते. उदाहरणार्थ, झोपेतून उठल्यावर शौचकर्म, व्यायाम, दात घासणे, अंघोळ, नाष्टा, अंगावर कपडे घालणे या गोष्टी तशा एकत्रच, एका पाठोपाठ एक लगेच कराव्या लागतात. पहिले काम संपते ना संपते तोपर्यंत दुसरे काम वाट बघत उभे असते. अशावेळी मेंदूला किती घाईत एकेक काम करावे लागते हे त्या मेंदूलाच माहीत. अशावेळी एखाद्या माणसाच्या मेंदूला प्रत्येक विषय व्यवस्थित हाताळण्याची व प्रत्येक काम अचूक (परफेक्ट) करण्याची सवय असेल तर? गेला ना असा मेंदू बाराच्या भावात! तसे पाहिले तर लोकांसाठी हा विषय म्हणजे छोटा विषय व त्यामुळे ते याचा जास्त विचार करीत नाहीत. पण हा काटेकोर (परफेक्शनीस्ट) माणसासाठी गंभीर विषय आहे.
एखाद्या औद्योगिक किंवा व्यापारी संस्थेचा मालक त्याच्या उद्योग धंद्यात अनेक विषयांच्या तज्ज्ञांची नेमणूक करतो. कारण तो सगळ्या विषयांत पारंगत नसतो. तसा तर कोणताच माणूस सगळ्या विषयांत पारंगत असू शकत नाही. मनुष्य जीवनाला स्पर्श करणारे विषय इतके विविध व अनेक आहेत की कोणालाही या सर्व विषयांना पूर्ण न्याय देता येत नाही आणि ही खंत मरेपर्यंत कायम राहते. काही थोडे विषय सोडले तर बरेच विषय संपता संपत नाहीत. ते कायम अर्धवटच राहतात. बाबा, संपव ना तो विषय एकदाचा असे वाक्य आपण समाज जीवनात कित्येकदा ऐकतो. पण एखादा विषय संपवला म्हणून सर्व विषय संपत नाहीत. बरेच विषय आयुष्यभर अर्धवटच राहतात आणि त्यामुळे माणूस कायम असमाधानी राहतो.
-©ॲड.बी.एस.मोरे, १५.६.२०२४