निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत हेच निसर्ग आपल्याला शिकवतोय!
निसर्गाकडे असलेला पदार्थांचा कच्चा माल मुळातच मर्यादित आहे. त्यातून तो बनवून बनवून तरी किती नवीन नवीन पदार्थ बनवत राहणार? तरी त्याची कमालच म्हणायची. याच कच्च्या मालातून त्याने कितीतरी विविध गुणधर्मी निर्जीव व सजीव
पदार्थ निर्माण करून निर्जीव-सजीव पदार्थांचे प्रचंड मोठे विश्व निर्माण केले आहे. निसर्ग व विश्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? की त्या एकच आहेत? म्हणजे निसर्गानेच निसर्ग बनवला किंवा विश्वानेच विश्व बनवले का? काही ठोस सांगता येत नाही. शेवटी निसर्ग व विश्व यांना एक मानले तरी त्याहून कोणती तरी मोठी शक्ती (चैतन्यशक्ती) निसर्ग किंवा विश्वात अस्तित्वात असावी व ती सर्वशक्तीमान असल्याने तिलाच तार्किक अंदाजाने परमेश्वर मानावे का? आणि तसे मानले तरी या चैतन्यशक्तीची आध्यात्मिक भक्ती, तपस्या, आराधना, प्रार्थना किंवा इतर धार्मिक कर्मकांडे करून ती प्रसन्न होते का व प्रसन्न होऊन तिनेच निर्माण केलेल्या परिस्थितीत, सृष्टी रचनेत, सृष्टी व्यवस्थेत भक्तांच्या सोयीनुसार बदल करते का, हे प्रश्न बुद्धिमान मानवी मनाला पडतातच.
विविध गुणधर्मी विविध मूलद्रव्यांचा एक निर्जीव अणू ते अनेक निर्जीव अणू यांच्या पासून बनलेले निर्जीव पदार्थांचे निर्जीव विश्व व एक सजीव पेशी ते अनेक सजीव पेशी यांच्या पासून बनलेले सजीव पदार्थांचे सजीव विश्व व या दोन विश्वांना नियमबद्ध करणारी निसर्ग व्यवस्था ही निसर्गाची अजब निर्मिती आहे.
या प्रचंड मोठ्या सजीव, निर्जीव विश्वांना नियमबद्ध करणाऱ्या निसर्ग व्यवस्थेत प्रामुख्याने तीन नैसर्गिक प्रक्रिया आढळून येतात. त्या म्हणजे पुनर्निर्माण, परिवर्तन, देवाणघेवाण. एखाद्या पदार्थाची त्याच प्रकारच्या पदार्थात पुनर्निर्मिती होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला पुनर्निर्माण असे म्हणतात. उदाहरणार्थ, स्त्री आणि पुरूषाच्या लैंगिक प्रक्रियेतून पुन्हा मनुष्याचीच निर्मिती होण्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे पुनर्निर्माण प्रक्रिया. दुसरी नैसर्गिक प्रक्रिया परिवर्तनाची. एखाद्या पदार्थाचे रूपांतर वेगळ्या प्रकारच्या पदार्थात होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला परिवर्तन असे म्हणतात. उदाहरणार्थ सजीव मानवी शरीराचे रूपांतर मृत्यूने निर्जीव शरीरात होण्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे परिवर्तन प्रक्रिया. या परिवर्तन प्रक्रियेत मानवी शरीर हळूहळू बाल व तरूण अवस्थेतून वृद्धावस्थेत म्हणजे मृत्यूच्या जवळ जाण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे.
पुनर्निर्माण व परिवर्तन या दोन प्रक्रियांच्या मध्ये तिसरी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती म्हणजे आंतर पदार्थीय देवाणघेवाण प्रक्रिया. उदाहरणार्थ, जिवंतपणी मानवी शरीराने हवेतील प्राणवायू आत घेऊन कार्बन वायू हवेत सोडणे ही श्वासोच्छवास प्रक्रिया, निसर्गातील अन्न, पाणी शरीरात घेऊन विष्ठा बाहेर टाकण्याची पचन प्रक्रिया, स्त्री व पुरूष यांच्यातील लैंगिक संभोग प्रक्रिया, आंतर मानवी ज्ञानकारण, अर्थकारण, राजकारण यासारख्या सामाजिक प्रक्रिया, या सर्व आंतर पदार्थीय देवाणघेवाण प्रक्रिया होत. अर्थात, आंतर मानवी सामाजिक देवाणघेवाण प्रक्रिया ही सुद्धा खोल अर्थाने आंतर पदार्थीय नैसर्गिक देवाणघेवाण प्रक्रिया होय. विशेष म्हणजे पुनर्निर्माण, परिवर्तन व देवाणघेवाण या तिन्ही नैसर्गिक प्रक्रिया एकमेकांशी संलग्न आहेत. उदाहरणार्थ, मुलामुलींचे लग्नाच्या वयात येणे हा परिवर्तन प्रक्रियेचा भाग आहे, वयात आल्यावर लग्न करून स्त्री पुरूषांनी त्यांच्या लैंगिक संबंधातून मुलामुलींना जन्म देणे हा पुनर्निर्माण प्रक्रियेचा भाग आहे तर स्त्री पुरूषांमधील लैंगिक-सांसारिक देवाणघेवाण हा आंतर पदार्थीय देवाणघेवाण प्रक्रियेचा भाग आहे.
निसर्गातील सर्व सजीव, निर्जीव पदार्थ या तीन प्रक्रियांत चक्राकार फिरत असतात. सागरी खारट पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन (बाष्पीभवन) तिच्यापासून पिण्यास योग्य असलेल्या गोड्या पाण्याचा पाऊस पडणे ही निर्जीव पदार्थांची पुनर्निर्माण प्रक्रिया होय. मूलद्रव्यांच्या रासायनिक क्रियेतून त्यांचे संयुग (कम्पाऊंड) पदार्थात रूपांतर होणे ही निर्जीव पदार्थांची परिवर्तन प्रक्रिया होय. वनस्पतींनी जमिनीतील पोषक पदार्थ, सूर्याची उष्णता, पावसाचे पाणी घेऊन फुले व फळांची निर्मिती करणे ही निर्जीव व अर्धसजीव वनस्पतींमधील देवाणघेवाण प्रक्रिया होय. याचा अर्थ सजीव व निर्जीव हे दोन्ही प्रकारच्या पदार्थांना पुनर्निर्माण, परिवर्तन व देवाणघेवाण या तिन्ही प्रक्रियांतून जावे लागते. या तिन्ही प्रक्रियांचे सुद्धा एक चक्र बनले आहे व या चक्रापासून कोणताही पदार्थ मुक्त नाही मग माणसाने जीवनचक्र प्रक्रियेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी किंवा या चक्रातून मुक्ती मिळविण्यासाठी महान परमेश्वराची (चैतन्यशक्तीची) कितीही प्रार्थना केली तरी काही फरक पडत नाही. विज्ञान व धर्मातील हाच तर मोठा फरक आहे.
निसर्ग चक्र व निसर्ग नियम यांच्या वर कोणत्याही पदार्थाचे नियंत्रण नाही. निसर्गाने फक्त माणूस हाच असा प्राणी घडवलाय की तो त्याच्या बुद्धीने (बौध्दिक शहाणपणाने) या निसर्ग चक्राचे व निसर्ग नियमांचे योग्य किंवा त्याला सोयीस्कर असे व्यवस्थापन करू शकतो. माणसाने त्याच्या बौद्धिक शहाणपणाच्या जोरावर पृथ्वीवरील निसर्गसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले आहे ज्या मर्यादित राज्याचा तो मर्यादित राजा झाला आहे व हे राजेपण तो निसर्गाच्या परवानगीने मिरवतो. या मर्यादित राज्याचे कायदे मानवाने स्वतःच्या सोयीसाठी खास बनवले व मग कायद्याचे राज्य असे या राज्याचे नामकरण केले. पण मानवनिर्मित कायदे हे निसर्ग नियमांना म्हणजे निसर्ग कायद्याला बांधील आहेत ही गोष्ट विसरता कामा नये.
निसर्गाचे पदार्थीय विश्व, या विश्वाची हालचाल निसर्ग नियमांनी बनलेल्या ज्या निसर्ग व्यवस्थेने होते ती निसर्ग व्यवस्था या सर्व गोष्टींचे ज्ञान तेच विज्ञान. निसर्ग विशाल तसे त्याचे निसर्ग विज्ञानही विशाल. पुनर्निर्माण व त्याबरोबर परिवर्तन, देवाणघेवाण या प्रक्रियांतून निसर्गातील पदार्थ विश्वाची होणारी हालचाल कधीकधी मानवी मनाला रटाळ वाटते. तेच ते पदार्थ, तीच तीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा पाहून मानवी मनाला निसर्गाचा व मानवी आयुष्याचा कंटाळा येऊ शकतो. कारण काही काळानंतर त्यातले नाविन्य संपल्याने त्यातील उत्सुकता, रस संपून जातो. काही माणसे तर असा रस संपल्याने नैराश्येत जाऊन आत्महत्या करतात तर काही माणसे विरक्ती येऊन संन्यास घेतात. पण शहाणा माणूस नैराश्य व संन्यास या दोन्ही गोष्टींना जवळ करणार नाही. त्यासाठी तो सुज्ञ विचार करेल की शेवटी निसर्ग तरी करून करून काय करील? त्याच्याकडील मूलभूत कच्चा माल जर कायम तोच राहणार असेल तर त्यातून तो किती नवीन नवीन पदार्थ बनवत राहणार? तसेच निसर्ग नियम व निसर्ग व्यवस्थेत तरी तो काय आणि किती बदल करणार? अर्थात निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत. मग त्याच्याकडून माणसाने जास्त अपेक्षा करणे चुकीचे नव्हे काय? तेव्हा निसर्गाकडून आपल्या अपेक्षा कमी करा, मागण्या कमी करा, निसर्गाचे पर्यावरण बिघडवू नका व नैसर्गिक दुःखातही नैसर्गिक आनंद शोधून आनंदात जीवन जगा. निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत हेच निसर्ग आपल्याला शिकवतोय.
-©ॲड.बी.एस.मोरे, ९.६.२०२४